Sunday 11 December 2022

राहत्या शहराचे लागेबांधे ०७

ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण हळूहळू माघार घेऊ लागतो. बागेत दुडदुडताना पुढे धाव घेऊन आजोबाची फरफट करणाऱ्या वांड पोरासारखं सुटवंग होऊन आपलं डोकं कधी आपल्यापुढे चार पावलं धावत सुटतं, तर कधी आपल्यामागे रेंगाळू लागतं. एक मात्र करायचं. कुठे जायचं त्याचं अजिबात नियोजन करायचं नाही. अक्षरशः वाट फुटेल तिकडे घरंगळत सुटलो, की आपल्या मूडला खेळकर वळणं देणारे रस्ते आपसुख पायाखाली येऊ लागतात. 


पायाखालचं शहर असलं की काही रस्ते निरनिराळ्या काळातल्या रूटीनची साक्ष देतीलसे चाकोरीबद्ध झालेले असतात. पण अशा वेळी त्यांना किंचित चकवावं. ज्या गल्ल्यांची तोंडं कधीच पाहिली नाहीत, अशांना हॅलो करावं. कधी डेड एण्ड लागून फसगत होते, तर कधी चक्क एखादा बहरलेला कैलासपती भेटून चकित करतो. कुठे जुन्याजाणत्या डेरेदार झाडाच्या पोपटी पानांतून सांडणारं जरतारी ऊन. अशा वेळी लागलेल्या डेड एण्डांनाही घरगुती स्वभाव असतो. रेंगाळत रेंगाळत थबकलेल्या गल्लीच्या टोकापाशी निव्वळ धूळ खात पडलेल्या अजस्त्र चारचाकी धुडांची गर्दी न मिळता एखादं अजूनही सिमेंटचा बट्टा न लागलेलं मातीचं अंगण आणि व्हरांडा लागतो. येणार्‍या-जाणार्‍यावर चष्मिष्ट लक्ष्य ठेवून असणारा एखादा खडूस म्हातारा दिसतो कुठे. कुठे चक्क कांदाभज्यांचा खमंग वास आणि निवांतपणे नाश्ता करणारे चुकार कष्टकरी. तिथे थांबण्याचा मोह होणं साहजिक. पण असे थांबे घेऊ नयेत. चांगली लागलेली तार त्यानं विस्कटू शकते. अशा शांत गल्लीतून आपण एकाएकी रहदारीनं गजबजलेल्या आणि अगदी सरावाच्या हमरस्त्यावर येऊन ओतले जातो, तेव्हा त्या रस्त्याची निराळीच बाजू दिसून दचकायला होतं. नि 'अरेच्चा! बबनचा वडापाव इथे मिळायला लागला होय हल्ली! तरीच तिकडची टपरी बंद दिसते!'प्रकारचे सुखद धक्के मिळतात. काही निखळ नॉस्टाल्जियाच्या गल्ल्या घ्याव्यात. मात्र त्यात किंचित जोखीम असते. आपण अक्षरशः वीसेक वर्षं मागच्या पाण्यात पाय बुडवून शांत होऊन बाहेर येऊ शकतो, वा 'छे! किती इमारती उगवल्या इतक्यात इकडे! आता दोन्ही बाजूंनी अंगावर आल्यासारखं होतंय. नि इथले दोन एकमेकांवर ओठंगलेले गुलमोहोर काय झाले? साले हरामी बिल्डर्स!' अशी तणतणही होऊ शकते. त्यामुळे जरा जपून. कधी मात्र आपला जुना भडभुंजा जसा आठवणीत होता तसाच्या तसाच दिसून चपापायला होतं आणि मग एकदम 'ओह! हा त्याचा मुलगा असणार!' हे ध्यानात येऊन सातत्यसाखळीनं आश्वस्त नि अचंबित असं दोन्ही वाटतं. काही रस्ते आपला तुळशीवृंदावनी स्वभाव सोडून एकदम मुरकी मारत, पान चघळत चहाटळ झालेले असतात. त्यानं विषण्ण व्हायला होतं. कधीकधी मात्र त्या तसल्या रस्त्यांवरही एखादंच जुनं रुपडं आणि ठणठणीत तब्बेत राखून असलेलं एखादं कौलारू घर खास आपल्याला दिलासा द्यायला थांबल्यासारखं थबकून राहिलेलं भेटतं. त्यानं एकदम खुशालल्यासारखं होतं. असे कोपरे भेटले, की आपण पुढे निघालो तरी मन मागेच रेंगाळतं. त्याचा पाय निघत नाही. पण आपण त्याचे लाड न करता साळसूदपणे पुढे निघायचं. कधी काही इमारती निव्वळ नसलेपणामुळे खिन्न करतात. 'या इथल्या कोपर्‍यावरून जाताना 'नववी अ'च्या वर्गाच्या खिडकीचा कोपरा दिसायचा...' असं आठवतं नि तिथे आता अवतरलेला 'अमुकतमुक नगरसेविकेच्या कृपेनं सेल्फी पॉइंट' बघून जग चंगळवादानं विटाळल्यासारखं अस्वच्छ-अशुद्ध वाटायला लागतं. पण हेही औटघटकेचंच. चार पावलं पुढे गेल्यावर सळसळत्या पिंपळातून नाचणारे उन्हाचे कवडसे टिपायला आपणही म्यानातून मोबाईल उपसतोच. चंगळवाद किंवा रसिकता, जो जे वांछील तो ते लाहो! 


मूड्सची अशी अनपेक्षित-खेळकर वळणं घेत हळूहळू पावलं आपसुख आपल्या हक्काच्या टपरीवाल्याकडे वळतात. अशा वेळी लाभलेल्या कटिंगशी स्पर्धा करणारं पेय अजून जन्मायचं आहे. ते घशाखाली उतरताना ग्लोबल कंटाळ्याचे ढग उडून गेलेले असतात. लख्ख मऊ ऊन पडलेलं असतं.


Friday 9 December 2022

बुजरी गाणी ०७

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.


चहूबाजूंनी खिडक्या आणि व्हरांडे असलेलं, वाहत्या रस्त्यावरचं, मुंबईमधलं चौकातलं घर. जुन्या पद्धतीची तावदानं, दोन पाखे असलेली दारं नि खिडक्या, गज, फरश्या, बटणं... सगळं सुस्थित, मध्यमवर्गीय, शहरी, सुसंस्कृत आयुष्याची ग्वाही देणारं. माधुरीचा नेहमीचा हेअरकट बाजूला ठेवून उंच पोनीटेल. मिनिमलिस्टिक लुक असलेला मेकप. नायक आणि नायिकेचे कपडेही किती मृदू रंगांचे, घराच्या भिंतींच्या पिवळसर पांढरा रंगात मिसळून जाणारे, एकमेकांच्या कपड्यांशी नातं सांगणारे असावेत! नायकाचा प्लेन पिवळा टीशर्ट आणि नायिकेच्या पांढर्‍याशुभ्र खमीसवर पिवळ्या रंगाची ओढणी. 


या सगळ्या रंगसंगतीचं गाण्याच्या मूडशी अतिशय जवळचं नातं आहे खरं. पण त्या सगळ्या मूडचा टेकऑफ आहे, ती अनिल कपूरची माधुरीकडे बघणारी नजर. त्या नजरेत वासनेचा लवलेशही नाही. एरवी 'पायली छुनमुन'सारख्या नितांत प्रेमभरल्या गाण्यात तब्बूची साडी भिजवल्यावर तिच्यामागे झेप घेणारा अनिल कपूर सावजामागून झेप घेणार्‍या वाघासारखा भासतो. पण इथे मात्र त्याच्या नजरेत निखळ मृदुता आहे. तहानेनं व्याकूळ होऊन खूप वणवणलेल्या माणसाला नितळ-निवळशंख पाण्याचा झरा दिसावा आणि तो पाहिल्यावर त्याकडे झेपावण्याऐवजी 'वणवण संपली' या भावनेनं, श्रांत समाधानानं त्यानं जागीच किंचित थबकावं तसे भाव त्याच्या माधुरीकडे बघणार्‍या नजरेत आहेत. ती त्याच्याकडे काही क्षणच अविश्वासानं, अप्रूपानं बघते आणि त्याच्या मिठीत धाव घेते. इथून त्या गाण्याचा सूर जो काही लागतो, तो लागतो! 


मग एकमेकांभोवती रुंजी घालण्यात जग विसरलेल्या दोन लव्हबर्ड्ससारखा सगळा नूर. घराभोवतीचं अविश्रांत वाहतं जग आणि त्या जगाच्या मधोमध एखाद्या बेटासारखं असलेलं ते घर. सगळ्या जोखमी आणि दुःखं आणि संकटं यांच्या समुद्रात दोन माणसांनी एकमेकांसाठी सावरून धरलेल्या आडोश्यासारखं. त्या नेपथ्यानं हा भाव अधोरेखित होतो आणि मग अनिल कपूर-माधुरीच्या फक्त एकमेकांसाठी एकमेकांवरच जडलेल्या नजरा तो कुठल्या कुठे घेऊन जातात. 


तिचं त्याच्यासाठी रांधणं, त्यानं तिच्या - अहं, त्यांच्या! - घराची डागडुजी करणं, त्यात खेळकरपणे तिनं मदत देऊ करणं आणि त्याच्याकडे टक लावून बघताना काहीतरी धसमुसळेपणा करणं, त्याचं लुटूपुटूचं चिडणं, शिक्षा दिल्याच्या आविर्भावात तिची नजर चुकवून तिच्या बोटात अंगठी घालणं... आणि त्यानं विभोर होऊन तिनं अक्षरशः घेतलेली गिरकी! 


लहानपणीच्या आठवणदृश्यांनी अधिकच गहिरी केलेली त्यांची एकरूपता, दिवे गेल्यावरच्या अंधारात आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच भारला गेलेला अवकाश, त्यातलं त्यांचं चोरटं पण अश्लील न भासता अधिकच सुंदर भासणारं सेमी-चुंबन.


दर ला-ला-ला वर आणि 'ऐसा लगा'मधल्या 'गा'वर आशा भोसल्यांनी घेतलेल्या अशक्य मोहक गिरक्या; विधूविनोद चोप्राचा ट्रेडमार्क असा, 'इन्स्पायर्ड-बाय-मधुबाला' असा ठळक शिक्का असलेला, माधुरीचा एकंदर लुक; आणि आशा भोसल्यांच्या सुराला कोंदण केल्यासारखा नि अनिल कपूरच्या हळव्या मुडाला साजून दिसणारा सुरेश वाडकरांचा आवाज. 


या गाण्यात न्यून शोधणं अशक्य आहे. म्हणून की काय, गाण्याच्या अखेरीस माधुरीनं अनिल कपूरच्या बोटात घालू पाहिलेल्या अंगठीचं माप चुकल्याचं कळतं नि अपशकुन खरा ठरल्यासारखी दारावरची बेल वाजते. सुखस्वप्नात अडथळा आणून दिग्दर्शकानंच गालबोट लावण्याचं काम केलं आहे असा भास होतो आणि तंद्री भंगते... 

~




तुम से मिल के, 

ऐसा लगा तुम से मिल के

अरमां हुये पुरे दिल के 

ऐ मेरी जान-ए-वफ़ा 

तेरी मेरी मेरी तेरी, एक जान है 

साथ तेरे रहेंगे सदा, 

तुम से ना होंगे जुदा 

तुम से मिल के, ऐसा लगा तुम से मिल के

अरमां हुये पुरे दिल के…

मेरे सनम, 

तेरी कसम, 

छोड़ेंगे अब ना ये हाथ 

ये जिन्दगी गुजरेगी अब

हमदम तुम्हारे ही साथ

अपना ये वादा रहा, 

तुम से ना होंगे जुदा

तुम से मिल के, 

ऐसा लगा तुम से मिल के

अरमां हुये पुरे दिल के…

मैंने किया 

है रातदिन 

बस तेरा ही इंतज़ार 

तेरे बिना आता नहीं 

एक पल मुझे अब करार 

हमदम मेरा मिल गया  

हम तुम ना होंगे जुदा 

तुम से मिल के 

ऐसा लगा तुम से मिल के...

~


नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 




Wednesday 7 December 2022

बुजरी गाणी ०६

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.


या गाण्याचं सगळ्यांत मोठं अपील म्हणजे यातले अमरिश पुरी. कनिष्ठ मध्यमवर्गीय, करारी, प्रेमळ बापपण त्यांच्या सगळ्या देहबोलीतून जाणवतं. पोराकडून व्यायाम काय करून घेतात, त्याला घड्याळ काय आणतात, त्याला शहाळ्याचं पाणी काय प्यायला लावतात, त्याच्या डाएटवर काय लक्ष्य ठेवतात, पोराला साहेबाची कॅप घालून डोळे भरून बघतात काय, त्याला भरवतात काय, त्याच्यावर प्रेमानं काठी काय उगारतात... त्यांच्या डोळ्यातलं लोभस प्रेम बघून जितकं सुखावायला होतं, तितकंच जॅकी श्रॉफचं लाड करून घेणं बघतानाही सुखावायला होतं. या बाप-लेकांमध्ये नुसती शिस्त नाहीय, बापाची स्वप्नं पुरी करायला पोरानं धडपडणं नाहीय, त्यापल्याडचा अतिशय अतिशय जिव्हाळ्याचा बंध या दोघांत आहे असं अगदी सहज मनात रुजून येतं. हा बाप पोलिसात असला, तरी हा 'अर्धसत्य'मधला हडेलहप्पी बाप नव्हे, हे लख्ख जाणवतं. दोन्ही ठिकाणी अमरिश पुरीच असताना हा फरक अक्षरशः काही सेकंदांत कळून यावा, यासाठी काय जातीचं अभिनयनैपुण्य लागत असेल! 


अमरिश पुरी काय नि जॅकी श्रॉफ काय, या दोनही नटांना त्यांच्या धिप्पाड देहयष्टी आणि रुपडं यांमुळे अशी नाती रंगवायला मिळणं फारच दुर्मीळ होतं असावं, आणि संधी मिळताक्षणी त्यांनी सर्वस्व ओतून काम केलं असावं, अशी खातरीच वाटते. जॅकी श्रॉफ तरी तसा 'अभिनेता' म्हणून थोर वकुबाचा नव्हे, तरी त्यालाही ते सहज साधलं आहे. नि अमरिश पुरी? त्यांच्या कुवतीच्या नटानं या जातकुळीचं काम पुन्हा फक्त 'विरासत'मध्ये केलेलं दिसतं. तोही प्रियदर्शनचाच सिनेमा. प्रियदर्शनबद्दल मनात एकदम अपार कृतज्ञता दाटून येते. 


तसाच प्रियदर्शनच्या सगळ्या हाताळणीत कायम दिसणारा, त्याचा ट्रेडमार्क असल्यासारखा तो खास छायाप्रकाश. याही गाण्यात तो आहे. तो नुसता यशचोप्रीय वा करणजोहरीय घे-वस्तू-कर-सुंदर-छाप प्रकाश नाही. त्या प्रकाशात एक स्वप्नीलपणा आहे. नेहमीचाच आमटीभात एखाद्या दिवशी गोड लागतो, घरातली नेहमीचीच चार माणसं हात वाळेस्तो पानावर गप्पा मारत बसतात, नेहमीसारखी न तळमळता तृप्त झोप लागते, आणि मग नंतर सगळं बिनसून गेल्यावर त्या दिवशीची आठवण एखाद्या स्वप्नासारखी वाटत राहते... तसं काहीतरी गतकातर वाटायला लावणारा तो प्रकाश आहे. आई-बाप-कष्टाळू मुलं-आपसांतलं प्रेम.. अशी साधीसरळ चौकट असलेलं ते घर विझून गेलं आहे, सगळे जण मनातून विद्ध आहेत, आपल्याच भाबड्या स्वप्नांच्या आठवणी काढून झुरताहेत, असा भाव असलेल्या या गाण्याला तो प्रकाश फार-फार साजून दिसतो.  


पण काय साजून दिसत नाही म्हणा! एसपीचा भरदार आवाज, आरडीची चाल, आणि जावेद अख्तरचे साधे-स्वप्नील गोड-कडसर शब्द? 


त्याखेरीजही एक आकर्षण या गाण्यात आहे. ते म्हणजे नव्वदीतली मुंबई. चौपाटीवर व्यायाम करणारे लोक, बेस्टच्या बसेस, झोपडपट्ट्या, मध्यमवर्गीय घरं, व्हरांडे... हे सगळं बघून गाण्याच्या आशयाशी आणि सुराशी काहीही संबंध नसलेली, निव्वळ नेपथ्याची भूल घालणारी एक भावना घेरून येते. पुन्हा त्या दिवसांत परतण्याची ओढ लागते. 


पण - 'हम न समझे थे, बात इतनी सी, ख्वाब शीशे के, दुनिया पत्थर की...' 


~


हम न समझे थे बात इतनी सी

ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की

हम न समझे थे बात इतनी सी

आरज़ू हमने की तो हम पाए

रोशनी साथ लाई थी साये

साये गहरे थे रौशनी हलकी

हम न समझे थे बात इतनी सी

सिर्फ वीरानी सिर्फ तनहाई

जिंदगी हमको ये कहा लायी

खो गयी हमसे राह मंजिल की

हम न समझे थे बात इतनी सी

क्या कोई देखे क्या कोई बाटें

अपने दामन में सिर्फ है कांटे

और दुकाने है सिर्फ़ फूलो की

हम न समझे थे बात इतनी सी

ख्वाब शीसे के दुनिया पत्थर की

~


नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


Tuesday 6 December 2022

बुजरी गाणी ०५

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.


आडवंतिडवं आसुरी खाल्ल्यामुळे दुपारी डोळ्यावर आलेली झापड जाऊन जाग यायला संध्याकाळ झाली की कसं वाटतं? तसं काहीतरी हे गाणं बघताना-ऐकताना वाटतं. ‘गुलाल’ पाहिला नसेल तर गाणं बघताना काय चाललंय त्याचा अर्थबोध होत नाही. पण त्या प्रतिमा आणि सूर मनावर काळीकुट्ट सावली पाडत जातात.

गाण्याच्या पहिल्यावहिल्या ओळींवरच घडलेला खून. शहर आणि गाव यांच्या सीमेवर अर्धवट विकासाच्या अभद्र खुणा लेऊन बसलेलं शहर. अर्धवट उजळणार्‍या पहाटेच्या वेळी, हळूहळू दृगोच्चर होऊन अंगावर काटा उभा करणारं, वेशीवर लटकवून दिलेलं प्रेत. त्या प्रेताकडे भेदरत भेदरत वळून बघणारी आणि पुन्हा निमूट कचरा चिवडू लागलेली म्हातारी. उघडीनागडी पोरं एकमेकांना उत्साहानं दाखवत असलेला प्रेताचा नजारा...

…सब ओरो गुलाल पूत गायो विपदा छायी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे…

एका दृश्यातून सावरता सावरता पुढचं अधिकच खचवून टाकणारं दृश्य अवतरतं. बांधल्या हातांनी आणि उघड्या डोळ्यांनी नजरेला धगधगती नजर देत गोळी खाऊन मरतं कुणी. रक्तानं न्हालेलं प्रेत पोलीस उचलून नेत असताना एखादा पत्रकार निर्विकार नजरेनं फोनवर बोलत टिपून घेतो काहीतरी. कुणी एक वृद्ध मुलाच्या मरणाची बातमी ऐकून बसल्या जागी मरण पावतो. जळणार्‍या चिता आणि त्यांना सलामी देण्यासाठी झाडल्या जाणार्‍या फैरी. उखीरवाखीर माळावर काहीतरी हुंगत फिरणारं एखादं मरतुकडं कुत्रं. थोबाडाला गुलाल फासून तारवटल्या-पिसाळलेल्या डोळ्यांनी घोषणा देणाऱ्या चेहऱ्यांच्या झुंडी....

सगळ्या प्रतिमांना पिवळसर वाळूचा, पण अजिबात सोनेरी वा सेपिया न भासणारा, मातकट रंग तरी आहे किंवा रक्ताचा लालबुंद रंग तरी.

सुनसान गली के नुक्कड पे जो कोई कुत्ता चीख चीख कर रोता है

जब लैंप पोस्ट की गंदली पिल्ली घूप रौशनी में कुछ कुछ सा होता है

जब कोई साया खुद को थोड़ा बचा बचा कर गम सायो में खोता है

जब पुल के खंभों को गाडी का गरम उजाला धीमे धीमे धोता है...

या शब्दांमध्ये नुसती चित्रमयता नाही, चित्र, ध्वनी, रंग, आणि गंध मिळून एक पूर्ण माहौल रचण्याची ताकद आहे. कुठूनतरी कुत्र्याचं भेसूर विव्हळणं ऐकू आल्याचा भास होतो, उदासवाण्या पिवळसर उजेडात निपचीत पडून राहिलेली रात्र दिसते, अर्धवट अंधार-उजेडाच्या सीमेवर भिंतीपाशी घसपटत-सरपटत-दबकत कुणीतरी निसटून गेल्याचा भास होतो..

हवेत काहीही अमानवी नसताही मानेवरचे केस उभे राहतात जणू.  

पियूष मिश्रा आणि स्वानंद किरकिरे हे स्वतंत्रपणेही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेले असे आवाज. ते दोन आवाज या गाण्यात कोरस म्हणून एकवटून येतात, आणि पोस्ट्ट्रूथ तिसर्‍या जगातल्या लोकशाही-राजेशाही-भांडवलशाहीचा नंगा नाच चितारतात. डीमेंटरच्या किससारखं सगळं भकास भेसूर रिकामं वाटायला लागतं. अर्थ कळो वा न कळो.


~




ए एक वक़्त की बात बताये एक वक़्त की

जब शहर हमारा सो गयो थो वो राज गजब की

हे चहु ओर सब ओर दिशा से लाली छाई रे

जुगनी नाचे चूनर  ओढ़े खून नहायी रे

सब ओरो गुलाल पूत गायो सब ओरो में

हे सब ओरो गुलाल पूत गायो विपदा छायी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे

जिस रात शहर में खून की बारिश आयी रे

सराबोर हो गया शहर और सराबोर हो गयी धरा

सराबोर हो गयो रे जत्था इन्सानो का बड़ा बड़ा

सभी जगत यह पूछे था जब इतना सब कुछ हो रियो थो

तो शहर हमारा काहे भाईसाब आँख मूड के सो रियो थो

तो शेहेर यह बोलियो नींद गजब की ऐसी आयी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे

सन्नाटा विराना ख़ामोशी अन्जानी

ज़िन्दगी लेती है करवटे तूफानी

घिरते है साये घनेरे से

रूखे बालों को बिखेरे से

बढ़ते है अँधेरे पिशाचों से

काँपे है जी उनके नाचों से

कहीं पे वो जूतों की ख़तख़त है

कहीं पे अलावो की चटपट है

कहीं पे है झींगुर की आवाज़ें

कहीं पे वो नलके की टप टप है

कहीं पे वो काली सी खिड़की है

कहीं वो अँधेरी सी चिमनी है

कहीं हिलते पेड़ों का जत्था है

कहीं कुछ मुंडेरों पे रक्खा है

रे रे रे रे रे रे रे

हूँ हूँ हूँ हूँ

सुनसान गली के नुक्कड पे जो कोई कुत्ता चीख चीख कर रोता है

जब लैंप पोस्ट की गंदली पिल्ली घूप रौशनी में कुछ कुछ सा होता है

जब कोई साया खुद को थोड़ा बचा बचा कर गम सायो में खोता है

जब पुल के खंभों को गाडी का गरम उजाला धीमे धीमे धोता है

तब शहर हमारा सोता है

तब शहर हमारा सोता है

हो ओ ओ हो ओ

जब शहर हमारा सोता है

तो मालूम तुमको हाँ क्या क्या होता है

इधर जागती है लाशें ज़िंदा हो मुर्दा उधर ज़िन्दगी खोता है

इधर चीखती है हौआ खैराती उस अस्पताल में बिखरी सी

आँख में उसके अगले ही पल गरम मांस का नरम लोथड़ा होता है

इधर उठी हर तकरारें जिस्मो के झटपट लेन देन में ऊंची सी

उधर घाव से रिस्ते फूंको दूर गुज़रती आखें देखे रूखी सी

लेकिन उसको लेके रंगबिरंगे मेलों में गुंजाईश होती है

नशे में डूबे सेहन से खूंखार चुटकुलों की पैदाइश होती है

अध नंगे जिस्मों की देखो लिपी पुट्ठी से लगी नुमाइश होती है

लार टपकती चेहरों को कुछ शैतानी करने की ख्वाहिश होती है

वो पूछे है हैरान होकर

ऐसा सब कुछ होता है कब

वो बतला तो उनको

ऐसा तब तब तब तब होता है

जब शहर हमारा सोता है

जब शहर हमारा सोता है

~


नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


Monday 5 December 2022

बुजरी गाणी ०४

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.


सुभाष घई आणि आनंद बक्षी ही दोन्ही नावं अशी नव्हेत, ज्यांच्याकडून अगदी मुख्यधारेतल्या सिनेमाच्या बाबतीतही फार अपेक्षा ठेवाव्यात. पण लोकसंगीतांच्या रूपानं लोकमानसातली शहाणीव कशी अलगद झिरपत धंदेवाईक उत्पादनातूनही डोकावताना दिसते, त्याचं उदाहरण म्हणून हे गाणं मला चकित करतं.


फतेहपूर सिक्रीच्या दर्ग्याबाहेरच्या प्रांगणात कलेची सेवा रुजू करायला बसलेल्या बहुधा राजस्थानी कलाकारांचा जथ्था. त्या लाल-विटकरी देखण्या प्रांगणात बेदरकारपणे रंग उधळणारे आणि ते कमी पडलं म्हणून त्यावरच्या आरसेकामानं उठून दिसणारे ठसठशीत पोशाख. तसेच उंच दाणेदार खडे सूर.


नायक आणि नायिका दोघेही प्रांगणात आहेत पण प्रेमाचा उच्चार झालेला नाही. फार काय, स्वतःपाशी स्वीकारही झालेला नाही. पार्श्वभूमीला मोहब्बत आणि इबादत – प्रेम आणि भक्ती यांच्यातलं साम्य रेखणारे शब्द. ईश्वराच्या वाटेवरच्या भक्तानं स्वतःला प्रेमिका नि ईश्वराला प्रियकर कल्पून आपल्या ओढीचं वर्णन करणं आशियाई उपखंडाला नवं नाही. लौकिकाची बंधनं तोडून परमेश्वराच्या भेटीच्या ओढीनं पहिलं पाऊल टाकणं परीक्षा पाहणारं. तसंच घरातल्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पना आणि मायेचे बंध तोडून प्रियकराच्या दिशेनं निघालेल्या प्रेमिकेचं पहिलं पाऊलही. या जगातून त्या जगात नेणारं. मागचं सारं खाक होऊन जाणार आहे, पुढे काय आहे ठाऊक नाही – पण जिवाला लागलेली ओढ अशी की सोसता सोसवत नाही. नायरा नूरनं गायलेल्या नसीम अख्तरच्या ‘उन का इशारा’मधले शब्द आठवतात, तशीच अरुणा ढेर्‍यांची ‘रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून निघालेल्या उत्कट मुलीची गोष्ट’ही.


या पार्श्वभूमीवरचे ते शब्द – हो, नको होतं प्रेमात पडायला. चुकलं माझं. घडलं हातून. आता काय पर्याय उरला आहे?


‘वापस कर आई मैं बाबुल को मैं शादी का जोडा, मैंने प्यार को पहन लिया रे प्यार को सर पे ओढा...’या ओळींपाशी ही अणिबाणी चरम सीमेवर पोचलेली. 'आता तुम्ही थांबवू शकाल, परतवू शकाल, दुखवू शकाल, त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणाऱ्या कुंवार मुलीला?'


जडावाचे आरसे असलेला शुभ्र पांढरा खमीस, अस्ताव्यस्त झालेले केस, पाय अनवाणी, डोळ्यांत संभ्रमाचं पाणी, आणि वराकडे निघालेल्या वधूसारखी लालबुंद ओढणी... ही वेशभूषा निवडणार्‍या इसमाला हे गाणं खरं कळलं आहे असं मनात आल्यावाचून राहत नाही.


गाणं चढतच जातं आपल्याला. ‘ये संगम हो जाये सागर से मिल जाए गंगा’ या ओळींचं आवर्तन होतं आणि नायिका नायकाच्या मिठीत शिरते. आता जग इकडचं तिकडं होऊ दे – समोर लढायला उभं ठाकू दे – का-ही-ही होऊ दे. आता विलग होणे नाही...


सिनेमात पुढे बरीच हाणामारी-डोळ्यातपाणी-तमाशे होतात. पण आपल्या डोक्यात ‘कट’ त्या ओळींवरच झालेला असतो. ‘ये संगम हो जाए सागर से मिल जाए गंगा’.


#बुजरी_गाणी ०४

~





ये मोहब्बत भी एक इबादत है


और ये इबादत भी एक मोहब्बत है


ये भी दीवानगी है, वो भी दीवानगी है


ये भी दिल की लगी है, वो भी दिल की लगी है


मुझको क्या हो गया है, सबको हैरानगी है


हो गया है मुझे प्यार


नहीं होना था, अरे नहीं होना था, लेकिन हो गया


हो गया है मुझे प्यार


इस प्यार के ये किस मोड पर वो चल दिये मुझको छोडकर


आगे जा ना सकूँ पीछे जा ना सकूँ


गम दिखा ना सकूँ गम छुपा ना सकूँ


सामने मेरे आग का दरिया डूब के जाना पार


हो गया है मुझे प्यार


जमाना दिलों को नहीं जानता है


जमाने को ये दिल नही मानता है


नहीं और कोई फकत इश्क है वो


जो आशिक की नजरों को पहचानता है


अब वक्त फैसले का नजदीक आ गया है


क्या फैसला करूँ मैं दिल ने तो ये कहा है


जीने का गर शौक तो मरने को हो जा तैयार


हो गया है मुझे प्यार


वापस कर आई बाबुल को मैं शादी का जोडा


मैंने प्यार को पहन लिया रे प्यार को सर पे ओढा


फेंक दी मैंनी गली में झूठी रस्मों की अंगूठी


तोड दिए सब लाज के पहरे मैं हर कैद से छूटी


ठोकर खाऊँ चलती जाऊँ अपनी अखियाँ मींचे


आगे मेरे साजन का घर दुनिया रह गई पीछे


एक ही दुआ मागूँ मैं बिछडा यार मुझे मिल जाए


मेरे पीर-ओ-मुर्शिद मेरा प्यार मुझे मिल जाए


अपना लाल दुपट्टा मैंने दिल के खून से रंगा


ये संगम हो जाए सागर से मिल जाए गंगा

~


नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


Sunday 4 December 2022

बुजरी‌ गाणी ०३

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणाटीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणालोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतंज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावंतसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.


या गाण्यावर कलत्या दुपारीचा प्रसन्न शिडकावा आहे. शहराचं ठिकाण, पण झाडं, निवांत पहुडलेले बसस्टॉप्स नि रस्ते जपून असलेलं, अद्याप माणसांत असलेलं, सत्तरीच्या दशकातलं शहर. नायिका प्रेमात आहे, पण त्या प्रेमाला आर्ततेचा, विद्धतेचा, आवेगाचा स्पर्श नाही अद्याप. नव्हाळीच्या दिवसांतलं उत्फुल्ल प्रेम. पायांना पंख फुटल्यासारखी थिरकत, तंद्रीत चालणारी नायिका. तिच्या सगळ्या विभ्रमांकडे मिश्किल नजरेनं हसत-हसत पाहणारा आसमंत.


शास्त्रीय संगीत शिकण्यानंच इतकं साधं-सुरेख-सुसंस्कृत, जाणतं होता येत असेल, तर आपणपण शिकायला पाहिजे होतं बा गाणं, असं जी जी गाणी बघून मला वाटलं आहे, त्यांपैकी हे एक. (अनामिक हुरहुर लावणारं ‘बिती ना बिताई रैना’ हे दुसरं, शांत आनंदानं मन भरून टाकणारं ‘मन आनंद आनंद छायो रे’ हे तिसरं, याच सिनेमातलं नायिकेचा हुंदका सहजी ओवून घेणारं-मनावर उदास सावली आणणारं ‘कहाँ से आये बदरा’ चौथं. मग 'भोर आई गया आंधियारा' आणि 'तुम बिन जीवन' आणि...  पण याला अंत नाही. हा एक आख्खा निराळाच विषय आहे.) या गाण्यांच्या रागदारीवर आधारित सुरावटींशी माझ्या आवडीचा संबंध कमी, आणि त्यातल्या एकंदर सुखवस्तू-शांत वातावरणनिर्मितीशी तो अधिक आहे! पुस्तकाच्या आशयापेक्षा त्याच्या रूपा-स्पर्शासारख्या सेंद्रिय पैलूंमध्येच अडकून पडावं, तसं आहे खरं हे. पण क्या करें, आहे आता! असो. तर – तंबोरे-पेट्या-तबले, पांढराशुभ्र सैलसर कुर्ता घालून गाणं शिकवणारे आश्वासक मुद्रेचे गुरुजी, हवेतला संथपणा... आणि पिवळ्याधमक गालिच्यावर बसलेली, प्राजक्तीच्या फुलासारखा शुभ्र पोशाख केलेली, टवटवीत, अनलंकृत दीप्ती नवल. कुठे तंबोर्‍याच्या खुंट्या पीळ, कान देऊन सूर बरोबर लागल्याची खातरी करून घे, कानात प्राण आणून गुरुशब्द उचलायच्या तयारीत राहा, असा सगळा तामझाम.


या गाण्यातल्या ‘चकित भई सगरी नगरी’ या शब्दांपाशी जो काही खेळ संगीतकारानं खेळला आहे, तो माझ्यासारख्या संगीताचा कान नसलेल्या व्यक्तीलाही ‘बसल्याजागी उगाच उड्या माराव्याश्या’ वाटायला लावणारा. त्या खेळाला आपण पहिल्या दोन कडव्यांत किंचित सरावतो न सरावतो, तोच गाण्यात ‘मितवा’चं आगमन घडल्याचं आणि फुलं फुलल्याचं सूतोवाच होतं, आणि नायिका सुगंधाच्या लाटेवर तरंगत बाहेर पडल्यासारखी संगीत विद्यालयातून दिमाखात बाहेर पडते. हातातली पर्स झुलवत, उंच टाचांचे सॅंडल्स सहजी वागवत, ओढणी सावरण्याचा खेळ करत ती अक्षरशः ठुमकत जाते खरी; पण तिच्यात कुणाचं लक्ष्य वेधून घेण्याचा हेतू नाही. तितकं परिसराचं भानच तिला नाही. गाण्यात आणि बहुधा गाण्याच्या आशयात पूर्ण बुडून गेल्याचा आत्ममग्न पण हसरा भाव. तिची चाल, तिच्या हातांच्या मुद्रा, बोटांनी नकळत धरलेला ताल... आणि या सगळ्याकडे गालातल्या गालात हसत बघणारे बसस्टॉपवरचे सहप्रवासी – त्यांत दोन लहान मुलंही आहेत! - या सगळ्यात या गाण्याचं सगळं सौंदर्य सामावलेलं आहे, असं वाटून जातं.


इथे गाण्याची सुरावट हलके-हलके वेग पकडू लागते. वळणावर ‘काली घोडी’वर सवार असलेल्या ‘सैंया’चं आगमन होतं, नायिकेच्या चेहरा होता त्याहूनही प्रसन्न होतो, त्यांच्यात काहीतरी हसरा-आतुर संवाद-न-संवाद घडतो, आणि ‘सुध बुध बिसर’लेली नायिका घोडीवर सवार होऊन निघते. मग तिची उडणारी चुनरी आणि नायकाच्या खांद्याशी लगट करणार्‍या बटा, बस! ‘काली घोडी दौंड पडी!’


#बुजरी‌_गाणी ३

~


काली घोड़ी द्वार खड़ी

खड़ी रे

काली घोड़ी द्वार खड़ी

गाओ

काली घोड़ी द्वार खड़ी

खड़ी रे

काली घोड़ी द्वार खड़ी

मूंगों से मोरी मांग भरी

मूंगों से मोरी मांग भरी

बर जोरी सैंया ले जावे

बर जोरी सैंया ले जावे

चकित भई सगरी नगरी

काली घोड़ी द्वार खड़ी

खड़ी रे

काली घोड़ी द्वार खड़ी

- - -

भीड़ के बीच अकेले मितवा

भीड़ के बीच अकेले मितवा

अकेले मितवा

अकेले मितवा

जंगल बीच महक गए फुलवा

जंगल बीच महक गए फुलवा

कौने ठगवा बइयाँ धरी

कौने ठगवा बइयाँ धरी

चकित भई नगरी सगरी

काली घोड़ी द्वार खड़ी

खड़ी रे

काली घोड़ी द्वार खड़ी

- - -

बाबा के द्वारे भेजे हरकारे

अम्मा को मीठी बतियन सँभारे

बाबा के द्वारे भेजे हरकारे

अम्मा को मीठी बतियन सँभारे

चितवन से मूक हरी

चकित भई नगरी सगरी

काली घोड़ी द्वार खड़ी

खड़ी रे

काली घोड़ी द्वार खड़ी

- - -

काली घोड़ी पे गोरा सैयां चमके

सैयां चमके

चमक-चमक चमके

चमक-चमक चमके

चमक-चमक चमके

काली घोड़ी पे गोरा सैयां चमके

कजरारे मेघा में बिजुरी दमके

बिजुरी दमके

सुध-बुध बिसर गयी हमारी

बर जोरि सैंया ले जावे

बर जोरि सैंया ले जावे

चकित भई नगरी सगरी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

- - -

लाज चुनरिया उड़-उड़ जावे

अंग-अंग पी रंग रचावे

लाज चुनरिया उड़-उड़ जावे

अंग-अंग पी रंग रचावे

उनके काँधे लट बिखरी

उनके काँधे लट बिखरी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

काली घोड़ी दौड़ पड़ी

~

शब्द इंटरनेटावरून ढापून डकवलेले आहेत. तरी, चूक भूल देणे घेणे.