Wednesday 7 December 2022

बुजरी गाणी ०६

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.


या गाण्याचं सगळ्यांत मोठं अपील म्हणजे यातले अमरिश पुरी. कनिष्ठ मध्यमवर्गीय, करारी, प्रेमळ बापपण त्यांच्या सगळ्या देहबोलीतून जाणवतं. पोराकडून व्यायाम काय करून घेतात, त्याला घड्याळ काय आणतात, त्याला शहाळ्याचं पाणी काय प्यायला लावतात, त्याच्या डाएटवर काय लक्ष्य ठेवतात, पोराला साहेबाची कॅप घालून डोळे भरून बघतात काय, त्याला भरवतात काय, त्याच्यावर प्रेमानं काठी काय उगारतात... त्यांच्या डोळ्यातलं लोभस प्रेम बघून जितकं सुखावायला होतं, तितकंच जॅकी श्रॉफचं लाड करून घेणं बघतानाही सुखावायला होतं. या बाप-लेकांमध्ये नुसती शिस्त नाहीय, बापाची स्वप्नं पुरी करायला पोरानं धडपडणं नाहीय, त्यापल्याडचा अतिशय अतिशय जिव्हाळ्याचा बंध या दोघांत आहे असं अगदी सहज मनात रुजून येतं. हा बाप पोलिसात असला, तरी हा 'अर्धसत्य'मधला हडेलहप्पी बाप नव्हे, हे लख्ख जाणवतं. दोन्ही ठिकाणी अमरिश पुरीच असताना हा फरक अक्षरशः काही सेकंदांत कळून यावा, यासाठी काय जातीचं अभिनयनैपुण्य लागत असेल! 


अमरिश पुरी काय नि जॅकी श्रॉफ काय, या दोनही नटांना त्यांच्या धिप्पाड देहयष्टी आणि रुपडं यांमुळे अशी नाती रंगवायला मिळणं फारच दुर्मीळ होतं असावं, आणि संधी मिळताक्षणी त्यांनी सर्वस्व ओतून काम केलं असावं, अशी खातरीच वाटते. जॅकी श्रॉफ तरी तसा 'अभिनेता' म्हणून थोर वकुबाचा नव्हे, तरी त्यालाही ते सहज साधलं आहे. नि अमरिश पुरी? त्यांच्या कुवतीच्या नटानं या जातकुळीचं काम पुन्हा फक्त 'विरासत'मध्ये केलेलं दिसतं. तोही प्रियदर्शनचाच सिनेमा. प्रियदर्शनबद्दल मनात एकदम अपार कृतज्ञता दाटून येते. 


तसाच प्रियदर्शनच्या सगळ्या हाताळणीत कायम दिसणारा, त्याचा ट्रेडमार्क असल्यासारखा तो खास छायाप्रकाश. याही गाण्यात तो आहे. तो नुसता यशचोप्रीय वा करणजोहरीय घे-वस्तू-कर-सुंदर-छाप प्रकाश नाही. त्या प्रकाशात एक स्वप्नीलपणा आहे. नेहमीचाच आमटीभात एखाद्या दिवशी गोड लागतो, घरातली नेहमीचीच चार माणसं हात वाळेस्तो पानावर गप्पा मारत बसतात, नेहमीसारखी न तळमळता तृप्त झोप लागते, आणि मग नंतर सगळं बिनसून गेल्यावर त्या दिवशीची आठवण एखाद्या स्वप्नासारखी वाटत राहते... तसं काहीतरी गतकातर वाटायला लावणारा तो प्रकाश आहे. आई-बाप-कष्टाळू मुलं-आपसांतलं प्रेम.. अशी साधीसरळ चौकट असलेलं ते घर विझून गेलं आहे, सगळे जण मनातून विद्ध आहेत, आपल्याच भाबड्या स्वप्नांच्या आठवणी काढून झुरताहेत, असा भाव असलेल्या या गाण्याला तो प्रकाश फार-फार साजून दिसतो.  


पण काय साजून दिसत नाही म्हणा! एसपीचा भरदार आवाज, आरडीची चाल, आणि जावेद अख्तरचे साधे-स्वप्नील गोड-कडसर शब्द? 


त्याखेरीजही एक आकर्षण या गाण्यात आहे. ते म्हणजे नव्वदीतली मुंबई. चौपाटीवर व्यायाम करणारे लोक, बेस्टच्या बसेस, झोपडपट्ट्या, मध्यमवर्गीय घरं, व्हरांडे... हे सगळं बघून गाण्याच्या आशयाशी आणि सुराशी काहीही संबंध नसलेली, निव्वळ नेपथ्याची भूल घालणारी एक भावना घेरून येते. पुन्हा त्या दिवसांत परतण्याची ओढ लागते. 


पण - 'हम न समझे थे, बात इतनी सी, ख्वाब शीशे के, दुनिया पत्थर की...' 


~


हम न समझे थे बात इतनी सी

ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की

हम न समझे थे बात इतनी सी

आरज़ू हमने की तो हम पाए

रोशनी साथ लाई थी साये

साये गहरे थे रौशनी हलकी

हम न समझे थे बात इतनी सी

सिर्फ वीरानी सिर्फ तनहाई

जिंदगी हमको ये कहा लायी

खो गयी हमसे राह मंजिल की

हम न समझे थे बात इतनी सी

क्या कोई देखे क्या कोई बाटें

अपने दामन में सिर्फ है कांटे

और दुकाने है सिर्फ़ फूलो की

हम न समझे थे बात इतनी सी

ख्वाब शीसे के दुनिया पत्थर की

~


नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


No comments:

Post a Comment