Tuesday, 8 July 2008

इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..

आतड्याची माणसं आपलं मरण स्वीकारत नाहीत तोवर म्हणे आपण मेलेले नसतोच.
शरीर संपून त्याची राख वा माती होतही असेल कदाचित. पण अस्तित्व मात्र उरतं.
अस्तित्व उरतं म्हणजे काय? आपण उरतो?
आपण म्हणजे जर हे शरीर, हाडकं, रक्त-मांस नसूच - तर आपण काय असतो? आपल्या माणसांच्या ऊष्ण आठवणी? आपण म्हणजे आपल्या कृतींचे कुणीतरी लावलेले अन्वयार्थ केवळ? किती भीषण आहे हे?
'एक दिन अचानक’ म्हणून एक सिनेमा पाहिला होता मृणाल सेनांचा. एक दिवस घरातला कर्ता पुरुष संध्याकाळी घरी परततच नाही. संध्याकाळ उलटते. रात्र होते. काळजीनं कुळकुळत रात्रही संपते. शिळी दमलेली सकाळ. काळजी. पोलिसांकडे नोंदवलेली तक्रार. ठिकठिकाणी केलेली शोधाशोध. कासावीस होऊन केलेली विचारणा. ढुंढाळलेल्या विहिरी. इस्पितळं. स्टेशनं. हाती आलेली रिकामी निराशा.
अशा अनेक संध्याकाळी. रात्री. सकाळी. उदासवाण्या - आशाळभूत.
आता घरानं प्राक्तन स्वीकारलं आहे त्याच्या पुरुषानं त्याच्याकडे पाठ फिरवल्याचं. पण तरीही अद्याप आशा पुरती मेलेली नाही. धुगधुगी आहे तिच्यात अजुनी. अजून कातरवेळेला जीव हुरहुरतो. चपलांची विशिष्ट करकर ऐकू आली, तर मन उशी घेतं. वरणाला फोडणी देताना अजुनी लसूण पडत नाही हातून. ’ह्यांना नाही चाल-’
चितेला अग्नी देताना, शरीराला मूठमाती देताना, अस्थी गंगेत विसर्जित करून पाण्याकडे पाठ फिरवताना हीच हुरहुर विसर्जित होत असेल? असण्याच्या आशांना चूड लागत असेल? अभाव चरचरीतपणे अधोरेखित होत असेल? काय होत असेल नेमकं?
पार्वतीबाईंचं काय झालं असेल?
त्यांचा कर्तासवरता नवरा असाच एकाएकी होत्याचा नव्हता झाला की. आत्ता होता - आत्ता नाही.
चुडा फोडू? भरलं कपाळ पुसू? मंगळसूत्र काढून ठेवू? असं कसं? अजून इकडच्या स्वारीचा देह नाही पाहिला, आणि हे काय भलतंच अभद्र? कुठे असतील ते - मी सधवेची विधवा होऊन त्यांना अपशकुन करू?
बाई आयुष्यभर अशीच जगली...अहेवपणाची लेणी लेऊन.
तिच्या मनात कातरवेळेला काय दाटलं असेल? अशुभाचा निर्वाळा देणारं आपलंच मन तिनं कसं घट्ट केलं असेल? रोज वेणीफणी करताना कुंकवाच्या करंड्यात बोटं थबकत असतील तिची? आणि जर तिला खरीच असेल खात्री सदाशिवभाऊंच्या जिवंत असण्याची, तर तिनं मनोमन साधला असेल संवाद त्यांच्याशी? काय बोलली असेल ती?
तिच्या रक्तामांसाच्या अपेक्षा होत्या जोवर, तोवर भाऊ होतेच. त्यांचं श्राद्ध झालं नव्हतं तोवर...
श्राद्ध.
हेसुद्धा आपल्याच आग्रहाला मूठमाती देण्यासाठी केलेलं कर्मकांड काय? जाणारा जीव जातो. त्याची माती होते. पण मागे राहणाऱ्यांचं काय? जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय?
म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी.
ज्यांना ही कर्मकांडं लाभत नाहीत, त्यांना खरंच नसेल येत पुरतं मरण? अशी माणसं भाग्यवान म्हणायची की अभागी?
सालं कुणाला न कळवता मरूनच पाहिलं पाहिजे एक दिवस.

Thursday, 3 July 2008

वक्त जाता सुनाई देता है...


कंटाळा. जडशीळ. सुस्त. निर्लज्ज बधिर कंटाळा. बघावं- तिकडे पसरलाय.
व्यायाम?
हो, केला की.
आरोग्यपूर्ण खाणंपिणं?
हो तर. सलाड, पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यापर्यंत.
फोनवरच्या निरुद्देश गप्पा?
एकदम बंद. कामाखेरीज एरवी फोन बंद म्हटलं ना.
चांगलं वाचत जावं मग.
अर्थात. स्फूर्तिदायक चरित्र, चेतन भगती पुस्तकं, झालंच तर हॅरी पॉटर. चालू आहे रतीब.
मग येतात कसे उठल्या-सुटल्या कंटाळे तुम्हांला? आम्हांला नाही आला तो कधी कंटाळा? आम्हांला वेळच नसतो ना कंटाळायला.. चोवीस वर्षं नोकरी केली. पण म्हटलं का कधी कंटाळा आला म्हणून? गेलोच की नाही चुपचाप कामावर? तरी बरं आम्हांला जीव रमवायला एवढी साधनं नव्हती. टीव्ही म्हणू नका, डीव्हीडी प्लेयर म्हणू नका, मोबाईल म्हणू नका, लॅपटॉप म्हणू नका. कशाला म्हणून कमी नाही. तरी आपलं उठल्या-सुटल्या आहेच – कंटाळा आला. अरे? काही नाही – भरल्या पोटाची दु:खं आहेत झालं. बाहेर जाऊन पाहा जरा...
याला आता अंत नाही. अगदी ऐकायचा कंटाळा येईपर्यंत –
तरीही कंटाळा उरलाच आहे अजगरासारखा निवांतपणे. थोडंथोडं खाऊन संपवतो आहे जगणं. निर्जीव तरी कसं म्हणावं याला? पोसत चालला आहे साला माझ्या आयुष्यावर. उदासवाणा वांझोटा लठ्ठ कंटाळा. पसरला आहे सगळीभर.
ऑफीसमधे अजून थोडं काम. भरपूर स्ट्रेचिंग. नवीन निर्बुद्ध कल्पना. चेहऱ्याला पावडर थापलेली अजून काही संभावित राजकारणं. थोडं कौतुक. पगारवाढीचा तुकडा झेललेला. वीकेण्डची अंतहीन झोप. शिळवटलेला सोमवार आणि फसफसलेला शुक्रवार.
नवीन सिनेमे, तीच प्रेमगीतं, तोच अन्यायाविरुद्ध लढा. तीच सिनेमॅटिक लिबर्टी. तोच विरह. तेच पुनर्मीलन. तेच उदात्तीकरण. तीच स्टाईल. तीच सुरुवात नि तोच शेवट.
नवीन पुस्तकं. अफगाणी स्त्रियांनी भोगलेला छळ. प्रसिद्ध लेखकांच्या बायकांनी सोसलेली मुस्कटदाबी. कॉलसेंटरमधली स्मार्ट प्रेमप्रकरणं. महाभारताचे नवीन अन्वयार्थ. ब्राह्मणी आणि दलित आणि दलित आणि ब्राह्मणी आत्मचरित्र. अजून कुठल्यातरी प्रसिद्ध देशाचं चटकदार-संस्कृतिपूर्ण ’ललित’ प्रवासवर्णन.
कवितांमधूनही साला कंटाळाच पसरलेला असावा?
एखाद्या सराईत बाजारू कवितेसारखा लांबलचक. घामट. वळवळणारा. चराचर व्यापून उरलेला. अश्लील कंटाळा उतरलाय सगळ्यावर.
कुठल्यातरी नागिणीनं नागाच्या मृत्यूचा सूड घेतल्याची बातमी झळकतेय दिवसभर टीव्हीवर. कुणीतरी महाराष्ट्राची महागायिका झालीय. अमेरिकनं कुणाच्या तरी युद्धखोरीचा निषेधही चालवला आहे सकाळपासून. शनी उद्यापासून मिथुनेत शिरणार म्हणून बोलावलेले एक तज्ज्ञ ज्योतिषी शनीच्या पीडेवर उपाय सांगतायत. कुणीतरी प्रियकराच्या खुनाचा कट करतं आहे. कुणीतरी शिरा ताणताणून करतं आहे कुणावरतरी भ्रष्टाचाराचा आरोप. कुणाचा खून, कुणावर बलात्कार. कुणावर ’बिनबुडाचे’ आरोप.
टीव्ही साला अथक गळतो आहे.
पाऊसही.
शहर बंद पडायला आलं आहे तरीही गळतोच आहे पाऊस निर्दयपणे. पाण्याचा जाड पोलादी पडदा. मातकटलेलं-गटारलेलं काळसर पाणी जिकडे तिकडे. आचके देऊन पडलेल्या लोकल्स. फलाटाच्या अपुऱ्या आसऱ्याला आलेली वळवळणारी आशाळभूत गर्दी.
तरीही पाऊस गळतो आहे.
आवाज नसलेला पावसाचा हिंस्र आवाज सगळं मिटवून टाकणारा. कुणाची वाट पाहण्यापुरतीही उसंत न देता भरत चाललेलं पाणी. शहराचे सगळे दोर कापत – गिळत जाणारा लोखंडी पाऊस.
आणि तरीही कंटाळा. सगळ्यासकट कंटाळा. एखाद्या भयप्रद श्वापदासारखा आसंमत गिळंकृत करून ढेकरही न देणारा...
कंटाळा.