Thursday, 3 July 2008

वक्त जाता सुनाई देता है...


कंटाळा. जडशीळ. सुस्त. निर्लज्ज बधिर कंटाळा. बघावं- तिकडे पसरलाय.
व्यायाम?
हो, केला की.
आरोग्यपूर्ण खाणंपिणं?
हो तर. सलाड, पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यापर्यंत.
फोनवरच्या निरुद्देश गप्पा?
एकदम बंद. कामाखेरीज एरवी फोन बंद म्हटलं ना.
चांगलं वाचत जावं मग.
अर्थात. स्फूर्तिदायक चरित्र, चेतन भगती पुस्तकं, झालंच तर हॅरी पॉटर. चालू आहे रतीब.
मग येतात कसे उठल्या-सुटल्या कंटाळे तुम्हांला? आम्हांला नाही आला तो कधी कंटाळा? आम्हांला वेळच नसतो ना कंटाळायला.. चोवीस वर्षं नोकरी केली. पण म्हटलं का कधी कंटाळा आला म्हणून? गेलोच की नाही चुपचाप कामावर? तरी बरं आम्हांला जीव रमवायला एवढी साधनं नव्हती. टीव्ही म्हणू नका, डीव्हीडी प्लेयर म्हणू नका, मोबाईल म्हणू नका, लॅपटॉप म्हणू नका. कशाला म्हणून कमी नाही. तरी आपलं उठल्या-सुटल्या आहेच – कंटाळा आला. अरे? काही नाही – भरल्या पोटाची दु:खं आहेत झालं. बाहेर जाऊन पाहा जरा...
याला आता अंत नाही. अगदी ऐकायचा कंटाळा येईपर्यंत –
तरीही कंटाळा उरलाच आहे अजगरासारखा निवांतपणे. थोडंथोडं खाऊन संपवतो आहे जगणं. निर्जीव तरी कसं म्हणावं याला? पोसत चालला आहे साला माझ्या आयुष्यावर. उदासवाणा वांझोटा लठ्ठ कंटाळा. पसरला आहे सगळीभर.
ऑफीसमधे अजून थोडं काम. भरपूर स्ट्रेचिंग. नवीन निर्बुद्ध कल्पना. चेहऱ्याला पावडर थापलेली अजून काही संभावित राजकारणं. थोडं कौतुक. पगारवाढीचा तुकडा झेललेला. वीकेण्डची अंतहीन झोप. शिळवटलेला सोमवार आणि फसफसलेला शुक्रवार.
नवीन सिनेमे, तीच प्रेमगीतं, तोच अन्यायाविरुद्ध लढा. तीच सिनेमॅटिक लिबर्टी. तोच विरह. तेच पुनर्मीलन. तेच उदात्तीकरण. तीच स्टाईल. तीच सुरुवात नि तोच शेवट.
नवीन पुस्तकं. अफगाणी स्त्रियांनी भोगलेला छळ. प्रसिद्ध लेखकांच्या बायकांनी सोसलेली मुस्कटदाबी. कॉलसेंटरमधली स्मार्ट प्रेमप्रकरणं. महाभारताचे नवीन अन्वयार्थ. ब्राह्मणी आणि दलित आणि दलित आणि ब्राह्मणी आत्मचरित्र. अजून कुठल्यातरी प्रसिद्ध देशाचं चटकदार-संस्कृतिपूर्ण ’ललित’ प्रवासवर्णन.
कवितांमधूनही साला कंटाळाच पसरलेला असावा?
एखाद्या सराईत बाजारू कवितेसारखा लांबलचक. घामट. वळवळणारा. चराचर व्यापून उरलेला. अश्लील कंटाळा उतरलाय सगळ्यावर.
कुठल्यातरी नागिणीनं नागाच्या मृत्यूचा सूड घेतल्याची बातमी झळकतेय दिवसभर टीव्हीवर. कुणीतरी महाराष्ट्राची महागायिका झालीय. अमेरिकनं कुणाच्या तरी युद्धखोरीचा निषेधही चालवला आहे सकाळपासून. शनी उद्यापासून मिथुनेत शिरणार म्हणून बोलावलेले एक तज्ज्ञ ज्योतिषी शनीच्या पीडेवर उपाय सांगतायत. कुणीतरी प्रियकराच्या खुनाचा कट करतं आहे. कुणीतरी शिरा ताणताणून करतं आहे कुणावरतरी भ्रष्टाचाराचा आरोप. कुणाचा खून, कुणावर बलात्कार. कुणावर ’बिनबुडाचे’ आरोप.
टीव्ही साला अथक गळतो आहे.
पाऊसही.
शहर बंद पडायला आलं आहे तरीही गळतोच आहे पाऊस निर्दयपणे. पाण्याचा जाड पोलादी पडदा. मातकटलेलं-गटारलेलं काळसर पाणी जिकडे तिकडे. आचके देऊन पडलेल्या लोकल्स. फलाटाच्या अपुऱ्या आसऱ्याला आलेली वळवळणारी आशाळभूत गर्दी.
तरीही पाऊस गळतो आहे.
आवाज नसलेला पावसाचा हिंस्र आवाज सगळं मिटवून टाकणारा. कुणाची वाट पाहण्यापुरतीही उसंत न देता भरत चाललेलं पाणी. शहराचे सगळे दोर कापत – गिळत जाणारा लोखंडी पाऊस.
आणि तरीही कंटाळा. सगळ्यासकट कंटाळा. एखाद्या भयप्रद श्वापदासारखा आसंमत गिळंकृत करून ढेकरही न देणारा...
कंटाळा.

10 comments:

 1. भन्नाट. आधी वाक्य उद्धृत करणार होतो. पण छे! कंटाळ्याचा अंगावर काटा यावा असा भिनवला आहेस शब्दाशब्दांतून.

  पण असा "दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर" छाप कंट्याळाचा पूर फार येतो ना?

  ReplyDelete
 2. hummm...
  I know what you mean...

  ReplyDelete
 3. bhayankar ahe baba he.

  nahi, bai ga.

  kantalyacha kantala yeil asa.

  ReplyDelete
 4. Prachand avadle he post mala,

  तरीही कंटाळा उरलाच आहे अजगरासारखा निवांतपणे. थोडंथोडं खाऊन संपवतो आहे जगणं...

  Hee vakye tar toofan avdlee.

  ReplyDelete
 5. हम्म.. पोस्ट वाचून English, August ची आठवण झाली.

  ReplyDelete
 6. khup nemkya shabdat barchas khar vastav sundarritya mandal ahes ..

  mi mhane jikkalayesss :-)

  ReplyDelete
 7. It shows real part of life which everyone has neglected..

  ReplyDelete
 8. Hi!
  Nimish cha blog vachat astana tuza blog disla, sahaj vachla... ani hya post ne ekdum laksh vedhun ghetale... kaay sundar lihile aahes! kantala ekhadya ajgarasarkha... waah kaay kalpana aahe... ti 'kantala' aalyachi bhavna agadi murtimant ubhi keli aahes tu!

  ReplyDelete
 9. एखाद्या भयप्रद श्वापदासारखा आसंमत गिळंकृत करून ढेकरही न देणारा... >> !! अगदी अगदी असाच असतो कंटाळा !

  ReplyDelete