मला प्रवास आवडत नाहीत.
मुक्कामी गावाच्या स्वभावापासून ते सहप्रवाशांच्या अकलेपर्यंत सगळंच, गाड्यांचे गोंधळ असताना तासाभरानं आलेल्या लोकलच्या दिशेनं सूर मारावा तसं. डेरिंगबाज, पण यश अनिश्चित. अनेक प्रवास माझ्या झोळीत चरफडीखेरीज आणि आगामी जहरी पूर्वग्रहांखेरीज काहीही बांधून देत नाहीत. अशी आठ्याळ कुंकवं लावून अनेक जागांवर मी कायमची फुली मारली आहे.
पण कोणत्याही थोर नियमाला असावेत, तसे अपवाद याही नियमाला आहेतच. क्वचित कधीतरी ते फळाला येतात.
***
अशीच पुण्यातली एक फेरी. कंटाळा आला, म्हणून उठून वीकान्ताला पुणं गाठलेलं. कुठेही निरुद्देश भटकलो. लाटणी, कानातली, चिंचा, बड्ड्या… असल्या काहीही रॅन्डम चिरकूट खरेद्या केल्या. कुठली-कुठली ऐन गर्दीतली धूळभरली देवळं बघून त्यांच्या गारव्याला टेकलो. पुस्तकांची दुकानं ढुंडाळली. ’गोट्या’, ’चिंगी’ आणि ’खडकावरला अंकुर’ मिळतात का बघू, म्हणून कुठल्या-कुठल्या गल्लीबोळांतून घरंगळत एका दुकानाशी पोचलो.
गृहस्थ मिशाळ, शिडशिडीत आणि उग्र होते. त्यांनी एका डुगडुगत्या स्टुलावर चढून वरच्या कप्प्यातली बरोब्बर पाच पुस्तकं खेचून खाडकन काउंटरवर आपटली. धुळीचा एक खकाणा उडाला. पण हे निर्विकार. सहजी न मिळणारी पुस्तकं हाती आल्यामुळे मी एकूण जुगार जिंकल्याच्या आनंदात. पैसे देऊन निघावं ना? पण जुगार्याचा मोह. मोह. त्यांच्या दुकानाची एकूण धुळकटावस्था आणि प्रचंड इंट्रेष्टिंग पुस्तकांच्या जुन्यापान्या आवृत्त्या बघून माझा पाय निघेचना. ते मिशा फेंदारून माझ्याकडे प्रश्नार्थक बघत उभे.
मला काय किडा चावला कुणास ठाऊक, बरेच महिने ज्याचा निष्फळ शोध घेतला, ते कुंडलकराचं “’छोट्याश्या सुट्टीत’ आहे का हो?” असा खडा मारला फेकून.
पूर्ण पाच सेकंद माझ्याकडे टक लावून काका उत्तरले, “आहे. पण ’झ्येरॉक्स’ आहे. चालेल?”
आहे? आहे? आहे?
मी त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखं भयचकित नजरेनं पाहिलं असणार. कारण ते किंचित हसल्याचा भास झाला. मग सावरून त्यांना म्हटलं, “चालेल, चालेल. द्या.”
ब्राउन पेपरमध्ये गुंडाळलेलं आणि वरून सेलोटेपा लावून नीट प्याक केलेलं ते पुडकं माझ्या हातात आलं. त्याचे पैसे किती विचारलं, तर म्हणाले, “बावन्न रुपये पन्नास पैसे.”
पन्नास सुट्टे पैसे दिले नसते, तर पुस्तक निर्दयपणे माझ्या हातातून काढून घेऊन त्यांनी वर फळीवर ठेवलं असतं याची मला खातरीच होती. त्यामुळे गपचूप पाकीट उलटंपालटं करून पन्नास रुपये आणि अडीच रुपये टेकवले. मी नशिबावर इतकी चकित होते, की पद्मजाचं ’गर्भश्रीमंतीचं झाड’ आहे का ते विचारायचं मला सुचलंच नाही. मी बहुतेक तरंगतच घरपर्यंत आले असणार.
परत पुण्यात इतक्या वार्या झाल्या, पण इतकी चमकदार पुस्तकखरेदी झाल्याची आठवण गाठीला नाही. त्या फेरीचा मुहूर्तच साडेतीनांपैकी एखादा असणार.
***
परदेशातली वारी. महिनोन् महिने आधीपासून नेटानं बुकिंगं केलेली. पॅरीसमधून रात्री निघून सकाळी झ्युरिकला पोचायचं होतं. तेवढाच एक बसचा प्रवास. पण पॅरीसच्या गाडीतळापासूनच नरपटी लागायला सुरुवात.
आपल्या बिचार्या यष्ट्यांचे तळही बरे म्हणावेत, असं एक तीन बाजूंनी उंचवटा असलेलं उखीर-वाखीर मैदान. उगाच एखाद-दोन झाडं, थोडा कचरा, बरीच माणसं. तिथे मातीतच बरासा उंचवटा नाहीतर सामानच वापरून टेकलेली. ऑफीसच्या खोपटाला टाळं. रागरंग बघून भिवया कपाळात गेल्या. पण ’बघू तर.’ असं म्हणून थांबलो. बस आल्यावर तिचा किन्नर इंग्रजीतल्या प्रश्नावर नळ सुटल्यासारखं जर्मनमधून बदाबदा उत्तरला, आणि एकदम ’हुर्रे!’ झालं. तीन दिवस पॅरीसकरांनी करायला लावलेल्या ’डम शराज’चा (मी हाच उच्चार लिहिणारे. वाचणार्यांनी आपल्याला हवा तो वाचून घ्यावा.) शीण खाडकन उतरला. एकदम साक्षर-सुशिक्षित-नागरी वाटायला लागलं. त्यानं सैलावत गाडीत बसलो. एका ठिकाणी बस बदलायची होती, रात्री तीन वाजता. त्या तयारीत मोबाईलचे गजर लावून गप्पा ठोकत बसलो. ’डायवर फुलॉन जर्मन फाडतोय, पण आपल्याला च्यायला येतेच्चे भाषा, आता बोला ना, आता बोला!’ असल्या पोरकट आनंदात चूर.
अकराच्या सुमारास पहिला स्टॉप आला आणि आमची तंतरली. एक्स्प्रेस हायवेवरून तळेगावजवळ जो टोलनाका लागतो, त्याच्या अलीकडे शुक्रवारी रात्री जास्त गर्दी असते; असला सुनसान स्टॉप. ऐन हायवेवर. ना कसलं ऑफीस आजूबाजूला, ना धड दिवे. बसमधून उतरणारा बाबा पाठीवर सामान लावून झपझप कुठेसा निघूनही गेला. आम्ही इकडे गॅसवर.
आता तीन वाजता जिथे उतरायचं आहे, तिथे तरी कुणी हरीचा लाल असणारेय का, असला जेन्विन प्रश्न पडला. डायवरला विचारलं, तर त्यानं खांदे उडवले. ’काय की बॉ! आत्ता कुठलं ऑफीस उघडं असायला? बसायला जागा असेल. बहुतेक.’ हे उत्तर. तशा आम्ही चौघी होतो एकत्र. त्यामुळे टेन्शनला चारानं भागायला हरकत नव्हती. पण तरी ’श्ट्रासबुर्गला न उतरता म्युन्शनला जाऊ या का सरळ? मग तिकडून जाऊ झ्युरिकला.’ असा बूट निघाल्यावर त्यावर फार भवति न भवति होता तीनेक मिनिटांतच एकमत व्हायला आलं, यावरून एकूण रागरंगाचं त्रैराशिक मांडायला हरकत नाही. तरी आखलेले बेत इतक्या सहजी बदलायची तयारी होईना माझी. झ्युरिकहून पुढच्या ट्रेनचं तिकीट हातात होतं, तेही फुकट गेलं असतं. किती उधळी नि खर्चीक झाले मी, तरी युरोमधून खर्च जरा जास्तच उधळखोर वाटायला लागला. शेवटी एकदा थांब्याचा अंदाज घेऊ नि आयत्या वेळी ठरवू अशी घोषणा करून मी चक्क झोपून गेले.
बरोब्बर तीन वाजता - श्ट्रासबुर्ग.
उठून बाहेर डोकावून पाहिलं, तर बंगळूरच्या स्थानिक बसतळावर आहे तशी रचना असलेले बसथांबे. दिवे-बिवे होते. पण चिटपाखरू नाही. सुनसान. या बाजूला पाहिलं, तर चक्क एकुलती बाई स्टॉपवर.
तिला बघून आम्ही आपापसात चकार चर्चा न करता एकदम उतरलोच. मजा म्हणजे आमच्यातल्या कुणीतरी डायवरला विचारलं एकदा, इथे सेफ आहे ना बाबा, तर त्यावरही त्या बाबानं नजर चुकवत खांदे उडवले!
नि तरी आम्ही ’मरू देत तिच्यायला!’ म्हणून उतरलो. बस निघून गेली, पुढची बस पावणेपाचाला येईलसं सांगून.
आम्ही पाच जणीच तिथे त्या मैलभर परिसरात. मिनिटभर लागलं असेल सेटल व्हायला. सगळ्यांना बसायला जागा नव्हतीच. चक्क ’लोकसत्ते’ची थोडी पानं पसरली आणि आम्हीही पसरलो मग. नावंगावं विचारली आम्ही, आणि तोवर पळायच्या तयारीत असल्यासारखी जय्यत बसलेली ती मुलगी सैलावलीच एकदम.
ती खरीच पळायच्या तयारीत होती, हे पुढच्या दोन तासांत कळलं. ती होती दक्षिण अमेरिकेतली, पेरूची. त्याच बस कंपनीनं घोळ घातल्यामुळे रात्री ११ वाजल्यापासून तिथे एकटीच बसलेली होती. तिला पुढची बस मिळायची होती सकाळी ८ वाजता. ना कंपनीचं ऑफीस. ना वायफाय. ना इंग्रजी बोलणारं कुणी फोनवर उपलब्ध. चिडचिड आणि हताशा आणि स्वीकार. मधून-मधून एक बाप्या समोरून सायकलवरून चक्कर मारून जात होता, म्हणून बारा-साडेबाराला तिनं पायातल्या उंच टाचांच्या चपला बदलून धावायचे बूट चढवले होते. सामान आवरून हाताशी ठेवलं होतं नि त्याला खुन्नस देत तिथे बसून होती. ’आता काही अजून निभणार नाही, झोप - थकवा - दडपण अती होतंय’ अशा टप्प्यावर आमची बस येऊन त्यातून चार बायका उतरल्यामुळे ती एकदम सैलावणे अधिक उत्तेजित होणे अशा अवस्थेला आली होती.
नंतरच्या गप्पांना खरोखरच तोड नाही. ’आता कुणी मवाली फिरकला तर आम्ही काय डरत नाही’छाप वल्गना; तिचं पर्यावरण परिषदेमधलं काम; माणसांकडे किती वर्षं शिल्लक आहेत त्याचे हिशेब; युरोपियन लोक स्वतःला प्रगत म्हणवतात, पण किती तुसडे असतात; त्याहून आपण आशियाई आणि दक्षिण अमेरिकी कसे कुटुंबवत्सल; आम्हांला जर्मन येत असल्याबद्दलचं कुतूहल आणि उगाच-कौतुक; मेथीच्या ठेपल्यांची पाककृती; भारतात आणि पेरूमध्ये येण्याची आमंत्रणं आणि घेण्याची काळजी; प्रवास करत राहण्याचे बेत आणि भेटायचे वादे; मेलायडींची देवाणघेवाण… बस आल्यावरही पाय निघेना. मग त्या डायवरला थांबवून चक्क मिठ्या आणि सेल्फी!
आल्यावर तिला लिहायचं पत्र अनेकदा खोडलं. कितीतरी दिवस ड्राफ्ट पडून आहे. अजुनी तिचा पत्ता आहे जपून ठेवलेला. फोटोही. पण काय लिहू, म्हणजे आम्ही आपापसांत वाटून घेतलेला बाईपणाचा दिलासा तिला सांगता येईल, ते काही कळत नाही.
***
एका शिबिराला म्हणून माणगावला गेलो होतो. माणगावच्या यष्टी ष्ट्यांडातून पुढली बस मिळायची होती. पण माणसं जमा होईस्तो बस येईल असा रागरंग दिसेना. सकाळी आठ-साडेआठाची भूकप्रधान वेळ. आम्ही एस्टी कॅन्टीन गाठलं. सगळं निवांत होतं. हवेतली गुलाबी थंडी भोगत पोर्या आणि गल्ल्यावरचा शेट दोघेच गप्पा छाटत बसलेले.
एस्टी कॅन्टीनमधली पुरीभाजी मला मनापासून आवडते. स्वच्छतेचे नखरे मिटून ठेवले, तर ती चमचमीत भाजी आणि त्यावर पेश्शल फर्माईश म्हणून ओतलेली मिसळीची तर्री काहीच्या काही वेऽड लागते. फक्त पुर्या गरम हव्यात.
“मिळेल पुरीभाजी?” आशेनं विचारलं.
“टाकतो की. थोडा वेळ लागेल पण.”
आम्ही बसलो. साताठ मिनिटांतच बाहेर हलचल. बस आलीशी वाटली. ’झालंच!’ असा अजिजीचा कटाक्ष टाकत पोरगं पुर्या तळतच होतं. पाचेक मिनिटं कसंबसं थांबलो, पण एक बस गेली असती तर अजून खोळंबा झाला असता. म्हणून दोन प्लेटांचे पैसे चुकवून बस गाठली.
’नव्हतं सालं पुर्यांवरती नाव आपलं’ म्हणून हळहळत मी खिडकी पकडली. बस सुटता सुटता आतून तीरासारखं ते कॅन्टीनमधलं पोरगं आलं. एका नजरेत मला हेरून, खिडकीतून माझ्या हातात पुरी-भाजीचं गरम पुडकं कोंबलं आणि मी आश्चर्यातून बाहेर येऊन थॅन्क्यू म्हणायच्या आत हसून अंतर्धान पावलंही. बस सुटली. ते पुडकं पिशवीत टाकून आम्ही पुन्हा गप्पांमध्ये. मग स्टॉप हुकला, आम्ही चुकलो, बरंच चालावं लागलं, थोडा कार्यक्रमही चुकला. हे प्रकरण डोक्यातून गेलंच.
शिबिरात जेवणाची व्यवस्था होती. पण स्वैपाकाचे अंदाज चुकले आणि बरेच जणांनी समजूतदारपणे जवळचे चिवडे-बिस्किटं काढली, तेव्हा एकदम हे पाकीट आठवलं.
वाफ धरल्यामुळे गोळा झालेली भाजी नि त्या मऊ पुर्या. आईनं बांधून दिलेला डबा खातानाही आले नसतील, इतके मला कृतज्ञतेचे झटकेच्या झटके आले खाताना. वेऽडच.
***
रायगडाच्या पायर्या फाफूं करत चढत असताना भाऊ आणि वहिनीनं आत्यांना दिलेली गोड बातमी - नि मग गड कसा सर झाला ते आठवणीतून पार गायब.
गावात पोचायला रात्रीचे दोन वाजले म्हणताना, ’कशा गं एकट्या फिरता तुम्ही?’ म्हणत झापणारा नि मग कुणीतरी आणायला आलेलं दिसेस्तो बस थांबवणारा कंडक्टर.
काठ्या नि दोर्यांचा जुगाड करून हेऽऽ एवढाले साबणाचे फुगे हवेवर सोडत बसलेल्या एका जर्मन पोराकडून घासाघीस करून खरेदी केलेल्या वेताच्या काठ्या!
विमानाला उशीर झाला तेव्हा तिथेच लाउंजमध्ये लागलेला ’मैंने प्यार किया’ बघून खिंकाळण्यात इतकी धमाल यायला लागलेली, की ‘कहे तोसे सजना’ लागलं आणि विमान आल्याची घोषणा झाली, म्हणून प्राणांतिक हळहळ…
नि तरी मला प्रवास नाहीच आवडत, म्हणजे माझा किती छळवाद झाला असेल…
त्याबद्दल परत केव्हातरी.
***
हे या पोस्टमधून राहून गेलेलं शेपूट.
त्याबद्दल परत केव्हातरी.
***
हे या पोस्टमधून राहून गेलेलं शेपूट.