काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.
~
मला धर्मेंद्र फारसा आवडत नाही. हेमामालिनीबद्दलही माझं मत फारसं बरं नाही. त्या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वात एक बेगुमान धटिंगणपणा आहे. त्याला बरेचदा आपसुख नाक मुरडलं जातं. पण या गाण्यात गुलजारनं त्या दोघांवर कसलीशी मंतरलेली भुकटी फुंकलीय. एक तर या गाण्यातला मळभ आल्यासारखा निवांत प्रकाश. आणि मूड... वल्लाह.
धर्मेंद्रची पांढर्या मलमलीची सैलसर कोपरी आणि लुंगी. हेमामालिनीची नायलॉनची असली तर अगदी रोजमर्रापण असलेली झुळझुळीत-पोपटी साडी, उजव्या कानाच्या मागे कर्ण्यासारखं खोवलेलं लालबुंद गुलाबाचं फिल्मी फूल, तिच्या कुरळ्या केसांची महिरप, आणि तरी - या सगळ्याला विलक्षण घरगुती प्रसन्नपणा बहाल करणारं तिच्या नजरेतलं त्याच्याबद्दलचं प्रेम. त्या दोघांकडे बघताना जाणवतं, हे प्रेम नव्हाळीचं नाही. मुरलेलं-सवयीचं-गडद-दाट आहे. त्या प्रेमावर सांसारिकतेचा ठसा उमटू पाहतो आहे.
गाण्याचे शब्दही ‘गुलजार-गुलजार-गुलजार’ असे अंतर्बाह्य ठळक शिक्के लेऊन आलेले. बातम्या असाव्यात अशा साध्या गद्य मुक्तछंदीय शब्दांना दिलेली सैलसर सुरावट. रोजच्या आयुष्यातले साधेसेच क्षण गुंफलेले त्यात, पण ते कविता कधी होऊन गेले, असं कोडं पडावं अशा बेतानं. निस्संकोचपणे, हक्कानं येऊन घरच्यासारखे बसणारे इंग्रजी शब्द आणि पात्रांची नावं. मनमुराद खिदळणं. आणि वर लिहिता-लिहिता गुलजारनं प्रेक्षकाला मिश्किलपणे डोळा घालावा, तसे ‘क्यों, चिठ्ठी है या कविता?’ असे विणलेले शब्द! मानेला सुरी लावून जरी कुणी ‘या गाण्याचा कवी गुलजार नाही’ असं म्हणायला फर्मावलं, तरी ते तोंडून निघणं शक्य नाही, इतकं हे गुलजारचं गाणं आहे.
मजा म्हणजे या गाण्यातल्या नायिकेच्या तोंडी मधूनमधून खिदळण्यापलिकडे आणि नायकाला चूप करण्यासाठी ‘Will you shut up!’ म्हणण्यापल्याड शब्द नाहीत. पण असं वाटत मात्र नाही. थेट ‘दिल का भॅंवर करे पुकार’मधल्या अजिबात अवाक्षर न बोलताही कित्तीतरी काय-काय बोलणार्या नूतनची आठवण व्हावी, इतकं हेमामालिनी या गाण्यात बोलली आहे. त्याचं स्वप्न ऐकताना, आपली स्तुतीच करणारेय हा, पण कशी बरं, अशा खातरीनं-अप्रूपानं-प्रेमभरानं तिची झालेली उत्सुक मुद्रा. त्याचा सूर उंच-ढाला लागल्यावर लटक्या नाराजीनं कानावर हात ठेवणं. मध्येच न राहवून लाजणं आणि तरी अनावर उत्सुकतेनं पुढे ऐकत राहणं. त्याच्या अंगावर केसांचं पाणी शिंतडणं, त्याच्या लबाडीनं वैतागून पत्ते त्याच्या अंगावर फेकणं, आणि हेमामालिनीनं जे पडद्यावर अगदी क्वचितच केलं आहे, ते म्हणजे चक्क ओठांचा चंबू करून नायकाच्या दिशेनं उडतं चुंबन फेकणं...
एकमेकांच्या अंगावर रेलणारे, एकमेकांशी निस्संकोच मस्ती करणारे, एकमेकांच्या कपाळावर हनुवटी रुतवून एकमेकांना डिवचणारे, खिदळणारे-चिडणारे-चिडवणारे, शृंगाराच्या अगदी कळे-न-कळेशा सूचनानं किंचित लाजणारे हे प्रेमिक बघताना भरून येतं. असं वाटतं, हे कधी संपूच नये.
गाण्यातल्या शब्दांवरला गुलजारचा सहीशिक्का कमी पडला म्हणून की काय, गाण्यातल्या गाण्यात फ्लॅशबॅकही आहे एकाहून अधिक वेळा. सगळ्या वेळा एका दृश्यातून दुसरं दृश्य अलगद मिसळत-उलगडत जातं आणि आपण आठवणीत शिरतो. असं होत नसतं, तेव्हाही आपल्याला दिसणारे नायक-नायिका कधी फुलांच्या डहाळीच्या आडून दिसतात, कधी खिडकीतून. त्या सगळ्या सिच्युएशनलाच एक हलका तरल धूसरपणा बहाल करणार्या; गद्य की पद्य, कविता की पत्र, सत्य की स्वप्न... असा भाव मनात नकळत जागा करणार्या त्या दृश्यचौकटी.
त्यावर कळस चढवल्यासारख्या, गाण्याच्या अखेरच्या ओळी, जागेपण आणि स्वप्नाच्या सीमेवर झुलल्यासारख्या – ‘जब तुम्हारा ये ख्वाब देखा था, अपने बिस्तर पे मैं उस वक्त पडा जाग रहा था…’
#बुजरी_गाणी २
~
एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने
तूने साडी में उरस ली है मेरी चाबियॉं घर की
और चली आई है बस यूं ही मेरा हाथ पकड कर
एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने
मेज पर फूल सजाते हुए देखा है कई बार
और बिस्तर से कई बार जगाया है तुझको
चलते फिरते तेरे कदमों की वो आहट भी सुनी है
एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने
क्यों चिठ्ठी है या कविता?
अभी तक तो कविता है
गुनगुनाती हुई निकली है नहा के जब भी
अपने भीगे हुए बालों से टपकता पानी
मेरे चेहरे पे छिटक देती है तू टीकू की बच्ची
एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने
ताश के पत्तों पे लडती है कभी-कभी खेल में मुझसे
और कभी लडती भी है ऐसे कि बस खेल रही है मुझसे
और आगोश में नन्हें को लिए
Will you shut up!
और जानती हो टीकू
जब तुम्हारा ये ख्वाब देखा था
अपने बिस्तर पे मैं उस वक्त पडा जाग रहा था
~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.
No comments:
Post a Comment