Wednesday 17 July 2024

आजीची गोष्ट ०५

(भाग ०४)

तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी.

सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही खाऊन जाणं जमत नसणार, इतकी कामाची धावपळ. तेव्हा डबा वगैरे नेण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी तीन-चार वाजता घरी यायची, तेव्हा तिच्या वाटचा गुरगुट्या भाताचा थिजून गारगुट्ट झालेला वाटीएवढा गोळा केळीच्या पानाखाली झाकून ठेवलेला असायचा. तो जेवताना तिला काय वाटत असेल? कधीच्या काळी केळीचं पान बघायला मिळणार्‍या आम्हां शहरी मुलांना केळीच्या पानावरजेवण्याचं कोण आकर्षण. गरम अन्न केळीच्या पानावर वाढलं की त्या वाफेनं केळीच्या पानावर असलेलं एक मेणसदृश रसायन वितळतं आणि अन्नात मिसळतं. त्याचा विशिष्ट वास अन्नाला येतो. तो वास मला फार आवडतो. पण आजीला त्या वासानं कसंसंच होत असे. घरी काही विशेष समारंभ वगैरे असला, एकत्र जेवणं असली की भांडी घासायला कमी असावीत, म्हणून मुद्दाम केळीची पानं आणवून घेतलेली असायची. पण ती मात्र केळीच्या पानात कदापि जेवायची नाही. तिचं जेवण ताटात. त्या नकोसेपणामागे काय-काय असेल!

इतकं करून शाळेचं शिक्षण जेमतेम चौथी पास. ती राहून गेलेली हौस तिच्यात मूळ धरून राहिली असावी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर तिनं खूप कष्ट केले. अंकगणितात तिला गती होती. आई सांगते त्यानुसार पार डीएडच्या अभ्यासक्रमातल्या अंकगणिताच्या अडचणी ती सोडवून देत असे. मामाला गणितात फारसा रस नसायचा. शाळेतून घरी आल्यावर तो आजीला बजावून ठेवायचा, “ही रीत बघून ठेव गं गणित सोडवायची. नंतर मी विसरीन. मग तू मला सांगायला हवीस.” मग ती रीत शिकून ठेवून आजी त्याचा अभ्यास घेणार! सातवी-आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना कुठे नणंदेकडे रत्नागिरीत, कुठे बहिणीकडे भांडूपला राहायला ठेवून त्यांच्या शिक्षणाची सोय होईलसं तिनं पाहिलं. सगळ्यांत मोठी मुलगी हुशार होती. म्हणती तर डॉक्टर होती. पण तिलाच एकटीला शिकवत बसलं, तर बाकीच्या चार मुलांची शिक्षणं कशी व्हायची? या विचारानं मावशीचं मॅट्रिकचं शिक्षण होऊन तिला नीटस नोकरी मिळाल्या मिळाल्या आजीनं पाच मुलांना ठाण्यात बिर्‍हाड थाटून दिलं. तेव्हा एखादा ब्लॉकही स्वस्तात मिळाला असता. पण पाच मुलंच राहायची, सगळ्यात मोठी मुलगी एकोणीस वर्षांची. आजूबाजूला बरीशी सोबत हवी. स्वच्छता हवी. सुरक्षितता हवी. येणंजाणं फार गैरसोयीचं नको. बरं, भाडंही पुढे त्यांचं त्यांना कमावून परवडेलसं हवं. अशा सगळ्या विचारानं तिनं एका चाळीतली तळमजल्यावरची जागा निवडली. पागडी जास्त लागणार होती, तर स्वतःच्या बांगड्या विकल्या.

या सगळ्यातला तिचा धोरणीपणा, निर्णय घेताना न डगमगणं, दूरवरचा विचार करण्याची वृत्ती, व्यावहारिकपणा... हे सगळं तर थक्क करतंच. पण सगळ्याच्या तळाशी असलेली दिसते, ती तिची चांगल्या शिक्षणासाठीची कळकळ.

मुलांपैकी दोन शाळेत जाणारी, दोन कॉलेजच्या वयातली, एक मुलगी नुकती नोकरीला लागलेली. अशा पाचच्या पाचही मुलांना घरापासून दूर स्वतंत्र राहायला ठेवताना तिला काळजी वाटली नसेल? असणारच. लोकांनीपण काहीबाही ऐकवलं असेलच. पण आजीचीच धाकटी बहीण म्हणायची, “लोक काही तुम्ही काय जेवता ते बघाला येत नाहीत की करून घालाला येत नाहीत, आपला आपल्यालाच पिठलंभात कराचा असतो...” आजी तिचीच मोठी बहीण, कुणी काही बोललं असेलच, तर तिनं सरळ काणा डोळा केला असणार! गावातला कुणी एसटीत काम करणारा, कुणी अजून कसला चाकरमानी... तिचं सगळ्यांशी चांगलं. त्यांच्यातलं कुणी-कुणी या मुलांकडे चक्कर टाकून येऊन-जाऊन असायचं. त्यांच्याकरवी ती सतत मुलांसाठी काही ना काही पाठवत असायची. दारच्या अळवाच्या अळवड्यांचे शिजवलेले उंडे, कोहाळ्याच्या वड्या, आंब्याच्या रसाचा आटवून वाळवलेला गोळा, फणसाची साटं, खरवसाचा चीक... गावातल्या दवाखान्यातून सलाईनच्या मोठ्याशा बाटल्या आणून स्वच्छ धुवायची. त्यांची बुडं नि अंग रुंद असायची, तर गळे अगदी निरुंद. त्या बाटल्यांतून घरचं दूध किंचित विरजण घालून तेही पाठवायची.

तेव्हाच्या त्या काळजीनं उडून जाणार्‍या दिवसांतच तिला डायबेटिस सुरू झाला असेल का? काय ठाऊक.

दुर्दैवाची गोष्ट अशी की तिन्ही मामांना शिकण्यात फार गती नव्हती. हे कळेस्तोवर मुलींची शिक्षणाची वयं उलटून त्यांनी बर्‍याश्या नोकर्‍या धरल्या होत्या. पण यानं निराश-बिराश होईल तर ती आजी कसली! तेव्हाच्या आणि त्यापूर्वीच्या कोकणातल्या निम्नमध्यमवर्गीय वा मध्यमवर्गीय ब्राह्मण पुरुषांना एक शाळामास्तरकी, भिक्षुकी, नाहीतर किराणा मालाचं दुकान यापलीकडचा चौथा धंदा सुचलेला दिसत नाही. पण मामांनी रिक्षा चालवण्यापासून ते फिशरी चालवण्यापर्यंत, टेम्पो-ट्रक्स चालवण्यापासून ते पोल्ट्र्या चालवण्यापर्यंत, मासळीचं खत विकण्यापासून ते कौलं विकण्यापर्यंत... स-ग-ळे धंदे केले. सगळ्याला आजीचा सक्रिय पाठिंबा असायचा. पुढे मामानं पुष्कळ टेम्पो दाराशी उभे केले. पण त्याच्या पहिल्या रिक्षा-टेम्पोत चालवणार्‍या मामाच्या शेजारी, एक तृतीयांश सीटवर बसून फिरून आलेली आजी मला आठवते आणि तिचं अजब वाटतं.

आईची नोकरी सुरू झाल्यावर पहिलं मूल तिनं कसंबसं पाळणाघरं, प्रेमळ शेजारणी, वहिनीची आई... असं करून शाळेच्या वयाचं केलं. पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र हे सगळं करणं तिच्या जिवावर आलं. सासूनं हात वर केलेले. तेव्हा आजीच उभी राहिली. माझी धाकटी बहीण तीन महिन्यांची असताना आजी तिला घेऊन गेली आणि ती साडेतीन वर्षांची – शाळेच्या वयाची होईपर्यंत आजीजवळ राहिली. आईची नोकरी बिनघोर सुरू राहिली. आईबापापासून लांब आहे हो पोर!म्हणून तिची जी काही कोडकौतुकं त्या घरादारानं केली त्याबद्दल निराळं लिहावं लागेल! आजी! तू नि मीच फक्त झोपाळ्यावर बसायचं. बाकी कुण्णी नको!” हे किंवा “आजी! मी तुझ्या मांडीवर झोपणार. तू मागे भिंतीला टेकायचं नाहीस!” या आमच्या दोनवर्षीय बहिणाबाईंनी काढलेल्या फर्मानांच्या कथा अजूनही अर्धवट थट्टेनं – अर्धवट कौतुकानं सांगितल्या जातात, इतकं म्हणणं पुरे आहे!

तिच्या मुलांसाठी आणि मुलीच्या मुलांसाठी तिनं इतकं केलं. मग मुलांच्या मुलींना - नातींना तळ्यासारख्या गावातल्या शाळा थोड्याच पुरणार‍! त्या शाळेच्या वयाच्या झाल्या. मुलांचे गावातले धंदे जोरात. मग पन्नाशीपुढची आजी नि साठीतले आजोबा असे दोघं स्वतः शहरात चार नातींना घेऊन राहिले!

शिक्षणाची हौस... असं मी पुन्हापुन्हा म्हणते आहे खरी. पण आजीला एकूणच हौस पुष्कळ. तिची मुलंबाळं, पैपाहुणा, गडीमाणूस, शिवण, स्वैपाक... वगैरे बारदाना तिला दिवसभराला पुरवत असणार. पण रात्रीच्या जेवणानंतर हातावर पाणी पडलं की अडकित्त्या नि सुपारी घेऊन पुढल्या पडवीत निदान अर्धा तास तरी येऊन बसणं चुकत नसे. पुढल्या पडवीत एक पट्ट्यांची पाठ नि टेकायला हात असलेला, वापरून वापरून मऊ-गुळगुळीत झालेला डौलदार लाकडी बाक होता. त्या बाकात बसायला नि वारा खायलाआजी रात्री येऊन बसायची. तिथे गप्पा रंगायच्या. सारीपाटासारखा कवड्यांनी आणि फाशांनी खेळण्याचा एक खेळ ती आणि शेजारची नलूआजी, आणि आजीच्या दोघी नणंदा खेळत असत. तोही तासंतास चालणारा खेळ. मार्कडाव उर्फ तीनशे चार हा तर आमच्या घरातला फार लाडका डाव. काळ्या बिल्ल्यांचे चोरून लाल बिल्ले केले म्हणून एकमेकांच्या उरावर बसणार्‍या नातवंडांची भांडणं आजीनं बघितली असती, तर ती चिडली असती की आधी ओरडून मग कौतुकानं हळूच हसली असती, असा प्रश्न मला अनेकदा पडून गेला आहे. गावातले डॉक्टर घरी जेवायला असायचे. त्यांनी आणलेला चित्रलॅडिजचा खेळ, कॅरम, कवड्या नाहीतर खुब्या वापरून एकमेकांवर मात करण्याचा फरं-मरं नामक एक मजेशीर खेळअसं सगळं कायम चालू असायचं. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या सगळ्या पोरासोरांसकट थोरांचा पत्त्यांचा डाव पडायचा. त्यात कुणीही खेळायला बसायची मुभा असायची. अट एकच – “खोटं खेळाचं नाही!”

साधं भरतकाम म्हणू नका, नाड्यांचे तुकडे जोडून केलेलं भरतकाम म्हणू नका, व्रतवैकल्यं म्हणू नका, नाटकं म्हणू नका, खेळ म्हणू नका, सासरमाहेरच्या नातेवाइकांना जीव लावून त्यांचं कष्टांनी-पैशांनी करणं म्हणू नका, तीर्थयात्रेपासून ते लग्नामुंजींपर्यंत आईबापापासून लांब असलेल्यानातीला खाकोटीला मारून भटकणं म्हणू नका... आजीची जीवनेच्छाच जबर. त्यात तिला आजोबांची तशीच साथ असायची. एकदा गावात बूड स्थिरावल्यानंतर ते गावाची वेस ओलांडून बाहेर पडायला फारसे उत्सुक नसायचे. पण तुला हवी तितकी तू भटक.” मुलांना मारायचं नाही” हे आजीचं सांगणं. डोक्यात मारून मुलांना इजा होऊ शकते, कानफटीत मारून तेच, पाठीत धबका जोरात बसला तर मूल तोंडावर आपटेल.... म्हणून मग आजोबांनी हिरकूट पैदा केलेला असायचा. मार म्हणजे गुडघ्याच्या खाली, पोटरीवर हिरकुटाची शिपटी, बास! कायम घरातली अंथरुणं घालण्यापासून ते आजी दमली तर तिच्या पायांना रॉकेल लावून मालीश करून देण्यापर्यंत सगळं काही आजोबा करायचे. वेळी विरजलेल्या सायीचं ताक करून, लोणी काढून, तूप कढवण्यापर्यंत सगळं.

त्या दोघांच्यातलं भांडण कधी पाहिलंच नाही, असं आई आणि तिची भावंडं एकमुखानं सांगतात. अनेक वर्षं ते दोघंच जण रात्री एक तरी डाव रमीचा खेळायचे. काहीतरी जादू व्हावी नि त्या दोघांच्या पानांमध्ये आळीपाळीनं डोकावत त्यांचा डाव बघता यावा, असं फार वाटतं.

क्रमशः

1 comment:

  1. डोळ्यापुढे चित्र उभं राहतं

    ReplyDelete