Saturday, 6 July 2024

आजीची गोष्ट ०४

(भाग ०३)

०४

ही गोष्ट माझ्या आजीची खरी. पण ती तिच्या एकटीची अर्थातच नव्हे. तिच्याकडे थोडं दुरून बघताना मला बाकीच्या सगळ्या गोष्टीही दिसत राहतात. त्या गोष्टी स्वतंत्र असल्या, तरी सुट्ट्या नव्हेत. त्या आजीच्या गोष्टीशी जोडलेल्या आहेत. किंबहुना तिनंच त्या निरनिराळ्या प्रकारे जोडून घेतलेल्या आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे आजीला तीन नणंदा. थोरल्या नणंदेनं आणि तिच्या नवर्‍यानं – राधा आणि अण्णा यांनी आजीचा संसार उभा करून दिलेला. गहू खरेदी करताना तो किती वेळ चावून बघावा नि त्याची गोडी नि चिकटपणा कसा पारखावा या विषयापासून ते आमच्या घरात सगळ्यांना प्रिय असलेल्या पत्त्यातल्या मार्कडावापर्यंत – अशा अण्णा आणि आजी यांच्या पुष्कळ गप्पा होत असत. त्यांची दोस्तीच होती असावी. अण्णांच्या मुली आणि उशिरा झालेल्या मुलग्यामध्ये पुष्कळ अंतर होतं. हा उशिरा झालेला भाचा आणि त्याची मामी – म्हणजे माझी आजी – यांचं अगदी कल्पनातीत गूळपीठ. दर सुट्टीत मामीकडे येणार्‍या या भाच्याचा तिच्यावर फार जीव होता. ती शिवणयंत्रावर बसलेली असली की तिला चहा करून देण्याचं काम त्याचं. त्याच्या चड्ड्या – लंगोट आणि पैरणीही मामीनंच शिवलेल्या असायच्या. तो कटिंग करून द्यायचा आणि मामी शिवून द्यायची. कौतुकाच्या, यशाच्या, दुःखाच्या सगळ्या गोष्टी येऊन तिला सांगायच्या. तो इंजिनिअर झाल्यावर निदान बाहेरच्यांसमोर तरी त्याला घरातल्या नावानं हाक न मारता नीट पूर्ण नावानं हाक मारावी, असं अण्णांना सुचवणारी आजीच.

तिचं लग्न होऊन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तिनं आजोबांच्या पालगडातल्या मूळ घराची नीट माहिती करून घ्यायला सुरुवात केली. पालगडला गणपतीत मोठा उत्सव होत असे. अजूनही होत असेल. त्या उत्सवाला आजी दर वर्षी नेमानं हजेरी लावत असे, तिथली नाटकं हौसेनं बघत असे. तिचा तिथल्या अनेकांशी संपर्क असायचा. पुढे माझ्या धाकट्या मामानं ही उत्सवाची रीत पाळली. तो जाईपर्यंत दर वर्षी तोही न चुकता उत्सवाला जात असे. तो तसा कुटुंबातला आजीनंतरचा जनसंपर्क अधिकारीच म्हणायचा! पण हे नंतरचं झालं. आजी पालगडला जायला लागली, तेव्हा तिथे आजोबांच्या सावत्र चुलत भावाकडे उतरावं लागे. ते उभयपक्षी अप्रिय होत असावं. पण आजी जाताना शिध्यासकट सगळं सामान घेऊन जायची. एकदा आजी तिथे गेली असताना अण्णाही यायचे होते. अण्णांना चहा करून द्यायला म्हणून आजी स्वैपाकघरात गेली असता आजीची सावत्र पुतणी कमळी तिला खोचून म्हणली, “दे की काकू तो सकाळच्यातला. इथे उत्सवाला आलं की काम पडतं फार. इतकी कौतुकं कशाला?” त्यावर आजीनं “कमळ्ये, ते या घरचे जावई आहेत. आणि त्यांना ताजा चहा करून द्यायला मी शिधाही घेऊन आल्ये नि माझे हातही.” असं ठाम उत्तर दिलं होतं.  

आजीची दुसरी नणंदही खेडलाच एका सधन कुटुंबात दिलेली. घरची पुष्कळ शेतीवाडी होती. पण नवर्‍याच्या अंगी काही कर्तृत्व नव्हतं. बहुधा त्याला कामाला लावण्याच्या उद्देशानं तिनं त्याला भावाच्या घराजवळ स्वतंत्र बिर्‍हाड करायला लावलं आणि ती तळ्यात आली. धंदा? शेतीवाडी नसलेल्या आणि थोडकं भांडवलं असलेल्या कोकणातल्या ब्राह्मणांना जो आणि जितपत सुचे तोच. किराणा मालाचं दु-का-न. पण नवर्‍याचं यशापयश बघायची संधी तिला मिळालीच नाही. घरात काम करताना कधीतरी तिचा हात विळीवर चांगलाच कापला. तेव्हा गावात दवाखानाही नव्हता. तालुक्याहून एकदा डॉक्टर फेरी मारून जात असे. इंजेक्षन वगैरे कुठलं सुचायला नि मिळायला. तिला धनुर्वात झाला. खेडला नेईपर्यंत ती वाटेतच वारली.  

आजीची तिसरी नणंद – कुशी उर्फ कृष्णा – लग्नानंतर लगेचच काही वर्षांत विधवा झालेली. मूलबाळ नाही. पण तिच्या वागण्याबोलण्यात मिंधेपणा, कमीपणा अजिबात असलेला आठवत नाही. ती रत्नागिरीसारख्या शहराच्या ठिकाणी राहायला असायची हे कारण तर असेलच. पण नवर्‍यामागे काही वर्षांत मरून गेलेली सासरची माणसं आणि मग उत्पन्नाची चिंता न करता मुखत्यारपणी घर सांभाळण्याचं आणि निर्णय घेण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य हीदेखील कारणं असणार. आजीचं आणि राधाच्या धाकट्या मुलाचं जसं मेतकूट होतं, तसं राधाच्या थोरल्या मुलीच्या मुलांशी कुशीचं. राधाची थोरली लेक कुशीच्या शेजारीच राहायची. त्यामुळे तिची मुलं कुशीसमोरच वाढलेली. तिला त्यांच्याबद्दल विशेष ममत्व होतं. पण फक्त त्यांचंच नव्हे, कुशीनं येणार्‍याजाणार्‍या सगळ्यांचं आनंदानं केलं. आला-गेला, पै-पाहुणा, शिक्षणासाठी म्हणून कुणी येऊन राहिलेला विद्यार्थी, परीक्षेसाठी कुणी आलेला परीक्षार्थी, कसल्या सरकारी कामानं जिल्ह्याच्या ठिकाणी काम घेऊन आलेला कुणी परिचित... असं कुणीही तिच्याकडे पाहुणचार घेऊन जात असे. आजीच्या लेकीही शिक्षणासाठी कुशीच्या घरी राहिलेल्या. मी सगळ्यांचं सगळं केलंअसं ती किंचित अलिप्तपणे पण सूक्ष्म अभिमानानं म्हणतही असे. 

तिच्या म्हातारपणची आठवण उदास करून टाकते.

तिला होईनासं झाल्यावर तिनं तिचं घर विकून टाकलं. तोवर माझी आजी आणि आजोबा दोघंही देवाघरी गेले होते. त्या दोघांपैकी कुणीही असतं, तर घर विकल्यावर तिनं कुठं राहायचं हा प्रश्नच उद्भवता ना. पण ते नव्हते. घर विकल्यावर त्या व्यवहाराचे लाखावारी पैसे जवळ असताना आपल्याला कुणीही – म्हणजे राधाची मुलं-नातवंडं खरं तर – प्रेमानं बघतील, अशी तिची समजूत होती असावी. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. तसं तिला कधी कुणी तोंडावर म्हणालं नाही, पण एकाएकी उपटलेलं वृद्ध माणूस दोन-अडीच खोल्यांत सामावून घेणं थोडं जड गेलं असावं आणि तिला ते जाणवलं असावं. त्यानं ती अंतर्यामी दुखावली गेली. माझ्या आजीची मुलं – आई आणि मावशी – तिचं कर्तव्यभावनेनं करायला तयार असत. आजी असती, तर आपल्या नणंदेला तिनं इकडेतिकडे कुठेही जाऊ दिलं नसतं, ही खात्री त्यांच्या कर्तव्यभावनेच्या मुळाशी होती. पण कुशीला ते मनातून आवडत नसे. एकतर जावयांकडे राहणं म्हणजे... त्यात तिथली नातवंडं सवयीची आणि प्रेमाची नव्हेत आणि त्यांचे संस्कारही जुन्या वळणाचे नव्हेत. तिचे सतत सगळ्यांशी खटके उडत. आधुनिक विचाराच्या आई-मावशीशी वाद घालून तो जिंकायला ती पुरी पडत नसे आणि त्यांना काही पटवूनही देऊ शकत नसे. पण तिचे पीळही बदलण्यातले नव्हते. तुम्ही म्हणजे अगदी पुर्‍या पूर्णत्वाला गेलेल्या आहात हो! आम्हांला तुमच्यासारखं जमलं नाही.” असं ती थोड्या निरुपायानं आणि हताशेनं, कडवट होऊन म्हणत असे, ते मला अजूनही आठवतं. त्यात किंचित असूया मिसळलेली होती का? जन्म एकटीनं मुखत्यारपणी वावरण्यात गेलेला. जमवून घेणं शक्यच नसावं. प्रेमानं, हक्कानं राहवून घेणं तर सोडाच, पण आपण पैसे टाकले, की सगळं नीट होईलही तिची समजूतही खरी झाली नाही. तिला या अपेक्षाभंगाचा आणि नंतरच्या तडजोडीचा मनस्वी त्रास झाला असावा. त्यातूनच तिचं अल्सरचं दुखणं बळावलं असेल का? समजत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम ती अतिशय आवडीनं खायची, इतकं आठवतं. हा भाचा, तो पुतण्या, असं करत काही वर्षं इथेतिथे राहण्यात गेल्यावर, शेवटी माझा मामा तिला तळ्याच्या घरी – माझ्या आजीच्या घरी घेऊन गेला. त्यामागेही प्रेम होतं असं म्हणवत नाही. ‘आई असती, तर तिनं हेच केलं असतं, ती नसताना मलाही केलं पाहिजेही ठाम कर्तव्यभावना मात्र नक्की होती. तिथेही तिचा वेळ वार्‍याशी भांडण्यात जाई. पुढेपुढे ती भ्रमिष्ट झाली. देहाच्या भुकांविषयी नाही-नाही ते वेडंवाकडं, आचकट-विचकट बोले. मला वृद्धाश्रमात नेऊन टाकाअसा हेका धरून बसल्यावर तिला तिथे नेऊन ठेवलं. तिथेच एकाकी अवस्थेत ती वारली.

नेमानं वर्तमानपत्रं वाचणारी, इकडेतिकडे हिंडाफिरायची मनापासून आवड असलेली, “माधुरी दीक्षित आमच्या रत्नागिरीची आहे हो!असं कौतुकानं सांगणारी ही आत्तेआजी. ती विलक्षण देखणी होती. तिच्या सत्तरीतही तिचा गोरापान-केतकी वर्ण आणि शेलाटा बांधा उठून दिसायचा. पूर्ण चंदेरी झालेल्या केसांचा नीटस अंबाडा बांधणं, नाजूक नक्षी असलेली, पांढरीशुभ्र, स्वच्छ सुती नऊवारी पातळं चापूनचोपून नेसणंतिचं राहणं आणि करणं-सवरणंही मोठं स्वच्छतेचं-निगुतीचं असायचं. नवीन गोष्टी शिकून घेण्याची हौस असायची. आजीकडे माहेरपणाला येताना अननसाच्या मोरंब्यासारखा, तेव्हा कोकणात नवलपरीचा असणारा पदार्थ, ती मुद्दाम करून आणत असे. तिच्या मोठ्याथोरल्या घराच्या पुढल्या अंगणापासून ते परसदारातल्या डेरेदार कृष्णावळ्याच्या अंगणापर्यंत सगळं स्वच्छ लोटून काढलेलं, देखणं सारवलेलं, लखलखीत नेटकं असायचं.  

नवरा पंचविशीत वारला, तेव्हा ती कितीश्या वर्षांची असेल? नवर्‍याकडून तिला मिळालेलं सुख म्हणजे तो गेल्यावर त्याच्या गैरहजेरीत मिळालेली मुखत्यारकी आणि आर्थिक स्वावलंबन – हेच काय ते. विधवा झालेल्या स्त्रियांच्या शरीरसुखाबद्दल बोलण्याचीही पद्धत आपल्याकडे नाही. तिच्याही ते कधी मनातही आलं नसणार. अवघं तरुणपण असं कुणाच्या डोळ्यात न येता, नीट रेषेवरून चालण्यात, शिस्त-वळण-सोज्ज्वळपण सिद्ध करत वावरण्यात, देवाधर्माचे-कीर्तना-पुराणांचे छंद लावून घेण्यात गेलं असेल. तिच्या काळाचा विचार करता तिला दुसरं काही करण्याचा पर्यायही नसावाच. तेव्हा स्वतःच्याही नकळत दाबून ठेवलेल्या देहाच्या भुका म्हातारपणी उसळून आल्या असतील?

तिच्या घरी तिनं स्वतःला पाणी प्यायला म्हणून मातीचा इवला खुजा घेतलेला होता. त्या खुज्याचा देखणा आकार, नाजूक डौलदार तोटी, कमानदार निमुळती मान... हे सगळं मला अजुनी आठवतं. आता माझी मावशीही तसाच खुजा कुठूनसा पैदा करून हौसेनं पाणी प्यायला वापरते. तेवढीच त्या आत्तेआजीची आठवण उरली आहे.

अशाच करड्या रंगाच्या गोष्टी आजीच्या आईच्या आणि बहिणींच्याही...

क्रमशः

 

 

No comments:

Post a Comment