एकही चुणी न पडलेल्या काळ्याशार चादरीसारखा समुद्र,
एखादाच ढग कपाळावर वागवणारं राखीकबरं आकाश.
फिक्या गोंदणासारखी चांदव्याची बिंदी कोपऱ्यात डौलदार.
पिवळ्या प्रकाशाचं नि बोथट काळोखाचं कॉकटेल झोकून धुंदावलेले जडपाऊल रस्ते.
कुठल्याश्या थेटरातून रस्त्यावर सांडलेली गर्दी मूठभर...
बाकी अपरात्रीच्या प्रहरातली चिमूटभर निखालस शांतता.
असं वाटतं,
कसल्याश्या जहरी फूत्कारत्या डिस्टोपियाला जेमतेमच झाकून घेणारी भूल पडली आहे आसमंतावर.
कुणी आणखी एखाद्या अश्राप जिवाला नख लावण्याची तेवढी देर आहे फक्त -
वसंतसेनेच्या दागिन्यांसारखा क्षणार्धात निखळून खाली येईल सगळा संभार.
जग नागडं होईल.
पुन्हा सुरुवात,
पहिल्यापासून.
No comments:
Post a Comment