खूप दिवसांपासून मांजर पाळायचं होतं.
अंगभूत डौल, शिकारी प्राण्याचे गुण. चकित करणारी चपळाई, सावध चाल, तीक्ष्ण नजर, अफाट श्रवणक्षमता, डोक्याएवढ्या लहान सापटीतून सहजी निसटू शकणारं शरीर, धारदार नख्या आणि दात... असं सगळं असलेलं मांजर पाळीव असलं, तरी मिजास राखून असतं. ती त्याची खासियतच. कितीही प्रेमाचं झालं, तरी मालकाच्या मागे लाळ घोटत येणारं मांजर दुर्मीळ. अशा मांजरांचा भोवतालचा वावर सुखावतो, शांतवतो. त्या मोहानं अनेकदा मांजर घरी आणायचे प्रयोग केले. पण त्यांतला एकही यशस्वी झाला नाही. कधी पिल्लाला घरात ठेवायला दारंखिडक्या लावून बसणं जिवावर यायला लागलं. कधी पिल्लाला त्याच्या आईविना चैन पडेना. कधी व्यावहारिक अडचणींपायी मांजराची पाठवणी, तर कधी मांजराच्या मूळ मालकाला विरह सोसेना म्हणून...
एका पिल्लानं तर फार चटका लावला. घरी येऊन चांगला आठवडा झाला, तरी जवळ येऊ देईना. जेमतेम दीड महिन्याचं पोर. पण काय त्याचा फणकारा! फिस्कारणं, पाय आपटून दात विचकून दाखवणं, ओरबाडणं... कुणासमोर अन्नपाण्यालाही तोंड लावायचं नाही. आठवडाभर नाना लाड करून पाहिले. उबेला शाली, खेळायला खेळणी, खाण्यापिण्याचे छप्पन्न प्रकार... त्याला सवय व्हावी म्हणून जमिनीवर बसून बोलाचाली, जेणेकरून त्याला भ्यायला होऊ नये. खाली बसून धीम्या आवाजात वाचणं-बोलणं, संथ हालचालींनिशी वावरणं, आवाज वा पारा चढू न देता त्याला दिलासा देत राहणं... एक ना दोन. पण ते दाद देईना. चिडक्या आवाजात ओरडत राहायचं. शेवटी बहुधा रागानं, अगतिकतेनं, ताणामुळे ते कुठेही हगू-मुतू लागलं. इवलासा मुका जीव. आपल्या हौसेपायी त्याचा सुखाचा जीव दुःखात का घालावा, असा प्रश्न पडला. असहाय वाटायला लागलं. कसेबसे आठ दिवस काढले. पण त्याच्या शीतून रक्त पडायला लागल्यावर मात्र धाबं दणाणलं. त्याला टोपलीत घालून डॉक्टर गाठला.
“हे खूपच आक्रमक स्वभावाचं आहे. वय वाढलं की त्याची ताकद वाढत जाईल. कसं झेपेल तुम्हांला? शक्य असेल तर त्याच्या आईकडे परत सोडाल का त्याला?” असा निस्संदिग्ध सल्ला मिळाला. तो मानला. तशी साहेबांच्या म्यांवचा सूर बदलला. जुन्या ओळखीच्या परिसरात ते बागडू लागलं. येताजाता त्याला कोवळ्या सुरात साद घातली की ते म्यांव करून हाकेला ओ देई. खायला-प्यायला दिलं, तर सावधपणे स्वीकारी. पण त्यापल्याड ओळखीची रेष त्यानं कधीच ओलांडली नाही.
त्याची रोखून बघणारी पण सावध नजर पक्की लक्षात राहिली.
या अनुभवानंतर माझी प्राण्यांकडे बघण्याची नजर बदलून गेली. आपल्याला वाटतं, तशा त्यांना फक्त अन्नाच्याच भुका असतात असं नव्हे. त्यापलीकडे आवडी-निवडी असतात, प्राधान्यक्रम, मूड्स, स्वभाव, भावनिक गरजा, ताणतणाव, आग्रह, हट्ट, त्यातून येणारी दुखणीखुपणी... सगळं असतं. आपण विश्वासाचा पूल बांधायला कमी पडतो – कारण आपल्याला एकमेकांची भाषा अवगत नसते, हे तर झालंच. पण त्याहून खरं म्हणजे, आपली दृष्टी बेपर्वा आणि मानवकेंद्रित असते.
हे चरचरून लक्षात येऊ लागलं, त्या टप्प्यावर लॉरा कोलमनचं ‘द प्यूमा इयर्स’ हे पुस्तक मला मिळालं.
~
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातला एक विकसनशील देश. इतर विकसनशील देशांपेक्षा त्याची कहाणी फार वेगळी नाही. भ्रष्ट सरकार. गरीब, नाडलेले, शोषित लोक. अस्ताव्यस्त, निबीड, गर्द, स्तिमित करणारं जंगल आणि त्यातले प्राणी. लाकूड आणि खनिजं यांसाठी त्या जंगलावर डोळा ठेवून असलेल्या बड्या कंपन्या. विकासाच्या नावाखाली वाढते रस्ते. विरळ होत जाणारं, लचके तोडले जाणारं, नैसर्गिक आणि कृत्रिम वणव्यांखाली भाजून काढलं जाणारं, अपरिहार्यपणे आटत-आक्रसत जाणारं जंगल. हक्काचा अधिवास गमावणारे, परागंदा होणारे, कधी कुणा श्रीमंती फॅडपायी शिकार होऊन कातडी वा दातरूपानं उरणारे, कधी सर्कशीत विकले जाणारे, कधी कुणा अतिश्रीमंत विकृत चाळ्यांपायी ‘पाळीव’ केले जाणारे, अक्षरशः मुक्यानं सोसणारे प्राणी.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुकाळ, आधुनिक युगातल्या विकासाची ओढ, अकार्यक्षम-भ्रष्ट राजवट – हे सगळं एकत्र आल्यावर जी घडते, तीच बोलिवियाचीही कहाणी.
‘द प्युमा इयर्स’ हे अनुभवकथनात्मक पुस्तक अशा बोलिवियामध्ये घडतं.
तिथल्या जंगलातल्या प्राण्यांचं बेकायदेशीर ट्रॅफिकिंग चालतं. सरकारी प्रयत्नातून त्यांपैकी काही रॅकेट्सवर धाडी पडतात, गुन्हेगार पकडले जातात. प्राणी ताब्यात घेतले जातात. पण त्या प्राण्यांनी कुठे जावं? खूप लहान पिल्लं असताना पकडले गेलेले हे प्राणी ना धड जंगलात जगू शकत, ना बंदिवासात. या प्राण्यांच्या अपेष्टा सहन न होऊन कुणीतरी आंदोलन उभं केलं. प्राण्यांच्या अंदाधुंद छळावर नियंत्रण आणलं. लहानपणी नैसर्गिक अधिवासात न वाढलेले आणि आता मोकळे केलेले वन्य पशू सांभाळण्यासाठी पदरचा पैसा खर्चून एक जमीन खरीदली. तिथे अभयारण्य आणि प्राणिसंग्रहालय यांच्या मधली एक व्यवस्था उभी केली. प्राण्यांना खायलाप्यायला मिळावं, त्यांना माफक का होईना – जंगलासारखा अनुभव देणार्या अधिवासात वावरता यावं, आपण त्यांच्यावर लादलेल्या छळाचं थोडं परिमार्जन करता यावं अशी ती यंत्रणा. 'एल पार्के' नावाची. अपुरा निधी, जगभरातून – विशेषतः विकसित देशांतून – कुतूहलानं येणारं स्वयंसेवक, आणि काही माणसांचं या प्राण्यांवरचं प्रेम – इतक्या बळावर चालत राहिली.
रंगीत काकाकुवे आणि पोपट, निरनिराळ्या जातींची माकडं, रानडुकरं, आणि मांजरं. पण मांजरं म्हणजे घराच्या उबेला राहणारी मांजरं नव्हेत. मोठ्ठाली मांजरं. बिबट्ये, सिंह, जॅग्वार आणि प्युमा!
कुणी छळापोटी चिडखोर बनलेलं. कुणी निराशेनं ग्रासलेलं. कुणी आत्महत्याप्रवण. कुणी अपंग. कुणी पंख छाटलेलं... त्यांना सर्वतोपरी जगवणारी माणसं.
त्या पार्कात लॉरा कोलमन जाऊन पोचली. ती तिथे कशी येऊन पोचली हाही एक मजेशीर योगायोगच आहे. मूळची ब्रिटिश असलेली चोवीसेक वर्षांची लॉरा. मानसोपचारतज्ज्ञ आईबाप, आपापल्या चमकदार व्यवसायांत यशस्वी असलेली भावंडं, उत्तम शिक्षण इ. असलेली ही मुलगी. आयुष्यात अद्याप स्थिरावत नव्हती. चारचौघींसारखी प्रेमप्रकरणं-लग्न-मुलंबाळं या चाकोरीत रस वाटत नव्हता, पण त्या अपेक्षांचं दडपण जाणवत होतं असावं. कामही मनासारखं मिळत नव्हतं. आज ही नोकरी, उद्या ती नोकरी, परवा कुठल्यातरी टूरिस्ट कंपनीत मार्केटिंग कर, तेरवा प्रवासाला नीघ... शरीराबद्दल आत्मविश्वास नाही, वागण्यात ठेहराव नाही. नुसतीच भिरभिर भिरभिर. निबर-कोडग्या महत्त्वाकांक्षेचा अभाव. संवेदनशीलतेपोटी कायम मनात वस्तीला आलेली व्याकूळता... असं करता करता एका प्रवासादरम्यान तिनं हार पत्करून घरी परतायचं ठरवलं होतं. त्याकरता कुठल्यातरी सायबर कॅफेत विमानाचं तिकीट काढत असताना तिथल्या भिंतीवरचं 'एल पार्के'तर्फे स्वयंसेवकांना आवाहन करणारं पत्रक तिच्या नजरेस पडलं. त्यात ना फार पैसे होते, ना फार आकर्षक असं काही काम. निव्वळ 'नाहीतरी दुसरं काय करायचंय, हे करून बघू' अशा अनिर्णितावस्थेत लॉरा पार्कात गेली.
ती जेमतेम महिन्याभरापुरती पार्कात आलेली. तिला बोलिवियाच्या जंगलातली उष्णदमट हवा, अस्वच्छता, अन्नाचं वेगळेपण, सगळीभर वावरणारे प्राणी, शारीरिक कष्टांचं काम… यांतलं काहीच सवयीचं नव्हतं. ती सुरुवातीला धसकली, श्रमली, भ्यायली, रडली. एक महिना झाला की परत जायचं, असं घोकत ती तिथे राहिली.
तिला त्या पार्कमधल्या ‘वायरा’ नामक प्यूमाला फिरवून आणण्याचं काम मिळालं.
वायरा ही एक पूर्ण वाढलेली प्यूमा मादी. वाघ-सिंह वा बिबट्याइतकीच हिंस्र, पण बुजरी. लहानपणापासून कुणीतरी कोंडून ठेवल्यामुळे कुणावरच चटकन विश्वास ठेवू न शकणारी, संशयी-सावध, जंगलात जगण्याचा अनुभव आणि क्षमता नसलेली, जंगलालाही भिणारी. तिला तिच्या लहानशा पिंजर्यातून बाहेर येता यावं, जंगलाच्या हवेत थोडं फिरता यावं-रमता यावं, म्हणून तिला मोठ्ठा दोर लावून पिंजर्याबाहेरच्या राखीव तुकड्यात बाहेर काढून फिरवून आणण्याचा प्रघात होता. तिला फिरवून आणणार्या मुलीच्या हाताखाली लॉराला काम मिळालं.
लॉरा हळूहळू तिथे रुळली. तिचं जंगलाशी नातं जुळत गेलं. तिथल्या अनागर, उग्र, रंगा-गंधा-नादांशी. तिथल्या शांततेशी. तिथल्या भौतिक सोयींच्या अभावांशी.
तिथल्या प्राण्यांच्या अश्राप प्रेमाशी, भित्यांशी, असुरक्षिततांशी.
लॉरानं अगदी सुरुवातीच्या वेळी वायराकडे जाताना अनुभवलेल्या जंगलाचं वर्णनही अद्भुत म्हणावं असं आहे.
... मी अंधारात अडखळतं पाऊल टाकलं. पायाखाली खडबडीत उखीरवाखीर ढेकळं होती आणि हवेला दवाचा वास. भोवती माझ्यापेक्षा उंच वाढलेलं जंगली गवत. मी हातानं ते वारायचा प्रयत्न केला, पण पात्यांना चांगलीच धार होती. जेमतेम काही फुटांवरचं कसंबसं दिसत होतं-नव्हतं. जंगलात दोनच ऋतू असतात - ओला नि कोरडा. मी जंगलात आले होते ती एप्रिलमध्ये. पाऊस संपून पाचेक महिने झालेले. आत्ता जंगलं जितकं सुंदर असतं, तितकं एरवी क्वचितच असतं. हळूहळू पाण्याची चणचण जाणवू लागेल आणि जमीन भेगाळेल. पण आत्ता? आत्ता मात्र जंगल मनाला दडपून टाकेलं असं नि इतकं देखणं दिसतंय. एकूण एक रंग जणू हिरव्याच्या जवळ गेला आहे नि जंगलानं ते सगळे रंग एकदम ल्याले आहेत. . . . राक्षसी झाडं, त्यांची अकराळ-विकराळ मस्तकं, खोडांच्या तपकिरी सालट्या सुटत चाललेल्या, अंगाखांद्यावर काटेदार चिलखतं. . . . एकमेकांच्या अंगाखांद्यावर चढलेली, गळ्यात पडलेली, गळे दाबणारी झाडंच झाडं... . . . हे एखादं स्वप्न तर नव्हे? मी त्यातून वाट काढताना विचार करत होते. धपापणारा श्वास असलेल्या अशा जिवंत ठिकाणी मी कधीच आले नव्हते आजवर. कितीतरी जीव स्पंदत होते माझ्या भोवतालात. लंडन अंडरग्राउंड ट्यूबमधली माणसांची गर्दी माझ्या डोळ्यासमोर आली. माणसांच्या घामाचा दर्प आणि जागेसाठी अव्याहत धडपडणारी माणसंच माणसं. तिथेही आजूबाजूला अनेक आयुष्यं धडधडत असायची. पण ती सगळी एकसारखीच होती. माझ्यासारखीच होती. इथे? इथे सगळंच माझ्याहून पूर्ण वेगळं. …
या जंगलानं लॉराला हळूहळू ताब्यात घेतलं. जंगलानं तिला बदलून टाकलं. लॉराच्या पार्कातल्या सहकारिणीच्या शब्दांत सांगायचं, तर ‘त्या प्राण्या-माणसांनी स्वतःच्या बचावासाठी स्वतःभोवती उभा केलेला एकेक थर त्या जंगलानं जणू हळूहळू सोलत नेला.’ आतलं अनाघ्रात कोवळेपण हळूहळू उजळत गेलं. त्या प्रक्रियेची ही गोष्ट.
वायरानं सुरुवातीला लॉराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्या दोघींना एकमेकींची सवय होत गेली. वायरानं लॉराचा हात पहिल्यांदा चाटला, त्या प्रसंगी लॉरानं नोंदलेली स्वतःची प्रतिक्रिया मुळातूनच वाचण्यासारखी आहे. भीती, अविश्वास, स्थिरावलेपणाची चकित करणारी भावना, आनंद... असे अनेक टप्पे तिनं अक्षरशः निमिषभरात ओलांडले. हळूहळू तिच्याबरोबर फिरताना, तिचा विश्वास बघताना, वायराचा शांत श्वासोच्छ्वास अनुभवत तासचे तास जंगलात पेंगत बसून राहताना लॉराला जणू पायाखालची जमीन सापडत गेली. या प्राण्यानं आपल्याला जितकं शूर मानलं आहे, तितके आपण नाही, पण त्यानं काही बिघडत नाही, आपण शिकू शकू... ही जाणीव पचवत लॉरा शांत होत गेली.
वायरानं लॉरावर विश्वासून टाकलेलं एकेक बिचकतं पाऊल, तिच्या नजरेतली भीती आणि उग्र दहशत, तिच्या उरातली गुरगुर, एका टप्प्यावर तिनं लॉरावर केलेला हल्ला... आणि मग एक दिवस लॉराच्या उरावर घुसळलेलं मस्तक... हा सगळा अवाक करून टाकणारा प्रवास लॉरानं या पुस्तकात नोंदला आहे.
पण ‘द प्यूमा इयर्स’ केवळ या नात्याची गोष्ट सांगणारं पुस्तक नाही.
~
मराठीतही प्राणी आणि माणसं यांच्यातल्या प्रेमाची गोष्ट सांगणारी अनेक पुस्तकं आहेत. पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' आहे. पशुवैद्य लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आहे. विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय आहे. आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून हेमलकसामधल्या त्या प्रकल्पातल्या प्राणिशाखेची सुरुवात झाली. अनेक गैरसोयी सोसत प्राण्यांची काळजी घ्यावी लागे. सरकारी अधिकार्यांची मर्जी सांभाळावी लागे. पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या विलास मनोहर यांचं या अनुभवादरम्यान एका प्राणिप्रेमी व्यक्तीत परिवर्तन झालं. डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही सुरेख आहे. व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' एका वानरटोळीचं शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी आहे. वानरांमधली जगण्यासाठीची स्पर्धा आणि क्रूर निसर्ग यांचा अविस्मरणीय अनुभव ‘सत्तांतर’ वाचताना येतो.
पण या सगळ्या पुस्तकांहून ‘द प्यूमा इयर्स’ वेगळं आणि कितीतरी अधिक भेदक आहे. कारण प्राण्यांची ही अवस्था नक्की कशामुळे होते, त्यात प्रत्यक्ष ट्रॅफिकिंग करणार्या माणसांखेरीज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कुणा-कुणाचा सहभाग असतो, त्याबद्दल कुणाला किती भान असतं, असे अनेक प्रश्न हे पुस्तक विचारतं.
लेखिका पार्कमध्ये राहत असताना हळूहळू जंगलातून लाकडाची ने-आण करणार्या ट्रक्सची रहदारी वाढत जाताना दिसत होती. जंगल विरळ होत जात होतं. दर काही वर्षांनी मोठाले वणवे लागत असत. एका टप्प्यावर अशाच एका वणव्यापासून पार्क वाचवण्याच्या प्रयत्नात तीन आठवडे खर्ची पडले. पावसाळ्याचा ऋतू नव्हता. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. प्राण्यांचा जीव वाचवायचा की त्यांचा अधिवास वाचवायचा? की आपला जीव? आग पसरू नये म्हणून सगळं सोडून जिवाच्या आकांतानं चर खणायचे की हताश होऊन विध्वंस बघत राहायचा? कुठवर? आपण पुरे पडू शकू का त्याला? असे अनेक प्रश्न. पण त्यांना सामोरं जात लॉरा आणि तिचे सहकारी नेटानं काम करत राहिले. परिस्थितीच्या रेट्यासमोर आपण हतबल, असहाय असल्याचं कळूनही, भावनिक-शारीरिक श्रम ओतून उभं केलेलं जग पुन्हा पुन्हा मोडून पडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी बघावं लागत असूनही, पार्क वाचवत राहिले.
हे वणवे नैसर्गिक कारणांमुळेच लागतात असं नाही, असं लेखिकेनं नोंदलं आहे. सरकार नामक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं, क्वचित बेकायदेशीर गोष्टींकडे काणाडोळा करत असल्याचंही नोंदलं आहे. जंगलात राहणार्या स्थानिक लोकांची मोजकी चित्रणंही आहेत. वायरा पार्कमधून पळून गेलेली असताना असाच एक स्थानिक 'शिकारी' माणूस लॉरा आणि सहकार्यांची घालमेल समजून घेतो. शब्दही न बोलता वायराचा माग काढायला मदत करतो. त्याचा जगण्यासाठी चालू असलेला झगडाही अपरिहार्यच आहे, हे लॉराला जाणवून जातं. अशा वेळी तिला ‘विकास’ या शब्दाभोवती असलेले पेच दिसू लागतात. प्राण्यांची अशी ससेहोलपट का होते? जंगल तुटतं म्हणून? ते का तुटतं? विकास हवा म्हणून? विकास म्हणजे काय? अजून वेगवान प्रवास, अजून काही छानछोकीच्या वस्तू, अजून थोडी चैन? कुणाची? स्थानिक लोकांची? की जगभर हातपाय पसरणार्या भांडवलशाहीची?
या प्रश्नांमधून लॉरा आणि तिचे सहकारी स्वतःलाही सोडत नाहीत. पार्कमध्ये राहून रोज या प्रश्नांशी झगडणं ताकद मागणारं, थकवणारं, निराश करणारं खरंच. पण घरी परतून प्राण्यांपासून दूर राहणंही न सोसणारं. मग काय करायचं? विमानानं ये-जा करायची? आणि इंधनासाठी अॅमेझॉनमधलं जंगल संपवणार्या लोकांपैकी एक व्हायचं? अहं. विमानाच्या फेर्या अगदी जीवनावश्यक मानायच्या आणि शक्य तेवढी काटकसर करत जिथे असू तिथून भोवतालचा निसर्ग वाचवत राहायचं, असा एकमात्र पर्याय उरतो.
आपण जरी मुंगीलाही इजा न करण्याइतके तथाकथित अश्राप असलो, तरी या पापाच्या भारातून आपली सुटका आहे का, असा प्रश्न या पुस्तकातून उभा राहतो. हे ‘द प्यूमा इयर्स’चं वेगळेपण आहे.
~
वाघ-सिंह-चित्ते यांसारखी मोठी शिकारी जनावरं त्यांच्या परिसंस्थेचं अक्षरशः सम्राटपण अनुभवतात. एक जिवंत वाघ निरोगीपणे नांदण्यासाठी एक विशिष्ट आकाराचा मोठा अधिवास असावा लागतो. त्या अधिवासाची स्वतःची अशी अन्नसाखळी असते. त्याच्या जिवावर वाघ जगतो. पिरॅमिडच्या वरच्या त्रिकोणातल्या मोजक्या जागेत, मोजक्याच संख्येनं राहून राज्य करणार्या सम्राटासारखा त्याचा वावर असतो. त्यातून त्याच्या देहबोलीतली लय, तंदुरुस्ती, देखणेपण, डौल, चपळाई, ग्रेस... हे सगळं येतं.
या विलक्षण वैभवाचं आपण नक्की काय आरंभलं आहे, असा प्रश्न ‘द प्यूमा इयर्स’ वाचताना पुन्हा पुन्हा पडतो. आपणही संडास-आंघोळीसारख्या रोजच्या वापरासाठी अनेक बादल्या पाणी बिनदिक्कत आणि सहज फ्लश करून टाकतो. जगाच्या एका टोकाला पिकणारं अन्न बेपर्वाईनं दुसर्या टोकाला मागवतो. कुठल्याही ऋतूतलं अन्न बारा-महिने-तेरा-काळ पिकवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ऊर्जा खर्च करतो. विमानप्रवास स्वस्त झाला आहे आणि सगळीकडे ‘एअर बी एन बी’सारख्या कंपन्यांनी सुविधा दिल्या आहेत, म्हणून पैसे उधळून प्रवास करतो. आणखी-आणखी-आणखी मजा करतो, करत राहतो. ह्या भुकेतून किती नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते आणि पिरॅमिडच्या टोकावर जगणारे किती प्राणी छळ सोसतात... याचा विचारही आपल्या गावी असत नाही.
आणि त्याच वेळी लॉरा कोलमनसारखी विशी-पंचविशीतली मुलं अशा प्रश्नांना न भिता प्राण्यांवर वेडं प्रेम करत राहतात. थकतात, विझतात, क्षणिक माघार घेतात, आणि पुन्हा नव्यानं भिडतात. त्यांच्या या लढ्यातली भावनिक ससेहोलपट बघताना नतमस्तक आणि हताश असं दोन्ही वाटतं.
~
वायरा पार्कमधून पळून गेली. परत आली, तेव्हा भीतीपोटी तिनं हातात दोर घेऊन पुढे जाऊ बघणार्या लॉरावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या पिंजर्यात जाणार्या लॉराला सुरुवातीला वाटणारा भीतीचा धसका जाणवत होताच, पण अगदी आपल्यासारख्याच असलेल्या, स्नेही झालेल्या या मुक्या प्राण्याचा विश्वास आपल्याला पुन्हा लाभावा, ही ओढही होती. त्यापायी वायराच्या पुढ्यात जाण्याचा धीर तिनं केला.
त्या क्षणांचं वर्णन वाचताना आपल्याला भीती वाटतेच. पण त्याहीपलीकडे फार आसुसून वाटतं, की या मुलीच्या मनातली ओढ वायराला कळावी. तिनं लॉरावर विश्वास टाकून पाहावा...
लेखिकेचे शब्द असे आहेत :
. . . हळूहळू श्वास सोडत मी हात सावकाश तिच्याकडे सरकवला. तिनं मला चाटायला सुरुवात केली. माझ्या हातावर तिची ओली जीभ घासली जाण्याचा आवाज मला जगातला सर्वांत सुंदर आवाज भासत होता. बधीर झाल्यासारखं वाटत होतं. डोळ्यांतून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. पुढे होऊन तिच्या मानेवर डोकं ठेवलं. एकदम सैल सैल वाटलं. . . . हवेची रेशमी झुळूक झाडांच्या फांद्यांवरून फिरली की जसा मातकट वास येतो, तसा वास येत होता वायराला. तीही अविश्वासानं आणि आनंदानं पुढे होऊन माझ्या अंगावर रेलली होती...
भांडवलशाही आणि तिनं बदलत नेलेल्या जगाचे प्रश्न राहत नाही शेवटी मनात. उरतात ते डिप्रेशनशी लढणार्या माकडांना प्रेमभरानं जवळ करणारे लॉराचे सहकारी. समा नावाच्या सिंहाला 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' वाचून दाखवणारी लॉरा. रात्रीचं चमचमतं आभाळ आणि शांतता वागवणारं हिरवंकंच जंगल. लॉरा आणि वायरा यांचं बिचकत बिचकत विश्वासून एकमेकींवर रेलणं. शांत होऊन, धीर करून नवे अनुभव घेऊन पाहणं. पोहायला पाण्यात उतरणं, नव्या वाटा हुंगून पाहणं, थारावत जाणं.
~
आपल्याला कधीच मांजर पाळता येणार नाही, हा माझ्या मनातला सल या पुस्तकानं मिटवून टाकला. तिथे एका आशेला जागा करून दिली. स्वतःपलीकडे जाऊन विचार करता आला, धीर धरता आला, अनिश्चितता स्वीकारता आल्या... की जमेल. तोवर धीर धरायला हवा.
आता लॉरा बोलिवियात राहत नाही. पण वायराशी तिचं नातं अभंग आहेच. लॉरानं ONCA नावाची संस्था सुरू केली आहे. सामाजिक-पर्यावरणीय प्रश्नांवर सर्जनशील उत्तरं शोधू बघणार्या या संस्थेच्या नावाचा अर्थच मुळी आहे - प्यूमा. Panthera Onca म्हणजे प्यूमा. वायराच्या माध्यमातून लॉरानं सगळ्या निसर्गाशी मैत्री करणारं पाऊल पुढे टाकलं आहे.
~
द प्युमा इयर्स
लॉरा कोलमन
प्रथमावृत्ती २०२१
लिटिल ए प्रकाशन
('अनुभव' या मासिकांमध्ये फेब्रुवारी २०२४ या अंकात पूर्वप्रकाशित)
No comments:
Post a Comment