Monday, 4 September 2023

इतक्यात वाचलेली पुस्तकं : अर्ली इंडियन्स


सुमारे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेली काही आदिमाणसं भारतीय उपखंडात आली. काही युरोपात गेली. पण ‘अर्ली इंडियन्स’ हे टोनी जोसेफ लिखित पुस्तक इतरत्र गेलेल्या माणसांकडे फार निरखून बघत नाही. त्याचा रोख आहे तो भारतीय उपखंडातल्या माणसांच्या इतिहासाकडे.
ही आदिमाणसं भारतीय उपखंडात कुठे-कुठे स्थिरावली. पण सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वीपर्यंत शेतीचा शोध लागला नव्हता. लोक नुसतेच भटकत, शिकार-सावड करत जगत होते. साहजिक पोटापलीकडचं उत्पन्न नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतीही नव्हती. पण पाचेक हजार वर्षांपूर्वी इराणमधल्या झाग्रोस नामक डोंगराळ भागातली काही माणसं आपण ज्याला हडप्पा संस्कृती म्हणतो त्या भागापर्यंत आली असावीत. आत्ताच्या भारतातला गुजरात नि आसपासचा भाग, पलीकडचा पार बलुचिस्तानपर्यंतचा भाग, आणि अलीकडे अगदी गंगा-यमुनेच्या संगमापर्यंतचा भाग असा विस्तीर्ण भूभाग हडप्पा संस्कृतीचा मानला जातो. पण हा त्याचा विस्तार पुढच्या दीडेक हजार वर्षांमध्ये झालेला. तर – भारतात राहू लागलेली आफ्रिकी आदिमाणसं नि इराणच्या झाग्रोसमधून आलेले लोक एकत्र राहू लागले असावेत. त्यांच्या वंशजांनी हडप्पा संस्कृती वाढवली. तत्कालीन पृथ्वीवरची ही सगळ्यांत मोठी संस्कृती – भूभागाचा आकार नि लोकसंख्या अशा दोन्ही अर्थांनी. (तरी लोकसंख्या फार तर भारतातल्या आजच्या एखाद्या सेमीशहराएवढी असेल! हे ‘प्रचंड’ लोकसंख्येचा आवाका ध्यानी यावा म्हणून.) शेतीवर आधारित जीवनशैली, मोठाल्या देवळांची अनुपस्थिती, हिंसा वा संघर्ष यांचं चित्रण अजिबात न सापडणं, राजापेक्षाही निवडक उच्चवर्णीयांच्या हाती कारभार असल्यासारखी लक्षणं, पाण्याचं नि सांडपाण्याचं उत्तम नियोजन, नद्यांना बंधारे घालून आणि पूरनियंत्रण करून खेळवलेलं पाणी, रस्ते-स्नानगृहं, इत्यादींमधली शास्त्रशुद्ध गुंतवणूक, शिस्नपूजा, युनिकॉर्नसदृश्य प्राण्याचं पूजन, हंडी उर्फ लोटा या नमुन्याच्या भांड्याची निर्मिती आणि प्रसार, तत्कालीन जागतिक संस्कृतींशी व्यापार, बांगड्या या दागिन्याचं प्राबल्य, घोडा या प्राण्याची अनुपस्थिती तर रेडा-म्हैस या प्राण्याला असलेलं महत्त्व, मातृदेवतांची उपासना… या काही गोष्टी हडप्पा संस्कृतीचे विशेष म्हणून मानल्या जातात. तीनेक हजार वर्षांपूर्वी काही एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपदांमुळे तिचा र्हास होऊ लागला. वसवलेली नगरं सोडून लोक परागंदा झाले. जगायला इतर भूभागात गेले. त्यांच्यापैकी काही लोक भारताच्या दक्षिणेकडे गेले. दक्षिणेत आधीही स्थलांतरं झाली असणारच. पण हे महत्त्वाचं स्थलांतर असणार. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा आजही पूर्ण उलगडा झालेला नसला, तरी दक्षिण भारतातल्या द्रविडभाषांची आदिभाषा आणि हडप्पामधली आदिभाषा यांच्यात म्हणण्याजोगी साम्यं आढळली आहेत.
हडप्पा संस्कृतीचा र्हास अंतिम टप्प्यात असताना कधीतरी स्टेप्समधून – गवताळ कुरणांच्या प्रदेशातून काही टोळ्या या दिशेनं आल्या. त्यांची जीवनशैली भटकी होती. घोडा हा प्राणी त्यांच्याकरता साहजिकच अतिमहत्त्वाचा होता. धातुकाम आणि पर्यायानं शस्त्रास्त्रं याही बाबतीत ते प्रगत असावेत. गुराढोरांना महत्त्व होतं, पण एका जागी स्थिरावून नगरं वसवणारे ते लोक नव्हते. आपण ज्यांना ‘आर्य’ म्हणतो ते हे लोक असावेत. तोवर वेदनिर्मिती झालेली नव्हती, तसंच संस्कृतही पूर्ण विकसित नव्हती. त्या दोन्ही बाबी या प्रदेशात आल्यानंतर घडल्या. पण त्यांच्या संस्कृतीत – बहुधा येताना अफगाणिस्तानात वाटेत आलेल्या हरवैती – सरस्वती? – नदीला महत्त्व होतं. नद्यांना बांध घालणं पाप मानलं जात असावं. शिस्नपूजेबद्दल तिरस्कार होता. आणि मुख्य म्हणजे हे लोक पुरुषबहुल टोळ्यांतून आले.
आधीच र्हासकालात असलेल्या हडप्पा संस्कृतीला हा संघर्ष पेलवला नसावा. आर्य पुरुषांनी इथल्या स्त्रिया मिळवणं, त्यातून वंश वाढवणं, हळूहळू वेदरचना होत जाणं, संस्कृतची प्रगती होत असतानाच स्त्रिया (कारण त्या बहुतांश परक्या वंशातल्या!) आणि शूद्र (हडप्पातले, उर्फ परके) यांच्या संस्कृत बोलण्यावर बंधनं असणं, यज्ञ-बळी-युद्ध इत्यादी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणं… हे यथावकाश घडत गेलं. आजच्या भारताच्या वरच्या भागात डावीकडून उजवीकडे एखाद्या उथळ यूसारखा एक रुंद पट्टा ओढला, तर जो आकार मिळेल, साधारण त्या भागात आर्यांची संस्कृती बहरत गेली. त्या-त्या प्रदेशातल्या इंडो-युरोपीय भाषांचा अभ्यास या स्थानाला पुष्टी देतो.
हडप्पा आणि आर्य या दोहोंची वैशिष्ट्यं एकत्र येत राहिली. सुरुवातीला शिस्नपूजेचा तिरस्कार करणार्या आर्यांनी शिवलिंग स्वीकारलं. हडप्पा संस्कृतीमधली हठयोग्याची मुद्रा आणि योग स्वीकारला. आधीच्या हडप्पाजनांची मातृदेवतांची उपासना मागे पडली. त्यांनी यज्ञयाग आपलेसे केले. संस्कृत आणि वेद आपलेसे केले. या सगळ्या काळात भारतीय उपखंडात जगभरातून इतरही स्थलांतरं होतच होती. कुठे-कुठे मूळ आफ्रिकी वंशाचे ‘अर्ली’ भारतीय लोकही होते. या सगळ्यांमध्ये ‘मुक्त संचार नि संकर’ घडत होता. हा ‘भारतीय’ संस्कृतीचा सर्वांत सर्जनशील कालखंड. उपनिषदनिर्मितीचा कालखंड. मुक्तविहाराचा, मिश्रणाचा, विविधतेचा, विपुलतेचा आणि निर्मितीचा कालखंड.
इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षं कधीतरी वर्णसंकर थांबलेला आढळतो. त्यावर बंदी तरी आली असावी वा वर्णसंकरात काहीतरी चूक आहे अशी समजूत जनमानसात रुजली असावी – रुजवली गेली असावी. मजेशीर बाब अशी की वेदांत आढळणारी चातुर्वण्याची संकल्पना तत्कालीन समाजात अस्तित्वात असूनही त्याआधी वर्णसंकर थांबलेला दिसत नाही. तसे ठोस जनुकीय पुरावे आता मिळाले आहेत. इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षांपूर्वी तो थांबला. त्या सुमारास जातिव्यवस्थेचा उदय झाला असावा, असं म्हणता येईल.
इतिहासाच्या पटाच्या तुलनेत वर्णसंकर निषिद्ध मानण्याची घटना तशी अलीकडची (!) असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये जनुकीयदृष्ट्या फरक नाही. थोडं वैविध्य आहे, पण आपण सगळे जण थोडे थोडे सगळ्यांसारखेही आहोत. आफ्रिकी वंशाचे भारतीय, आ०वं०भा० + झाग्रोसमधले शेतकरी = हडप्पा, हडप्पा + आ०वं०भा०= द्रविड उर्फ दक्षिण भारतीय, हडप्पा + आर्य = उत्तर भारतीय, भारताच्या ईशान्येकडून आलेले मंगोल वंशीय आणि त्यांचे इतरांशी झालेले संकर, आणि या सगळ्यांचे आपापसांत झालेले संकर... असा भारतीयांचा जनुकीय आणि पर्यायानं सांस्कृतिक-सामाजिक इतिहास आहे. एका पिझ्झ्याची अतिसुलभीकृत (हा लेखकाचाच शब्द) उपमा देत ही घडण समजावली जाते. खालचं पीठ आ०वं०भा०चं, वरचा सॉस हडप्पाचा, चीज आर्यांचं, तर इतर लोकांचे टॉपिंग्स – असं सगळं मिळून आपण उर्फ आजचा आपला पिझ्झा घडलेला आहे.
हा सगळा पट ‘अर्ली इंडियन्स’च्या पूर्वार्धात उलगडतो. त्याकरता पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, जनुकशास्त्र, भाषाशास्त्र, शिलालेखन-ताम्रपट आणि बोलींचा इतिहास, इतर सांस्कृतिक-सामाजिक इतिहासलेखन – या सगळ्यांची मदत घेतली जाते. मात्र गेल्या पाचेक वर्षांपूर्वींपर्यंत या सगळ्या इतिहासात असलेली संदिग्धता संपवून ठोस नेमकेपणा आणि अचूकपणा आणण्याचं काम प्राचीन जनुकीय पुराव्यांनी केलं असल्याची ठाम नोंद होते.
ही गोष्ट अत्यंत दिलखेचक तर आहेच. त्याखेरीज ती आपल्याला विचारात पाडते. हा हजारो वर्षांचा इतिहास ओलांडून बघता बघता आजच्या भारतातल्या उत्तर विरुद्ध दक्षिण अशा संघर्षांपर्यंत येऊन ठेपते. ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद यांची मुळं दाखवून देते. शाकाहार आणि मांसाहार, दुग्धसेवन आणि मांसाशन यांमागच्या जनुकीय कारणांवर प्रकाश टाकते. गांधी-आंबेडकर वादाची मुळं शोधू पाहते. मगध आणि आर्यवंशीय यांच्यातल्या संघर्षाची कारणं पाहते. बुद्ध नि जैन धर्मांच्या उदयामागची नि प्रसारामागची पार्श्वभूमी दाखवून देते... आणि या सगळ्या द्वैतांच्या पलीकडे जाणारी – या भूमीतल्या वैविध्यात नांदणार्या एकात्मतेचा, मिश्रणाचा, संकराचा, संगमाचा, सहजीवनाचा... आणि त्यातून निर्माण झालेल्या अद्वितीय वारशाचा धागा दाखवते.
वाचताना पुष्कळ काही पूरक आठवत, दिसत राहिलं. त्यानं या गोष्टीला अनेक आधार पुरवले. उदाहरणं दिली. स्पष्टीकरणं दिली. दिलासाही दिला. पुस्तक अतिशय अतिशय आवडलं हे तर सांगायला नकोच. ते सतत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात पृष्ठभागापाशीच राहील, पुन्हापुन्हा त्याकडे संदर्भाला, तुलनेला परतणं होईल – हे महत्त्वाचं. आणि तसं दुर्मीळ.
बाकी – हा निव्वळ न राहवून करून दिलेला परिचय आहे. तपशिलात काही चूक असेल, तर ती माझी.
~
अर्ली इंडियन्स : द स्टोरी ऑफ अवर अॅन्सेस्टर्स अॅंड व्हेअर वी केम फ्रॉम
टोनी जोसेफ
प्रथमावृत्ती 2018
जगरनॉट पब्लिकेशन

No comments:

Post a Comment