Wednesday, 13 February 2013

गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

डिस्क्लेमरः
अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे.
आ) 'आयुष्याचा अर्थ काय?' असा प्रश्न चारचौघांत विचारला तर लोक चमत्कारिक + हेटाळणीच्या नजरेनी पाहतात. प्रश्नाला उत्तर मिळणं तर दूरच, आपल्याला लोक गंभीरपणे घेण्याची शक्यताही कमी होते,  त्यामुळे ही शब्दरचना टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न साधारण त्याच प्रकारचे आहेत.

दोष
१. आळस / कंटाळा / थोड्या वेळानी करू: समोर करण्याजोगं, ठरवलेलं, मिळवलेलं काम असतानाही रिकाम्या वेळात भलतंच काहीतरी अनुत्पादक करून वेळ संपवला जातो.
२. तेच ते आणि तेच ते: आपल्याला जे बरं जमतं, ते नि त्याच्या कुरणातल्या गोष्टींकडेच लक्ष पुरवलं जातं. नवीन, वेगळ्या - उद्या कदाचित रोचक वाटूही शकतील अशा गोष्टी करून पाहण्याची तीव्र अनिच्छा.
३. व्यापक चित्राचा लोभ आणि धरसोडः आपल्याला अनेक गोष्टींत रस वाटतो, पण कुठलीच एक गोष्ट जीव जाईस्तोवर कष्ट करून तडीस नेता येत नाही. सुरुवात करताना कुठूनतरी करावीच लागणार नि ती भव्यदिव्यव्यापक नसणार हे कागदावर कळतं. पण अशी सुरुवात मात्र अपुरी, टुकार, अनाकर्षक, कंटाळवाणी वाटते.

गुणः
१. अनेक बाजू दिसतातः कुठल्याही गोष्टीच्या अनेक बाजू दिसतात. एकांगी, सोपी भूमिका सहजी घेतली जात नाही.
२. जगण्याचा लोभः निराशेचे कितीही कढ काढले, आता नको-पुरे-मरून जाऊ असे गळे काढले, तरी अजून जगायला अधूनमधून पण सातत्याने मज्जा येते. 'जगायला' हाही बदनाम शब्द. जगायला - पक्षी: भांडायला, हसायला, रडायला, खायला, प्यायला, झोपायला, जागायला, वाचायला, लिहायला, पाहायला, दाखवायला इत्यादी. त्यामुळे दर थोड्या दिवसांनी 'नवीन काहीतरी करून पाहू'चा किडा सुचत राहतो. (हे नवीन आपल्या राखीव कुरणाशी संबंधितच काहीतरी असतं म्हणा. (नवीन पीक माणसाळवण्याऐवजी त्याच पिकाची अजून एक प्रजाती घडवण्याशी याची तुलना व्हावी.) पण ठीक.)
३. मर्यादांची जाणीवः आपण थोर-बीर नाही हे एक नीट पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे उगा स्वत:बद्दल अनाठायी गोग्गोड कल्पना नाहीत. हे जमतं, हे जमत नाही, अशी ठोक विधानं. (हां, त्यांचेही तोटे असतात. कुरणं वगैरे. प. ठी.)

(इतकं भारूड जमवल्यावर आता तरी मुख्य प्रश्नाला हात घालावा.) काय केलं म्हणजे मजा येईल, येत राहील - त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे भारूड.
जेवणखाण, निरनिराळ्या चवी, स्वैपाक, खरेद्या, गाणी-सिनेमे-पुस्तकं... यांनी तात्पुरती मजा येते. पण ही मजा दीर्घजीवी असत नाही. उलट एका मर्यादेनंतर आपण मुख्य प्रश्नांकडे डोळेझाक करून नाही त्या अश्लील गोष्टीत शहामृगी पद्धतीत डोकं खुपसून बसलो आहोत अशी जाणीव अजून अजून टोकदार होत जाते आणि गंमत संपत जाते. हेच नातेसंबंध या बहुचर्चित गोष्टीलाही लागू करता येईल अशा टप्प्यावर मी आत्ता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता, माणसांमधे बुडी मारण्याची वृत्ती... यांतून हाताला जे लागायचं ते लागलं आहे. आता हा रस्ता पुढे कुठेच जात नाही याचं नकोसं भान आल्यामुळे अस्वस्थता अधिक. माइंड यू, मी आयुष्यातल्या भोगवस्तू वा माणसं नाकारण्याबद्दल बोलत नाहीय. तर त्या भोगण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय.

हातून म्हणण्यासारखं काहीही होत नाही. कुणी म्हणण्यासारखं, लोक कोण काही म्हणणारे, लोक गेले फुल्याफुल्यांत... हे मीच मला विचारून-म्हणून झालं आहे. त्यावर टीपी नको. कुणी म्हणण्यासारखं? तर मीच म्हणण्यासारखं. मला माझ्या कामाबद्दल (काम किंवा काहीही. शब्द महत्त्वाचा नाही) भारी वाटेल, काळाच्या छोट्याश्या तुकड्यावर तरी ते उठून दिसत राहील अशी आशा वाटेल - असं काहीतरी - काहीही.

असं काहीतरी करावंसं वाटणं हेही आउटडेटेड-आउटॉफ्फ्याशन आहे, मला कल्पना आहे. पण आता आपल्याला आवडतो सचिन तेंडुलकर तर आवडतो. असेल आउटॉफ्फ्याशन. आपण काय करू शकतो?

कृतिकार्यक्रमः
१. निदान ३ तरी नवीन गोष्टी चालू करून वर्ष संपेपर्यंत सातत्यानी रेटायच्या. त्यातली एखादी तरली तरी चांगभलं.
२. निदान ३ तरी कुरणाबाहेरच्या गोष्टी करून पाहायच्या. वर्षाखेरपर्यंत नाही रेटणार कदाचित. पण करून बघायच्याच.
(तिसरं काही सुचत नाहीये, पण ३ आकडा मस्त वाटतो. बरंच काही करून पाहतोय असं वाटतं. आठवा च्यायला. हां, हे बरंय, स्टॅण्डर्ड.)
३. वजन कमी करणे.

इत्यलम.

8 comments:

  1. @लिना
    सुम्मामेन.

    ReplyDelete
  2. दोष तंतोतंत (असा एकाच शब्द असावा ज्यात एकाच अक्षर वापरले गेले आहे ..असो अवांतर होतंय) जुळताहेत...
    कृती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल..पण तीनही दोष परत डोक वर काढतील अशी भीती आहे..

    असो...

    ReplyDelete
  3. खालील गोष्टींचे वर्गीकरण करा:

    १. रोज दहा तास केले तरी संपत नाहीये असे काम पडलेले असताना ब्लॉग वाचायला घेणे.

    २. सुरु केल्यावर फक्त 'दोष' वाचूनच, गुण वाचायचा कंटाळा करणे.

    ३. आणि शेवटपर्यंत वाचल्यावर आपल्याबद्दलच बोलत आहे असे वाटले तरी कमेंट लिहिण्याची (सूचना देण्याची) इच्छा होणे.

    ३ आकडा धरून लिहिली आहे बरं क्का! :) ऑल द बेस्ट. एक मात्र नक्की हे असं लिहिलं की वर्गीकरण तरी होतं. नाहीतर गुण- दोष यांची पण भेळ-मिसळ होते. :) Keep writing ! You should have added that as one of things to do regularly. :D

    -विद्या.

    ReplyDelete
  4. @सतीश
    अवांतरः अजून दोन शब्द आहेत असे मराठीत. आठवताहेत का पाहा बरं! नैतर सांगते.
    बाकी कृतिकार्यक्रमाचं काय होतं सांगा.
    @विद्या
    खिक! जित्याची खोड म्हणतात त्यातली गत. त्याकरता नियम कशाला हवा? पाहू कसे जमतेय. विल कीप यू पोस्टेड!

    ReplyDelete
  5. कृतिकार्यक्रम छानच आहे!

    ReplyDelete
  6. माझ्यासाठी एखादी गोष्ट जमली की 'कुरणातली' होते; न जमली की कुरणाबाहेर फेकली जाते.
    त्यामुळे माझं आपलं तळ्यात-मळ्यात चालू असतं :-)
    अशा परिस्थितीत 'कुरण' आपलं काय आहे नेमकं - हे कळणं - हेसुद्धा पुष्कळ झालं की!

    ReplyDelete