एकीचं शाळेत शिकलेलं फ्रेंच आणि बाकीच्यांचं फ्रेंचचं एकअक्षरकळलतरशपथ-आकलन घेऊन पॅरिसात उतरलो आम्ही, तेव्हा गंतव्य मेट्रो स्टेशन 'इथ्थेच जवळ' आहे हे माहीत होतं. आमची किल्ली घेऊन एअरबीएनबीत साफसफाई करणारी काकू तिष्ठत होती. पण प्रत्यक्ष मेट्रो स्टेशनात पोचेस्तो किमान पाच तरी 'कुठून येतात काय माहीत असले लोक' असं म्हणणारे कटाक्ष, तीन अत्यंत पोलाईट आणि मदतशील 'नो आयडिया'वाले कोरे चेहरे, आणि बॅगा फरफटवत, ग्राफिटी बघून दचकत, भुयारी मार्गांच्या क्रीपीपणानं शहारत ओलांडलेला वीसेक मिनिटांचा खुश्कीचा मार्ग - इतकं सोसलं, तेव्हा कुठे योग्य मेट्रो गावली. दोन स्टेशनांनंतर आपलं स्टेशन इतकं एकमतानं नक्की करून सैलावून बसलो. दोन स्टेशनं गेली आणि गाडी धाडधाड करत एका पुलावर आली. बाहेर नजर गेली तर आयफेल टॉवरचं शिंग झुईंकन समोर. कधी ठरवूनही न किंचाळता येणाऱ्या माझ्या तोंडून आनंदाची आरोळी फुटली असणार. कारण आम्हांला सगळ्यांना त्या निमिषभरात ते टॉवरचं शिंग तर दिसलंच; वर डब्यातले पॅरीसकर खुदखुदून आमच्याकडे बघायला लागले, ते आम्ही किंचित शरमिंदं हसून, स्टेशनात उतरून त्यांना हात दाखवेपर्यंत. मग किल्ली ताब्यात घेईस्तो केलेले साडेतीन-चार फोन, शाळेत मिळालेल्या मार्कांची सत्त्वपरीक्षा, आम्हांला पत्ता समजावून सांगण्यातला खटाटोप किती व्यर्थ ठरेल ते कळून आपला आवरत आलेला भाजीचा गाळा मदतनिसावर टाकून इमारतीच्या खालपर्यंत सोडायला आलेला भाजीवाला... हे सगळं पार पडेपर्यंत तो 'झुईं' डोक्यात ताजा राहिला असणार. कारण बॅगा टाकून, शूविसर्जन करून, कुलपाचा पासवर्ड पाठ करून आम्ही तत्काळ टॉवरच्या दिशेनं कूच केलं होतं. मग त्या तीन दिवसांत अक्षरशः सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र दर्शन घेतलं त्याचं. वर जाऊन. पोटात शिरून. नदीपल्याड काठावर पाय हलवत बसून. दुपारी हिरवळीवर लोळून... तरी बेट्याचा टूरिस्टी लोकप्रियतेबद्दल फणकारा नाही आला. मजाच वाटत राहिली एकसारखी.
~
गोव्यातल्या
माझ्या त्यापूर्वीच्या सगळ्या ट्रिपा सपशेल फेल होत्या. कधी मंगेशी आणि
शांतादुर्गा आडवे येत. कधी शुद्ध शाकाहारी लोकांसह फरफट. कधी पाण्याला भिणाऱ्या
लोकांसह कुचंबणा. कधी 'दारू म्हणजे काय रे भाऊ?'वाल्या शुभंकरोति मंडळींच्यात बाजूला बसावं लागणं.
त्या
खेपेला भेटलेलं गोंय मात्र खम्प्लीट निराळं. पावसाची रीरी संपता संपेनाचे अप्रवासी
दिवस. हवेत ओलावा आणि नजरेला हिरवाई. पंज्येंमधलं एक कौलारू छप्पर आणि बाहेर
फणसाची झाडं असलेलं कॉटेज. समुद्राशी लगट करणारं नसल्यामुळे आबदार आणि शांत. दुचाकी चालवणारी आणि खानावळींची खडानखडा माहिती असलेली अबोल सोबत.
त्याच
ट्रिपेत पोर्तुगीज वारसा जपणारी गोव्याची भव्य लायब्री भोगली. खाडीच्या काठानं
पहुडलेल्या निवांत रस्त्यावरून वारा पीत भटकलो. खानावळींतून कालवणं नि मच्छी
ओरपली. बटाट्याचा अंगभूत गंध ल्यालेल्या पिवळ्या पातळभाजीत चिवट उन्नी भिजवून
खाल्ले. रस आम्लेटाच्या गाड्या हुडकत हिंडलो. गव्हाचा चुरचुरीत कोंडा ल्यालेले
ताजे पोंय् खाल्ले. 'सोलकढीन् पॉट भरतां? बास. चंणक कोण खाईल. ज्येवा आता.' असा दम भरून लाल तांदळाचा भात खिलवणाऱ्या
वेटराच्या हातचं जेवलो. रस्त्यावर बागेलच्या बांगड्या घेऊन उभे राहिलेल्या
पाववाल्यांकडून ते गरम, चविष्ट बांगडीपाव खाल्ले.
खाडीच्या
एका फाट्यावरून नारळींतून येणारा रस्ता. शेजारी पाणी. मधूनच उघडा मांडव असलेलं
गावातलं चर्च. आकाशात आख्खा चांद. हवेत झुलणारे माड अन् पोफळी. पोटात गोंयचं
तीर्थ. काळोख आणि उजेड. चंदेरी माहोल.
सरत्या
संध्याकाळी खाडीशेजारच्या रस्त्यावरच्या एका सरकारी बागेत शिरलो, तर एक सोनसळी काठ गवसला. माझी पापं संपून पुण्याचा हिशेब सुरू झाला असणार
त्या ट्रिपेपासून.
~
प्रवासाला जाताना कोऱ्या मनानं आणि उघड्या डोळ्यांनी जावं वगैरे सुविचार कितीही थोर असले, तरी चोप्रांच्या सिनेमावर पोसलेल्या निदान मला तरी स्वित्झर्लंडच्या बाबतीत तसं करणं अशक्य आहे हे मी स्वतःशी स्वीकारेस्तोवर माझ्या समोरच्या दृश्याला बॅकग्राउण्ड म्युझिक म्हणून 'चाँदनी ओ मेरी चाँदनी' वाजून मी श्रीदेवीच्या किनरट आवाजातल्या 'मेरे शोना, शोना..'वर जाऊन पोचले होते. बरं, स्वित्झर्लंडनी तरी भारतीयांच्या मनातली 'नंदनवन' ही आपली भूमिका बजावण्याकरता थोडं ताठ्यानं वागावं? पण ते तर 'खास भारतीयांसाठी' पंजाबट जेवण विकणारी हाटेलं थाटून बसलेलं आणि 'डीडीएलजे'मधल्या शारुख-काजोलचा पुरुषभर उंचीचा कटाउट मिरवणारं. मग मीपण जनाची न् मनाची दोन्ही उधळून दिल्या आणि हिरवळीवर फोटो काढायला स्लिवलेस पोलकं नि शिफॉनची प्लेन साडी आणायला हवीवती का काय, अशा खंतावणाऱ्या विचारात बुडून गेले. पथारी पसरायला मिळालेल्या बेड न् ब्रेकफास्टच्या खोलीला एक चिमुकली गच्ची होती. तिथून एक निळंभोर चमचमतं तळं दिसायचं. त्या गच्चीतल्या आरामखुर्चीत पसरून फोनच्या स्पीकरवर 'तू मेर्रे स्सामने...' लावलं. तोच 'तळ्याचा रंग किती 'कैसी है ये रुत की जिसमें'मधल्या तळ्यासारखा दिसतोय ना...' हे जोडीदारणीचं वाक्य आलंच! चोप्रांना उचक्या लागल्या असणार बहुतेक त्या दिवशी.
~
शहर अपरात्री पाहावं म्हणतात. अहर्निश धडधडणारे रस्ते निवांत सैलावून पहुडलेले असताना. तेव्हा ते आपल्याकडे मान वळवून नीट बघण्याच्या शक्यतेची शक्यता तरी असते. राहत्या महाशहरातही असला योग किती दुर्मीळ ते पक्कं ठाऊक असलेल्या मला परदेशातल्या शहराबाबत तशी काही अपेक्षा नव्हती. पण संध्याकाळभर गळणारा पाऊस दुर्लक्षून मैत्रिणीला नि तिच्या ताज्या नवऱ्याला भेटायला गेलो. सुरुवातीची बळंच मैत्रीपूर्ण संभाषणं ओलांडता आली नसती, तर एक टिकमार्क करून परतायचा इरादा होता. पण 'युनिव्हर्सल स्टुडिओचं सोडा, या झुल्यात बसलात तर खरं!' अशा खेळकर च्यायलेंजचा विडा उचलला नि इतक्या उंचीवरून चमचमती नदी बघताना 'आपल्या वजनानं तुटणार नाही ना हा पट्टा'ची बाकबूक अल्लाद विरून गेली. तिथून रंगतच गेली संध्याकाळ. नदीकाठच्या हाटेलांतून जेवत बसलेले लोक, बेंबीतला खडा नि सपाट पोट दाखवत थिरकणारी बाई, शेजारी उभं राहून कुणास ठाऊक किती वेळ टाळ्यांनी धरलेला ताल, हळूहळू ओसरत गेलेली गर्दी, रिकामे रस्ते तुडवत जाण्याचा सरता न सरणारा उत्साह, अधूनमधून झिमझिमणारा पाऊस, शेजारून वाहतं पाणी, कुणाकडेच नसलेली छत्री, सोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांनी बहाल केलेला सेपिया टोनिश माहौल, 'सुबत्ता आहे, सुरक्षितता आहे. पण संस्कृतीची नाडी नाही बा गवसलेली अजून मला इथल्या..' असल्या दोन-अडीच पेगनंतर होणाऱ्या गप्पा... काहीच न पिता तरी कसं म्हणावं? रात्र चढत गेली त्या दिवशी.
No comments:
Post a Comment