अनेकदा पुस्तक वाचायला घेताना आपल्या डोक्यात काहीही उदात्त हेतू नसतो. ज्ञानसंपादन, चिंतन, वैचारिक देवाणघेवाण, कुतूहलशमन, बुद्धीकंडशमन... काहीही नाही. काहीतरी चटकदार, रसाळ, उत्कंठावर्धक वाचून वेळ मस्त घालवणे - बस. या वाचनाकडून इतर काही मिळत नाही, असं नव्हे. अर्थात, मिळतंच. पण वाचताना निदान माझा तो मुख्य उद्देश असत नाही. या क्याटेगरीतलीच पुस्तकं पुन्हा-पुन्हा, पुन्हा पुन्हा वाचली जातात. अशा पुस्तकांपैकी निवडक सात पुस्तकं.
~~
पुस्तक पहिले
मॅजेस्टिक प्रकाशन
'तुंबाडचे खोत' वा 'गारंबीचा बापू' वा 'रथचक्र' यांसारखी पेंडशांची इतर अनेक पुस्तकं कायम चर्चेत असतात, लोकांना ठाऊकही असतात. पण त्यांनी अगदी उशिरा उशिरा लिहिलेलं हे रत्न मात्र अनेकांना माहीत नसतं. गोष्ट वाचकाचा कसा ताबा घेते, याबद्दल पेंडशांची पकड ठाऊक असणार्या वाचकाला अवाक्षरही सांगण्याची गरज नाही. ते स्वयंस्पष्टच आहे. पण मला खरी आवडते ती तीतली खास पेंडसे-भाषा. 'गावात लग्न अन् कुत्र्याची हडबड'सारख्या अफलातून कोकणी म्हणी; 'सतर्या नाना'सारखे अगोचर प्रयोग आणि त्यामागच्या रसाळ कहाण्या; कोकणी शिव्यांचा अत्यंत चपखल, नैसर्गिक नि अकारण हशा न पिकवणारा वापर हे सगळं खास शिरूभाऊंचं आहे. तितकंच कादंबरीत एखादी घटना उर्फ किस्सा सांगून, मग त्याची आठवण देण्यासाठी एखाद्या विशिष्ट शब्दप्रयोगाचा मोटिफसारखा वापर करणं आणि त्यायोगे त्या शब्दप्रयोगाला एखाद्या वाक्प्रचाराचा दर्जा बहाल करणं ही खास लकबही शिरूभाऊंचीच. आंतरजातीय लग्न करणार्या भावाने इतरांना त्यासाठी प्रोत्साहन दिल्यावर आजीनं वापरलेला 'बल्या बाटगा... त्याला साथीदार मिळाला तर हवाच आहे!' हा उद्गार काय, किंवा शयनक्रीडा करताना धसमुसळेपणा करणार्या सुनेच्या अकलेचा उद्धार करताना 'इतकी अक्कल असती, तर स्वैपाकघरातली भांडी कशाल् पडती?' हा आजीच्या जावेचा फणकारा काय. 'एखाद्याचा अण्णू गोगट्या होणे' या पुलंच्या रत्नाच्या तोडीची ही रत्नं आहेत. बाकी धीट 'विषय'हाताळणीकरता पेंडशांचं कौतुक करायला नकोच, कारण त्यांच्या अनेक कादंबर्यांत शृंगाराची फक्त रोमॅंटिकच नव्हेत, तर इतरही अनेक अंगं सहजी येऊन जातात. ही कादंबरीही त्याला अपवाद नव्हे. आणि सरतेशेवटी सर्वांत महत्त्वाचं - कितीही वेळा वाचली, तरी तिची गोडी सरत नाही, अशी काहीतरी जादू या अजब रसायनात आहे. तेवढ्याकरताही हे पुस्तक अमर आहे, बाकी सगळं अलाहिदा.
~~
पुस्तक दुसरे
दुर्गभ्रमणगाथा
- गो. नी. दाण्डेकर
मॅजेस्टिक
प्रकाशन
'दुर्गभ्रमणगाथा'
का आवडतं हे
सांगणंही अवघड. त्याला साधं कथानकही नाही. गोनीदांनी आयुष्यभर किल्ल्यांच्या वाटा
तुडवल्या. उन्हात, पावसात,
दिवसा, रात्री, एकट्यानं, दुकट्यानं, आप्तमित्रांसोबत, सुट्टी साजरी करायला, फोटो काढायला, वाटाड्या म्हणून, समारंभाकरता, अभ्यासक म्हणून... दर खेपेला निराळं
रूप, निराळा
अनुभव. त्यात कधी पार सातवाहनांपर्यंतच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात. कधी
शिवाजीराजाच्या अक्षरशः पावलाच्या खुणा. कधी धनगर मैतरांच्या खोपट्यांतून
रांधलेल्या नि आंब्याच्या डहाळ्यांनी माश्या वारत चापलेल्या दूधगूळभाताच्या आठवणी,
कधी तीन दगडांची
डुगडुगती चूल मांडून, 'नामांकित
शिधा' रांधून
पकवलेली उकळती खिचडी पायावर सांडून पाय भाजून घेण्याच्या आठवणी. कधी उदबत्त्यांचा
जुडगा पेटवून, पौर्णिमेच्या
चांदण्यात रायगडाच्या अवशेषांतून केलेली मंतरलेली वारी. कधी गडाच्या माथ्यावर
कोसळती वीज खाली येण्यापूर्वीच्या काही क्षणांत डोक्यावर अक्षरशः उभे राहिलेले
केस. कधी रौद्र पावसाचं तांडव अनुभवत जीव मुठीत धरून कसंबसं बालेकिल्ला गाठणं. कधी
रानावनातल्या एकान्तात लागलेली कुणाची अकल्पित चाहूल. कधी ज्योतवंतीचं ओलं होऊन
प्रकाशणारं लाकूड, कधी
चकव्यात हरपलेली वाट, कधी
लेखकमहाशयांनी चक्क ढापलेली शिवकालीन मूर्ती... पण छे! याला काही अंत नाही! हे
आपलं आपण अनुभवण्याचं आहे. धनगर-बामण-शिवकालीन-उत्तरप्रदेशी अशी अनेक रूपं लीलया
पालटणाऱ्या, डोळे
झाकूनही 'गोनीदांची
भाषाय ही!' असा
परिचय द्यायला लावणाऱ्या, शैलीवान, साजिऱ्या, आणि अत्यंत लाघवी अशा भाषेत रंगवलेलं
हे रसाळ गप्पाष्टक. वाचकाला पुन्हा पुन्हा आवतण देणारं.
~~
पुस्तक तिसरे
आवजो : पद्मजा
फाटक
श्रीविद्या
प्रकाशन
'सर्व्हास'
नावाच्या एका
आंतरराष्ट्रीय पाहुणचार योजनेची बस पकडून पद्मजानं थेट अमेरिका गाठली आणि
मध्यमवर्गीय मराठी लोकांच्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन बोकाळायच्या आत अत्यंत
अपर्यटकी पद्धतीनं निरखली. अमेरिकेतल्या साधारणपणे शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये
राहून, त्यांच्याशी
मैत्र्या वा सेमीमैत्र्या करत, त्यांना आपल्या आयुष्याबद्दल सांगत आणि
त्यांच्या आयुष्याबद्दल समजून घेत, त्यांच्या देशाशी ओळख करून घेत केलेला हा अनोखा
प्रवास. घटस्फोटांपासून लिव्ह इनपर्यंत आणि मुलांच्या डेटिंगपासून रॅन्च
लाइफपर्यंत सगळ्याला खुल्या, स्वीकारशील आणि अत्यंत प्रामाणिक मनानं सामोरं
जात केलेला. तोवर शाळकरी असलेल्या मला 'आवजो' हाती लागेपर्यंतच्या वाचनात इतकं निराळं,
आधुनिक, तरीही देशी आणि अस्सल मराठी, समोरच्याची आणि स्वतःची झाडाझडती
घ्यायला न बिचकणारं असं काही मिळालंच नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. त्यातल्या
स्त्रीवादी, शहरी,
मराठी, लेकुरवाळ्या, आधुनिक, संकोच आणि धिटाई यांचं लडिवाळ मिश्रण
असलेल्या, जिवंत,
संवेदनशील
पद्मजानं मला झपाटलंच. मग तिचं अक्षरशः अक्षर अन् अक्षर मी मिळवलं, वाचून काढलं.
भाषा म्हणजे एखादं
जड शिवधनुष्य आहे असं न मानता, एखादी मुरलेली स्मार्ट पुरंध्री ज्या सराईतपणे
झिरझिरीत ओढणी वागवत असेल, त्या सराईतपणे पद्मजा तिची भाषा वागवते आहे,
असा भास तिचं
लिखाण वाचताना मला कायम होत आला आहे. त्या सुखद अनुभवाची सुरुवात करून देणारं हे
पुस्तक, म्हणूनही
मला ते अतिप्रिय. सुनीताबाई, गौरी, सानिया, मेघना पेठे, शांताबाई गोखले अशा अनेक लेखिकांनी मला
आधी आणि नंतरही घोळसलं. त्यांचेही प्रभाव अर्थात माझ्या लिहिण्यावर आहेतच. पण माझं
ठाम मत असं, की
माझ्या शैलीवर सगळ्यात जास्त प्रभाव पद्मजाचा आहे. म्हणूनही...
एनिवे!
बाकी ता. क.
पुस्तक कुठे मिळेल असा प्रश्न पडणार्यांकरता : 'आवजो' फक्त लायब्र्यांतूनच मिळू शकेल. कारण
पद्मजाची अनेक पुस्तकं - 'आवजो'सकट - आउट ऑफ प्रिंट आहेत.
~~
पुस्तक चौथे
एम टी आयवा मारू : अनंत सामंत
मॅजेस्टिक प्रकाशन
सामंतांच्या पुस्तकांची चटक लागली, त्या काळात पुस्तक दणादण विकत घेणं परवडायचं नाही. लायब्र्या हा मुख्य स्रोत असे. तिथेच 'एम टी आयवा मारू' हाती लागली. त्या दोन महिन्यांच्या काळात चार वेळा आणून मी तिची पारायणं केली. ती आवडली असं म्हणणं हे फारच मोठं अंडरस्टेटमेंट होईल. तेलवाहतूक करणाऱ्या जहाजावरचं विश्व ही भानगडच मुळी प्रचंड नवीन. त्यात उत्कट चित्रकार असलेला मरीन इंजिनियर नायक. थायलंड-हाँगकाँगसारख्या देशांतलं नाइटलाईफ. जहाजाच्या प्रेमात पडलेला अनुभवी कॅप्टन. शापित आणि वादळी सौंदर्य लाभलेली नायिका. खलाश्यांचं शिवराळ आणि उन्मुक्त आयुष्य. गे संभोगांपासून ते थ्रीसमपर्यंत अनेक बोल्ड प्रसंग... असं चिकार कायकाय सांगता येईल. पण या सगळ्यांत 'आयवा मारू'ची जान नव्हती. ती होती सामंतांच्या अत्यंत उत्कट, रॉ, ताज्या, कोऱ्या-करकरीत शैलीत. ठसठशीत आणि चित्रमय पात्ररेखाटणीत. धीम्या गतीकडून अलगद वेगवान होत जाणाऱ्या घटनाक्रमांच्या बांधणीत. त्या सगळ्याची भूलच पडली माझ्यावर. पुढे सामंतांची शैली परिचयाची झाल्यावर ती यथावकाश उतरली, सैल जागा दिसायला लागल्या, काहीसा अविश्वसनीय फिल्मीपणा खुपायला लागला... पण तोवर 'एम टी आयवा मारू' तिचं अढळपद कमावून चुकली होती. नाना पाटेकरनं 'एम टी आयवा मारू'च्या चित्रपट रूपांतरणाचे हक्क सुमडीत विकत घेऊन ठेवलेत हे कळलं, तेव्हा आपोआप त्याला मनोमन दाद दिली गेली, ती उगाच नव्हे!
~~
पुस्तक पाचवे
मुखवटा : अरुण साधू
राजहंस प्रकाशन
'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' वगळता लोक अरुण साधूंना इतकं का मानतात हे मला कळत नसे. त्यांचं चीनवरचं पुस्तक वाचल्यावर मी थोडी मवाळ झाले. नि मग मला 'मुखवटा'चा दगड लागला. ठेच. कपाळमोक्ष. साक्षात्कार. तोवरचा मटाचा तटस्थपणा सोडून केतकरांनी 'मुखवटा'वर एक पानभर लेख छापवून आणला होता, हे कळल्यावर मी 'अर्थात!' अशी प्रतिक्रिया मनोमन देऊन टाकली.
'मुखवटा'मध्ये कायकाय आहे याची अनेक समीक्षकी आणि राजकीय-सामाजिक प्रकारे चिरफाड करता येईल. ती त्या-त्या प्रकारे बरोबरही असेल. पण ती एक अतीव रंजक, उत्कंठावर्धक, सुरुवातीपासून शेवटापर्यंत कुठेही माती न खाणारी, अंतर्बाह्य कादंबरी आहे हे माझ्या मते तिला मोठं करणारं खरंखुरं लक्षण आहे. तीतली वऱ्हाडी बोली, वाड्यासह शेतीत आणि मातीत धसत जाणारं ब्राह्मण कुटुंब, पिढ्यानपिढ्या चालत आलेले गूढ मुखवटे आणि त्याहूनही विचित्र परंपरा, कुळाच्या इतिहासाची अंधाऱ्या आणि लज्जास्पद मुळांशी नेऊन सोडणारी वाट, त्या इतिहासानं अपरिहार्यपणे आणि विधिलिखित असावं अशा नियतपणे मागितलेले कठोर जाब, शरीरामनासकट वाढणारी-मोडणारी-श्वास घेणारी आणि बेमुर्वतखोरपणे राखाडी असणारी स्खलनशील पात्रं, त्यांना एकसमयावच्छेदेकरून ग्रासून असलेला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ... या सगळ्यासकट 'मुखवटा' एक परिपूर्ण कादंबरी आहे. कितीही वेळा वाचली, तरी नवनव्या सातत्यसंगती उलगडून दाखवणारी, नव्यानं भुरळ घालणारी.
~~
पुस्तक सहावे
पाडस : अनु० राम पटवर्धन
मूळ कादं० : द इयरलिंग, मार्जोरी किनन रॉलिंग्ज
मौज प्रकाशन
'पाडस' हे कायम सकारात्मक कारणांनी चर्चेत असणारं, राम पटवर्धनांच्या अनुवादाचं पुन्हापुन्हा कौतुक करायला लावणारं, 'कमिंग ऑफ एज' प्रकारातलं फार तोलामोलाचं मानलं जाणारं पुस्तक. पण माझ्याकरता या सगळ्याखेरीज ते एक 'फूड बुक' आहे. जे वाचताना भूक खवळते, कल्पना वेगानं धावू लागते, अन्न या घटकाचं आपलं आयुष्य व्यापून उरणारं स्थान नव्यानं कळतं, आणि रसनातृप्तीचं समाधानही लाभतं, असं चविष्ट पुस्तक. मन विदीर्ण करणारा आणि शहाणीव देऊन जाणारा त्याचा शेवट मी फार फार तर तीन-चारदा वाचला आहे, आणि नंतर अगणित वेळा 'सैराट'च्या शेवटासारखीच त्या शेवटापासून शेपूट घालून मागे फिरले आहे. बाकीचं पुस्तक मात्र कितींदा वाचलं असेल नि वाचीन याला गणती नाही. डुकराच्या मांसाची बेगमी करण्याच्या वार्षिक कार्यक्रमाचं वर्णन, शिकार करून हुतोआजीच्या घरी ज्योडी आणि पेनी जातात तो प्रसंग, ख्रिस्मससाठी खरेदी आणि केक करण्याचा प्रसंग, पेनीला साप चावून तो जिवावरच्या जोखमीतून बाहेर आल्यानंतरच्या न्याहारीचा प्रसंग, वादळानंतरच्या जंगलातल्या शिकारीचा काळ... हे काही ठळक भाग. काय संदर्भ आहेत त्यात अन्नाचे! काळविटाच्या शिंगांच्या मधल्या दुबेळक्यातली खाज अनावर होऊन त्यानं झाडाच्या खोडावर शिंग घासल्यामुळे सुटून आलेली नि मऊ शिजवलेली लुसलुशीत कातडी, बिबट्याच्या चरबीत शिजवलेली पाणकोबीच्या सुईऱ्यांची भाजी, मगरीच्या शेपटाच्या मांसाचा मीठमिरी लावून सुकवलेला नि खरपूस भाजलेला तुकडा, शेवटच्या चुलाणात थोडी संत्री टाकून त्यांचा केलेला गुळांबा, ब्रायरबेरीच्या फळांची जेली, बुरसू नयेत म्हणून घरातल्या शेकोटीवर शेकवलेल्या ताज्या घेवड्याच्या दाण्यांची उसळ, अस्वलाच्या तुपात भाजून मऊ झालेल्या बेकनच्या कडा, घिरटावर भरडल्या जाणाऱ्या मक्यांचा चवीहूनही खमंग असा वास, खांडसरीची पुटं चढवून आणि डुकरांच्या स्वच्छ केलेल्या आतड्यांत भरून सुकायला कोठीत टांगलेल्या नि हिकोरीचा धूर पिणाऱ्या मांसल सॉसेजांच्या माळा, डोळे विस्फारायला लावणारी ख्रिस्मसची प्रचंड केक... याला अंत नाही खरं तर. अन्न आणि भूक या गोष्टींचे उघड वा प्रवाहाखालून गुप्तपणे वाहणारे संदर्भ नाहीत, असा भागच या पुस्तकात नाही. ते जितकं 'कमिंग ऑफ एज'बद्दल आहे, त्याहूनही अधिक ते पोटाच्या खळगीबद्दलचं पुस्तक आहे असं मला वाटतं. त्यातले कितीक पदार्थ चाखून बघणं तर सोडाच, मी कधी पाहिलेलेही नाहीत. पाहण्याची शक्यता नाही, आणि खरं सांगायचं तर मला तशी आसही नाही. मला ते 'पाडस'नं आधीच दिले आहेत.
~~
पुस्तक सातवे आणि शेवटचे
बाइंडरचे
दिवस : कमलाकर सारंग
ग्रंथाली
प्रकाशन
मी 'सखाराम बाइंडर'चा एकही प्रयोग प्रत्यक्ष पाहिलेला
नाही. किंबहुना माझ्या वयाच्या लोकांकरता ती एक आख्यायिका आहे. नाटकात असं आहे तरी
काय, या
कुतूहलापोटी लायब्र्या उचकत असताना लक्ष्यात आलं की 'बाइंडर'च्या एकजात सगळ्या प्रती 'गहाळ आहेत'. मग उत्सुकता फारच वाढली. तेव्हा
सारंगांचं हे पुस्तक हाती लागलं. उचललं. तेव्हापासून आजतागायत नाटकाबद्दलच्या
पुस्तकांनी मला पछाडलं आहे. पण 'बाइंडरचे दिवस'ची हळूहळू पकड घेणारी मांडणी, प्रामाणिक हाताळणी, आलंकारिक भाषेचा संपूर्ण अभाव आणि
पुस्तक हातात घेतल्यापासून संपेपर्यंत खाली ठेवणं अशक्य करणारी, एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता -
दुसऱ्या कुठल्याही नाटकाबद्दलच्या पुस्तकात मला सापडलेली नाही. 'बाइंडरचे दिवस' एकमेवाद्वितीय.
कधीही कोणतंही
मोठं नाटक दिग्दर्शित न केलेला लेखक थेट डॉ. लागूंना मोहात पाडणारं तेंडुलकरांचं
नवं नाटक दिग्दर्शनासाठी मिळवतो, निळू फुलेंसारख्या तोवर व्यावसायिक रीत्या
यशस्वी न झालेल्या नटाला मुख्य भूमिका मिळते, नाटकाच्या स्फोटकपणाची सुतराम कल्पना न
येता अक्षरशः पदरचे पैसेही घालून ते उभं करतो, संस्कृतिरक्षकांचे हल्ले झेलतो,
नटी असलेल्या
त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नाही नाही ती गलिच्छ चिखलफेक होऊनही पतीपत्नी
खंबीर राहतात, नाटक
की नोकरी असा प्रश्न आल्यावर बायकोची परवानगी घेऊन (होय!) नोकरी सोडून देतो,
नाटकाच्या
अस्तित्वाकरता कोर्ट गाठतो आणि जिंकताना नाटकांचं सेन्सॉर बोर्डच संपवतो... एकाहून
एक अचंबित करणाऱ्या गोष्टी. नि त्या सांगणाऱ्या सारंगांचा अत्यंत प्रामाणिक,
रोखठोक
आत्मपरीक्षणाला तयार असलेला सच्चा, अनलंकृत सूर. नाटकाच्या प्रवासातले अत्यंत रंजक
तपशील... तालमीच्या काळातले भूकंपाचे धक्के, एका रंगलेल्या प्रयोगानंतर कुणा अनामिक
प्रेक्षकानं हाती आणून दिलेली दारू, न्यायाधीशांनी निरीक्षणाकरता प्रयोग बघत असताना
रंगून जाऊन आक्षेपार्ह मजकूर दर्शवणाऱ्या लाल दिव्याची कटकट त्रासून बंद करायला
सांगणं, संस्कृतिरक्षक
विरोधकांच्या गलिच्छ भाषेमधला सर्रिरल विनोद, समर्थकांच्या सह्या मिळवण्यासाठी
काढलेली सह्यांची सायक्लोस्टाईल पत्रकं आणि त्याकरताची धावपळ.... एक ना दोन. सारंग
पतीपत्नींच्या वा संबंधित सगळ्यांच्याच हिंमतीचं कौतुक तर वाटतंच, पण त्याहीपेक्षा या सगळ्या बाजी
लावायला लागणाऱ्या प्रवासाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग झालेल्या सगळ्यांनाच
किती झिंगदार धमाल आली असेल, त्याची चुणूक आपल्यालाही मिळते.
'सखाराम बाइंडर'
हे फक्त नाटक
नव्हे. त्या निमित्तानं घुसळून निघालेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दस्तऐवजातलं
ते एक अतिमहत्त्वाचं प्रकरण आहे. त्याचा असा प्रत्यक्षदर्शी, प्रामाणिक आणि उत्कंठावर्धक अनुभव
देणारं पुस्तक दिल्याबद्दल मी सारंगांची कायम ऋणी असेन.
~~
पुस्तकं चिकार वाचतो आपण. पण सर्वाधिक रंजक आणि पुन्हापुन्हा वाचूनही खुमारी अजिबात कमी न झालेली पुस्तकं कुठली, असा विचार करायला बेहद्द मजा येतेच. त्या निमित्तानं आपल्याला पुस्तकातलं नक्की काय खुणावत राहिलं आहे असा चाळा मनाशी सुरू होतो, हे की ते अशी स्पर्धा नकळत चालते, स्वतःशीच तानापलटे होतात, नवे शोध लागतात. मजा येते. मलाही हा खो घ्यायला अतिशय अतिशय मजा आली. इतर कुणाला रस असेल, तर जरूर स्वतःहून सामील व्हा.
No comments:
Post a Comment