Tuesday, 12 May 2026

शहरनोंदी १०

शहरांच्या वेगात मोठी भूमिका त्यांतल्या दळणवळणाच्या साधनांची असते. वेग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गोळीच्या वेगानं सणाणत निघालेल्या बुलेट ट्रेनचं चित्रच काय ते येतं. पण दळणवळणाच्या साधनांचा वेग शहरांच्या वेगासाठी तितका महत्त्वाचा नसतोच.


गोंधळलात ना?! एक मिनिट! पण खरंच. बस किंवा टॅक्सी किंवा ट्रेन ताशी किती किमी वेगानं धावते, हे महत्त्वाचं नसतं. शहर दीर्घकाळ सुरळीत चालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वेग नाही, तर इतर अनेक घटक जास्त महत्त्वाचे असतात. एकाच एक प्रकारची वाहतूक आहे की त्या त्या भागाच्या वापराला आणि भूगोलाला अनुसरून बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, टमटम, मेट्रो, दुचाकी वाहनं, खासगी वाहनं.. इत्यादी प्रकारांचं यथायोग्य मिश्रण आहे? ते सर्वसामान्य माणसांना सहज वापरता येईल असं नि इतकं स्वस्त आहे का? वाहतूकप्रकारांची ही जाळी आपापसांत ‘बोलतात’ का – म्हणजे ट्रेन आहे, पण कनेक्टिंग बस नाही, म्हणून ताटकळत बसावं लागतं, असं तर होत नाही ना? प्रवास सुखदायक आहे का? की रोज जिवाची बाजी लावावी लागते प्रवासात? उपलब्धतेत सातत्य आहे का? असे अनेक प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील, तर शहरं सुरळीत धावतात, माणसांच्या शरीरा-मनांची कमीत कमी ताकद शोषून घेतात, राहणाऱ्यांना सुखकर वाटतात.


असं म्हणतात, सार्वजनिक वाहतुकीवर आज खरचलेला एक रुपया नजीकच्या भविष्यकाळात शहरांच्या अर्थव्यवस्थेला पाच रुपये कमावून देतो. जर्मनीत २०२२ साली झालेला ‘९-युरो तिकीट’ नावाचा यशस्वी प्रयोग पुष्कळ बोलका आहे. जर्मनीतल्या शहरांत उपनगरी रेल्वे, जमिनीखालून जाणारी मेट्रो, ट्रॅम, उपनगरी बस अशी बहुरंगी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आहे. ९ युरोंचं तिकीट घ्या नि यांतल्या कुठल्याही वाहनांतून एक दिवस कितीही प्रवास करा, अशी एक योजना त्यांनी काही शहरांत जाहीर केली. हे फार स्वस्त तर होतंच. पण सोयीस्करही होतं. वाढत्या इंधनकिमतीच्या काळात लोकांना हे फारच आवडलं. महागड्या गाड्या बाळगायाची आणि रहदारीच्या किचकिचाटात त्यात अडकून पडायची सक्ती टाळून बरेच लोक सार्वजनिक वाहनांनी येजा करायला लागले. वेळ, पैसे, ताकद तर वाचलीच. पण प्रदूषणही कमी झालं. मग तो प्रयोग जर्मनीभर राबवण्यात आला. युरोपात सगळीकडेच त्याची पुनरावृत्ती झाली. लक्झेंबर्गमधल्या मंडळींनी त्यांची सार्वजनिक वाहतूक पूर्णतः चकटफू करून टाकली. फ्रांसमधल्या शहरांत खाजगी पार्किंगसाठी राखलेले भले-दांडगे भूखंड आणि इमारती काढून घेण्यात आल्या आणि त्या सार्वजनिक वापराला खुल्या केल्या. ‘जिथले श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक वापरतात, तो खरा प्रगत देश. जिथल्या गरिबांकडे मोटारी असतात, तो नाही!’ हे कोलंबियाच्या राजधानीच्या – बोगोटाच्या  महापौरांचं विधान आणि त्यांचे शहररचनेतले प्रयोगही असेच प्रसिद्ध आहेत.


हे सगळे प्रयोग सरकारी कल्पकपणातून, धीटपणी सार्वजनिक वाहतुकीत केलेल्या गुंतवणुकीतून, जबाबदार नागरी सहभागातून केले गेले – यशस्वीही झाले. त्या प्रयोगांना ‘फुकटेपणा’ वा ‘रेवड्यावाटप’ अशी लेबलं लावली गेली नाहीत. त्याचा फायदा त्या शहरांच्या नागरिकांना झाला. त्यांचं आयुष्य वेगवान राहिलं, पण त्या वेगासाठी त्यांनी धुराची-धुळीची किंमत मोजली नाही, रोजच्या प्रवासासाठी प्राणांची बाजी लावली नाही, वा स्वतःच्या खिशातून भरमसाठ पैसाही मोजला नाही. 


आपण या प्रयोगांतून प्रेरणा कधी घेणार आहोत? की आपल्याला मोठाल्या, सुळसुळीत, वेगवान, महागड्या, नि खाजगी गाड्यांचं वेड - आणि पर्यायानं त्यातून येणारे ट्रॅफिकचे, प्रदूषणाचे, गर्दीचे प्रश्न आवडायला लागले आहेत?   

लोकमत, १२ मे २०२६


Tuesday, 28 April 2026

शहरनोंदी ०९

‘नेटफ्लिक्स’चा सी०ई०ओ० रीड हास्टिंग्स म्हणाला होता, माझी स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे. तशी शहरांची स्पर्धा माणसांच्या झोपेशी, स्वास्थ्याशी, निवांतपणाशी असते असं म्हटलं तर ते फारसं खोटं ठरणार नाही. शहरं अहर्निश धावत असतात. का बरं? 

साधं गणित आहे. एका विशिष्ट कालावकाशात एकूण किती गोष्टी घडतात, यावर वेग ठरतो. मर्यादित अवकाश, जास्त गोष्टी, वेग जास्त. मर्यादित अवकाश, कमी गोष्टी, वेग कमी. गुलजारनं लिहिलेलं ‘छोटे छोटे शहरों से, खाली बोअर दुपहरों से’ हे गाणं आठवतं का? शहरं म्हटलं असलं, तरी ती ‘छोटी’ आहेत. काल गावं असलेली, परवा मोठी शहरं होऊ घातलेली. त्यात करण्याजोग्या गोष्टी एकरेषीय नि मर्यादित आहेत. जगण्याचा वेग संथ आहे. त्यामुळे तिथल्या दुपारी रिकाम्या नि कंटाळवाण्या आहेत! पण शहरांचं तसं नाही. गावांच्या तुलनेनं शहरांच्या अवकाशात खूपच जास्त गोष्टी कोंबलेल्या असतात, आणि त्याही सतत आणि चढत्या वेगानं वाढत असतात. माणसं, पर्याय, कामं, संधी... सगळंच. मुंबईत माणसांच्या मनगटांना घड्याळं बांधलेली नसून घड्याळांच्या पट्ट्यांनी माणसं बांधलेली असतात, असं पुलं म्हणाले होते. आता घड्याळांच्या जागी मोबाईलचा पडदा आला आहे, इतकंच काय तो फरक. वेग मात्र तसाच, ‘वाढता वाढता वाढे...’ 

या वेगाचं प्रतिबिंब शहराच्या सगळ्या गुणधर्मांमध्ये पडलेलं दिसतं. ‘टाइम इज मनी’ हे शहराचं घोषवाक्य असतं. प्रवासाला अनेकानेक पर्याय असतात. त्यांची वारंवारिता आणि वेगही जास्त असते. ‘आठ बावीस’ चुकल्यामुळे आणि पुढची आख्खी दोन मिनिटं गाडी नसल्यामुळे हळहळणाऱ्या चाकरमान्याचं दुःख एखाद्या गावकऱ्याला कळूच शकत नाही, यामागे त्या दोघांच्या स्वभावांतला फरक नसून त्यांच्या राहत्या ठिकाणांमधला फरक असतो. शहरात झटपटपणाला मोठीच किंमत असते. रस्त्याकडेला मिळणारे पदार्थही तसेच. पोषणमूल्यं थोडी कमी असतील तरी पदार्थ चटकन होणारा, उभ्या उभ्या खाता येईलसा हवा! शहरांमध्ये फॅशन्स आणि तंत्रज्ञानंही भराभर अवतरतात, भराभर मावळूनही जातात. शहरांच्या मध्यवर्ती भागात आलं की पावलं नकळत त्या लयीशी जुळवून घेतात. आसमंतात ऊर्जाच तितकी असते. झगमगणारे दिवे, भुलवणाऱ्या जाहिराती, संगीतापासून विक्रेत्यांच्या आरोळ्यांपर्यंत आणि हॉर्नच्या कर्णकटू आवाजांपासून दस्तुरखुद्द गर्दीच्या ‘बझ’पर्यंत अनेकानेक आवाज नि वास. पदार्थांचे खमंग वास, गजरेवालीकडच्या मोगऱ्याचा नाजूक गंध, पेट्रोलपंपावरचा उग्र-तीक्ष्ण वास, हवेतला धूर नि धूळ, नि या सगळ्याला बकालीच्या दुर्गंधीचं छुपं अस्तर. उत्तेजना जागवणारे कितीतरी घटक शहरात एकसमयावच्छेदेकरून नांदत असतात. 

त्यात आर्थिक-सामाजिक-राजकीय संस्था, कार्यक्रम, कामकाज, इत्यादींची भर घाला. ही पर्यायांची वर्तुळं आणि त्यावर स्वार झालेली माणसं एकमेकांना छेद देत, एकमेकांच्या हातात हात गुंफत वेगानं गरगरू लागतात. 

या वेगाचा संबंध लोकसंख्येच्या घनतेशी असतो. लोकसंख्या दुप्पट झाली की जगण्याचा वेग साधारण १२ टक्क्यांनी वाढतो. गेल्या साठेक वर्षांत भारतातली शहरं जवळ जवळ दुपटीनं वाढली आहेत, तर लोकसंख्या साधारणपणे तिपटीनं वाढली आहे. याचा आपल्या जगण्याच्या वेगावर परिणाम झाला नसेल, असं कसं शक्य आहे? वेग वाढणारच! 

आपली शहरं प्रचंड वेगानं जगू लागली आहेत. ती तर झोपतही नाहीत. मग त्यांना लागणारी ऊर्जा ती घेतात कुठून? अर्थात, आपल्याकडून! शहरं अक्षरशः आपला निवांतपणा, झोप, स्वास्थ्य शोषून वाढतात. आपण हे सगळं शहरांना का वोपतो? कधी थबकून विचार केला आहात? किंवा, तितकी सवड मिळालीय का तुम्हांला कधी?!

लोकमत, २८ एप्रिल २०२६

Thursday, 16 April 2026

शहरनोंदी ०८

‘आपले’ लोक शेजारी असावेत, अशा मानवी प्रवृत्तीपायी जरी शहरात गेट्टोआयजेशन होत असलं, तरी ते सकारात्मकही नाही आणि शहराच्या चलनवलनाला मानवणारंही नाही. गेट्टोआयजेशन या शब्दाचा इतिहास काळाकुट्ट आहे. हिटलरच्या राजवटीत त्यानं ज्यू लोकांना विशिष्ट वस्त्यांच्या कुंपणाआत कोंबून तिथेच राहण्याची सक्ती केली. त्या वस्त्यांना गेट्टो (ghetto) असं म्हणतात. त्यामुळे अशा वस्त्या शहरांच्या प्रवृत्तीला लाजिरवाण्या असतात. पण त्या गैरसोयीच्याही असतात. आणि तरीही त्यातून जगभरातली कुठलीच शहरं सुटलेली नाहीत.  


भारतातल्या शहरी गेट्टोआयजेशनला जात आणि धर्म हे पैलू तर आहेतच. पण तितकेच मात्र नाहीत. भाषा, वंश, आणि त्याहूनही मूलभूत म्हणजे आर्थिक स्तर - हेही आयाम त्याला आहेत. लोक शहरात जेव्हा राहण्याची जागा निवडतात, तेव्हा त्या निर्णयात ‘परवडणे’ हा एक अतिशय महत्त्वाचा, अटळ असा घटक असतो. एका बाजूनं पाहता, शक्यतोवर आपल्या भाषेत बोलणार्‍या, आपल्यासारखेच सणवार-रीतिरिवाज पाळणार्‍या, आपल्यासारखं खाणार्‍या-पिणार्‍या माणसांसोबत राहण्यानं माणसांना हायसं वाटतं; पण दुसर्‍या बाजूनं पैशांच्या बाबतीत समान पातळीवर असणं त्या सगळ्यांहून वरचढ ठरतं. या विशिष्ट गरजेतून भारतातल्या शहरांचा पोत तयार होत गेलेला आहे. 


आता या घटकांत आणखी एकाची भर पडलीय - तो म्हणजे मांसाहार. तसा तो घटक आधीही कार्यरत होताच. चाळीत लोक एकमेकांच्या स्वैपाकघरांतून येणार्‍या वासांना नाकं मुरडायचे आणि निव्वळ शेजार आवडला नाही म्हणून घरंही बदलू शकायचे. आठवा : ‘बटाट्याची चाळ’ आणि ‘लव्हाळी’. पण मजेची बाब म्हणजे जागा बदलण्याचा पर्याय उपलब्ध असण्याच्या सौम्य दिवसांत वस्त्यांमध्ये जितकं ध्रुवीकरण होतं, त्याहून ते आजच्या तथाकथित आधुनिक काळात वाढलेलं दिसतं. जैनबहुल सोसायट्यांमधून मांसाहाराला असलेली अघोषित बंदी आणि अधूनमधून त्यावरून पेटणारे मराठी विरुद्ध जैन वाद तरी तेच सांगतात. हे साध्या मांसाहाराचं झालं. महार वा मांग लोकांचं किंवा मुस्लिमांचं पारंपरिक अन्न? शाहू पाटोळ्यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’सारखे काही सन्माननीय अपवाद वगळता - ते उघडपणे खाणं तर सोडाच, त्याबद्दल बोलणंही फक्त लाजिरवाणंच नव्हे, तर चक्क जोखमीचं होत गेलेलं आहे.


हे विभाजन मोठ्या शहरांनी स्वीकारलं आणि सोयीस्करपणे वापरलंही आहे. ‘मोठ्या सोसायट्यांना’ तितक्याच मोठाल्या कुंपणवजा भिंती असतात. त्यांच्याकडे कामाला येणार्‍या माणसांसाठी आडबाजूची कुठलीतरी एक लिफ्ट मुक्रर केलेली असते. काही ठिकाणी तर कामकरी माणसांना लिफ्ट वापरायची बंदीच असते. कितीही निकड असली, तरी कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह वापरण्याचा विचार किती कामवाल्या बायांना करता येईल? ‘किती नाही म्हटलं तरी त्यांच्या अंगाला एक वेगळाच्च वास येतो, नाही?’ असं मानभावीपणे म्हणणारे लोक आपण आजूबाजूला बघतो, तसे ते ‘पॅरेसाइट’ या २०१९ सालच्या ऑस्करविजेत्या कोरियन सिनेमातही बघितल्याचं अनेकांना आठवत असेल. पण या सगळ्या उच्चभ्रू मंडळींना कुंपणालगतच्या गरीब वस्त्या अत्यावश्यक मात्र वाटतात. एरवी घरात काम करायला मोलकरीण कुठली आणि इस्त्री केलेले कपडे घरपोच आणून द्यायला भय्या तरी कुठला? 


या विभाजनांचं, अंतरांचं, आणि अस्पृश्यतेचं समर्थन करणारे आपणच गेट्टो स्वीकारतो, सोयीनं वापरतो. “माझं आणि माझ्या मोलकरणीचं मूल एका शाळेत? नाही रे बाबा! किती नाही म्हटलं तरी संगत चांगलीच्च हवी…” असं म्हणतो. आपल्याच मुलांना एक्स्पोजर नाकारतो. यामागे नक्की काय आहे, याचा विचार आपल्याला कधीतरी करावाच लागेल. एरवी आपण स्वीकारलेली आधुनिकता निव्वळ एका बेगडी मुखवट्यासारखी ठरेल. त्याआड नांदत राहतील नागरयंत्रणा वापरणारे अर्धनागर, संकुचित वृत्तीचे लोक. ना इथले, ना तिथले. आपल्याला असं अरत्र ना परत्र असायचंय का?


लोकमत, १४ एप्रिल २०२६

शहरनोंदी ०७

शहरांच्या आकर्षणामध्ये त्यांतल्या सोयी जितकी कळीची भूमिका निभावतात, तितकंच तिथलं स्वातंत्र्यही. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शहरांकडे चला’ हा संदेश तेच सांगतो.


शहरांची रचना, यंत्रणा, किंबहुना त्यांची सगळी चालचलणूकच अशी असते; की जातिभेद पाळणं अशक्यच व्हावं. मेट्रो-लोकल ट्रेन्स-रिक्षा-टॅक्सी-बस… कुठलीही सार्वजनिक वाहतूकव्यवस्था घ्या, सहप्रवाशाची जात विचारून प्रवास करता येत नाही. दुकानदार कोणत्या का जाती-धर्माचा असेना, वेळेला त्याच्याकडेच जावं लागतं. सरकारी कचेऱ्यांतली माणसं, कामातले सहकारी… सार्वजनिक अवकाशात वावरताना निवड करणं शक्य नसतं. मुदलात जातीपातींची विचारणाच शक्य नसते, तर अस्पृश्यता कुठून पाळणार! सध्याच्या विपरीत काळातही अशी निवड करायला सुचवणारे लोकच ट्रोल होताहेत, कारण असं करणं व्यवहार्य ठरू नये अशीच शहरांची रचना असते. ‘माणूस माणसाला ओळखत नाही’ हे शहरांच्या अमानुषपणाची खूण म्हणून सांगितलेलं लक्षण वास्तविक समतावादी समाजाच्या पथ्यावर पडलेलं गुणवैशिष्ट्य असतं. कारण खेडेगावाच्या रचनेत महत्त्वाची, दिलासादायक आणि वेळी जाचक ठरणारी ओळख शहरात अनोळख होऊन येते. दलितांना, परप्रांतीयांना... पोटामागे आलेल्या कुणाही कष्टकऱ्याला तिथे जागा असते, कारण शहराला राबणारे हात लागतात. 


स्त्रियांबाबतही हे तितकंच खरं ठरतं. गावाच्या चौकटीत पुरुषसत्ताकतेनं त्यांच्यावर घातलेली बंधनं शहरांतून टिकू शकत नाहीत. कारण शहरांना ग्राहक हवा असतो, तसं मनुष्यबळही हवं असतं. ते कुठल्या जातीचं आहे हे महत्त्वाचं नसतं, तसं ते कुठल्या लिंगाचं आहे हेही महत्त्वाचं नसतं.


‘जोगवा'मधले तायाप्पा आणि सुली गावात राहते, तर त्यांचं प्रेम कोमेजून गेलं असतं. एका बाजूला तायाप्पाला पौरुष नाकारणाऱ्या अंधश्रद्ध रूढी, तर एका बाजूला गावच्या देशमुखाची नजर. पण मुंबई त्यांना प्रेमाचं स्वप्न बघायचा अवकाश देते. ‘दीवार'मधल्या हातावर ‘मेरा बाप चोर है’चा डाग घेऊन आलेल्या विजयपासून ‘बॉम्बे'तल्या शैला बानोपर्यंत; आणि ‘पाथेर पांचाली'तल्या गावात गुदमरणाऱ्या सर्वजयापासून ते अगदी आजच्या ‘सैराट'मधल्या आर्ची आणि परश्यापर्यंत… कितीतरी वेळा सिनेमानं हे अगदी नेमकेपणानं टिपलं आहे. शहरं दलितांना, स्त्रियांना, आणि परीघावरच्या कुणालाही उपकारक वाटतात ती अशी. 


भारतात गाव आणि शहर यांच्यातून प्रकटणारं हे द्वंद्व आता अधिक व्यापक पटावरही बघता येतं. अमेरिकेत किंवा खरंतर कुठल्याही पाश्चिमात्य देशात स्थायिक झालेल्या जोडप्यांना भारतात परत येण्याविषयी विचारा. वरकरणी तरी पुरुषाला ‘मातीची ओढ’ कासावीस करत असते. पण स्त्रियांना? त्यांना तिथलं स्वतंत्र आयुष्य सोडून होता होईतो इथल्या रामरगाड्यात परतायचं नसतं. निव्वळ सुखकर आयुष्य इतकंच त्याचं कारण नसतं. त्यामागे स्वातंत्र्याची चव असते.


शहरांच्या या आकर्षकपणाला मर्यादाही असतात. तो काही मुद्दामहून निर्माण केलेला समतेचा स्वर्ग नव्हे. शहरांच्या स्वतःच्या गरजेतून निर्माण होईल तितकं स्वातंत्र्य शहरं देऊ करतात, पण त्याची त्रिज्या मर्यादित असते. त्यापल्याड जाता येत नाही. त्यामुळेच पुरुषांनी पुरुषांसाठी घडवलेले आणि ठरावीक वेळांपल्याड स्त्रियांना असुरक्षित करणारे सार्वजनिक अवकाश जन्माला येतात, गरीब ‘दिसणाऱ्या’ माणसांना शॉपिंग मॉल्ससारख्या ठिकाणी सहजासहजी शिरता येऊ नये अशी व्यवस्था केलेली असते… 


आणि शिवाय, कितीही झालं तरी माणसं सहजासहजी कुठे बदलतात? शहरांच्या कॉस्मोपॉलिटनपणावर त्यांनी त्यांचा खास तोडगा काढला आहेच. ‘किमान शेजारपाजार तरी’ निवडून घेण्याचा तोडगा. गावगाड्यातल्या ‘ब्राह्मण आळ्या’ आणि ‘महारवाडे’ शहरांत हळूहळू नवीन नावांनी अवतरले आहेतच. शहरीकरणाच्या प्रक्रियेसमोर त्यांनी नवं आव्हान उभं केलं आहे. त्याबद्दल पुढच्या नोंदीत.


लोकमत, ३१ मार्च २०२६

शहरनोंदी ०६

“तुम्हां पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!” अशी किंचित असूयायुक्त अप्रूपाची एक झाक महाशहरांच्या बाहेरच्या लोकांच्या शहरवासीयांबद्दलच्या बोलण्यात असते. त्या असूयेचं मूळ कशात असतं? तर ते सुरळीत आणि सुसज्ज अशा यंत्रणांची कायमस्वरूपी उपलब्धता गृहीत धरता येणं, या महाशहरांच्या वैशिष्ट्यात असतं.


लोडशेडिंग होईल म्हणून घाईनं कामं आटपावी न लागणं, पाणी भरण्याचं प्रचंड कष्टप्रद काम करावं न लागता नळ सोडला की पाण्याची धार पडू लागणं, मैलोनमैल चालावं न लागता बस-ट्रेन वा रिक्षा-टॅक्सीसारखी वेगवान आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक सर्वांना उपलब्ध असणं... या तर मूलभूत गोष्टी झाल्या. पण त्यापलीकडेही मनोरंजनाच्या क्षेत्रापासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांना हे लागू होईल. शहरातल्या माणसांना अनेक गोष्टी सहजासहजी आणि सतत उपलब्ध असतात. याचा अर्थ सदासर्वकाळ सगळे जण सगळ्या गोष्टी उपभोगत असतात असं नव्हे. तर – गरज पडली तर कुठल्याही संघर्षाशिवाय हे मिळेल, अशी खात्री त्यांना असते, असा त्याचा अर्थ. या सदासर्वकाळ उपलब्धतेमुळे माणसं सैलावतात. ज्यांचं लहानपण पाण्याच्या अभावात गेलं आहे, अशी माणसं पाहिली असलीत, तर तुमच्या हे लक्षात येईल. अशी माणसं बारमाही पाणी असलेल्या ठिकाणी वास्तव्याला गेली, तरी काही काळ त्यांचा त्या वैपुल्यावर विश्वासच बसत नाही. जमेल त्या प्रत्येक भांड्यात जमेल तेव्हा जमेल तितकं पाणी भरून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी ते ओतून टाकून पुन्हा भरणे, असा अव्यापारेषु व्यापार ती करत राहतात. यंत्रणांच्या उपलब्धतेवर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती त्यांनी कधी अनुभवलेलीच नसते. त्यातून हे वागणं येतं. तर्काचा त्यावर इलाज चालत नाही. मात्र एखाद्या नेटक्या शहरात जन्मलेली माणसं पाहा. त्यांच्या वर्तनात याचा लवलेशही नसतो. बॉलीवूडमधल्या वा क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीजचं अप्रूप न बाळगता आपापले व्यवहार चालू ठेवणारे मुंबईकर; रिक्षाच्या तळावर रांग धरली की रिक्षा मिळणार या खात्रीनं घाईगडबड न करता बसमधून शांतपणे उतरणारे म्हैसूरकर; सकाळी सातच्या ठोक्याला स्टेशनवरच्या बेकरीत ताजा नाश्ता मिळणार या खात्रीनं उपाशीपोटी ऑफिसला निघणारा पॅरिसकर; चाकाची खुर्ची स्वतःची स्वतः नेता येईल असे उतार शहरभर असणार आणि ते नीट राखलेले असणार या खात्रीनं लंडनमध्ये स्वावलंबीपणे फिरणारे वृद्ध आणि अपंग लंडनकर; कितीही रात्री बाहेर पडलो तरी आपल्याला धोका नाही यांची खात्री असलेले सिंगापुरकर... ही सगळी त्यांचीच उदाहरणं. हे सगळे लोक एक प्रकारची सुरक्षित, रिलॅक्स्ड, उदार मनोवस्था अनुभवत असतात. त्यांना निदान या व्यवस्थांच्या बाबतीत तरी वखवख वा असुरक्षितता नसते.


जी शहरं भांडवलशाहीच्या प्राथमिक पायरीचं लक्षण आणि अंतिम पायरीची खूण मानली जातात, त्यांनीच तृप्त आणि उदार सहजीवनाचं हे प्रारूप उभं करावं हे विसंगत आणि मजेशीर आहे खरं. पण त्यातच शहर नावाच्या व्यवस्थेतली सगळी गंमत दडलेली आहे. त्याचं आकर्षण सर्वांनाच वाटतं. अगदी ‘गावाकडची निर्मळ-ताजी हवा आणि घरच्या मळ्यातला भाजीपाला’ यांचे गुण गाताना न थकणाऱ्या लोकांनाही. त्याबद्दलच्या असूयेतून “तुम्हां पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!” हा शेरा येतो.


अर्थात हे चित्र एका आदर्श शहराचं आहे. अशी निरामय, सहज – आणि मुख्य समतादर्शक समृद्धी कमावली, तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं शहरं होऊ हे वेगानं बकाल होत त्यालाच ‘विकास’ मानणाऱ्या गावांना कळलं आहे का?


लोकमत, १७ मार्च २०२६

शहरनोंदी ०५

एफ०एस०आय० हा शहरांमधला एक परवलीचा शब्द. एखाद्या जागेचं क्षेत्रफळ आणि त्यावर करता येणारं बांधकाम यांच्यातलं ते गुणोत्तर. वरकरणी साधंसरळ गणित. पण माणसांच्या मानानं जागा मर्यादित असल्यामुळे शहरांमध्ये त्या गणिताला अनन्यसाधारण महत्त्व येतं. राहणारी आणि बांधणारी अशी दोन्ही प्रकारची माणसं अधिकाधिक एफ०एस०आय० पदरात पाडून घेता यावा आणि पाय थोडेसे जास्त पसरता यावेत म्हणून नाना प्रकारच्या लटपटी-खटपटी करतात. 


मुळात एफ०एस०आय०चं उद्दिष्ट काय? ‘औट हात तुझी जागा’ असं तुकारामानंच म्हणून ठेवलेलं असताना हा हव्यास कशाला?! तर माणसाच्या प्रेताला साडेतीन हात जागा पुरत असली, तरी शरीर-मन जितं-जागतं असताना त्याला तितकी जागा पुरत नाही. त्याचं आरोग्य नेटकं राहायला हवं असेल, तर त्याला घरात आणि घराबाहेरही थोडी अधिकची जमीन, थोडंसं आकाश लागतं. 


जॉन कॅलहूनचा उंदरांवरचा एक प्रयोग प्रसिद्ध आहे. त्याने 

अमर्यादित अन्न आणि सुरक्षित जागा देऊन काही उंदीर निरीक्षणाखाली ठेवले. उंदरांकरता ती जागा म्हणजे स्वर्गच होता. नैसर्गिक शत्रू नाहीत, अन्नाची टंचाईही नाही. लोकसंख्या भसाभस वाढत गेली. एका विशिष्ट संख्येला पोचल्यानंतर मात्र उंदरांच्या वर्तनात बदल झाला. प्रणय थांबला, सलोख्याचे संबंध संपले, हाणामाऱ्या होऊ लागल्या. एका टप्प्यावर तर उंदीर उंदरांनाच खाऊ लागले. सगळं ठीक होतं. ठीक नव्हता तो एफ०एस०आय०. त्यानं उंदरांचा अंत केला. 


मानवी समाजाचं असं होऊ नये, म्हणून नागरी संस्था वस्त्यांवर हे कृत्रिम नियंत्रण घालतात. मैदानं राखणं, बागा वा जलाशय जोपासणं, दोन इमारतींमध्ये मोकळी जागा ठेवणं, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपाथ राखणं… या तरतुदीही त्याकरताच. जेणेकरून माणसांना माणसांपासून थोडातरी सुटा अवकाश मिळावा. त्यांच्यातले संबंध सुरळीत-सुखकर राहावेत. 


या उद्दिष्टाची बूज शहरं राखतात का, हा प्रश्न विचारणं आज आवश्यक होऊन बसलं आहे. जुन्या इमारती पाडून तिथे चिकार मजल्यांच्या आणि चिंचोळ्या व्हरांड्यांच्या उंच इमारती उभारल्यामुळे आपल्याला काही टक्के जागा अधिक मिळते, बिल्डरांना विक्रीसाठी फ्लॅट्स मिळतात, अवघा आनंदीआनंद होतो. पण रस्त्यांची रुंदी वाढणार असते थोडीच? ती तितकीच राहते. त्यात भर म्हणून पार्किंगला जागा न मिळालेल्या वाढीव गाड्याही रस्त्यावरच मुक्कामाला येतात. रुंदी अजूनच आटते. मग रस्ते रुंद करण्यासाठी इतर इमारतींची आवारं काबीज केली जातात. झाडं तोडली जातात. फुटपाथांचा बळी जातो. इतक्यानं भागत नाही. सार्वजनिक अवकाशातल्या मोकळ्या जागांवर बिल्डर लॉबीचा डोळा असतोच. पण तेच काही एकटे दोषी म्हणता येत नाहीत. रस्त्यांवर सणासमारंभांचे आणि अगदी लग्नांचेही मांडव पडत असतात. त्याकरता जमेल तिथून जमतील तशा विजेच्या जोडण्या घेतल्या जातात. त्यातच एखाद्या दगडाचा शेंदूर फासून तिथे दिवाबत्ती सुरू होते. पुढेमागे लोक तिथे घरातल्या देवादिकांच्या अधिकच्या तसबिरी आणून सोडू लागतात. आरत्या होऊ लागतात, एखादी शेड् टाकली जाते. हळूच कधीतरी पक्कं बांधकाम होतं. धार्मिक भावना जपण्यासाठी ते यथावकाश जिरवून घेतलं जातं. नियम ‘मॅनेज’ होतात. लचका तुटतो तो सार्वजनिक अवकाशाचा.


या सगळ्याचे लाभार्थी आपणच असतो. पण हा खरंच लाभ असतो का? की आपण त्याची किंमत निराळ्या ठिकाणी चुकवत असतो? ही सगळी अमानुष-हावरी घुसमट आणि त्यातून होणारं आपलंच शोषण सुधीर पटवर्धन कितीतरी वर्षं त्यांच्या चित्रांतून मांडतायत. आपली नजर जागी कधी होणार आहे?


लोकमत, ३ मार्च २०२६

शहरनोंदी ०४

गर्दी ही तशी सब्जेक्टिव गोष्ट असते. बेल्जियममधून दिल्लीत प्रथमच उतरलेल्या माणसाला ’सगळा बेल्जियमच अवतरलाय की काय या विमानतळावर?’ असं वाटून भीती वाटू शकते, मग तो बेल्जियमच्या राजधानीत का राहणारा असेना. पण मुंबईतून पॅरीसला जाणार्‍या माणसाला ’खिसापाकीट जपून बरं का, चोर फार तिकडे!’ हा इशारा अगदीच बाळबोध आणि बावळट वाटतो, कारण त्याला रोजच ’जिंकू किंवा मरू’ म्हणत पाठपिशवी पोटावर बांधून लढायला निघायची सवय असते. पण दुसर्‍या महायुद्धापूर्वी मुंबईत राहिलेल्या माणसाला आज सकाळी डोंबिवली स्टेशनवर सोडा; त्याला बहुतेक नुसती गर्दी बघूनच फेफरं येईल. 


थोडक्यात, स्थळकाळाची परिमाणं बदलली की माणसं कशाला गर्दी मानतील, तेही बदलतं. पण कुठल्याही काळात असा, कुठल्याही स्थळी असा, शहर म्हटलं की गर्दीला पर्याय नसतोच. आपण मागे म्हटलं तसं निरनिराळ्या प्रकारच्या संधींनी माणसांना आकर्षून घेणारी जागा म्हणजेच शहर असतं असं म्हटल्यावर ते ओघानं आलंच. पण म्हणून ती गर्दी अमानुषच असते, असं अजिबात नाही. 


गर्दीची अनेकदा सोबत होते, आधार वाटतो. निर्मनुष्य समुद्रकिनार्‍यावर भर दुपारी एकटेच जाऊन बघा. बघता बघता अंगावर भयाचा काटा फुलू शकतो. पण भेळवाल्याची टोपली आणि थोडी पर्यटकी गर्दी आणा… तोच समुद्र कसा वत्सल-खेळकर भासतो! 


शहरातल्या गर्दीचा आणखी एक लोभस विशेष म्हणजे तिच्याकडे आधाराच्या जोडीला एका विशिष्ट प्रकारचा खांदेउडवूपणाही असतो. लंडनच्या बसमध्ये ऐन ऑफीस-टायमात तुम्ही एखादं रक्ताळलेलं मुंडकं जरी काखोटीला मारून हिंडलात, तरी लोक फार तर फार भिवया उंचावतील, पण तुमच्या भानगडीत नाक खुपसणार नाहीत, असं एका अतिशयोक्त विनोदात म्हटलंय. त्यात किंचित का होईना, तथ्य आहेच. शहरं माणसांना एक अनोळख बहाल करतात. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य म्हणून शहरांना मान्य असतं, म्हणून नव्हे बरं का, उगाच भलता गोड समज नको! पण तिथल्या कुणालाच तुमच्या फाटक्यात पाय घालायला वेळ नसतो, ताकदही नसते. भल्या सकाळी लोकलच्या रुळांवर जीव देणार्‍या कुण्या अभागी जिवाबद्दल लोकांना सहानुभूती नसते असं नाही. पण घड्याळाला बांधलेली त्यांची आयुष्यं त्यांच्या ओठांवर एक कोरडा ’प्च’ तेवढा आणतात. इथे उदय प्रकाश यांच्या ’तिरिछ’ कथेची आठवण होते. त्या कथेत गावात प्रतिष्ठित असलेली एक व्यक्ती कामासाठी शहरात येते आणि एका विषारी प्राण्याच्या दंशामुळे एकाकी अवस्थेत भयावहरीत्या मरून जाते. लेखकानं त्या कथेतून आधुनिक शहरी चंगळवादी अवकाशाबद्दल काही अतिशय अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत, यात वादच नाही. पण त्या कथेच्या नायकपदी पितृसत्तेमध्ये प्रतिष्ठेचं स्थान असलेला एक प्रौढ पुरुष आहे, हीच एक अतिशय बोलकी गोष्ट आहे. सतत भावकीच्या नि गावकीच्या नजरांना जाब देण्याचं बंधन बाळगून दमलेल्या एखाद्या स्त्रीला विचारा शहरातल्या तुटक स्वातंत्र्याची किंमत. ती बहुतेक तुम्हांला उदय प्रकाशांपेक्षा वेगळं काहीतरी सांगेल.


शहरव्यवस्थापनयंत्रणांना गर्दी हवीही असते आणि नकोही. कारण माणसं नसतील, तर शहरं शहरं कशी बरं ठरतील? कुणाच्या बळावर चालतील? कुणाच्या जिवावर रंगीबेरंगी, आकर्षक, जिवंत, लोभस होतील? अव्याहत येणारी माणसं हवीतच. पण ती सुरळीत शिस्तशीर नांदूनही हवी असतात. नाहीतर मुंबईतल्या परळ स्टेशनात एका दुर्दैवी दसर्‍याच्या आदल्या दिवशी अवतरली आणि बावीस लोकांचा बळी घेऊन गेली, तशी जीवघेणी काळरात्र अवतरते. 


शहरातली माणसं मात्र याला हसत हसत ’स्पिरिट’ असं म्हणतात आणि पुन्हा धावू लागतात. हसावं की रडावं? कळेनासं होतं खरं.


लोकमत, १७ फेब्रुवारी २०२६

शहरनोंदी ०३

शहराचं शहरपण कशात असतं? एकच एक उत्तर देणं कठीण आहे. पण आपण हिशेब मांडून बघू. 


सर्वप्रथम प्रगत वैद्यकीय सुविधा. सुसज्ज रुग्णालयं आणि निष्णात डॉक्टर्स मोठ्या शहरांमध्ये सहजी उपलब्ध होतात, हे खरंच. तेच उच्चशिक्षणाच्या पर्यायांचं आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचं. बरोबरीनं जगभरातल्या उत्तमोत्तम वस्तूंचे स्वस्त-महाग पर्याय देत लुभावणारे बाजार. नुसत्या वस्तूंनी भागलं नाही, आर्थिक उलाढाली करणारे शेअरबाजार नि वित्तसंस्थाही. झालंच तर; सिनेमे, नाटकं, संगीताच्या मैफिली, क्लब्स-पब्स, लायब्रर्‍या, मुलाखती, चर्चासत्रं… अशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. शहर म्हटलं की हे सगळं आलंच. पण त्याहीआधी पोट भरण्याच्या संधींचा सुकाळ हवा. त्यासाठी उद्योगधंदे आणि नोकर्‍या हव्यात. कष्टकर्‍याच्या पोटाला अर्धी भाकर तरी मिळण्याची हमी हवी. त्याकरता तर लोक हक्काची आणि मायेची जागा सोडून शहरांच्या आसर्‍याला येतात. त्यामुळे सगळ्यांत आधी संधी हव्यात. 


ठीक. पण तितक्यानं थाटतं का शहर? 


डोक्यावर लहानसं का होईना, पण छप्पर हवं. म्हणजे स्वस्त नव्हेत, पण परवडण्याजोगी; कामाच्या ठिकाणाला लागून नव्हेत, पण प्रवास करून तरी वापरता येतीलशी घरं हवीत. त्यापाठोपाठ घरपोच पाणी पोचवणारी नळयंत्रणा आणि विजेची सोयही. प्रवास? सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसेल, तर परवडण्याजोगं दळणवळण व्हावं कसं? बसचं, रेल्वे-ट्राम-मेट्रोचं जाळं हवं. त्याला पूरक रिक्षा, टॅक्स्या, टमटम हव्यात. तिन्हीत्रिकाळ कामाच्या ठिकाणी पोचायचं, म्हणजे बाहेर खाण्यापिण्याची सोयही हवीच. म्हणजे फेरीवाल्यांपासून पंचतारांकित हॉटेलांपर्यंत आणि उडप्यांपासून पोळीभाजीकेंद्रांपर्यंत सगळे पर्याय आलेच. बरं, सुरक्षितता हवी. म्हणजे रात्रभर दिव्यांनी उजळलेले सार्वजनिक अवकाश हवेत, तशीच दक्ष आणि मदतीला तत्पर पोलीसयंत्रणाही हवीच. 


हे सगळंही आलं, म्हणू. पण तितक्यानं तरी नांदू लागतं का शहर? या सगळ्या भौतिक पसार्‍यात वावरून वर दशांगुळं उरणारं आणि चिमटीत पकडता न येणारं काहीतरी असतं शहरात. होय की नाही? ते काय असतं? ’कधीही न झोपणारं शहर’ किंवा ’स्पिरिट पाहा, पावसानं इतकं झोडलंय, तरी दुसर्‍या दिवशी लोकल्स भरून वाहतायत!’ असं आपण मुंबईबद्दल म्हणतो, तेव्हा आपण कुणाबद्दल बोलत असतो? ’जो माणूस लंडनला कंटाळला, तो जगण्याला कंटाळला’ असं सॅम्युएल जॉन्सन लंडनबद्दल म्हणून गेला आहे, तो कशामुळे? 


त्यामागे दुसरं-तिसरं कुणीही नसून तुम्ही-आम्ही-आपण असतो. भरमसाठ पैसे देऊन इंच-इंच जागा विकत घेण्याची स्वप्नं बघणारे, रोजीरोटीमागे धावून रात्री घरी परतणारे, बस-ट्रेनच्या गर्दीत गुदमरणारे, दमलो तरी शुक्रवारी रात्री उशिराचा शो बघणारे, रिक्षावाल्यांशी भांडणारे आणि चर्चाही करणारे, लॉंग वीकेंडला ट्रॅफिक कमी झाल्यामुळे खुशालणारे, नाक्यानाक्यावरच्या मांडवांनी आणि मोर्च्यांनी कातावणारे, स्टेशनवरच्या गर्दीत आपली भाजीवाली म्हातारी हेरून तिच्याशी एक मूक नातं जोडून असणारे… जातपातधर्मप्रांत न बघता वेळेला सहप्रवाशांच्या आणि शेजार्‍यांच्या मदतीला धावणारे तुम्ही-आम्ही-आपण - कॉस्मोपॉलिटन आपण. 


आपण आपापल्या शहराला नुसतं व्यक्तिमत्त्वच बहाल करतो असं नव्हे, तर अक्षरशः आपली ऊर्जा वोपून त्याच्यात प्राण फुंकत असतो. शहरं ही ऊर्जा पिऊन घेतात, ढेकरही न देता दिसामासांनी बिनबोभाट वाढत राहतात… त्या बदल्यात ती आपल्याला काय देतात? या लेखात आपण ज्या अत्यावश्यक सोयींची यादी केली, त्या तरी ती आपल्याला देऊ करतात का? जरा थबकून अदमास घ्या. जर उत्तर नकारार्थी असेल, तर आपल्या शहराचं शहरपण शाबूत आहे असं म्हणायचं का?


लोकमत, ३ फेब्रुवारी २०२६


शहरनोंदी ०२

शहरं म्हणे बकाल असतात. तसं ते खरंही आहे. पण बकाल असतात म्हणजे काय असतात? कचरा असतो, गर्दी असते, की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण? हे सगळं असतंच. पण त्याशिवाय वर थोडंसं काहीतरी, शब्दांत पकडता न येणारंही असतं. नाही पटत? थांबा, पायरी-पायरीनं बघू. 


बकालीसाठी दळणवळणाची सेवा अत्यावश्यक. सर्वप्रथम जर काही बकाल होत असेल, तर तो स्टेशनाभोवतीचा भाग. तिथला काळोख अंतर्धान पावतो. रात्रंदिवस जळते दिवे येतात. पाठोपाठ बिडीकाडी, भुर्जीपाव, सिमकार्ड-रीचार्ज, लॉटरीची तिकिटं… त्यातच घट्टपणी जागा धरून राहिलेली थोडी जुनी कापडचोपडाची दुकानं. एखादं रेस्टॉरंट, एखादा चहावाला, अर्थात एकतरी पानवाला. त्यांच्यापाठोपाठ विशिष्ट प्रकारचा कचरा. भाजीमंडईचा कचरा निराळा असतो. मानवी वस्तीचा निराळा. तशी बकालीच्या कचऱ्याचीही एक विशिष्ट जात असते. पानाच्या पिचकाऱ्या, बिड्यांची थोटकं, लॉटरी तिकिटांच्या चिंध्या, भुर्जीवाल्याच्या थाळ्या बुचकळलेल्या पाण्याचे तिथल्याच गटारात चाललेले ओहोळ... फाटक्या व्यक्तिमत्त्वाचा, पण आपल्या असण्यानंच कळकट वाटायला लावणारा कचरा. त्यातच कुठेतरी आडोसा धरून संसार मांडणारं एखादं बारकं कुटुंब हळूहळू दिसू लागतं आणि बघता बघता तिथल्या सगळ्या अर्थव्यवस्थेत सहजी विरघळून जातं. तिथेच भिकारी, रात्री उशिरा फिरणार्‍या वेश्या, एखादी पोलीस चौकी, रिक्षास्टॅंड, बसस्टॅंड... सगळं बयाजवार असतं. पण तरीही तिथल्या गर्दीला चेहरा नसतो. थांबायला वेळही नसतो. बारा महिने-चोवीस तास, कुठल्याही ‍ऋतूत, कुठल्याही प्रहरात; येणारे लोक येत असतात, जाणारे जात असतात. आसमंताला एक सळसळता यांत्रिक वेग असतो. पण इतक्या वेगात-उद्योगात बुडलेला असूनही तिथल्या गर्दीचा स्वभाव एखाद्या उडाणटप्पू, मवाली, बेछूट, पोरसवद्या तरुणासारखा असतो. निर्विकार चेहऱ्यानं एखाद्या अश्राप जिवाचा खूनही पचवेल आणि नामानिराळी होऊन खांदे उडवत, एखादी बेपर्वा शिवी हासडत चालती होईल, अशी ही गर्दी. 


आहे ना कचरा-गर्दी-प्रदूषण-वेग यांच्यापेक्षा अधिकचं काहीतरी? असतंच. विकासाची पावलं जिथे जिथे जातील, तिथे-तिथे बकाली हलके हलके पसरत जाणाऱ्या बुरशीसारखी उगवत जाते. कशामुळे? कारणं जरा गुंतागुंतीची आहेत. पण तशी ती कुणालाच नको असते. असल्या बकाल भागात लोक अगदी नाईलाज असला तर नि नाईलाज असेपर्यंतच थांबतात. अशा भागापासून सुरक्षित अंतरावर, ’मध्यमवर्गीय’ वस्तीत, हल्ली ’गेटेड कम्युनिटीज’मधून राहू पाहतात. बोहारणी, फेरीवाले, भिकारी, डोंबारी, कडकलक्ष्म्या तर बादच. जेमतेम घरकामाला येणार्‍या मोलकरणी, वॉचमन, झाडूवाले, स्विगीझोमॅटोची सेवा पुरवणारे डिलिवरीबॉइज… यांनाही आपादमस्तक तपासून, वेळी त्यांची झडती घेऊन नि त्यांच्याकरता लिफ्ट्स वेगळ्या ठेवून कामापुरताच प्रवेश देतात. बकालीला भिऊन असल्यासारखे वागतात…   


आज विषमतेच्या जिवावर का होईना, ही विभागणी शहरांना धकवून नेतेय. शहरांना वाढीसाठी आणि चलनवलनासाठी अत्यावश्यक असलेली ऊर्जा मिळतेय. पण हे कसंबसं धकवून नेणंच आहे, सुखानं नांदणं नाही, बहरणं तर नाहीच नाही. बकालीचं हातपाय पसरणंच की हे, वाळवंटासारखं. आजच लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधली अमानुष गर्दी, ट्रॅफिक जॅम्स, धूळ-धूर-आवाज… असह्य झालं आहे. लोक अक्षरशः गुदमरताहेत. रोड रेजच्या रूपानं म्हणा, वाढत्या गुन्हेगारीच्या रूपानं म्हणा - हे ठसठसतं गळू वेडंवाकडं फुटू लागलं आहे. ज्या संधी, सोयीसुविधा, समता यांच्या मोहानं लोक शहरांच्या आश्रयाला येतात; त्याच आपण गमावू लागलो आहोत. शहरांचं शहरपणच आटू लागलं आहे. मागे विकासाची निष्प्राण, अजस्र, क्रूर धुडं उरताहेत… 


याहून अधिक मोठी धोक्याची घंटा काय असेल!


लोकमत, २० जानेवारी २०२६

शहरनोंदी ०१


शहरं मोहक असतात. 


अहं, तुम्हांला वाटतंय तसा हा शहर विरुद्ध गाव असा नेहमीचाच वादंग नाही. गावंही त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं लाघवी असतातच. पण शहरांमध्ये भूल घालण्याची, वेड लावण्याची, मोहात पाडण्याची कसलीशी अजब ताकद असते हेही खरं. हे आजचं नाही, युगानुयुगे मिरवत आली आहेत शहरं ही जादू. पण त्याबरोबरीनं गावांकडून वाट्याला आलेली तुच्छताही. ’स्नान केलेल्या माणसाला पारोश्या माणसांकडे बघून वाटतं, तसं मला नगरजनांकडे बघून वाटतं. हे नगर अपवित्र आहे.’ असं खुद्द कालिदासाचंच एक पात्र ’शाकुंतला’त म्हणून गेलंय, म्हणजे बघा! तरीही शहरांची बिलोरी जादू अभंग आहे. आंबेडकर तर ’शहरांकडे चला’ असं म्हणून गेले आहेतच, पण भारतात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी जेमतेम दहा टक्के असलेली शहरी लोकसंख्या येत्या पाचेक वर्षांतच चाळीस टक्क्यांचा टप्पा गाठेल, असं आकडेवारी सांगते आहे. बॉलिवुडनंही अनेक वर्षं ’शहर की लडकीयों’ बद्दल अविश्वास आणि संशय मनात बाळगलाच की. पण  हळूहळू तिथूनही ’गाँव की छोरी’ अदृश्य झालीय. तिथले नायक-नायिकाही ’छोटे छोटे शहरों से…’ असू लागले आहेत.     


म्हणून म्हणतेय, शहरं मोहक असतात. 


का? काय असतं त्यांच्या पोटात? ’नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ या कुसुमाग्रजांच्या ओळींतल्यासारखा झगमगाट? की शिक्षणाच्या नि रोजीरोटीच्या संधींची रेलचेल? कष्टकरी हातांना केवळ एका वडापावाची हमी? की खरंच आंबेडकरांना वाटत होतं, तशी समता? की रानाच्या आदिम भीतीपासून सुटकेचं आश्वासन? की गर्दीतला कुणी एक बिनचेहर्‍याचा मानवप्राणी होऊन आपापलं एकांडं जगण्याचं - आधुनिक स्वातंत्र्य? काय की बुवा. प्रत्येका(की)ची उत्तरं वेगळाली असतील. या सगळ्यातला स्वप्नाळू भाव कुणाला पटणारही नाही कदाचित. शहरातल्या बकालीला नि ऊर्जेच्या उधळपट्टीला, आवाजाला आणि प्रदूषणाला, गर्दीला आणि वेगाला, मग्रुरीला आणि माजाला नावं ठेवणारे लोक आजही असतील. पोटापाण्याच्या मजबुरीपायी शहरात दिवस काढताना आपलं गाव आठवत झुरत असतील, ’बहुत मीठा है पानी उस कुंंवे का, बडी मीठी है उन पेडों की छाँव…’ मनोमन आळवत असतील. 


पण हेही तितकं खरं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या द्वैतापासून आपण आज पुष्कळ पुढे आलो आहोत. शहरांना पर्याय नाही, हे आपण आपलंसं केलं आहे. शहरीकरणाला अभूतपूर्व वेग आला आहे. सगळ्या पातळ्यांवरची बकाली वेगानं वाढते आहे. त्याचबरोबर, आणखीही एक मोठा बदल होऊन स्थिरावला आहे. शहरं हीच ज्यांची जन्मगावं आहेत, असा वर्ग आता बहुसंख्याक आहे. ’शहर’ या संकल्पनेबद्दल अनेक पिढ्यांनी जोपासलेलं रागा-प्रेमाचं परस्परविरोधी रसायन त्यांना माहीत नाही. त्यांनी शहरी जगण्याखेरीज इतर काही पाहिलेलंच नाही. 


त्यांच्याकरताही शहरं तितकीच मोहक आहेत का? शहरांचं शहरपण असतं तरी कशात? ते निव्वळ भौतिक श्रीमंतीत असतं की त्यात नागरिकांच्या वागण्या-बोलण्याचा काही भाग असतो? असेल, तर तो नक्की कुठे असतो, कसा दिसतो? तो आजच्या शहरांमध्ये उरला आहे का? किती? नसेल, तर का नाही? वेगानं बदलत ’शहरी’ होत चाललेल्या तुमच्या-आमच्या भोवतालात काय भलं आहे आणि काय बुरं आहे? कशानं जीव सुखावतो आहे? आणि कशानं खंतावतो आहे - व्याकुळतो आहे? 

अशा तुम्हां-आम्हांला रोज पडणार्‍या आणि आपण मनातच ठेवलेल्या प्रश्नांचं हे सदर. भेटूच.


लोकमत, ६ जानेवारी २०२६

Monday, 2 June 2025

अंतर

दूर आहेस माझ्यापासून खूप
जगाच्या मागण्यांच्या विळख्यात.
तरी तुझा आवाज कसा पोचतो आहे माझ्यापर्यंत?
आणि माझा आवाज ऐकून खुशालतो कसा आहे तुझा चेहरा?
कशा निवळून जाताहेत कपाळावरच्या आठ्या क्षणार्धात?
कुठले धागे आहेत हे अदृश्याचे आपल्याला जोडून घेणारे,
ज्यांतून हलके, अगदी हलकेसे कंपही, अलगद पोचताहेत या हृदयीचे त्या हृदयी?
हा कुठला काळानिळा पक्षी रात्रीच्या अंधारात मिसळून गातो आहे आपल्या दोघांसाठीच फक्त,
त्याचं कोवळंशार गाणं?
दूर तरी आहेस का तू खराच माझ्यापासून?

Wednesday, 28 May 2025

गिचमीड


वाटतं,
फार गिचमीड नकोच पानावर.
नुसतं वावरावं तुझ्या अवतीभवती.
संथ लगबगीनं.
तुझ्या तंद्रीदार प्रश्नांना अटकर उत्तरं पुरवावीत,
नेमक्या जागी स्वल्पविराम रेखावा.
पडदे झुळझुळते राखावेत,
गॅलरीत एखादा नाजूकसा हिरवागार वेल,
बकुळीची चार फुलं टेबलापाशी.
हवेत गुणगुण.
बस.
वाचता वाचता थबकून,
हुंकार उमटावा,
नकळत. 
मग काही म्हणायला नकोच वाटावं.
शब्द वरवरचे, फोलपटांसारखे, निःसत्त्व... 
एकेकदा अश्लीलही. 
काही म्हणायला नकोच वाटतं बघ. 

Friday, 14 March 2025

दिसामाजी काहीतरी : अंतर्जनम : देवकी निलयगोडे

‘अंतर्जनम’ हे देवकी निलयमगोडे (उच्चारात चू०भू०दे०घे०) यांचं आत्मचरित्र. नंबुद्री ब्राह्मण घरात १९२८ साली जन्माला आलेल्या या बाई. इंदिरा मेनन आणि राधिका पी. मेनन अशा दोघी जणींनी देवकीबाईंची मल्याळमध्ये लिहिलेली दोन चरित्रात्मक पुस्तकं आणि त्यांचेच काही सुटे लेख यांचं इंग्रजीत भाषांतर करून हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
नंबुद्री ब्राह्मण चालीरीतींबद्दल मला मोघम माहिती होती. साधारणपणे आठव्या शतकात केरळातल्या राजांनी श्रौत कर्मकांडं करवून धर्माची मान्यता मिळवण्याकरता नंबुद्री ब्राह्मण कुटुंब उत्तरेतून आणवली. ही कर्मकांडं करण्याच्या मोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या. या ब्राह्मणांनी वेदाध्ययनाची मौखिक परंपरा जपली. मल्याळम भाषेत काव्यरचना केल्या. त्यातून मल्याळम भाषेवर संस्कृतचा अमीट ठसा उमटला. याबद्दल आणि त्यांच्या काही विशिष्ट चालीरीतींबद्दल तेव्हा ऐकण्यात आलेलं असल्यामुळे मला त्याविषयी कुतूहल होतं. त्यामुळे नेटवर रानोमाळ भटकताना वाटेत लागलेलं हे पुस्तक उचललं आणि ते अक्षरशः दोन दिवसांत संपवलं.
वाचताना संताप, शरम, अचंबा, कुतूहल, विषण्णता, कौतुक, अविश्वास…. अशा भावना आलटून पालटून मनात येत राहिल्या.
नंबुद्री ब्राह्मणांना इनाम मिळालेल्या जमिनी कुटुंबातच राहाव्यात आणि त्यांचे तुकडे होऊ नयेत, म्हणून या कुटुंबांमध्ये एक विशिष्ट पद्धत राबवली जात असे. फक्त मोठ्या मुलग्याचं लग्न नंबुद्री ब्राह्मण जातीत करायला परवानगी होती. बाकीच्या मुलग्यांना नायर राजकुळात, वा इतर काही क्षत्रिय जातींमध्ये ‘संबंध’ राखण्याला परवानगी असायची. या संबंधांना ‘संबंधम्’ असंच म्हणत. त्यांच्या स्त्रिया आणि मुलं ही त्यांच्या मातृघरीच राहत. त्यांचे वंशपरंपरागत हक्क, नावं हे सगळंच त्या स्त्रियांच्या माहेरचं असायचं. त्यामुळे नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या जमिनी त्यांच्याकडे सुरक्षित राहत. त्या कुटुंबातल्या मुलींना साहजिकच नवर्या मुलांची चणचण भासायची. हुंडेही जबरदस्त द्यावे लागायचे. त्यामुळे त्यांची लग्नं होणं अतिशय कठीण असे. या मुली वयात आल्यापासून मरेपर्यंत अक्षरशः दिवाभीतासारख्या घरातच डांबल्या जात. एकुणातच नंबुद्री घरांमधल्या सगळ्याच स्त्रियांना परपुरुषाच्या नजरेला पडण्याचीच बंदी होती. त्यामुळे त्यांना ‘अंतर्जनम्’ – म्हणजे अक्षरशः ‘आत राहणारी माणसं’ हेच नाव असे. पुरुषाचा तर सोडाच, परजातीच्या स्त्रीचाही स्पर्श वर्ज्य. तो झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहण-जलग्रहण नाही. पुरुषाची तर नजरही पडणं अशक्यप्राय. तरी घरातल्या विवाहित आणि नवरा जिवंत असलेल्या बाईचं आयुष्य बरं. पण अविवाहित मुली मात्र पाळी सुरू होईपर्यंत घराबाहेरच्या आवारात, देवळापर्यंत, ओसरी-पडवीवर, तळ्यापर्यंत उंडारतील, तितक्याच. पाळी सुरू झाली, की लग्न होईपर्यंत वा मरण येईपर्यंत स्वैपाकघर ते घरातल्या बायकांसाठी राखीव असलेला, परसातला आंघोळीचा हौद कम् तळं. इतकाच त्यांच्या आयुष्याचा परीघ.
वाचताना माझा संताप होत होता. पण मग लागोपाठ चित्पावन ब्राह्मण घरातल्या बायकांची स्थिती आठवे आणि शरमेनं जीव गोळा होई. पण महाराष्ट्रात आधी न्यायमूर्ती रानडे यांनी बालविवाहाच्या विरुद्ध चळवळ आरंभली होती (इ०स० १८६५) तर धोंडो केशव कर्व्यांनी महाराष्ट्रातला पहिला विधवाविवाह १८९८ साली केला होता. त्याही आधी फुले दाम्पत्यानं विधवांच्या मुलांसाठी, स्त्रीशिक्षणासाठी काम सुरू केलं होतं. त्यामुळे तुलनेनं लवकर परिस्थिती बदलली. पण केरळमध्ये मात्र साधारण १९४०-४५पर्यंत नंबुद्री ब्राह्मण स्त्रियांची परिस्थिती कमालीची दयनीय होती. म्हणजे फक्त ८० वर्षांपूर्वीपर्यंत हे असंच सुरू होतं.
राग येत होता, पण एक विचित्र रोगट कुतूहलही वाटत होतं, इतके विलक्षण तपशील.
सांपत्तिक स्थिती बरी असेल, तर या घरांमधून शेकडो माणसं जेवून जात, मदतनीस स्त्रिया, नोकरचाकर, आला-गेला, रोगी, विद्यार्थी... कुणीही विन्मुख जात नसे. पण घरातल्या स्त्रीला मात्र दमडीही उपलब्ध नसायची. ‘तशी पद्धत नव्हती’, इतकंच स्पष्टीकरण. लेखिकेच्या आईला माहेरी जायचं असेल, तर स्वैपाकघरात वापरण्यासाठी जे तांदूळ मॅनेजर द्यायचा, त्यांतले काही तांदूळ महिनोन् महिने थोडथोडे बाजूला करून ठेवावे लागत. मग ते कुणाच्या तरी मेहेरबानीनं विकले गेले की मग हाती आणा लागायचा. असे पैसे जमले की ते मुंडूच्या चुण्यांमध्ये लपवायचे आणि तेव्हा कुठे माहेरी जाता यायचं. अंगावर ल्यायचे कपडेही रंगीत नव्हेत. दोन पांढरी वस्त्रं. बाहेर जाताना अंगाभोवती गुंडाळायला एक मुंडू. एक सोनेरी कडा असलेलं पांढरं वस्त्र. चोळ्या घालायला बंदी. एक लाकडी छत्री. लग्नाच्या वेळी बरोबर आणलेले काही दागिने. एक लाकडी पेटी. इतकीच त्यांची सत्तेची मालमत्ता. बाहेर जाताना अंगाभोवती पायघोळ वस्त्र लपेटायचं, छत्री धरायची – जेणेकरून कुणाच्या दृष्टीला नखही पडू नये, नजर खाली पायाकडे. पुढे मदतनीस नायर स्त्रिया चालत, ‘याS होS’ अशा आरोळ्या देत, म्हणजे ‘शूद्र’ कुणी असेल, तर त्यांनी रस्त्यातून दूर व्हावं. असं देवळापर्यंत जायचं आणि तसंच परत यायचं. मुलींचे कान टोचून त्यात जड पितळी कानातले बाळपणीच घातले जात. कानांच्या पाळ्या लोंबून पार खांद्यापर्यंत याव्यात अशा बेतानं या कानातल्याचं वजन वाढवलं जाई. तसे कान सुंदर मानले जात. ‘मुलींचे कान चांगले लांब होऊ देत’ अशी प्रार्थना बायका करत, म्हणजे मग त्यांची लग्नं नीट होतील आणि त्या कदाचित पोटभर जेवू शकतील, अशी इच्छा त्यामागे असे. नवरा चिडला तर कानांतले खेचून बायकोला सहज यातना देऊ शके. किंवा बसायचं लाकडी आसन पायांवर फेकून मारी, म्हणजे पाय मोडत. बायकांना डॉक्टरनं बघायची पद्धत नव्हतीच. कुणीही आजारी पडलं, तरी आधी आयुर्वेद. तो थकला की मग डॉक्टर. तोही पुरुषांकरता. ‘घरी डॉक्टर आला, तर पेशंट अर्थात ‘पुरुष’ असायचा’ या अर्थाची नोंद वाचून मला चरकायला झालं. बायकांनी अंथरूण धरायचं. जीवानं तग धरला तर ठीक. नाहीतर विधवा, कुमारिका, अविवाहिता मेली काय नि जगली काय. लग्नाची बाईल मेली, तर तिची जागा घ्यायला इतर मुली तत्पर असायच्या. शिक्षण वर्ज्यच. अक्षरओळख करून दिली जायची, पण ती पुराणाचं एक पुस्तक वाचता आलं की तत्काळ बंद. मग पुस्तक वाचण्यावर अर्थातच बंदी. शिक्षणालाही. कारण? परपुरुषाच्या नजरेला पडण्याला बंदी. लग्न झालं तर ठीक, नाहीतर घरात कुजून-राबून मरण. क्वचित या बाया अविवाहित असतानाच मेल्या, तर त्यांची नाममात्र लग्नं करून त्या नवऱ्याकरवी अंत्यसंस्कार केले जात. कारण धर्मानं मुलगी अविवाहित ठेवण्याला मान्यता नव्हती. विधवांचे हाल तर कुत्राही खात नसे. त्यांच्या ‘अशुभ’पणाबद्दल आपण मराठी ब्राह्मणजनांना काही सांगायला नकोच. पण एकंदरीतच शुद्धाशुद्धतेच्या विलक्षण कर्मठ कल्पना. नवरा मेल्यावर स्त्रीनं दागिने उतरवून ओलेतं वस्त्र नेसायचं. नवर्याच्या प्रेतासमोर माथा टेकून त्याची क्षमा मागायची. मग तिनं स्नान करायचं. पण तिला अंग कोरडं करायची परवानगी नसे. दिवसातून तीनदा स्नान करून ओलेतं वस्त्र अंगावरच वाळू द्यायचं. मीठ नसलेलं, न शिजवलेलं असं कदान्न खायचं. एकान्तात, कोंडल्या स्थितीत, काळोखात राहायचं. वैधव्यानंतर पुढे तीन वर्षं हा ‘दीक्षा’ नामक सुतकाचा कार्यक्रम लागू असे. विवाहित बायकाही अक्षरशः जेवणाच्या आशेनं लग्नाबिग्नासारख्या समारंभांतून आशेनं जात. पण त्यांनी जेवायचं ते नवर्याच्या उष्ट्या पानात. ही नंबुद्री ब्राह्मण बायांची स्थिती. इतर - नायरेतर आणि ब्राह्मणेतर - 'शूद्र' स्त्रियांनी तर इतर सगळे जेवल्यावर त्यांच्या उष्ट्या पानांवरच जेवायचं. तेही मालकानं समारंभाच्या ठिकाणच्या ब्राह्मणाला सांगून ओळख पटवून दिली तरच. नंबुद्री कुटुंब कर्जबाजारी झाल्यामुळे जमिनी गेल्या, जप्ती आली, तर पुरुष खुशाल कुठल्यातरी देवळाच्या आसर्याला राहू शकत. स्त्रियांची फिकीर कुणालाच नसे. त्यांचं काही का होईना.
यातला अन्याय अंगावर येतोच. पण त्याचं व्यवस्थेमध्ये केलेलं चिरेबंदी रूपांतर जाणवून थरकून जायला होतं. कुठून आला असेल इतका तीव्र द्वेष आपल्याच बायकांबद्दल आणि मुलींबद्दल? पोटात तुटत नसेल काही? न राहवून मला पेगी मोहन यांच्या पुस्तकाच्या भाषांतरांच्या निमित्तानं वाचलेल्या अनेक गोष्टींची आठवण होत राहिली. भारतात आलेल्या वैदिक आर्यांच्या टोळ्या निदान सुरुवातीच्या काळात तरी पुरुषबहुल होत्या. त्यांनी इथल्या स्त्रिया मिळवल्या. कशा मिळवल्या? त्या स्वेच्छेनं या परकीय पुरुषांशी रत झाल्या असतील, की नाइलाजानं? कुणाला ठाऊक. या स्त्रियांची भाषा संस्कृतेतर. शिवाय त्यांच्यावर संबंध लादलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल कमालीचा अविश्वास. त्यामुळे त्यांना संस्कृत शिकायला बंदी असेल? या अविश्वासाची, तिरस्काराची, व्यवस्थाप्रणित छळाची मुळं तिथे असतील का? समजत नाही... अवाक, खिन्न व्हायला होतं खरं.
लेखिकेची भाषा मात्र कमालीची संयत आहे. इतकी, की हा संयतभाव भाषांतरातही आणायचा, पण लेखिका त्या नेमनियमांचं समर्थन करत नाहीय, हेही अधोरेखित करायचं – हे कसं साधायचं असा पेच भाषांतरकारांपुढे उभा राहिल्याचं त्यांनी नोंदलं आहे.
लेखिकेच्या सुरात कडवटपणा नाही. तिला यातला अन्याय दिसत नाही, असं नाही. तिचं लग्न सुधारकी कुटुंबात झालं आणि इंग्लिश शिकता आलं. ‘योग क्षेम सभा’ नामक सुधारकी चळवळीचं काम करता आलं. आयुष्य बदललं. पण ते नंतर. त्यापूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या तिच्या नोंदी कडवट, संतप्त असत्या तर ते समजण्याजोगं होतं. पण तसं दिसत नाही. तत्कालीन सणसमारंभ आणि चालीरीती, अन्नधान्य साठवण्याच्या पद्धती, जेवणातले पदार्थ, वस्त्रप्रावरणं, निसर्गाशी असलेलं जोडलेपण, वैद्यकीय अज्ञान आणि त्यामुळे धर्मावर असलेलं अवलंबित्व, देवभोळेपण, निरनिराळी फळं-फुलं-पानं यांना जगण्यात असलेलं स्थान... यांबद्दल अतिशय तपशिलात जाऊन, रसाळपणे केलेल्या नोंदी दिसतात. आयुष्य एका प्रकारे अभावाचं खरं, पण ही व्यक्ती त्याही परिस्थितीत किती रसरसून जगली आहे, ते दिसायचं राहत नाही. त्यानं थक्क, नतमस्तक व्हायला होतं.
मला त्यातल्या कितीतरी समारंभांबद्दल वाचताना, केळी-नारळ-सुपार्या-भात-बांबू यांनी घेरलेलं हिरवंगर्द आयुष्य अनुभवताना; कोकणातल्या तत्कालीन मंगळागौरींची, गौरीगणपतीत खेळल्या जाणाऱ्या बायकांच्या खेळांची, तिथल्या निसर्गाची, हिरवेपणाची आठवण होत राहिली. पाठोपाठ अर्थात चित्पावनांच्या केशवपनासारख्या चालीही आठवणं क्रमप्राप्त होतं... पण समाज सुधारू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी रक्त आटवणार्या काही माणसांचं महत्त्व किती आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदललं आहे, हेही पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं.
नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या दात्री नामक स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप झाला आणि तिच्यावर ‘स्मार्तविचारम’ नावाचा खटला चालवण्यात आला. तिनं एक-दोन नव्हे, तब्बल त्रेसष्ट पुरुषांची नावं घेतली. त्यांच्या शरीरावरच्या अवघड जागच्या खुणा- त्यांची पत्रिका – जन्मवेळ – शरीरसंगाची वेळ-तिथी... इत्यादी पुरावे देऊन तिनं खटला चालवणार्या नायर राजाच्या तोंडाला फेस आणला. त्यानं तिच्यासकट त्या त्रेसष्ट लोकांना जातिबाह्य जाहीर करून खटला गुंडाळला. पुढे तिचं काय झालं त्याच्या काहीही नोंदी सापडत नाहीत. ही घटना १९०५मधली. (अलीकडे मनु पिळलै यानं लिहिलेल्या The Courtesan, the Mahatma & the Italian Brahmin: Tales from Indian History या पुस्तकात त्याबद्दल तपशीलवार वाचता येईल.) या प्रकरणाचे लेखिकेच्या आयुष्यावर पडलेले पडसाद या पुस्तकात दिसत राहतात. दबक्या आवाजात होणार्या चर्चा, दात्रीच्या चारित्र्यावर ओढले जाणारे ताशेरे, आपल्या कुटुंबातल्या कुणा पुरुषाचं नाव त्यात ‘निघालं’ तर काय, ही पोटातली भीती, अविश्वास आणि एक प्रकारचं छुपं कौतुक... अशा गोष्टींच्या नोंदी लेखिकेनं केल्या आहेत. त्या वाचताना लेखिकेच्या संयत, डोळस, विशाल दृष्टीचा प्रत्यय येत राहतो.
नंबुद्री ब्राह्मण जातीतले पुरुषही अखेर या सगळ्या अंधकारमय चालीरीतींचे बळीच होते. त्यांच्यापैकीही काही जणांनी आपापल्या मुलीबाळींसाठी, बहिणीबायकांसाठी सुधारणेचे कडवे प्रयत्न केले. काही जणांमध्ये धैर्य नव्हतं. पण प्रेम होतं. लेखिकेच्या वडलांनी तिच्या बहिणीला संस्कृत शिकायची हौस असल्यामुळे निदान ज्योतिषशास्त्र तरी शिकवण्याचं वचन तिला दिलं. मुलगी एका खोलीत, उंबर्यात वडील, दुसर्या खोलीत शिक्षक – असा शिक्षणाचा खटाटोप काही काळ चालवला, अशी नोंद लेखिकेनं केली आहे. काही नंबुद्री ब्राह्मण पुरुषांनी औषधोपचार न घेता देवासमोर मरायचं ठरवलं. पण स्नानाशिवाय देवासमोर जायचं नाही या नियमासमोर मान तुकवून त्या मरणासन्न अवस्थेत घरच्या तळ्याकाठच्या हौदात बुडी घेऊनच... हे वाचताना पोटात तुटतं. माणसं रूढींसमोर इतकी हतबल का होतात, असा प्रश्न परत एकदा पडला.
जमिनींच्या मालकीपासून या भयानक चक्राला मिळालेली गती अखेर कूळकायद्यात जमिनी गेल्यावर हळूहळू मंदावली. जमिनीच उरल्या नाहीत. जमिनींवर उलटसुलट दावे सांगून तिच्या वाटण्या होऊ नयेत, म्हणून नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या धाकट्या मुलग्यांनी जातीत लग्न करण्यावर बंदी होती. तीही हळूहळू संपुष्टात आली. वाटण्या झाल्या. विभक्त कुटुंबव्यवस्था आली. स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, चोळ्या घालू लागल्या, कानांच्या फाटक्या पाळ्या शिवून घेऊ लागल्या...
हे पुस्तक इंग्रजीत २०११ साली प्रकाशित झालं. ‘माझ्यानंतर कुणी अशा प्रकारचं आत्मचरित्र लिहू शकणार नाही. जग बदललं आहे.’ अशा आशयाची ओळ त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात आहे. ती वाचताना हायसं वाटतं.
पण जे. देविका यांनी त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना विचारात टाकणारी आहे. ‘खरंच दरवाजे उघडले का, किती?’ असा प्रश्न त्या प्रस्तावनेत विचारतात. ते आठवून आणि सध्याचे एकंदर वारे पाहता - थोडं भयभीतही वाटतं.
***

Antharjanam : Memoirs of a Namboodiri woman
Devaki Nilayamgode
Trans. Indira Menon, Radhika P. Menon
Oxford University Press, 2011
***

'फेसबुक'च्या पोस्टखालच्या कमेंट्स बघून काही पुरवण्या जोडाव्याशा वाटतात -
१. केरळ पुढे पुष्कळ प्रागतिक राज्य झाले, तरी नंबुद्री ब्राह्मण समाजांसारख्या काही तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये ही कर्मठ आणि संकुचित मानसिकता पार स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकून होती. त्यानंतर त्यात बदल झाला. जाती-जातींमध्ये असा असमतोल आजही दिसतोच - तोही फक्त केरळमध्ये नव्हे, सर्वत्रच.

२. तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये स्त्रियांचे स्थान कायमच दुर्लक्षित, बंदिस्त असे असते असे एक समाजशास्त्रीय निरीक्षण सांगतात. मालमत्ता अधिक, त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्याची उर्मी अधिक, त्यामुळे योनिशुचितेची चिंता अधिक - असा त्यामागचा तर्क असावा.

३. स्त्रियांना दिली जाणारी वागणूक भयावह असली, तरी त्यात फक्त नंबुद्री ब्राह्मण ही एकच जात दोषी होती असे नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबांमध्ये बालविवाहाची चाल होती, तसेच केशवपनासारखी निर्घृण चालही होती. विधवांची स्थिती भयानकच होती. बंगाली ब्राह्मणांमध्ये सती चांगलीच प्रचलित होती. त्याबद्दल काही बोलावे तितके कमीच आहे. तमिळ ब्राह्मणांमध्येही केशवपनाची चाल होती. मराठा जातींतल्या सधन-जमीनदारीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये आजही स्त्रियांची स्थिती दयनीय असते. मारवाडी समाजात, तसेच उत्तरेकडच्या उच्चजातीय समाजांमध्येही तीच परिस्थिती असते. मुस्लीम समाजातल्या स्त्रीप्रश्नांवर तर सरकारी प्रचारच चालतो. एकुणात कुणी कुणाला हसण्यासारखी परिस्थिती नाही. काही पुढे, तर काही मागे, काही आधी, तर काही नंतर. पण स्त्रीची दडपणूक या एका बाबतीत सब घोडा बारा टक्का.

४. याविषयी पुष्कळ पुस्तके आहेत. मराठीत ह. ना. आपटे, वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, ज्योतिबा फुले, आगरकर, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, ताराबाई शिंदे, साने गुरुजी, श्री. ज. जोशी अशा कितीतरी नव्या-जुन्या लोकांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल पुष्कळ लिहिले आहे. बंगालीबद्दलही तेच. मल्याळममध्ये ललितांबिका अंतर्जनम यांचे लेखन आहे. त्यावर दोन उत्तम सिनेमेही ऐंशीच्या दशकामध्ये येऊन गेले. मराठी वैचारिक निबंध आणि कादंबर्यांखेरीज, नाटकांमध्येही या विषयाचे उत्तम आणि यथासांग प्रतिबिंब पडलेले दिसते. संदर्भासाठी पाहा : मराठी नाटकाच्या तीस रात्री, खंड पहिला, मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन.

४. वरील परिचयात मी या लेखिकेने केलेल्या निसर्गविषयक, संस्कृतिविषयक निरीक्षणांबद्दल फार लिहिलेले नाही. हे लेखिकेला अन्यायकारक आहे, लिहायला हवे होते. त्यातले अन्नाच्या साठवणुकीचे तपशील, सणांमधून दिसणारे पर्यावरणाचे भान, त्यातला विलक्षण आनंदाचा भाग, नृत्य आणि गाण्यांचे - पुस्तकांतल्या गोष्टींचे आणि पुराणांचे तपशील... हे सगळे अतिशय मनोज्ञ, आनंददायक आहे.

शांत काळोखाचे तुकडे

आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच. पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणार्‍या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणार्‍या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणार्‍या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणार्‍या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वार्‍याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागिरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे, आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणार्‍या प्रकाशाच्या ओकार्‍या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा. 


दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा, जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात पाऊस कोसळू लागायचा, मे-महिन्यात घामाच्या धारा लागायच्या. पण एसीवाचून जगणं शक्य होतं.


रस्ते डांबरी होते. त्यात सिमेंटचा तोबरा भरायचा अद्याप शिल्लक होता. रस्त्यांच्या कडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे. तिथे चिकनखडे, खाजकुयली, एरंड, आणि कसलीकसली अनाम झाडंझुडपं माजलेली असायची. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा. श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे. खूप पाऊस झाला, की चाळींसमोरच्या अंगणांमधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडुळं दिसायला लागायची. लोक खडेमीठ घालून त्यांना तडफडवून मारायला धावायचे.

.

ऑफीस टाईमचे दोन-अडीच तास सोडून प्रवास केला, तर रेल्वे-बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची. स्टेशनाबाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी गिर्‍हाइकांवर नि गिर्‍हाइकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे. त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती. लोक गावी जाण्याकरता एसटीची तिकिटं काढायचे. गर्दीच्या दिवसांत त्याकरता एसटीत काम करणार्‍या कुणाचीतरी ओळख काढून ज्यादा गाड्यांची तिकिटं मिळवायचे. अर्थात, गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती. एसटीचा तेव्हा 'लाल डब्बा' झाला नव्हता, तसंच सर्विस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंगंही झाली नव्हती. तितक्या चारचाक्याच नव्हत्या. त्यामुळे निदान मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा-दीड तासात पोचता यायचं. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणा नेत्याच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं ह्या तशा क्वचित घडणार्‍या घटना होत्या.  


माघी गणपती आणि नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत. पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची. तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या. त्यातल्या कागदी पिपाण्या, पत्र्याच्या बेडक्या, वेताचे उघडमीट करणारे साप आणि धनुष्यबाण, मोठाल्या चक्र्या… हे सगळं वर्षाकाठी एखाद्दुसर्‍या वेळीच दिसायचं. रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे. रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि सोज्ज्वळ ‘रामराणा’ होता, रामरक्षेची ‘पब्लिक अ‍ॅक्टिविटी’ अद्याप व्हायची होती. 


घरोघरी लॅंडलाईन फोन आले होते. पण  बाहेरगावी फोन करायचा, तर रात्री नऊनंतर सवलतीच्या दरात बोलता यायचं, त्यामुळे तेव्हा बाहेर पडून एसटीडी बूथ गाठला जायचा. परदेशी फोनबिन अपूर्वाईचीच गोष्ट. कुणीकुणी पेजर्स लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे. मोबाईल फोन येऊ लागले होते, पण सगळी भिस्त मिस्ड कॉल्स आणि एसेमेसवर असायची. 


सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती. फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत-तडतडत आणि मागे विझत-जळलेली दारू सोडत जाते, त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या वेशीपल्याड उघडणार्‍या आणि मागे ओसाड पडत जाणार्‍या मॉल्सच्या माळेचा जन्म नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे पॉपकॉर्न्सच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या.    


ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट. काळाच्या पोटातही फार लांबची नाही बरं का, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. 


पार 'बटाट्याच्या चाळी'तलं शेवटाकडचं कढकाढू चिंतन वाटतं ना हे? आय नो. मला कल्पना आहे. हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान-छान वाटत असेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही.


आपल्या भारतीय मनाला गतकातरतेची चूष तशीही असतेच. आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोर्थोर; तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतं. या खास भारतीय घडणीचाही थोडा भाग असेल. शहरी-सवर्ण-सुशिक्षित-कमावत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे ‘भरल्या-पोटी माझं सुख दुखतंय' असंही थोडं असू शकेल. सगळंच थोडथोडं शक्य आहे, थोडं खरंही आहे. सगळं नकारात्मकच आहे, असंही नाही. निदान माझ्यासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हाती थोडा पैसा खेळू लागला आहे, बरीच वैद्यकीय प्रगती झाली आहे, जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत, त्यांनी अंतराच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, संधींची रेलचेल झालेली आहे, शिक्षणाला अनेकानेकानेक वाटा फुटल्या आहेत, परदेशगमन सोपं झालं आहे, आईबापांना त्यांच्या नोकर्‍यांच्या अखेरच्या काळात मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत. हे सगळं आहेच. 


असेलही माझी बोच निखळ स्मरणरंजनी. पण सार्वजनिक अवकाशाचं काय? माझ्या आजूबाजूचा, अवघ्या पाव शतकाच्या कालावधीत आमूलाग्र बदलून गेलेला शहरी अवकाश तर खरा आहे? तो मला भेदरवून, घुसमटवून, चिरडून टाकतो आहे. 


मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं काँक्रिटाइज झालेल्या, उजेडानं लखलखलेल्या, आवाजानं दणाणून गेलेल्या, अमानुष गर्दीनं वेढल्या गेलेल्या, रहदारीनं-सांडपाण्यानं तुंबणार्‍या आपल्या सार्वजनिक अवकाशाकडे. मी गावाकडच्या 'निसर्गरम्य' अवकाशाबद्दल बोलत नाहीय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या शहरांबद्दल बोलतेय. ती आत्ता-आत्तापर्यंत वेगवान, पण सौम्य आणि जैविक होती. ती विषम विकासानं बरबटत, अमानुष, बकाल, कृत्रिम होत गेली आहेत; दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होताहेत. 


गेल्या सहस्रकापर्यंत हडप करायला, विकायला, नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या. भूखंड लाटले जायचे. आता भूखंडच काय, साधी खेळाची मैदानं, बागा, खाड्यांकाठची कांदळवनं, आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसाखळी वागवणार्‍या पाणथळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत. पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं. शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोव्हिडकाळानं लोकांना आयती लावून दिली, त्यामुळे शुद्ध हवा हीदेखील चैनीचीच बाब झाली आहे. मग बळकावायला उरलं काय? 


आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जातायत. नाही पटत? विचार करून बघा.


बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा. कुणीही तुम्हांला जाब विचारू शकत नाही. तुमच्या भागातल्या नगरसेवकाचा उजवा हात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजी साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजवून शुभेच्छा द्यायच्यात? अवकाश तुमचाच आहे. गणपती, नवरात्र, आणि थर्टीफर्स्ट तर हक्काचेच होते. सव्वीस जानेवारी नि पंधरा ऑगस्टची देशभक्ती लाउडस्पीकरवरून 'ए मेरे वतन के लोगों' आळवल्याशिवाय पूर्वीही साजरी होत नसे. पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाईल आपल्या कानातल्या बोंड्यांपुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतं. साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक? इच्छा असो वा असो, ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असते. तेवढ्यावर थांबायची गरज नाही. घरी हळद आहे? आणवा डॉल्बीची भिंत. गल्लीत सत्यनारायण घालायचाय? बसवा भटजीला पूजा सांगायला माइकच्या बोंडक्यापाशी. सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात. होऊ द्या खर्च! शांतता आपल्याच तीर्थरूपांची आहे. 


बचाबच उजेड करा. दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत? सुमडीत रात्रीबेरात्री एखादं इंजेक्षन टोचा. महिन्या-दोन महिन्यात झाड वठून मरतंय. तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिर्‍हाईक खेचायला मोकळे. ते जमत नसेल, तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा. इतकी सोय दिलीय निसर्गानं, ती वापरा. एखादी मोठीशी इमारत पुनर्विकसनासाठी घेतलीय? त्याच्या बाहेरच्या भिंती मोठाल्या चोवीस-तास-चमकत्या जाहिरातींसाठी वापरून टाका. झगमगवून टाका रस्ते अहोरात्र. आयुष्यातला अंधार मिटवून टाका. प्रकाशाकडे चला. महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलूनचालून गाड्यांतून जाणार्‍या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठीच असतात, एरवी इतक्या रहदारीत तुंबलेलं असताना त्यांचा वेळ जायचा कसा? सगळीच्या सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका, झगमगवा. उजळून टाका आसमंत. निऑन साइन्स लावा, फ्लड लाइट्स सोडा, लेझर किरण वापरा. चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत? 


लोकांपाशी असलेला स्वस्थ वेळ हीदेखील आता एक हडपण्यायोग्य कमॉडिटी आहे. कसं करायचं हे माहितीय? प्रादेशिक भाषांमधून सिरियली आणवा तिन्हीत्रिकाळ चालणार्‍या. त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या वा आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणार्‍या असतील तर सोन्याहून पिवळं. गल्लोगल्ली दिवाळीपहाटसदृश पण शक्य तितक्या फुकट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी होऊ द्या. तसंही आपल्याला कुठे द्यायचं आहे सभागृहाचं भाडं? रस्त्यावरच तर मांडव ठोकायचा आहे. त्यातूनही वेळ उरला, तर रिअ‍ॅलिटी शोज घडवा, रील्स बनवा, सेल्फी पॉइंट बांधवा. गुडमॉर्निंगयुक्त व्हॉट्सॅप, इंस्टा-ट्विटर, फेसबुक आणि ओटीटी आहेतच. अवघा आनंदकल्लोळ उसळू द्या… 


हे औपरोधिक-अतिरंजित वाटेल. थोडं अंगावर येणारं, थोडं उगाच भीती दाखवणारंही. पण आपल्या आजूबाजूचा भवताल निरखून बघा, नि यांतलं काहीही खोटं असेल तर सांगा. 


इतक्यावर थांबणार नाही हे. असं वाटतं, हळूहळू जिथे काहीही करायचं नाहीय - ऐकाबोलायचं-लिहावाचायचं-बघानाचायचं-खायचंप्यायचं नाहीय - असे शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील. किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच. अशा परवडणार्‍या लोकांच्यात आपण असू, इतकी खातरजमा करून घेतली की झालं. मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे. 


अरुण कोलटकरांच्या कवितेतल्याप्रमाणे 'बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन’ जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे.


(लोकरंंग, लोकसत्ता, जानेवारी २०२५)

Saturday, 28 December 2024

नव्वदीच्या आगेमागे : राहून गेलेले तुकडे ०१

शहरी घरात, चाळीत नि ऑलमोस्ट झोपडपट्टीत वाढले मी. काही वर्षं तर घर बांधकाम चालू असलेल्या इमारतीतच थाटलेलं होतं, कारण बिल्डर पळून जाईल अशी भीती होती. सांगायचा मुद्दा असा की माझं लहानपण काही निसर्गरम्य वगैरे खेड्यात गेलं नाही. नि तरी मला अनेक झाडं नि फुलं ओळखीची होती.
कुंपणापाशी मेंदीची झुडपं होती. ती ओरबाडून पाला पाट्यावर वाटायचा नि हाताला बांधून झोपायचं, असा एक उद्योग असायचा. पुढे गल्लीत वड. त्याच्या फळांचा सडा रस्त्यावर पडून रस्ता लालपिवळा माखलेला असे.
चाळीत राहत असताना शेजारच्या मामीच्या पुढीलदारी जांभळाचं झाड होतं. जांभळीचं लाकूड कुचकं हो, जपून... असे इशारे देत कुणीतरी दर वर्षी तिच्यावर चढायचं, पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्यातून लोक काढण्याबिढण्या देऊ करायचे, जांभळं काढून घरोघर वाटली जायची. मामी रोज संध्याकाळी अंगणात पाण्याचा सडा मारायची. तिच्या मागीलदारी केळ नि जास्वंद नि सोनटक्का. तिच्या पलीकडे तगरीचं गचपण. नि तिच्या तळाशी दुर्वा. त्या तगरीची फुलं चाळीतले सगळे जण देवाला घालायला कायम काढत असायचे. तरी तगर कमी पडायची नाही. जांभळीच्या पलीकडच्या कोपऱ्यात कायम चिकनखडे नि खाजकुयली नि एरंड माजलेले असायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे टाचण्या नि चतुर भिरकटत असायचे कायम. माझी आगाऊ भावंडं चतुर पकडून त्यांना दोरे बांधून उडवायची. मला ते एकाच वेळी जाम शूर नि भयंकर क्रूर वाटायचं. पण माझी धाव मात्र आमच्या दारासमोरच्या बिट्टीची पिवळीधम्मक फुलं वेचून पाची बोटांत घालण्यापुरतीच. बिट्टीच्या फुलाच्या आत एकच नाजूक देखणा पराग असतो, तो काढून त्याची नथनी करायची. बिट्टीची फळंही पडायची. त्याचा गर खोट्या खोट्या कैऱ्यांचा गर म्हणून भातुकलीतलं लोणचं घालण्याकरता. आत बिट्ट्यांच्या बिया. त्या उगाच जमवून ठेवायच्या. तशाच चटक्याच्या बिया असायच्या. बहुधा पांगाऱ्याच्या. त्या फरशीवर जरा घासल्या की तापायच्या. मग त्यांनी चटका द्यायचा, हा खेळ. कारंज्याच्या बियाही मला आठवतात. त्या दाबून एकमेकांवर पिचकाऱ्या उडवण्याचा खेळ. पलीकडच्या वाडीत गणपतीचं देऊळ. मधल्या कुंपणाच्या भिंतीवर शेवाळ धरायचं पावसात. तसंच एक विशिष्ट जातीची शेवाळासारखी वनस्पतीही उगवायची. टाचणीसारखा अगदी नाजूक देठ नि त्याला पुढे घोड्याचं चिमणं तोंड असावं तसं चिमुकलं डोकं. सगळा मिळून टाचणीहून लहान हिरवागार कारभार. असे दोन घोडे दोघांनी घ्यायचे नि त्यांची डोकी एकमेकांच्यात अडकायची. कुशल खेळाडू आपल्या टाचणीनं दुसरीचं मुंडकं उडवायचा. देवळाच्या आवारात देवचाफा उर्फ पांढरा चाफा. त्याच्या फुलांना गोड वास. त्याच्या फुलांच्या अंगठ्या करून बोटांत घालायच्या. पुढच्या वाडीत चिमण्या केशरी फुलांचे गुच्छ येणारं झाड. त्या फुलांच्या देठांत अगदी थेंबभर मध असायचा. त्याचे गुच्छच्या गुच्छ तोडून एकेका फुलातला मध चुंपत बसायचं. तिथेच कोपऱ्यावर मधुमालतीचा माजलेला वेल. वेड लागल्यासारखा फुलांनी लदबदलेला असे तो. त्याच्या फुलांचे देठ लांबसडक नि चिवट. ते एकांत एक गुंफून आई त्याची सुबक वेणी करायची. त्याही फुलांना मंद आणि गोड वास. पुढे हनीसकलचा वास घेतल्यावर - काही साम्य नसूनही मला मधुमालती आठवली होती एकदम. मागीलदारी अनंताचं झाड. लहानसं. पण काय धुंद सुगंध. दर वर्षी एकदा त्याला फुलांचा वेडा बहर यायचा. मग ती फुलं काढून वाडीत सगळ्यांना थोडथोडी वाटायची. पैंच्या दाराशी सदाफुली, अबोली, आणि गुलबक्षी. पांढऱ्या सदाफुलीची पानं पाण्यात उकळून ते पाणी प्यायलं तर मधुमेहावर गुणकारी असतं म्हणे. गुलबक्षीची फुलं बघून मला कितीतरी वर्षं सोनाराकडचा कागद आठवायचा. हे खास माझ्या शहरीपणाचं लक्षण. अबोली बघून आईच्या गजरेप्रिय मनाला मोह, पण मला ती तशी ग्लॅमरहीनच वाटायची.
शाळेत येण्याजाण्याच्या रस्त्यावरही रान माजलेल्या जागा होत्या चक्क. आता आठवून अचंबा वाटतो. त्यातून चिकनखडे काढून ओढण्यांवर फेकून मारण्याचा एक खेळ.
कोकणातल्या आजोळी तर काही विचारू नका. विहिरीवरचा मोगरा, दारात बकुळ. कुंपणावर फड्ये निवडुंग. मागीलदारी जांब आणि चिकू आणि पेरू आणि पपई. पलीकडे काजू. देवळासमोर आंबा. दारातही मोठ्ठा आंबा. कवाडीपाशी फणस... असा सगळा सरंजाम. बाबांच्या माहेरी कवाडीजवळच हेs मोठं बांबूचं गचपण, अलीकडे प्राजक्त. दारचा फणस तोडला तर भाऊआजोबा कोण खवळले होते. पण गावचं वेगळंच. तिकडे अजूनही बरंच कायकाय. त्याचं मोठंसं कौतुकही नाही, तिथल्या कुणाला तर नाहीच. पण सापाकिरडाला, अंधाराला, नि एकूणच गावातल्या हिरव्याकंच वासाला भिऊन असलेल्या शहरी मला तर नाहीच नाही.
मला नवल वाटतं ते माझ्या ठार शहरी आयुष्यातल्या फुलापानांच्या श्रीमंतीचं. वाडीत सुरवंट अंगावर पडायचा कधीतरी कुणाच्या येताजाताना. मग चार तास कंड सुटून पुरेवाट. पावसात मृगाचे लाल रेशमी किडे सापडायचे, मग ते बिचारे मरेस्तो काडेपेट्यांतून कैद व्हायचे. पिवळी नि काळीपांढरी नि शेंदरी फुलपाखरं कायम दिसायची. कण्हेर असायची मागीलदारी. तिच्यावर एखादंच लाल-शेंदरी तकतकीत डौलदार फूल. मामीच्या दारात कृष्णकमळांचा वेल होता. पावसाळ्यात त्यावर फुलं आली की शाळेत जाताना केसांत घालायला म्हणून तिच्याकडून फूल आणायचं. शंभर कौरव, पाच पाण्डव, नि मधला कृष्ण. त्याचा निळाजांभळा रंग नि वास. त्या गोड वेलीवर काडमुंगळे असायचे कायम. बुचाच्या फुलांचा दिमाख मी आत्याच्या गावी बघितला. रस्त्यावर हाs सडा. अगदी माजोरड्यासारखं वाटायचं त्यावरून चालत जाणं. पण गावातल्या गावात मावशीच्या सोसायटीबाहेर हा थोरला नागचाफा. त्याच्या बुंध्यावर कायम फुलं लगडलेली नि गोडसर सुवास. त्याच्या चामड्यासारख्या जाडसर नि तरी मखमली स्पर्शाच्या, गर्दलाल पाकळ्या, आतला पिवळाधमक फणा नि शंकराची पिंड म्हणवला जाणारा परागकंद अतीव दिमाखदार वाटायचा.
आता निदान शहरांतून तरी या सगळ्याचं आयुष्यातून उच्चाटनच झालेलं दिसतं. उदास वाटतं. थोडं भयभीतही.

Friday, 20 December 2024

बुजरी गाणी ११

हे गाणं आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा - खरं तर हातवाऱ्यांचा, let's be realistic! - गाण्याच्या बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे. 

पण तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे. 

शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट. 

कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ.  अशी जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.

पडद्यावर हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.

~



चुरा के दिल मेरा गोरिया चली - २

उड़ा के निंदिया कहाँ तू चली 

पागल हुआ दीवाना हुआ 

कैसी ये दिल की लगी 

चुरा के दिल तेरा चली मैं चली 

मुझे क्या पता कहाँ मैं चली 

मंज़िल मेरी बस तू ही तू 

तेरी गली मैं चली... चुरा के दिल मेरा...

अभी तो लगे हैं चाहतों के मेले 

अभी दिल मेरा धड़कनों से खेले 

किसी मोड़ पे मैं तुमको पुकारूं 

बहाना कोई बना तो ना लोगे 

...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या है 

...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे 

...अगर बढ़ गयी है बेताबियां 

...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे 

कहता है दिल धड़कते हुए 

तुम सनम हमारे हम तुम्हारे हुए 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली...

चुरा के दिल मेरा गोरिया चली

चुरा के दिल तेरा चली मैं चली...

नही बेवफ़ा तुम ये मुझको खबर है 

बदलती रुतों से मगर मुझको डर है 

नई हसरतों की नई सेज पर तुम 

नया फूल कोई सजा तो ना लोगे 

...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है 

...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं 

...कसम मेरी खा कर इतना बता दो 

...किसी और से दिल लगा तो ना लोगे 

धीरे धीरे चोरी चोरी आके मिल 

टूट ना जाये प्यार भरा दिल 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली 

चुरा के दिल मेरा गोरिया चली 

~

गाण्याचे बोल इंटरनेटवरून ढापलेले असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.