Thursday, 16 April 2026

शहरनोंदी ०४

गर्दी ही तशी सब्जेक्टिव गोष्ट असते. बेल्जियममधून दिल्लीत प्रथमच उतरलेल्या माणसाला ’सगळा बेल्जियमच अवतरलाय की काय या विमानतळावर?’ असं वाटून भीती वाटू शकते, मग तो बेल्जियमच्या राजधानीत का राहणारा असेना. पण मुंबईतून पॅरीसला जाणार्‍या माणसाला ’खिसापाकीट जपून बरं का, चोर फार तिकडे!’ हा इशारा अगदीच बाळबोध आणि बावळट वाटतो, कारण त्याला रोजच ’जिंकू किंवा मरू’ म्हणत पाठपिशवी पोटावर बांधून लढायला निघायची सवय असते. पण दुसर्‍या महायुद्धापूर्वी मुंबईत राहिलेल्या माणसाला आज सकाळी डोंबिवली स्टेशनवर सोडा; त्याला बहुतेक नुसती गर्दी बघूनच फेफरं येईल. 


थोडक्यात, स्थळकाळाची परिमाणं बदलली की माणसं कशाला गर्दी मानतील, तेही बदलतं. पण कुठल्याही काळात असा, कुठल्याही स्थळी असा, शहर म्हटलं की गर्दीला पर्याय नसतोच. आपण मागे म्हटलं तसं निरनिराळ्या प्रकारच्या संधींनी माणसांना आकर्षून घेणारी जागा म्हणजेच शहर असतं असं म्हटल्यावर ते ओघानं आलंच. पण म्हणून ती गर्दी अमानुषच असते, असं अजिबात नाही. 


गर्दीची अनेकदा सोबत होते, आधार वाटतो. निर्मनुष्य समुद्रकिनार्‍यावर भर दुपारी एकटेच जाऊन बघा. बघता बघता अंगावर भयाचा काटा फुलू शकतो. पण भेळवाल्याची टोपली आणि थोडी पर्यटकी गर्दी आणा… तोच समुद्र कसा वत्सल-खेळकर भासतो! 


शहरातल्या गर्दीचा आणखी एक लोभस विशेष म्हणजे तिच्याकडे आधाराच्या जोडीला एका विशिष्ट प्रकारचा खांदेउडवूपणाही असतो. लंडनच्या बसमध्ये ऐन ऑफीस-टायमात तुम्ही एखादं रक्ताळलेलं मुंडकं जरी काखोटीला मारून हिंडलात, तरी लोक फार तर फार भिवया उंचावतील, पण तुमच्या भानगडीत नाक खुपसणार नाहीत, असं एका अतिशयोक्त विनोदात म्हटलंय. त्यात किंचित का होईना, तथ्य आहेच. शहरं माणसांना एक अनोळख बहाल करतात. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य म्हणून शहरांना मान्य असतं, म्हणून नव्हे बरं का, उगाच भलता गोड समज नको! पण तिथल्या कुणालाच तुमच्या फाटक्यात पाय घालायला वेळ नसतो, ताकदही नसते. भल्या सकाळी लोकलच्या रुळांवर जीव देणार्‍या कुण्या अभागी जिवाबद्दल लोकांना सहानुभूती नसते असं नाही. पण घड्याळाला बांधलेली त्यांची आयुष्यं त्यांच्या ओठांवर एक कोरडा ’प्च’ तेवढा आणतात. इथे उदय प्रकाश यांच्या ’तिरिछ’ कथेची आठवण होते. त्या कथेत गावात प्रतिष्ठित असलेली एक व्यक्ती कामासाठी शहरात येते आणि एका विषारी प्राण्याच्या दंशामुळे एकाकी अवस्थेत भयावहरीत्या मरून जाते. लेखकानं त्या कथेतून आधुनिक शहरी चंगळवादी अवकाशाबद्दल काही अतिशय अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत, यात वादच नाही. पण त्या कथेच्या नायकपदी पितृसत्तेमध्ये प्रतिष्ठेचं स्थान असलेला एक प्रौढ पुरुष आहे, हीच एक अतिशय बोलकी गोष्ट आहे. सतत भावकीच्या नि गावकीच्या नजरांना जाब देण्याचं बंधन बाळगून दमलेल्या एखाद्या स्त्रीला विचारा शहरातल्या तुटक स्वातंत्र्याची किंमत. ती बहुतेक तुम्हांला उदय प्रकाशांपेक्षा वेगळं काहीतरी सांगेल.


शहरव्यवस्थापनयंत्रणांना गर्दी हवीही असते आणि नकोही. कारण माणसं नसतील, तर शहरं शहरं कशी बरं ठरतील? कुणाच्या बळावर चालतील? कुणाच्या जिवावर रंगीबेरंगी, आकर्षक, जिवंत, लोभस होतील? अव्याहत येणारी माणसं हवीतच. पण ती सुरळीत शिस्तशीर नांदूनही हवी असतात. नाहीतर मुंबईतल्या परळ स्टेशनात एका दुर्दैवी दसर्‍याच्या आदल्या दिवशी अवतरली आणि बावीस लोकांचा बळी घेऊन गेली, तशी जीवघेणी काळरात्र अवतरते. 


शहरातली माणसं मात्र याला हसत हसत ’स्पिरिट’ असं म्हणतात आणि पुन्हा धावू लागतात. हसावं की रडावं? कळेनासं होतं खरं.


लोकमत, १७ फेब्रुवारी २०२६

No comments:

Post a Comment