‘नेटफ्लिक्स’चा सी०ई०ओ० रीड हास्टिंग्स म्हणाला होता, माझी स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे. तशी शहरांची स्पर्धा माणसांच्या झोपेशी, स्वास्थ्याशी, निवांतपणाशी असते असं म्हटलं तर ते फारसं खोटं ठरणार नाही. शहरं अहर्निश धावत असतात. का बरं?
साधं गणित आहे. एका विशिष्ट कालावकाशात एकूण किती गोष्टी घडतात, यावर वेग ठरतो. मर्यादित अवकाश, जास्त गोष्टी, वेग जास्त. मर्यादित अवकाश, कमी गोष्टी, वेग कमी. गुलजारनं लिहिलेलं ‘छोटे छोटे शहरों से, खाली बोअर दुपहरों से’ हे गाणं आठवतं का? शहरं म्हटलं असलं, तरी ती ‘छोटी’ आहेत. काल गावं असलेली, परवा मोठी शहरं होऊ घातलेली. त्यात करण्याजोग्या गोष्टी एकरेषीय नि मर्यादित आहेत. जगण्याचा वेग संथ आहे. त्यामुळे तिथल्या दुपारी रिकाम्या नि कंटाळवाण्या आहेत! पण शहरांचं तसं नाही. गावांच्या तुलनेनं शहरांच्या अवकाशात खूपच जास्त गोष्टी कोंबलेल्या असतात, आणि त्याही सतत आणि चढत्या वेगानं वाढत असतात. माणसं, पर्याय, कामं, संधी... सगळंच. मुंबईत माणसांच्या मनगटांना घड्याळं बांधलेली नसून घड्याळांच्या पट्ट्यांनी माणसं बांधलेली असतात, असं पुलं म्हणाले होते. आता घड्याळांच्या जागी मोबाईलचा पडदा आला आहे, इतकंच काय तो फरक. वेग मात्र तसाच, ‘वाढता वाढता वाढे...’
या वेगाचं प्रतिबिंब शहराच्या सगळ्या गुणधर्मांमध्ये पडलेलं दिसतं. ‘टाइम इज मनी’ हे शहराचं घोषवाक्य असतं. प्रवासाला अनेकानेक पर्याय असतात. त्यांची वारंवारिता आणि वेगही जास्त असते. ‘आठ बावीस’ चुकल्यामुळे आणि पुढची आख्खी दोन मिनिटं गाडी नसल्यामुळे हळहळणाऱ्या चाकरमान्याचं दुःख एखाद्या गावकऱ्याला कळूच शकत नाही, यामागे त्या दोघांच्या स्वभावांतला फरक नसून त्यांच्या राहत्या ठिकाणांमधला फरक असतो. शहरात झटपटपणाला मोठीच किंमत असते. रस्त्याकडेला मिळणारे पदार्थही तसेच. पोषणमूल्यं थोडी कमी असतील तरी पदार्थ चटकन होणारा, उभ्या उभ्या खाता येईलसा हवा! शहरांमध्ये फॅशन्स आणि तंत्रज्ञानंही भराभर अवतरतात, भराभर मावळूनही जातात. शहरांच्या मध्यवर्ती भागात आलं की पावलं नकळत त्या लयीशी जुळवून घेतात. आसमंतात ऊर्जाच तितकी असते. झगमगणारे दिवे, भुलवणाऱ्या जाहिराती, संगीतापासून विक्रेत्यांच्या आरोळ्यांपर्यंत आणि हॉर्नच्या कर्णकटू आवाजांपासून दस्तुरखुद्द गर्दीच्या ‘बझ’पर्यंत अनेकानेक आवाज नि वास. पदार्थांचे खमंग वास, गजरेवालीकडच्या मोगऱ्याचा नाजूक गंध, पेट्रोलपंपावरचा उग्र-तीक्ष्ण वास, हवेतला धूर नि धूळ, नि या सगळ्याला बकालीच्या दुर्गंधीचं छुपं अस्तर. उत्तेजना जागवणारे कितीतरी घटक शहरात एकसमयावच्छेदेकरून नांदत असतात.
त्यात आर्थिक-सामाजिक-राजकीय संस्था, कार्यक्रम, कामकाज, इत्यादींची भर घाला. ही पर्यायांची वर्तुळं आणि त्यावर स्वार झालेली माणसं एकमेकांना छेद देत, एकमेकांच्या हातात हात गुंफत वेगानं गरगरू लागतात.
या वेगाचा संबंध लोकसंख्येच्या घनतेशी असतो. लोकसंख्या दुप्पट झाली की जगण्याचा वेग साधारण १२ टक्क्यांनी वाढतो. गेल्या साठेक वर्षांत भारतातली शहरं जवळ जवळ दुपटीनं वाढली आहेत, तर लोकसंख्या साधारणपणे तिपटीनं वाढली आहे. याचा आपल्या जगण्याच्या वेगावर परिणाम झाला नसेल, असं कसं शक्य आहे? वेग वाढणारच!
आपली शहरं प्रचंड वेगानं जगू लागली आहेत. ती तर झोपतही नाहीत. मग त्यांना लागणारी ऊर्जा ती घेतात कुठून? अर्थात, आपल्याकडून! शहरं अक्षरशः आपला निवांतपणा, झोप, स्वास्थ्य शोषून वाढतात. आपण हे सगळं शहरांना का वोपतो? कधी थबकून विचार केला आहात? किंवा, तितकी सवड मिळालीय का तुम्हांला कधी?!
लोकमत, २८ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment