शहराचं शहरपण कशात असतं? एकच एक उत्तर देणं कठीण आहे. पण आपण हिशेब मांडून बघू.
सर्वप्रथम प्रगत वैद्यकीय सुविधा. सुसज्ज रुग्णालयं आणि निष्णात डॉक्टर्स मोठ्या शहरांमध्ये सहजी उपलब्ध होतात, हे खरंच. तेच उच्चशिक्षणाच्या पर्यायांचं आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचं. बरोबरीनं जगभरातल्या उत्तमोत्तम वस्तूंचे स्वस्त-महाग पर्याय देत लुभावणारे बाजार. नुसत्या वस्तूंनी भागलं नाही, आर्थिक उलाढाली करणारे शेअरबाजार नि वित्तसंस्थाही. झालंच तर; सिनेमे, नाटकं, संगीताच्या मैफिली, क्लब्स-पब्स, लायब्रर्या, मुलाखती, चर्चासत्रं… अशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. शहर म्हटलं की हे सगळं आलंच. पण त्याहीआधी पोट भरण्याच्या संधींचा सुकाळ हवा. त्यासाठी उद्योगधंदे आणि नोकर्या हव्यात. कष्टकर्याच्या पोटाला अर्धी भाकर तरी मिळण्याची हमी हवी. त्याकरता तर लोक हक्काची आणि मायेची जागा सोडून शहरांच्या आसर्याला येतात. त्यामुळे सगळ्यांत आधी संधी हव्यात.
ठीक. पण तितक्यानं थाटतं का शहर?
डोक्यावर लहानसं का होईना, पण छप्पर हवं. म्हणजे स्वस्त नव्हेत, पण परवडण्याजोगी; कामाच्या ठिकाणाला लागून नव्हेत, पण प्रवास करून तरी वापरता येतीलशी घरं हवीत. त्यापाठोपाठ घरपोच पाणी पोचवणारी नळयंत्रणा आणि विजेची सोयही. प्रवास? सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसेल, तर परवडण्याजोगं दळणवळण व्हावं कसं? बसचं, रेल्वे-ट्राम-मेट्रोचं जाळं हवं. त्याला पूरक रिक्षा, टॅक्स्या, टमटम हव्यात. तिन्हीत्रिकाळ कामाच्या ठिकाणी पोचायचं, म्हणजे बाहेर खाण्यापिण्याची सोयही हवीच. म्हणजे फेरीवाल्यांपासून पंचतारांकित हॉटेलांपर्यंत आणि उडप्यांपासून पोळीभाजीकेंद्रांपर्यंत सगळे पर्याय आलेच. बरं, सुरक्षितता हवी. म्हणजे रात्रभर दिव्यांनी उजळलेले सार्वजनिक अवकाश हवेत, तशीच दक्ष आणि मदतीला तत्पर पोलीसयंत्रणाही हवीच.
हे सगळंही आलं, म्हणू. पण तितक्यानं तरी नांदू लागतं का शहर? या सगळ्या भौतिक पसार्यात वावरून वर दशांगुळं उरणारं आणि चिमटीत पकडता न येणारं काहीतरी असतं शहरात. होय की नाही? ते काय असतं? ’कधीही न झोपणारं शहर’ किंवा ’स्पिरिट पाहा, पावसानं इतकं झोडलंय, तरी दुसर्या दिवशी लोकल्स भरून वाहतायत!’ असं आपण मुंबईबद्दल म्हणतो, तेव्हा आपण कुणाबद्दल बोलत असतो? ’जो माणूस लंडनला कंटाळला, तो जगण्याला कंटाळला’ असं सॅम्युएल जॉन्सन लंडनबद्दल म्हणून गेला आहे, तो कशामुळे?
त्यामागे दुसरं-तिसरं कुणीही नसून तुम्ही-आम्ही-आपण असतो. भरमसाठ पैसे देऊन इंच-इंच जागा विकत घेण्याची स्वप्नं बघणारे, रोजीरोटीमागे धावून रात्री घरी परतणारे, बस-ट्रेनच्या गर्दीत गुदमरणारे, दमलो तरी शुक्रवारी रात्री उशिराचा शो बघणारे, रिक्षावाल्यांशी भांडणारे आणि चर्चाही करणारे, लॉंग वीकेंडला ट्रॅफिक कमी झाल्यामुळे खुशालणारे, नाक्यानाक्यावरच्या मांडवांनी आणि मोर्च्यांनी कातावणारे, स्टेशनवरच्या गर्दीत आपली भाजीवाली म्हातारी हेरून तिच्याशी एक मूक नातं जोडून असणारे… जातपातधर्मप्रांत न बघता वेळेला सहप्रवाशांच्या आणि शेजार्यांच्या मदतीला धावणारे तुम्ही-आम्ही-आपण - कॉस्मोपॉलिटन आपण.
आपण आपापल्या शहराला नुसतं व्यक्तिमत्त्वच बहाल करतो असं नव्हे, तर अक्षरशः आपली ऊर्जा वोपून त्याच्यात प्राण फुंकत असतो. शहरं ही ऊर्जा पिऊन घेतात, ढेकरही न देता दिसामासांनी बिनबोभाट वाढत राहतात… त्या बदल्यात ती आपल्याला काय देतात? या लेखात आपण ज्या अत्यावश्यक सोयींची यादी केली, त्या तरी ती आपल्याला देऊ करतात का? जरा थबकून अदमास घ्या. जर उत्तर नकारार्थी असेल, तर आपल्या शहराचं शहरपण शाबूत आहे असं म्हणायचं का?
लोकमत, ३ फेब्रुवारी २०२६
No comments:
Post a Comment