Thursday, 19 July 2007

तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

(शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.)

"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता!

तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली गेली नव्हती, नाही. तसंच त्याचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ही खात्रीही.

तर... हे काही प्रश्न मित्राला -

खरं आहे. काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य करायला हवंय.

पण ’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ म्हणजे नक्की काय रे? त्याच्या व्याख्या केल्या आहेस का तू तुझ्यापाशी नक्की? उदाहरणार्थ अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण म्हणजे मोठ्ठं? (हे फारच ढोबळ झालं नाही?! बरं, आपण जरा वेगळ्या शब्दांत मांडू - ) अमुक इतक्या माणसांच्या आयुष्याला आकार देण्याची ताकद मिळाली म्हणजे मोठ्ठं? किंवा अमुक इतके पैसे कमवले आणि उर्वरित आयुष्य अधिकाधिक मिळवत राहण्याची बेगमी केली म्हणजे मोठ्ठं? किंवा जगातल्या अमुक इतक्या ठिकाणी आपलं नाव छापून आलं, आपण अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? याआधी कुणीच न केलेलं काही आपल्या हातून घडलं म्हणजे मोठ्ठं?

काय? मोठ्ठं म्हणजे नक्की काय?

खरं सांगू? हे निकष नाहीतच एखादी गोष्ट ग्रॅण्ड असण्याचे. मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस ठरू शकते. आणि जगाच्या लेखी कितीही क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते.

माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे...
माझ्या टीचभर आयुष्यातलं काय काय पणाला लागतं आहे...
मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
It matters...

हां, आपल्याला खुणावणारे असले खेळ शोधायलाच लागतात आयुष्यात. त्यातून सुटका नसते. ते शोधण्याचे रस्ते, त्यातल्या अडचणी, पुन्हा पुन्हा घेरत राहणारी निराशा आणि तिला वारत पुढे चालत राहण्याची आपली मस्ती... मिळेल... पुढच्या वळणावर असेल... असे स्वत:ला समजावताना येणारे वैफल्य आणि स्वत:च्या शहाणपणाबद्दल येणार्‍या रास्त शंका... हे सगळे अपरिहार्यच.

’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ या गोष्टीच्या व्याख्या मात्र आपल्या आपण ठरवायच्या.
आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा.

What say?

Thursday, 5 July 2007

दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय...

Friday, 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...

Saturday, 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

Monday, 14 May 2007

रिश्तोंकी परछाईयाँ...

"भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!"

"हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही."

असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग पाय मोडला म्हणून; साहेब जवळ जवळ चार महिने रजेवरच होते. नंतरच आमची जरा जरा ओळख व्हायला लागली. संध्याकाळी फारच वैतागला तर गप्पा मारायला म्हणून येत असे तो माझ्या डेस्कजवळ. कॉलेजमधली मस्ती, फिल्म फेस्टिवल, नाटकं, संदीप, कंटाळा.... असल्या कसल्याही गप्पा. मग हळूहळू त्याचं एखादं वाक्यं नकळत डोक्यात राहून जायला लागलं.

”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?"

"शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते माहीत नाही, असंच झालंय ना ’आपलं’?"

"मग? पुढे काय शिकायचा विचार आहे ’आपला’? हे टीचर्स ट्रेनिंग का काय ते ’आपण’ नाही करणारे का?"

हा ’आपण’चा खास वापर - समोरच्याला ऑफ गार्ड पकडणारा. ही त्याची खास लकब लक्षात यायला लागली, तेव्हाच त्याला ’हॅपी गो लकी’ म्हणून टाईपकास्ट करायचं मी बंद केलं असावं. निमित्त त्याचं झालं. पण मग आजूबाजूची सगळीच, मी द्विमित म्हणून फुली मारून टाकलेली, माणसं माझ्या लेखी हळूहळू त्रिमित व्हायला लागली ती त्याच सुमारास.

सतत पॅटर्नल वागून समोरच्याला पंखाखाली घेऊ पाहणारा एक मित्र. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून त्याच्या आक्रमक पालकत्वाचा राग येऊ न देता त्यातली फक्त आस्था तेवढी उचलायला शिकत होते. मात्र त्यातही त्याचं समोरच्या माणसाबद्दलचे आडाखे बांधणं थांबत नाही हे जाणवलं तेव्हा मला ’जग उफराटं आहे’ असा धक्कादायक साक्षात्कार झाल्याचा आठवतो...!

नवीन काहीही करा-शिकायचा प्रचंड उत्साह असलेला एक मित्र. त्याचं फ़्रस्टेशन आणि ’क्या यार, कम से कम सपने तो बडे देखने चाहिये...तभी तो कुछ कर सकते हैं..’मधून लख्ख दिसणारा त्याचा निरागस स्वप्नाळूपणा. तो पाहूनच मी माझ्या निष्क्रिय कडवटपणाला दटावायला लागले नकळत.

जाड भिंगांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचे ’बाळू’छाप निरागस भाव घेऊन असलेला एक मित्र. बोलता बोलता कधी विकेट काढेल याचा काही नेम नाही मात्र. ऐकणारा पार गारच.

पुरुष हा विषय आयुष्यातून एका समंजस शहाणपणाने बंद करूनही कडवट न झालेली एक मैत्रीण...

इतक्या सरळपणे - खरं तर मूर्ख म्हणावं इतक्या सरळपणे - वागून इतकी वर्षं कसे टिकले असतील इथे, असं आश्चर्य मला नेहमी वाटायला लावणारे फिलॉसॉफर बॉस...

ज्याला पाहून मला न चुकता दर वेळी भारत सासणेंच्या ’रंगराजाचा अजगर’ या कथेची आठवण येते, असली राजकारणं खेळणारा एक टीम लीडर. पण तशीच त्याची अंगावर घेतलेले पंगे एन्जॉय करत निभावून नेण्याची खुजलीही....

ही आणि अशी कितीतरी माणसं. जिवंत. आपापला इतिहास-भूगोल घेऊन येणारी. माझ्या असण्यावर रिऍक्ट होणारी. मला रिऍक्ट व्हायला भाग पाडणारी. एकाच वेळी प्रेमळपणे काही देऊ करणारी आणि त्याच वेळी आपल्या निखळ स्वार्थानं मला चकित करून टाकणारी...

त्यांच्या असण्याचं भान मला त्यानं पुरवलं. त्याचा तसा उद्देश होता असं अजिबातच नव्हे. कदाचित त्याचा अंगभूत चांगुलपणा असेल किंवा स्वत:चा अहंकार सुखावण्याची गरजही. किंवा दोन्ही. किंवा या दोन्हीबरोबर कुठेतरी काठ शोधायची माझी आत्ताची गरज.

काहीतरी झालं खरं.

म्हणूनच परवा तो बोलता बोलता सहज बोलून गेला ते वाक्य तेव्हा मी चमकले.

" तुला असं नाही वाटत मी बरेच दिवस तुझ्याशी बोलून या सगळ्याची तयारी करून घेतोय...? It's time to get married..."

म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली...

आणि मग कळलंच मला एकदम - इतके दिवस या माणसांना खोटी खोटी, आपल्या आयुष्यात नसलेली, निव्वळ सोईपुरती माणसं समजत होतो आपण. ते तसं नाहीय.

One can't afford to treat the world like a lifeless thing. It's a whole, live, throbbing life... react to it.

Thanks friend, for making me see it. Thanks.

Wednesday, 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’

Friday, 27 April 2007

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग...

शिल्पा आणि रिचर्ड गिअर यांच्यावरून आपल्याकडे जे रामायण चाललंय, त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करणं म्हणजे येडेपणाच आहे.

पण विंदांच्या खास शैलीतली ही कविता मात्र आठवतेय. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती आठवताना काही औरच मजा येतेय!

विंदा म्हणतात -

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग,
अन्‌ आत्म्याच्या देव्हाऱ्यातुन गंध मधुर दरवळला ग

आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग,
आज सखे मज नकळत अलगज गाठ जिवाची सुटली ग

आगांतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग,
आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली ग

चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग,
विश्वफुलातिल पिवळे केंसर, खुणा तयाच्या कळल्या ग...

- विंदा करंदीकर
’मृद्गंध’

Sunday, 22 April 2007

अखियोंके पानीमें रखना वो चिठियाँ ...

काही पत्रं लिहिली जातात, पण इच्छित मुक्कामी पोचतातच असं नाही. कधी पोचतात, पण वाचणाऱ्यापर्यंत पोचतात असं नाही. ही अशीच काही पत्रं. अर्ध्यात राहिलेली.

एक काळ असाही होता, जेव्हा तुला फोन करावा, तुझा फोन यावा असं सतत वाटत असे. आता तसं असत नाही. आपण हल्ली एकमेकांना लिहितोही क्वचित. नुसती भांडणं करण्यापेक्षा नकोच ते, असं वाटून थांबलो का आपण? माहीत नाही.

आपण भेटतो तेव्हाही काही हिशोबांची परतफेडच तर करायची असते फक्त. अपेक्षा असतात. अपेक्षाभंग असतात. मग वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलणं असतं; नाही तर ओठ आवळून गप्प बसणं तरी असतं. प्रश्न असतात... असंच करायचं आहे का आयुष्यभर? याचसाठी केला होता अट्टाहास?
उत्तरं नसतातच.मग अजून भांडणं, चिडचिड, त्रागा, वैताग ...

खरोखर तुला नाही या साऱ्याचा त्रास होत? की तू इतका विचारच करत नाहीस या साऱ्याचा? तू खरोखरच मला गृहित तर धरून चाललेला नाहीस ना?
मलाच कितीतरी वेळा प्रश्न पडतो, का कुणाला तरी हवं असावं मी? तुला इरिटेट होईल इतक्या वेळा हा प्रश्न मी तुला विचारलेला आहे. होय ना? पण तो मला खरोखरच सतावतो. वाटतं, या मुलाने आपल्या असण्यात फक्त सोय तर नाही ना पहिलेली?
हा तुझ्यावर अन्याय असेलही कदाचित. पण तसा तो व्हायला माझ्याइतकाच तूही कारणीभूत आहेस मित्रा. तुझ्या आयुष्याबद्दल काय ठाऊक आहे मला?
तुझा जन्मदिवस, पत्ता, कुटुंबीयांचे तपशील, रंग-वजन-उंची-पगार हे सारे तपशील कदाचित सांगू शकेन मी. पण एकमेकांशी जोडलं जाणं इतकंच असतं फक्त? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगता येणं शक्य नाही आणि तुला सांगितल्याशिवाय ज्याची पूर्तताही व्हायची नाही असं काहीतरी माझ्यापाशी असतं. आपण एकमेकांना हा मान, ही जवळीक देऊ करतो तेव्हा इतर कसल्याही तपशिलांनी येणार नाही इतके जवळ येतो. असा एकच क्षण येऊन पुरत नाही. त्या एका क्षणानं खूण पटेल कदाचित एकमेकांची. पण तिथेच थांबत नाही ते. अशा एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत, दुसऱ्यापसून तिसऱ्यापर्यंत ... असे असंख्य प्रवास करायचे असतात.

Am I sounding too romantic or filmy? May be...

हे इतकं बटबटीत आणि फिल्मी वाटत असेल तर मग माझी तोकडी भाषाच त्याला कारणीभूत आहे.
मी मागेही एकदा तुला लिहिलं होतं - कधी कधी सध्या, रोजच्या बोलण्यातून सूर जुळत जतात. समोरचा माणूस जे बोलत असतो, ते आणि तेवढंच बोलत नसतो तो. ऐकू न येणारं, पण जाणवू शकणारं असंही बरंच काही असतं. ते ऐकू यायला लागतं - पटतं, तेव्हा तर आपण अधिकाधिक मोकळे होत जातो.
कधी कधी मात्र असे सूर नाहीच जुळत. किती वचावचा बडबड केली, तरी आपण तस्से कोरडेच राहतो.
अलीकडे मला हे फार जाणवतं. तुझ्या असण्याबद्दल मनातून आनंद- आनंद नाही दाटून येत. आपण एखादी बिझिनेस मीटिंग आटपावी, तसे भेटतो. चार पुस्तकांबद्दल चार ताशेरे झाडतो, दोन टोमणे मारतो, आणि आपापल्या वाटेने चालते होतो.

इतकंच
असायचं होतं का या साऱ्याचं आयुष्य? इतकंच मिळायचं होतं आपल्याला एकमेकांकडून?

माझ्याकडे उत्तरं नाहीत मुला. मला त्रास देणारे प्रश्न मी संगतवार मांडायचा प्रयत्न करते आहे फक्त. मी फार कोरडी आहे स्वभावानं. तुझ्या-माझ्या नात्यात तर फारच. आपल्याकडून कुठून कसल्या प्रेमा-मायेचा अंशही निसटता कामा नये, म्हणून स्वत:वर पहारा देत असल्यासारखी वागते मी. तसेच स्पर्शाबाबतचे माझे संकोच...

या साऱ्याला मी काहीच करू शकत नाही मुला. मी अशी अशी आहे, इतकंच म्हणता येतं फक्त. म्हणून का तू असा रेषा आखून दिल्यासारखा बाहेरचाच झालास?

परवा संध्याकाळी सैरभैर झाल्यासारखी झाले होते मी. उगाच रडायला येत होत. सिनेमा पाहताना मॅडसारखं एकटीनंच रडून घेतलं मी. कारण? ठाऊक नाही. वाटत होतं, किती मोठी मोठी स्वप्नं पाहतो आपण.. आणि प्रत्यक्षात मात्र हातात काहीच मिळत नाही. जेमतेम भाकर तुकडा मिळवण्याचे हिशेब, अजून पैसे मिळवण्याचे काटेकोर क्षुद्र बेत.. घर नि दार... हे काय होऊन बसलंय... असे काहीतरी निराशावादी विचार. आता नवे बेत करायचं वय सरत चालल्याची घाबरवून टाकणारी जाणीव. 'सामान्यपण’ स्वीकारणं फार जड जात होतं...

त्या क्षणी मला इतकं प्रचंड एकटं वाटलं -
आपल्याला जिथे तुटतं आहे, ते कुणालाच - दुसऱ्या कुणालाच - सांगून समजणार नाही अशी भयानक खात्री माझी मलाच. आणि त्याचंही वाईट वाटतंच आहे...
ब्रह्मांड अनुभवलं.

पण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.

हे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.

का रे हे असं होऊन बसलं?
की हे असंच असायचं असतं?
इतकंच?

Tuesday, 6 March 2007

All the best

Hi!

Ajoon maraaTheet (pakshee: dewanaagareet) kasa lihaayacha yaach muddyaawar JhaTaapaT chaalalelee asalyaamuLe kaahee lihiNa jamalelach naahee!

pan aapaN kaaheehee lihoo shakato aaNi te waachaNyaasaaThee khula asat, hee kalpanaach muLat bhannaaT aakarshak aahe. patrahee navhe aaNi Daayareehee.. wow...

haataat kurhaaD tar miLaleey. aataa kuThalee bichaaree zaaD marataat, te paahaayach! All the best!!!

Thursday, 8 February 2007

उपाशी माणसाचे मनोगत

खूप दिवसांच्या उपाशी माणसाला अन्न मिळाल्यावर त्याला नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळेनासे होते. माझे नेमके तसेच झाले आहे. भानावर येऊन अन्नाची नीट चव कळू लागायला आणि दाद देत मनापासून जेवायला काही काळ जावा लागेल!!!