त्याचं
सहज वावरणं, अभिनय न भासणारा अभिनय त्याच्या रूपापुढे झाकोळून गेल्याची जी भावना
शशी कपूरच्या जाण्यानं सर्वत्र व्यक्त झाली, तिनं मी दचकले. ऋषी कपूर हा माझा फार
लाडका नट. त्याच्या कामाबद्दल आपण कधीच काही बोलत नाही हा माझा जुना सल. आता तोही
व्यक्त करायला आपण त्याच्या जाण्याची वाट बघत बसणार का काय, असं
मनात येऊन दचकायला झालं. म्हणून -
'दामिनी' आठवतो संतोषीचा? निरनिराळ्या कारणांनी चर्चा होते
त्यावर. घणाघाती संवाद, मीनाक्षीचा भावखाऊ अभिनय,
बलात्कारित
महिलेवर व्यवस्थेकडून होणारा अन्याय, सिनेमाचं तत्कालीन बोल्डपण... पण ऋषी
कपूरबद्दल कुणीच बोलत नाही. काय सहज, बोलका वावर आहे त्याचा त्यात.
सुरुवातीची उत्साही, तरुण, दामिनीकडे ओढ घेणारी देहबोली; आणि
पुढे घरातल्या परिस्थितीपुढे हळूहळू खचत, शरमत, निराश होत जाणं; प्रतिष्ठा
आणि मूल्य यांतल्या द्वंद्वात अनिश्चित होत जाणं; आणि शेवटी कोर्टातल्या प्रसंगात
"मैं कसूरवार हूं, गुनहगार हूं." या निःसंदिग्ध, ठाम
कबुलीपर्यंत पोचणं... काय प्रवास रेखाटलाय या इसमानं! झुकते खांदे, विझलेले
डोळे ते थेट सनीसारख्या सांडावर गुरकावण्याची हिंमत राखणारा संताप, दामिनीबद्दलच्या
प्रेमातून आलेला. पार्श्वभूमीला सतत त्याची श्रीमंत, उच्चभ्रू, क्लासी अकड. कमीजास्त होत राहणारी, पण सतत
असलेली.
मी दर
वेळी या व्हर्ल्नरेबल माणसाच्या प्रेमात पडते सिनेमा बघताना. अशा किती भूमिका
सांगाव्यात? त्याच्या गुलाबी-गोऱ्या गाजरकायेपल्याड जिवंत,
निमिषार्धात
झर्रकन भाव पालटणारा, अभिनयाचा वासही येऊ न देता सहज अभिनय करणारा एक
जातिवंत नट कायम दडलेला दिसतो. खाडकन दर्शन देऊन चकित करतो आणि पुन्हा आपल्या
चिकण्या चेहऱ्याआड लुप्त होतो.
त्यानेच
कुठल्याशा नृत्याच्या कार्यक्रमात म्हटलं होतं मागे,
"नाच काही फक्त
हातापायांनी करायचा नसतो. चेहराही नाचात सामील असला पाहिजे..." किती खरंय हे
या माणसाच्या बाबतीत! नव्वदीतल्या कितीतरी नृत्यगीतांमधला ऋषी कपूरचा चेहरा मिटवून
पाहा, गाण्याचं
काय होतं ते. गाण्यातली जान निघून, विझून जाते क्षणार्धात!
आपल्या
सेकंड इनिंगमध्ये सुदैवानं ऋषीला चिकणेपणापलीकडे जाणाऱ्या भूमिका मिळताहेत. पण
म्हणून त्याच्या ऐन देखणेपणातल्या कारकिर्दीवर अन्याय होता नये. शेवटी 'नटसम्राट'सदृश
भावखाऊ व्यक्तिरेखांमध्ये अभिनय करतातच भले भले नट. पण ज्या भूमिकांत अभिनयाला भाव
खाण्याची अजिबात संधी नसते अशा साध्यासरळ नाचगाणी-पळापळी कामांत वावरूनही
आपल्यातला नट जपलेल्या ऋषीला सलाम. वेळ निघून जाण्यापूर्वी...
(शशी कपूर गेल्यानंतर लिहिलेली पोस्ट. आता ऋषी कपूरही गेलाच. :()
फारच छान लेख. त्याचा खोज नावाचा एक अप्रतिम चित्रपट आहे. फारसा कोणाला माहिती नाही.
ReplyDeleteहॉय!
ReplyDelete