कणेकरांच्या ‘फिल्लमबाजी’मध्ये एक पुचाट, सेक्सिस्ट न-विनोद असायचा. बायकोला सिनेमाला ‘नेणे’ आणि मग ‘हव्या तितक्या
साड्या बघ, मागू नकोस!’ असं म्हणणे. माझ्या शाळकरी वयातही मला त्यात काही विनोदी
वाटलं नव्हतं. भिवई वर गेली होती. पण ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या श्रीदेवीच्या एक
से एक साड्या बघताना अधूनमधून सतत सिनेमाच्या संहितेचा काठ सोडून मी ‘आयला, ही किती भारीय!’छापाची वळणं घेत
होते, तेव्हा मला चाटून गेलेल्या शरमेमुळे मला तो न-विनोद आठवला. सिनेमामधल्या
वेशभूषा (नि केशभूषा नि रंगभूषा) नोंदणं याला कायम थिल्लरपणाचे आणि अक्कलवान
पुरुषांपेक्षा त्यात काहीतरी कमी दर्जाचं असल्याचे रंग फासलेले असतात नि माझ्या
नकळत मी तो संस्कार आत्मसात केला आहे, याचा तो पहिला साक्षात्कार. मग यथाशक्ती तो
संस्कार उचकटून फेकणं आलंच. पण मुळात तो होता, हेही कमी धक्कादायक
नव्हतं.
तर – श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या साड्या. सुती, पारंपरिक प्रकारांच्या, कमालीच्या साध्या, आबदार नि देखण्या साड्या होत्या त्या. ती आख्ख्या सिनेमात एकदाच तिचा पदर पिनप न करता, मोठ्ठाल्या फुलांच्या, नि झुळझुळत्या, सुट्या, धावत्या पदराची साडी नेसलेली दाखवली आहे. तिच्या वर्गातल्या फ्रेंच मित्राच्या मोहात ती असल्याचं तिच्या लक्ष्यात येतं त्या दिवशी. पुन्हा ‘इंग्लिश विंग्लिश’ बघताना हा बारकावा मी नोंदला, तेव्हा मी गौरी शिंदेला मनोमन दाद दिली होती.
‘स्वदेस’मध्ये शारुखने घातलेले फॉर्मल पूर्ण हातांचे शर्ट्सही मला फार आवडले होते. त्याचं चाकोरीबद्ध, उच्चभ्रू नि पांढरपेशं, नि तरी अकडबाज व्यक्तिमत्त्व त्यात खुलून दिसलं होतं. गायत्री जोशीच्या वर्गात ती फळा पुसत असताना, तिथे असलेल्या शारूखच्या मागे सारलेल्या बाह्यांमधून त्याच्या कोपरावरची खळी दिसते. एरवी शारूखच्या इंटेन्स डोळ्यांखेरीज काहीही न आवडणार्या मला मीच नोंदलेला तो तपशील थक्क करून गेला.
‘सपने’मधली काजोल एरवीही कमाल ताजीतवानी, सौंदर्याच्या रूढ कल्पनांना धुडकावून लावत देखणेपण वागवणारी दिसते. पण ‘हूं लालाल्ला’मध्ये तिनं घातलेला तो काळ्या रेशमाचा अटकर पोशाख. त्यावर पेहरलेला तो रंगीबेरंगी रुमाल. आणि न राहवून स्वतःला संगीतात झोकून देत थिरकायला लागणारी तिची पावलं. सुभानल्ला! त्या सगळ्या सिनेमामध्ये तिच्या बहुतांश पोशाखांमधून तिच्या मांड्या दिसतात. काजोल वास्तविक सावळी, जाडजूड, जाडसर नि जुळलेल्या भिवयांची बाई. शिडशिडीतपणा, गोरेपणा, प्रमाणबद्धता यांपासून फटकून असलेली. पण ‘चंदा रे चंदा रे’मध्ये चेहर्यावर संभ्रमित, उत्कट भाव घेऊन झुलणारी काजोल मला जितकी आवडते, तितकाच तिचा पोपटी रंगाचा आखूड झगा, त्यातून दिसणारे तिचे सावळे भरगच्च पाय, नि मोकळे सोडलेले पिंगट केसही आवडतात.
‘बॉम्बे’मध्ये नखशिखान्त बुरख्याआड असलेल्या मनीषा कोईरालाचा गर्द मोरपंखी निळ्या रंगाचा पोशाख नि त्यातून उठून दिसणारं तिचं कोवळं, नितळ, अनाघ्रात गोरेपण. त्याच पोशाखात ती किल्ल्यावर जाते पावसाळी संध्याकाळी. ‘तूही रे’च्या आर्त वादळी नेपथ्यात त्या हिरव्यागर्द पावसाळी, ओसाड किल्ल्याचा; उसळत्या लाटांचा नि हरिहरनच्या आवाजाचा जितका वाटा आहे, तितकाच तिच्या काळ्या-निळ्या वाहत्या वस्त्रांचाही आहे.
‘तुमसे मिलके’मधल्या माधुरीचा आखूड बाह्यांचा पांढराशुभ्र खमीस नि प्राजक्तीच्या फुलांच्या देठाच्या रंगाची साधीशी शिफॉनची ओढणी.
‘विजेता’मधल्या शशी कपूर – रेखाचं ते उच्च मध्यमवर्गीय – मध्यमवयीन सुखवस्तू घर; सुती साड्यांमधल्या रेखाचे संयमी, ठाम सूर; नि पांढर्या मलमलीच्या कुर्त्यातला नि बाटीकची लुंगी नेसून निवांत पेपर वाचणारा, मोकळाढाकळा शशी कपूर. त्याच्या त्या कपड्यांनी त्या घराला किती विलक्षण घरपण दिलं आहे!
ऋषी कपूरच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याचं पोट किंचित सुटलं होतं. पण त्याच्या त्या मऊ स्वेटर्समध्ये ते मस्त लपून जायचं. त्याच्या ऊबदार, आश्वासक, मिश्कील हसण्याशी त्याच्या पोटाचं नि स्वेटर्सचं काहीतरी नातं होतं खास.तितकेच आकर्षक भासायचे ते रवींद्र महाजनींचे, कशीबशी एखाद्याच बंद बटणानं लज्जारक्षण करणारे नि बहुतांश वेळा महाजनींची फिगर दाखवणारे तंग शर्ट्स. शाळेत असताना सूर्यकांत-चंद्रकांत बघून कावलेल्या मला मराठीत इतका झक्कपैकी सेक्सी दिसणारा नटही आहे यानं जामच भारी वाटायचं.
‘रंगीला’मध्ये उर्मिलाचे कपडेही असेच लक्ष्यात राहिलेले. एकतर त्या सिनेमापासून तिनं जणू कात टाकली. सिनेमातल्या सिनेमातली मुख्य भूमिका तिला मिळाली हे कळवायला तिला फोन येतो, त्या वेळची तिची आखूड चड्डी, दोन वेण्या, आणि तिच्या लिपस्टिकची शेडही मला नीट आठवते. किती सुंदर आहे ही मुलगी, असं राहून राहून वाटलं होतं सिनेमाभर. नंतर ती पुष्कळ बारीक, शिडशिडीत झाली. पण त्या सिनेमात ती एखाद्या गुटगुटीत पोरीसारखी दिसते. मादक वगैरे तर वेळोवेळी दिसतेच. पण त्याखेरीज त्या भूमिकेला आपल्या ध्यासामागे सर्वस्व उधळून चाललेल्या धिटुकल्या, मनस्वी पोरीचे रंग आहेत. तिचं देखणेपण येतं ते त्यातून. त्या छटेला तिनं घातलेले फ्रॉक्स, स्कर्ट्स, बारक्या-बारक्या चड्ड्या, नि पेटिकोट्स इतके खुलून दिसतात, की बस! ती सिनेमातल्या सिनेमात शिफॉनच्या साड्या नेसून सेक्सी वगैरे दिसते तेव्हाच ती भूमिका रंगवत असल्याचा नि आत्ता बाहेर येऊन खिदळायला लागणार असल्याचा भास होत, यातच काय ते आलं.
‘ओम्कारा’मधला काळाकभिन्न, पिळदार दंडांचा, गंभीर-अबोल चेहर्याचा अजय देवगण नि त्याच्या मनगटावरचा तो तटतटलेला ताईत.
दुर्गाबाई खोट्यांनी ‘बावर्ची’मध्ये नेसलेल्या सुती, घरगुती साड्या नि ‘भोर आई...’च्या शेवटी लाजत-मुरकत, पण लाजेवर तश्शी मात करत, फणकारून हसत, पातळ वर ओढून घेत, थिरकवलेली वृद्ध, जाडीभरडी, पण कमालीची देखणी पावलं.
‘राजू बन गया जंटलमन’मधले जूही चावलाचे साधेसुधे प्लेन ब्लाउजेस, घेराचे लांबलचक स्कर्ट्स, नि उंच बांधलेला, झुबकेदार पोनीटेल.
‘संगीत’मध्ये माधुरी दीक्षितच्या हनुवटीवरच्या तीन गोंदणठिपक्यांनी तिला बहाल केलेला अभूतपूर्व निरागस गोडवा.
‘जाने तू या जाने ना’मधल्या रत्ना पाठक-शहांचं तोकड्या कॅप्रीज अडकवून, सोफ्याच्या पाठीवर एक तंगडं भिरकावून वाचत लोळणं.
‘मासूम’मध्ये घरगुती सुती कुर्ता-पायजमा घालून पोरींशी मस्ती करणारा लडिवाळ कुटुंबवत्सल नसीर.
जाड काड्यांचा चष्मा नि अर्ध्या बाह्यांचे शर्ट्स घातलेला, नि एका जाडजूड पुस्तकानिशी थेट गुलजारांची आत्मप्रतिमा होणारा ‘परिचय’मधला जितेंद्र...
छे! नाही म्हणता म्हणता मीही भिरकावलाच आहे की तो सेक्सिस्ट संस्कार! थॅंक्स टू हिंदी सिनेमे.
#थॅँक्स_टु_हिंदी_सिनेमे १
No comments:
Post a Comment