Saturday 27 April 2019

विणीचा काळ विसरून

विणीचा काळ विसरून बारा महिने तेरा काळ घुमत बसणाऱ्या पक्ष्यांनी
उच्छाद मांडलाय सगळीभर.
झाडंबिडं लागत नाहीत त्यांना.
बिल्डिंगांच्या वळचणी, ओस पडलेले उंच भगभगीत चौक, घरांच्या दुर्लक्षित बाल्कन्या...
सिमेंटी स्वभावाचे कसलेही झरोके
चालतात.
थवेच्या थवे
वाण्यांच्या तूरडाळयुक्त भूतदयेचे सडे वेचतात.
खातात, वितात.
उडतात, फडफडतात.
काड्यांची अस्ताव्यस्त जुडीवजा घरटी, अंडी,
करुण आवाजात घूंघूं करत खुरडत फिरणारी सततची भुकेली पिल्लं,
शीट,
तिनंच सांधली जाणारी घरटी...
घडतात, मोडतात.
प्रहरांमागून प्रहर, बहरांमागून बहर
एक बॅच उडाली, दुसरी हजर.
भेदरलेल्या झुंडीच्या अगतिक अस्थिर उग्रतेचा लालबुंद डोळा वटारून पाहणारे पक्षी सगळीभर.
हार्डवायर्ड प्रेरणेनं जागा मिळेल तिथे घुसतात, एकमेकांवर चढतात.
फडफडतात.
जाळ्या ठोकून बंद केलेल्या निर्मम व्हरांड्यांवर
अभिमन्यूचा बिनडोक आवेश घेऊन पुन्हापुन्हा चढाया करतात.
घुसतात, फसतात.
उपाशी तडफडतात.
मरतात.
नव्या दिवशी नव्या जोमानं ट्रेन्स भरून टाकणाऱ्या,
स्मृतीच्या पेशी नसलेल्या प्रवाशांप्रमाणे
नव्या दिवशी पुन्हा नव्याने त्याच जागी चोचीत चोच घालून घुमतात.
दाणे टिपतात, अस्ताव्यस्त पोसतात.
जुगतात, वितात.
खातात, हगतात.
टूथपेस्ट थुंकून ठेवल्यासारखं दिसणारं पांढरंफेक शहर.
पक्ष्यांनी व्यापून टाकलं आहे होतंनव्हतं शहर.

No comments:

Post a Comment