लग्न न करणार्या माणसांना कळतच नाही
आपल्या आईबापाला सावकाश घेरत राहिलेलं म्हातारपण.
नोकरीधंदा असतो लग्न न करणार्या माणसांना.
अधिकाधिक स्थैर्य-सुबत्ता-बेफिकिरी...
चैनीच्या सवयीही खिळत गेलेल्या हाडीमाशी.
म्हणावीत तितकी वळणं नसतात थबकायला लावणारी.
केळवणं, ग्रहमकं, रिसेप्शनं...
...डोहाळजेवणं, बारशी, शाळेच्या अॅडमिशन्स, मुंजी आणि दहाव्याही
नसतात त्यांच्या आयुष्यात थेट.
आईबाप अधिकाधिक कर्मठपणे बघत राहतात मराठी सिरियली
रांधत राहतात त्याच त्या चवीच्या भाज्या आणि आमट्या निरुपायानं मनापासून
नाना युक्त्या लढवतात कावेबाजपणे
आणि
कधीकधी हताशेनं डोळ्यात पाणी आणून खरोखरचं.
करत राहतात नवनवीन स्थळांची वर्णनं न थकता.
आपल्याच अंगाखांद्यावर खेळवलेल्या झाडांची निवांत पानगळ
मुकाट विसरून जाणार्या
आणि कावेबाजपणानं दिव्यांचा लखलखाट धारण करत
वस्तूंचे अंतहीन मोह अधिकाधिक निकरानं विकत राहणार्या
शहरातल्या रस्त्यांसारखीच,
आईबापांशीही सवयीनं वाढत राहते अनोळख.
याच रस्त्यावर
काचेला नाक लावून सोनेरी मासे
आणि जाळीत बोटं रोवून पिवळेधम्म लवबर्ड्स पाहिले
मन भरेस्तो.
सायकल शिकताना गुडघे फुटले,
ऐन रहदारीत बकुळीची फुलं वेचली वेडगळासारखी,
नाक्यावर तीनतीन तास गप्पा ठोकत रेंगाळलो
रात्री अडीच वाजेस्तो.
ज्या वळणावर खचकन सामोरं येतं हे सगळं,
तिथेच फ्लायओव्हरखाली दिसतो
हळूहळू मरण पावत गेलेला रस्ता.
लग्न करणार्या माणसांना कधी भेटतात असली वळणं?
अप्रतिम...! खूपच भावली.
ReplyDeleteअनेक आभार. :)
Delete