हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता
फुशारक्या मारतो, वाद घालतो, भांडतो
शिव्याशाप देतो तळतळून.
कितीही दूरवर पोचणार्या गप्पा मारतो दिवसरात्रीच्या कोणत्याही प्रहरी
प्रेमही करतो मनापासून.
एकच लहानशी अट
पलीकडच्या प्राण्यालाही असावं लागतं आमच्याच उत्क्रांतीच्या पायरीवर.
त्यालाही फुटलेला असला पाहिजे हा अवयव.
बस.
यंत्राला ऊर्जा लागते, तसं खावंप्यावंही लागतंच म्हणा.
संडासबिंडासलाही जावं लागतं
धुवायला, ओतायला पाणी लागतं.
पण ते सगळं असायचंच.
त्यात फार गुंतू नये, सब मोहमाया है...
अर्थात
काही बग्स आहेतच....
अजूनही क्वचित
दिवस सैल पडतो आणि तरीही पीळ जात नाही कपाळावरच्या आठ्यांतून.
थकवा अंगभर, डोळे तारवटून.
गादीवर टेकते पाठ, पण विसावत नाही सैलावून.
अंथरूण-पांघरूण
गादी, उशी.
व्हिक्सची बाटली
पंखा, एसी.
स्क्रीन्स चमकदार,
मेसेंजरव्हॉट्सअॅपफेसबुक बर्करार.
मिटतातही डोळे.
पण सुखाचा अस्फुट हुंकार उमटत नाही अंगांगातून.
कूस वळवत, घाम टिपत,
पंखा भर्र फिरवत...
काही केल्या नीज उतरत नाही पापण्यांआडून.
अशा वेळी पुन्हा नवा अवयव हातात घेतो आता
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता.
No comments:
Post a Comment