Friday, 2 December 2022

बुजरी गाणी ०१

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.


हे गाणं त्यांपैकी एक.


वरकरणी तसं वाटलं, तरी एकतर्फी प्रेमाची कडसर गोडी त्यात आहे असं म्हणता म्हणवत नाही. प्रेमभावनेला सामोरं जाण्याचं धाडस करता न आल्यानं, त्याहून मोठी रेष ओढल्यासारखं करून मूळ मुद्द्याला बगल दिल्याचं किंचित सूचन मला त्यात जाणवत राहतं.


नायिका आणि नायक एकमेकांपासून दूर. ती त्याच्या प्रेमात चूर, उदास, आर्त, पण ठाम. तो जगाच्या दुःखांची ओझी वाहणारा, ध्येयवादी-स्वप्नाळू तरुण, पण ‘तुझ्याहून मोठं काहीतरी मला कळलं आहे’ अशी किंचित तुच्छता कळत-नकळत वागवणारा. काळ्यापांढर्‍या गाण्यांच्या काळातल्या सगळ्या नायिकांना असतो, तो शरणागत स्त्रीत्वाचा न्यूनगंड तिला आहे, यानं किंचित चिडचिडायला होतं आपल्याला, ‘मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है, उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है’ हा तिचा उदास प्रश्न ऐकून. एका प्रकाशशलाकेतले सातही रंग एकसमयावच्छेदेकरून अचूक टिपून चितारणार्‍या लोलकाची अनन्यसाधारण क्षमता आहे बये तुझ्यात, त्याला ‘उलझे-उलझे से खयालात’ काय म्हणतेस, असं हताशपणी वाटतं. पण तिच्या ‘तुम जो ये भी न बताओ तो ये हक है तुमको’मधल्या शांत-ठाम-स्वीकारानं चकितही व्हायला होतं. आपली बाजू पटवून देण्यासाठी भांडावंही वाटू नये कुणाला? असं होण्याकरता किती विश्वास असायला हवा स्वतःवर, असं वाटून थबकायला होतं.


नायकाचं मात्र थेट फैजच्या त्या ‘और भी दुख है जमाने में मोहब्बत के सिवा’सारखं काहीतरी भलतंच चाललेलं. एका व्यक्तीचं प्रेम म्हणजे ‘जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत’ वाटते होय तुला फक्त, किती कमनशिबी असशील तू, असं वाटून मी दर वेळी हळहळते त्या नायकासाठी. पण ‘मैंने तुमसे ही नही सबसे मोहब्बत की है’ ऐकलं की हळहळ संपून मी खांदे उडवून टाकते. एका व्यक्तीवर प्रेम नाही, हे चोख सांगायच्या ऐवजी ‘माझं सगळ्यांवरच प्रेम आहे’ अशी सारवासारव करायला लागावी? ‘हात् लेका! दम नाही तुझ्यात,’ असं म्हणून पुढे होते.


मग या गाण्यामधलं सर्वांत लखलखीत कडवं लागतं.


नायिकेला जणू अंतःस्फूर्तीनं व्हावी, तशी नायकाच्या रस्ता बदलण्याची जाणीव असावी बहुधा. नायकानं जरी ‘मैंने तुमसे ही नही सबसे मोहब्बत की है’ असं म्हटलं असलं, तरी त्याच्या ‘सर्वांभूती प्रेमा’करता मित्रामित्रांमधल्या स्नेहासाठी वापरला जाणारा ‘उल्फत’ असा शब्दच ती वापरते! त्याला डोळेझाक करायची असेल, तर त्यानं ती जरूर करावी. तिला असल्या खेळात रस नाही. आणि तिचं त्याच्यावर प्रेम असलं, तरी तिच्या प्रेमाचं सार्थक मीलनामध्येही नाही. प्रेम हे साधन नव्हे, ते जणू साध्यच आहे तिच्याकरता. ‘मैं तुम्हारी हूं ये मेरे लिये क्या कम है?’ हा तिचा प्रश्न आणि पाठोपाठ ‘मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है’ हे उद्गार. प्रेमाच्या स्पर्शानं अलौकिकत्व लाभावं एखाद्याला आणि त्याला त्याचं अंतर्बाह्य उजळून टाकणारं भानही असावं, तसे ते उद्गार. त्यात बाकीचं सगळं हीण जणू वितळून जातं.


गाणं साहिरचं आहे, यात सगळं कौतुक आलंच. पण तरी हे त्याच्या नेहमीच्या गाजत्या गाण्यांमध्ये कुठेच नसलेलं. लता-आशा यांच्यापैकी कुणाचा आवाज न घेता सुधा मल्होत्राच्या पातळ-उदास स्वरातलं, त्यामुळेही निराळं उठून दिसणारं. शुभा खोटे-सुनील दत्त अशा अनवट जोडीचं असल्यामुळेही वेगळं.


काय शुभा खोटेंनी जिवंत केलीय त्या प्रेमिकेची कणखर आर्तता... ते बघताना नजर खिळवून ठेवणार्‍या पण जीवघेण्या विजेची रेष आठवत राहते.


#बुजरी_गाणी

~



तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है

उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है

मैंने क्यों प्यार किया तुमने न क्यों प्यार किया

इन परेशान सवालों की कीमत क्या है

तुम जो ये भी न बताओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है

जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नही कुछ और भी है

भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में

इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है

तुम अगर ऑंख चुराओ तो ये हक है तुमको

मैंने तुम से ही नही सब से मोहब्बत की है

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही

सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही

मैं तुम्हारी हूं यही मेरे लिये क्या कम है

तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत न सही

और भी दिल को जलाओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

~

नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


Tuesday, 15 November 2022

मासोळ्या

लहानश्या ओढ्यावर पाण्यात पाय सोडून बसलाहात तुम्ही कधी?
खूप वेळ स्वस्थ बसलात,
तर हळूहळू...
एकेकच मासोळी जवळ येते आधी.
जराश्याही हालचालीनं धुम् पळून जाते..
हालचाल न करता,
हसू आलं तरी गालातच जिरवत,
बसून राहिलात देवासारखे,
पण देवासारखे नव्हे हां -
जिवंत, शहाण्या, मन काठोकाठ भरलेल्या, भल्या, अस्सल नि स्व-स्थ माणसासारखे -
तर एकीच्या दोन, दोनाच्या चार, नि चाराच्या आठ होतात.
इवल्या दाताओठांनी पावलांना लुचतात.
तरीही स्वस्थच राहायचं बरं का!
त्यांच्या शेपट्या झिळमिळतात.
कोवळ्या उन्हाची वेळ असेल, तर सोन्याच्या तिरिपी अचूक झेलत चमकतात-विझतात,
नजरबंदी करतात.
गुदगुल्या होऊन पोटातून हसू आलं, तर हसायचं मनमुराद.
पण चक्रमपणी भिऊन जाऊन पाय खस्सदिशी ओढायचे मात्र नाहीत.
असं सगळं बयाजवार नि खूपच्या खूप वेळ जमलं,
की मग,
कधीकधी,
कधीकधीच -
हलके-हलके कुशीत शिरावं कुणाच्या,
तसे आपले पाय नि मासोळ्या नि आपण नि पाणी नि ऊन नि आणखीन सांगताच न येणारं काहीतरी...
असं सगळं फेर धरायला लागतं.
अर्थात -
इतकं जमायला जिवंत, स्वस्थ आणि किंचित आवंढा गिळणारं...
माणूसपणच लागतं,
साक्षात देवाचाही काही उपयोग नाही,
कबूलाय.
पण ते तर म्हटलंच ना आपण आधी.
लहानश्या ओढ्यावर पाण्यात पाय सोडून बसलाहात तुम्ही कधी?

Tuesday, 18 October 2022

उशिरा सापडलेले नट

आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला नाही कळत लगेचच्या लगेच. शेफाली छायाचीही मला नव्हती कळली. हो, मला माहितीय तिचं नाव आता ती शेफाली शाह असं लावते. पण माझ्या डोक्यात तिचं आधीचंच नाव रुतून बसलंय आता. काय करायचं. नटाला सगळं स्वतःच नाही ठरवता येत. अनेक जणांचे शब्द, अनेक जणांच्या नजरा, अनेक जणांच्या कल्पना... अशा सगळ्यांतून घडत गेलीय शेफाली छायाही. तिचं रूपही तसंच. बघणार्‍याच्या नजरेत दडलेलं. ऐश्वर्या राय-छाप रूपाला देखणेपणा म्हणणार्‍या लोकांना शेफाली छाया देखणी नाहीच वाटायची. सावळी, ठेंगणी, जाडजूड भारतीय बांध्याची. तिचं देखणेपण तिच्या डोळ्यांत आहे पण. मोठ्ठाले डोळे. मनातलं सगळं बोलत राहणारे.


तिला पहिल्यांदा ‘सत्या’त बघितल्याचं आठवतं. ‘मुम्बै का किंग’ असलेल्या भिख्खू म्हात्रेला झापडवणारी त्याची राणी. ‘सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पिछे पिछे चलता है...’ असं त्याला सुनावत बेभान नाचणारी. तिची ती भूमिका विसरणं शक्यच नव्हतं. पण तरी तिची कदर नाहीच केली मी. पुढे खूप वर्षांनी राहून गेलेला ‘मान्सून वेडिंग’ बघताना त्यातली ती एकत्र कुटुंबातली, बापाचं छत्र हरवलेली, लैंगिक शोषण सोसणारी, स्वतःचा स्वतंत्र आवाज शोधायला धडपडणारी तरुण मुलगी बघताना मात्र तुटलं पोटात. अन्यायामुळे डोळे भरून येत असताना मुक्यानं सगळं निभावत जाणारी ती मुलगी दुसर्‍या कुणा लहान मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होताना बघून वाघिणीसारखी झेपावते त्या हरामखोर पुरुषासमोर. बापासारखं प्रेम करणार्‍या काकाच्या विनवणीखातर मुक्यानं वावरते लग्नात अपमान गिळून. किती काय-काय बोलले आहेत तिचे डोळे त्या सिनेमात. ‘मान्सून वेडिंग’मध्ये खूपच काय-काय नि कोण-कोण आहे बघायला. कितीही वेळा बघितलं तरी काही ना काही नवं सापडतंच त्यात. उदास संध्याकाळच्या एकटेपणापासून ते अस्फुट उमलत्या शृंगारापर्यंत... विजय-राजच्या फाटक्या करुण मीलनोत्सुक देहापासून आख्ख्या नसीरपर्यंत. 

पण दर वेळी - दर वेळी न चुकता, irrespective of anything and everything else, शेफाली छाया मला तिचं देणं द्यायला लावत आली आहे. 

मग कधीतरी ‘दिल धडकने दो’ बघितला. त्यातली असहाय्यपणे, दोन्ही हात बरबटवून चॉकलेट केक खात खात स्वतःचा अपमान गिळू बघणारी शेफाली छाया. त्यातही तिचा संधीसाधूपणा, सोयीस्कररीत्या मुलांचंही हवं तेच ऐकणं, कधी भान विसरून नवर्‍यावर करवादणं... 

मग मी तिला जमेल तिकडे शोधायला सुरुवात केली. ‘रंगीला’त कचकड्याची हिरॉईन. ‘ज्यूस’मधली अक्षरशः डोळे नि देहबोली वापरून तगमग-संताप दाखवणारी नायिका. ‘वक्त द रेस अगेन्स्ट टाईम’मधली पोरावर डोळस प्रेम करणारी आई – चक्क अमिताभची बायको नि अक्षय कुमारची आई! या बाईला काही करायला भीती वाटतच नसेल का? बरं, सहसा अशा नटांना असते ती रंगभूमीची तगडी-दमदार पार्श्वभूमी तिला नाहीच. मग कुठून, कुठून येतं हे? 

‘डार्लिंग्स’मधली तरुण भंगारवाल्याला जवळ करणारी नि जावयाला मारायचे बेत थंड डोक्यानं रचणारी तिनं केलेली आई मला अलिया भटच्या फुटेजखाऊ नायिकेहून ठळक वाटली होती. ‘जलसा’मधली मदतनीस शेफाली – ते बोलण्याजोगं प्रकरण नाही. बघण्याचं आहे. ‘डॉक्टर जी’मधली गायनॅक डिपार्टमेंटची करारी हेड तर बोलूनचालून ‘ये बाई, खा भाव’ कॅटेगरीतली होती. 

अजुनी मी शेफाली छायाची सगळी कामं बघितली नाही आहेत. मला काही घाईही नाही. हा तिच्या कारकिर्दीचा सगग्र आढावाफिढावा नव्हे. तिची कारकीर्द इतक्यात संपू नये, तसं तिची काही कामं अजून माझ्याकडून बघणंही संपू नये. असावं सतत तिनं केलेलं काहीतरी बघायचं शिल्लक. कमी वेळा लाभतात असले नट. रसिकासारखे काही तर चकवून मरूनही जातात मध्येच. मग त्यांच्यावर धड भडकताही येत नाही. त्याहून हे बरंय. 

Thursday, 13 October 2022

चेहरा

चेहरा हसरा निष्काळजी बॅडास ठेवण्यासाठी लागणाऱ्या ताकदीचा शेवटचा कणही आटून गेलेला असताना,
आरशात बघून डोळ्याला डोळा भिडवण्याची ताकद जिथून कुठून पैदा करतात,
त्या इंद्रियाचा शोध लागला,
की हळूहळू परतीचा प्रवास सुरू होतो. 
मग दिसायला लागतात 
पुढे आलेले हात,
पाठीवरच्या थापा,
वाऱ्यावरून वाहत आलेले दाणेदार सूर,
कुठकुठल्या दूरवरच्या खिडक्यांमधल्या शांतपणे तेवणाऱ्या दिव्यांची सोबत.
मग होत जातो चेहरा आपोआप हसरा, निष्काळजी, बॅडास. 


Tuesday, 11 October 2022

बोडक्याची बहुभाषिकता

एक काहीसं स्पष्टीकरण. हे काहीसं टारगट प्रकटन हिंदी, इंग्रजी वा संस्कृतविषयी नाही खरं तर. मराठी सोडून मला तोडक्या-मोडक्या येणार्‍या सगळ्याच भाषांविषयी मला असंच वाटतं. याची कारणं माझ्या भाषाविषयक धारणांमध्ये आहेत. कोणतीही भाषा आपल्याला आली असं म्हणताना माझ्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा खूप आहेत, आणि वैशिष्ट्यपूर्णरीत्या कडक आहेत. हीच धारणा योग्य असं माझं मत नाही. लोकांनी कुठल्याही प्रकारे भाषांना वागवावं नि कम्फर्टेबल व्हावं हे योग्यच आहे. पण मी मात्र माझ्यासाठी माझे निकष वापरते. हे या लेखनाचं मूळ आहे.

~

जगातल्या कुठल्याही अर्जावरचा अवगत भाषाहा रकाना भरताना दणकवून मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तीनही भाषांना टिकमार्क करण्याची मराठीजनांची जाज्ज्वल्य परंपरा असली, तरी हिंदीसमोर टिकमार्क करताना माझा हात अंमळ बिचकतो. माझं हिंदी लोकांशी बोलून-ऐकून कमावलेलं तर नाहीच, ते पाठ्यपुस्तकांतूनही शिकलेलं नाही. हिंदी सिनेमे बघून-बघून आपल्याला जे आपोआप येऊ लागतं असं मराठी लोकांना वाटतं, ते हिंदी मला येतं.

म्हणजे खरं तर मला हिंदी येत नाही.

मला येते ती हिंदीची बॉलिवुडी बोली. तीही बोलता येते असं म्हणणं म्हणजे... एखाद्दा जरी ट्रेनमध्ये हिंदीतून भांडायची वेळ आली, की त्या येण्याची लक्तरं निघतात. कारण माझ्या हिंदीत एकतर मोहतरमा’, ‘कनीज’, ‘इश्क’, ‘जुनून’, ‘मुल्जिम’, ‘बाइज्जतअसे शब्द तरी असतात, नाहीतर मग थेट मेरेकू उतरने दो ना मॅडम, बीचमें कायको खडे हो तुम?’ तरी असतं. बरं, हेही बोली भेटले तर ओळखीचे भासतात, लेखी भेटले तर भ आणि फ अशा दोन्ही अक्षरांची मोट बांधून केलेल्या अक्षरासारखे स्पीडब्रेकर्स लागतात, नुक्ता नामक टिंबं नक्की कशी उच्चारायची त्याचा पत्ता नसल्यामुळे आत्मविश्वास खचतो, तरी रेटून तस्सं निगरगट्टपणे वाचत राहिलं, तर मराठीत ऑकार आणि अनुस्वार यांचा साधासोपा एकत्रित उच्चार असणारी चाँदबिंदी हासारख्या अक्षरावर येऊन आता काय गायीसारखं हंबरून वाचू का, आँ?’ असा संताप करवून आणते; नि त्यातूनही वाट काढून पुढे जाण्याचं धैर्य राहिलंच, तर बैंक’, ‘डाक्टरबाबूयांसारखे शब्द वाचताना काय येडी का खुळी म्हणायची ही लोकं? ‘बइंकअसं कोण उच्चारतं सुखासुखी जिभेला गाठी मारून? नि डाक्टर’? इतके गावठाण आहोत का आपण? द्या की एक अर्धचंद्र... एरवी जगभर चाँदबिंद्यांतून त्याचे दागिने गाठवता ते?’ अशा फणफणाटात वाचनाचा शेवट होतो. नव्वद टक्के ओळखीची चिन्हं दिसताहेत, लावून-लावून वाचताही येताहेत, पण सगळं मिळून अर्थबोध होईस्तो पहाट उजाडत्ये, अशातली अवस्था.

या असल्या हिंदीच्या जोरावर रेतसमाधीसारखं पुस्तक हाती घेतलं, तर आपल्यालाच समाधी मिळायची. कारण आमच्या हिंदीची झाकली मूठ उत्तरेकडच्या लोकांशी खरोखरच हिंदीतून गप्पा मारायची वेळ येईपर्यंतच वज्रचुडेमंडित. तिला जेमतेम पूर्णविरामाच्या जागी दंड द्यायचा ठाऊक, ‘रेतसमाधीतलं काव्यात्म, संस्कृतप्रचुर हिंदी कुठलं उमगायला? बरं, संस्कृतप्रचुर असल्यामुळे कानाला टोचतं म्हणावं; फारसी-अरबीच्या वळणानं जाणारं हिंदी तरी धड कळतंय ? ‘वख्तमधला ख घसोंड्यातून निघेस्तो ऊर्ध्व लागायची पाळी येते नि पेशानीम्हणजे कपाळ हे निव्वळ मधुबालाच्या सखीनं केलेल्या अभिनयामुळे कळलेलं असतं. त्या एरियात फार बागडायला गेलं, तर स्तन नि नितंब यांपैकी कुठला स्पेअरपार्ट कुठला?’ ही नवइरॉटिकाकाराला सतावणारी गोची आपल्याही वाट्याला येईल याची पोटातून खातरीच असते.

एकुणात हिंदी येतं म्हणायचं, ते फक्त अर्जावर.

आज अनेक वर्षांनी ऋषीकेश मुखर्जींचा बावर्चीदिसला. त्यात हिंदी हमारी अपनी भाषा है।‘ – ‘उर्दू भी तो हमारी अपनी जुबाँ है!लागलं आणि जुनेच न्यूनगंड नव्यानं उफाळून आले. असो.

~

लोकांना ज्या तडफदारपणे आपल्याला इंग्रजी येत असल्याची ग्वाही देता येते, ते बघून मला कायम कुठेतरी लपून बसावंसं वाटतं. कारण मला इंग्रजी येत असल्यासारखं लोकांना काही काळ वाटू शकेल, इतपत इंग्रजी मला येते, पण त्याचा अर्थ मला इंग्रजी येते असा घ्यायचा नसतो, हे अनेक कसनुशा प्रसंगांनी माझ्या मनावर खोल बिंबवलं आहे.

उदा. मराठी नि हिंदी दोन्ही न येणार्या लोकांना एखादी पाककृती समजावून सांगण्याचा प्रसंग. काही नाही... रवा भाजायचा खमंग...एवढं एक भरतवाक्य घ्या. (काही नाही, असं म्हणणं मॅंडेटरी असतं. ते न म्हटल्यास तुम्ही पाकृही येत असण्याचं इंग्रजीसारखंच नाटक करताय असं धरतात.) ते सांगा बरं सफाईदार इंग्रजीमधून. बों ब. रवा म्हणजे सेमोलिना? पण जाडा की बारीक? नि दलिया म्हणजे? नि खमंग भाजायचा म्हणजे कसा? नि मुळात काही नाहीकसं भाषांतरायचं? असे प्रश्न दर टप्प्यावर लागतात. अनेकदा मी या प्रश्नांचा नकाशा आधीच बघून ‘no, I haven't cooked it, so I won’t be able to explain the recipe’ अशी हार पत्करते.

प्रसंग दुसरा. भांडण. मी इंग्रजीतून भांडायला सुरुवात केली की साधारण अडीचाव्या वाक्याला मी भांडणाच्या मुद्द्यांऐवजी आपल्या वाक्याचं क्रियापद येऊन गेलंय की यायचंय, ते सकर्मक होतं की अकर्मक, पण हा वाक्प्रचार असा इंग्रजीत थोडाच असणार आपण तर मराठीतल्या वाक्प्रचाराला साडी नेसवली, नि कुठलं शब्दयोगी अव्यय बरोबर, ऑफ की फॉर की अपॉन... असल्या एक्झिस्टेंशियल भाषाशास्त्रीय प्रश्नांमध्ये पाय अडकून पडायला सुरुवात होते. साहजिकच पलीकडच्या पार्टीचा टेम्पो जातो. ऊर्जा कोंडून राहते, नि एकंदर उभयपक्षी यथेच्छ वैताग वैताग होतो.

प्रसंग तिसरा. तुम्हांला खूप काही म्हणायचंय. पण तुमच्याकडची विशेषणांची शब्दसंपदा तीन विशेषणांत पक्षी : अमेझिंग, फॅंटस्टिक, पथेटिक, आणि तीन क्रियाविशेषणांत पक्षी : रिअली, सिरियसली, टेरिब्ली, संपते. अशा वेळी आपण मगाचंच वाक्य परत बोललोय की काय असं वाटून भयानक न्यूनगंड यायला लागतो.

हे बोलतानाचं झालं. लिहितानाचे प्रश्न अजून निराळे. मी इंग्रजी वापरते ते बहुतकरून आयटी सेटपमधल्या इमेल्समध्ये. त्यामुळे इंग्रजीतून काहीही लिहायला घेतलं, की मला धिस इज रिगार्डिंग...किंवा धिस इज टू इन्फॉर्म...हेच पहिलं वाक्य सुचतं नि भारतातल्या लोकांना चांगलं इंग्रजी येतं असं मानणार्या युरोपियनांची दया-दया येऊ लागते. पुढे काही लिहिलं जातंही बरं, नाही असं नाही, पण त्याला मला येते इंग्रजी, बघा, बघा!असं दाखवत बोलणार्या इसमाची कृत्रिम, केविलवाणी कळा असते. मग त्याला काही केल्या डौल, आत्मविश्वास, ओघ येणं शक्य नसतं.

स्पेलिंग आणि उच्चार याबाबत आपण बोलायला नको. त्या प्रांतात अनेक लोकोत्तर स्त्रीपुरुषांनी महनीय कार्य करून ठेवलेलं आहेच.

माझी खरी गोची होते ती वाचताना. शब्दाचा अर्थ न कळणं इथवर ठीक आहे. नाही आपली शब्दसंपदा चांगली. ठीके ना. लाजायचं काय. नाही आता. पण शब्द दिसून साधारण ओळखता येतो. शब्दाचा अर्थ कळतो. अनेकदा वापरताही येतो अनमानधपक्यानं बरोबर. पण उच्चार काय? फाफलते. जरी आपल्याला त्या शब्दाचा उच्चार कधीच मोठ्यांदा करायचा नसला, तरीही तो आपण मनातल्या मनात अंदाजपंचे करतो आहोत, या जाणिवेनं तुम्ही आपोआप पोक काढून जगायला लागता.

(मला कुणीही कोश बघणे, गूगलणे, यूट्यूब बघणे हे सल्ले देऊ नयेत. त्याकरता ही पोस्ट लिहिलेली नाही. मला ते सगळं ठाऊक आहे. मी भाषा येणे आणि न येणे यांतल्या बाSSरीक फरकाविषयी काही म्हणायचा प्रयत्न करते आहे. धन्यवाद. (बघितलंत, मायमराठीत माझ्या बोलीत कशी बाणेदार तडफ संचारली ती? खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे, उडविन चिंधड्या राइराइएवढ्या... Don’t even start about र्हस्वदीर्घाच्या चुका. आपण मराठी पद्याविषयी बोलतोय, एरिया माझा आहे, शटाप, माझं चूक जरी निघालं तरी शटापच.))

असो. कल्पना येण्याकरता इतकं पुरे आहे.

~

वनम् वने वनानि प्रथमा, वनम् वने वनानि द्वितीया... असं करत करत आठ विभक्त्या ढकलत जायच्या. हे फक्त अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाकरता. निरनिराळ्या अंत्याक्षरानुसार आणि लिंगांनुसार हे असं गुणिले चोवीस रूपं पाठ करत जायची. नि हे फक्त नामांचं झालं. धातूंचे गण नि पदं, त्यानुसार त्यांची रूपं नि प्रत्यय, त्यांची कभूधावि, कविधावि - प्लीज आत्ता फुलफॉर्म विचारू नका - इत्यादी झेंगटं. त्यांना कोणत्या विभक्तीतल्या नामांची अपेक्षा असते, संधीचे नियम... नि हा सगळा अक्कलनिरपेक्ष पाठांतराचा चिखल तुडवून ऊर्जा उरलीच तर मSग त्या भाषेतलं गद्य आणि पद्य.

मला संस्कृतबद्दल अतीव नफरत वाटू लागली याचं मला अजिबात नवल वाटत नाही.

तीन वर्षं या वरच्या परिच्छेदातल्या भयप्रद गोष्टींच्या गोवऱ्या वेचल्यानंतर आणि 'संस्कृत स्कोरिंग असतं' या तद्दन ममव आचरट समजाला आणि बिनडोक लालसेला खतपाणी घालतील इतके मार्कं मिळवल्यानंतरही माझा नि संस्कृतचा संबंध 'हां, हा शब्द संस्कृत वाटतोय' अशा, अक्षरशः अंदाजपंचे दाहोदरसे, अदमासांपुरताच राहिला. तोही राहिला कारण मराठी प्रमाणलेखनाच्या नियमांमध्ये अडकलेला पाय. शब्द मूळ संस्कृत आहे की नाही हे माहीत नसेल, तर मराठी प्रमाणलेखन शिकता येत नाही, ही मजबुरी. (होय, या वाक्यात काहीही चूक नाहीय. पण तो निराळ्या लेखाचा, चळवळीचा, मोहिमेचा, सत्याग्रहाचा इत्यादी विषय आहे.) त्या जुलमाच्या रामरामामुळे संस्कृतचा अजूनच राग-राग. ही शिक्षणानं नि व्यवस्थेनं लादलेली नफरत कमी पडली, म्हणून त्या भाषेची मुकी (तरी मारकुटी) गाय भगव्यांनी आपल्या बैलबाजारात नेऊन बांधली. त्यामुळे एरवी संस्कृत नाटकांच्या आणि काव्याच्या आकर्षणाचं जे गाजर असू शकलं असतं, तेही त्या तुपकट-ओशट-आक्रमक भगवेपणात कुजून गेलं.

आता 'संस्कृत ही संगणकाकरता उपयुक्त भाषा आहे', 'संस्कृत ही देवांची भाषा आहे', 'तुला जर्मन शिकताना संस्कृतचा उपयोग झाला असेल ना?', आणि 'संस्कृतमधून मराठी जन्माला आली' या वाक्यांपैकी कुठलं अधिक संतापजनक आणि घनघोर मूर्ख आणि ठार चूक आहे याचा निर्णय करण्यापुरतीच भाषिक ऊर्जा माझ्या पदरात त्या मृत भाषेकरता शिल्लक आहे. बाकी जिवंत भाषांकरता आवश्यक.

~

जर्मन वापरून मी माझी मीठभाकर कमावते. त्यामुळे तूर्तास काही बोलण्याचा विचार रहित करत आहे. ;-)

अवघड जागची भाषा!

माझ्या शाळेतल्या मैत्रिणीनं सांगितलेला एक किस्सा आठवतो.

आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत होतो. साहजिक कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजीशी जुळवून घ्यावं लागलं. घेतलं. त्याचीही सवय झाली. त्या सुमारास कधीतरी ती आणि तिची एक मैत्रीण भर वर्गात व्याख्यान चालू असताना एकमेकींशी खुसफुसत बोलत होत्या. शिकवणार्‍या प्राध्यापिका मूळच्या मराठी, पण व्याख्यान इंग्रजीत चालू. यांचं बोलणं ऐकून प्राध्यापिका वैतागल्या. त्या दोघींना उद्देशून मोठ्यांदा नि मराठीत म्हणाल्या, “अमकी आणि तमकी, माझं बोलणं चालू असताना गप्पा मारायला लाज नाही वाटत? दोघी वर्गाबाहेर चालत्या व्हा.” मैत्रीण आणि तिची मैत्रीण चुपचाप चालत्या झाल्या. घटना संपली.

पण मैत्रिणीची त्या सगळ्यावरची मल्लीनाथी मात्र मला विचारात पाडून गेली. ती म्हणाली, “अगं, ‘गेटाउटम्हणल्यास्त्या तर इतकी लाज नसती वाटली. पण मराठीत ओरडल्यात्या चक्क! मला अगदी भयंकर अपमानास्पद, ओशाळवाणं वाटलं‍ गं.”

म्हणजे स्वभाषेत सगळ्याच भावना अधिक तीव्रपणे जाणवतात हे खरंय तर. अर्थात अवघडलेपणाही. नि म्हणून माणसं अवघडलेल्या प्रसंगांमध्ये हटकून परभाषा वापरतात. कुणी गेल्यावर म्हणायचे सांत्वनपर शब्द (आयम रिअली सॉरी फॉर युअर लॉस, अमक्यांकडे कंडोलन्ससाठी जावं लागेल, इत्यादी); लघवी-शौच-बाळंतपण-संभोग यांसारख्या शारीर गोष्टींविषयी बोलण्याच्या गोष्टी (डिलिव्हरी झाली, टॉयलेटला जायचं आहे, तुमची सेक्शुअल रिलेशनशिप ठीक आहे?, डिसेंट्रीचा त्रास होतो आहे जरा, काही नाही हो – यूटीआय आणि इतर गायनॅक प्रॉब्लेम्स, इत्यादी); स्वतःकडे प्रचंड व्हल्नरॅब्लिटी घेऊन आपल्या प्रेमवस्तूपाशी आपल्या प्रेमाचा उच्चार करणं (अर्थात – आय लव्ह यू, आय लाइक यू, आयम इंट्रेस्टेड इन यू वगैरे); स्वतःकडे कमीपणा घेऊन माफी मागणं (आयम सॉरी) अश्या सगळ्या वेळी माणसं परभाषेच्या आसर्‍याला जाताना दिसतात. अमुक आणि तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे’, ‘पाण्याची पिशवी फुटली’, ‘बाळ आडवं आलं’, ‘माझं तुझ्यावर निरतिशय प्रेम आहे’, ‘लघवीच्या ठिकाणी फार जळजळ होते हो..’, ‘मला क्षमा करावगैरे वाक्यं आपल्या बोलण्यातून जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहेत.

मायभाषेच्या जागी, नक्की कुठली परभाषा वापरतात लोक? (खरं तर परभाषा हा शब्द अंमळ फसवा आहे. भाषा ओळखीची असतेच. फक्त बोलणार्‍याची पहिली भाषा मात्र नसते. असो.) जी भाषा आपल्याला आपल्या मायभाषेहून अधिक प्रतिष्ठित, अधिक शिष्टसंमत, सामाजिकदृष्या अधिक उच्चस्तरीय वाटते, अशी परभाषा लोक अश्या प्रसंगी वापरतात. मराठीच्या बाबतीत हे स्थान संस्कृत आणि इंग्रजी आलटून-पालटून बळकावताना दिसतात. मराठीत शृंगारकथा लिहिताना अवयवांकरता (क्वचित चुकीचेही!) संस्कृत शब्द वापरणार्‍या लेखकांची आणि वाचकांची गोची आठवते की नाही?! असले संस्कृत शब्द वापरून लिहिल्यावर कसं काही वाटणार तसलं’?’ अशी तक्रार करणार्‍या लोकांना संस्कृतच्या ऐवजी दुसरी परभाषा अधिक मानवते, इतकंच! बाकी साधी-सरळ आंबा-काकडी-मुळा वगैरे फळं-भाज्यावर्गीय परिभाषा वापरूनही चावट साहित्य लिहिलं जातंच, पण ते या दोन्ही गटांतल्या लोकांना कसंसंचवाटतं!

असो, आत्ताचा मुद्दा मात्र थोडा निराळा आहे.

त्याचं झालं असं - अलीकडच्या काळात काही साध्यासरळ ललित लेखनात शारीर क्रियांचा उल्लेख करण्याची वेळ आली असता, मी माझ्याही नकळत निराळा प्रयोग करून गेले. टॉइलेटला / लघवीला जाऊन आल्यावरअसं लिहिण्याच्या ऐवजी शू करून आल्यावरअसा प्रयोग केला. माझी स्वतःची आणि वाचकांचीही प्रतिक्रिया बघताना असं ध्यानात आलं, की यानं त्या क्रियेविषयीचा अवघडलेपणा पार संपून त्या क्रियेला एक निरुपद्रवी शरीरसुलभ क्रिया इतकंच महत्त्व उरतं. हे त्या लिखाणाच्या जातकुळीला फारच मानवलं. मग हळूहळू माझ्या सामाजिक वापरातही मी हाच प्रयोग रुळवायला सुरुवात केली. मला जायचंयअसा मोघम उच्चार न करता वा वॉशरूम कुठे आहे?’ असं न विचारता, ‘मी आलेच जरा शू करून.असं म्हणायला लागले. बघितलं, तर लोक ते सहज स्वीकारत होते. आणि त्याहून नवलाची बाब म्हणजे त्यात अगदी इंग्रजी वापरल्यानंतर येणारा अवघडलेपणाही उरत नव्हता.

कधीतरी एकदा अतिशय विकल क्षणी जवळच्या व्यक्तीपाशी रडले. त्याबद्दल कुणा मित्राला सांगताना मी भोकाड पसरलं खरं. पण मला आता बरं वाटतंय पुष्कळच.असं सांगितलं. त्याच्या प्रतिक्रियेनं चमकायला झालं. त्याचं म्हणणं होतं, ‘वा! हा शब्द किती नॉन-जजमेंटल वाटवतो रडण्याबद्दल! नि त्या कृतीचा साधासरळ अपरिहार्य निरुपद्रवीपणाही ठसवतो.

खरंच की. कशानं असेल?

तर लक्ष्यात आलं, की शू, शी, भोकाड हे शाळकरी – त्यातही प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळकरी –  शब्द. तेव्हाच्या आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींबद्दल एकमेकांना जोखण्याचा विचार शिवलेलादेखील नसतो. एखाद्या क्रियेबद्दल वा संदर्भाबद्दल मनात अवघडलेपणा असणं नि मग तो परभाषेच्या आवरणाआड दडवणं – यापेक्षाही हे परिणामकारक. कारण हे शब्द वापरले की आपोआप आपण तत्कालीन मनोवस्थेत शिरतो, आणि जोखण्याची इच्छा वा अवघडलेपणा हे दोन्ही अंतर्धान पावतं.

शाळेतल्या मित्रांना अक्षरशः अनेक वर्षांनी भेटल्यावरही कुठल्याही विषयावर निर्विष-निस्संकोचपणे केलेल्या, दुथडी भरून वाहिलेल्या, अतिशय मोकळंमोकळं वाटवणार्‍या, भरभरून मारलेल्या गप्पा आठवल्या. असं लक्ष्यात आलं, की जरी आपण शाळेत एकमेकांशी मुलांशी / मुलींशी आपण नाही बॉ बोलतछाप वागत आलो असलो, तरीही, इतक्या वर्षांनंतरही, जगातल्या बर्‍याच अवघडलेल्या विषयांवर आपण याच मित्रांशी आणि मैत्रिणींशी कुठल्याही संकोचाशिवाय आणि जजमेंटशिवाय बोलू शकू. कारण आपण एकमेकांना छातीवर सेफ्टीपिनने रुमाल आणि नावाचा बॅच टाचलेला असताना, ‘बाई, शू करायला जाऊ?’ असं विचारताना, मैदानावर दाणकन आपटल्यावर वा आई शाळेत सोडून गेल्यावर अनावर रडताना बघितलं आहे; आणि त्यानं आपल्यात काहीतरी बंध बांधला गेला आहे.

हाच बंध भाषा जागा करत असेल का?

मला एकदम भाषिक अवघडलेपणावरचं रामबाण उत्तर सापडल्यागत हुर्रे!झालं!

अर्थात – प्रेम आणि संभोग – या दोन प्रांतात हे उत्तर अजिबातच कामी येणार नाही. कारण लैंगिक कृतींबद्दलचा किंचित अवघडलेला, किंचित व्हल्नरेबल, किंचित शृंगारातुर भाव नसेल, तर या भावना व्यक्त करण्यात हाशील तरी काय?!

तर - शृंगारलेखकांची गोची तूर्तास बर्करार. पण इतर प्रांतात मात्र मला अत्यंत लिबरेटेड’ – होय, होय, आयमायस्वारी, मोकळं-मोकळं! – वाटतंय!

Thursday, 6 October 2022

वीज

थेटरातल्या अंधारात दिसावा आपल्या प्राणप्रिय नटाचा क्लोजप,
आणि आजूबाजूच्या धपापत्या गर्दीत 
निरा एकान्त अनुभवावा;

कुण्या विद्ध कवीनं लिहिलेली एखादी ओळ ऐकावी बेखबरपणी,
आणि ध्यानीमनी नसताना 
आपल्याच वर्माचा पत्ता लागावा आपल्याला;

तसं एखादं संबोधन आपल्यातुपल्यातलं, 
ठेवणीतलं, न झिजलेलं, तरीही मृदावलेलं,
घामात मिसळलेल्या सुगंधासारखं खास आपलं झालेलं,
वीज चमकावी तसं लखलखून जातं.

मग जीव मुठीत धरून कडाडण्याची वाट पाहायची, 
बस. 

Wednesday, 28 September 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - ४

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकरप्रेमभंगमैत्रमैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झालाअपराधीपण आलं. परिणामी 'न-नायकएखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्याराहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

~

'त्रिभंग' अंमळ उशिरानंच पाहिला. फार आवडला. 


आधी वाटलं, ही शकुंतलाबाई परांजपे-सई परांजपे-विनी परांजपे-गौतम जोगळेकर अशी गोष्ट आहे की. तेच ते जगाच्या रीतींपल्याडचे बेधडक निर्णय घेणं नि निभावणं. जरा खट्टू व्हायला झालं. सई परांजप्यांचा 'साज' खूप आवडलेला असूनही थेट वास्तवाधारित गोष्ट चितारण्यानं खट्टू व्हायला झालं होतं, तसंच. 'मीच लिहिणार माझं चरित्र. कळू दे सगळ्यांना.' हे सिनेमातल्या लेकीचे विद्ध-संतप्त उद्गार ऐकताना विदुषी इरावतीबाईंच्या सान्निध्यात प्रेमाची तहान न भागलेली गौरी देशपांडे, तिच्या परीकथा, आणि मग तिच्या लेकीचं 'A pack of lies' आठवून खंतावायला झालं. पण हेही फार टिकलं नाही. वाटलं, अरे, ही तर काजोलची, तिच्या आजीची नि आईचीपण गोष्ट आहे. "घरात पुरुष लागतो असं आम्हांला कधी वाटलंच नाही, इतक्या स्वतंत्रपणे आईनं वाढवलं आम्हांला. स्त्रीवादाचं नाव प्रत्यक्ष न उच्चारता!" हे काजोलच्या एका मुलाखतीतले उद्गार आठवून वाटलं, किती-किती प्रकारे जवळची वाटली असेल ही भूमिका हिला! हे वाटतं न वाटतं, तोच शांताबाई गोखले आठवल्या. त्यांचं निष्ठेनं नि व्रतस्थ असल्यासारखं, एका निखळ intellectual गरजेतून लिहिणं. त्यांचे घटस्फोट. अरुण खोपकरांसारख्या कलावंताशी असलेलं अल्पकाळाचं नातं. रेणुका शहाणेची कारकीर्द, तिचा घटस्फोट, आशुतोष राणाशी लग्न करून त्याला 'राणाजी' संबोधणं नि डोक्यावर पदर घेऊन हौसेनं वावरणं. 

एकाएकी चमकल्यागत लक्ष्यात आलं, ह्या सगळ्या छटा आहेतच त्या गोष्टीत. या सगळ्या स्त्रियांच्या गोष्टी पोटात घेऊन ही गोष्ट साकारली आहे. त्यातले पुरुष निमित्तमात्र आहेत, साहाय्यक भूमिकेत आहेत, वा परीघावर तरी. कारण ही गोष्ट आपल्या मर्जीनं, वेळी चुकीचे, पण स्वतंत्र निर्णय बेधडकपणे घेणाऱ्या, नि आपल्या नात्यांची नि चाकोरीबद्ध सुरक्षित जगण्याची किंमत चुकवून ते धडाडीनं निभावणाऱ्या सगळ्याच मनस्वी, कर्तृत्ववान बायांची गोष्ट आहे. 

रेणुका शहाणेचं अभिनंदन. 

#त्रिभंग

Tuesday, 27 September 2022

दिवस

फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं, 
तरी डोळ्यांना धारा लागण्याचे दिवस.

उन्हाळलेल्या दिवसांमधले दमदार सोनेरी रंग... 
कुठून मागे राहावेत, सांग.
सांग, कशी आठवावी दयाळाच्या शुभ्र पिसाची जादुई रेष,
कशी ओलांडावी मनानं पागोळ्यांची पोलादी वेस?
कुठून कशा तुरतुराव्यात नाचऱ्या खारी छपरांवरून?
कावळ्यांच्या स्मार्ट स्वाऱ्याही न थबकताच निघून जातात दारावरून.
आभाळ उन्हाविना उदास, गच्च, ओथंबून.

सांग, कधी संपतील हे बोचऱ्या, गप्पगार वाऱ्यांचे दिवस?
फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं, 
तरी डोळ्यांना धारा लागण्याचे हे लांबलचक दिवस.

Friday, 16 September 2022

कितीही असोशीनं

कितीही असोशीनं, 
कसोशीनं,
पागोळीखाली पावलं पुन्हापुन्हा नितळून घेत,
स्वच्छ मनानं हात हाती धरू पाहिले, 
तरीही अखेर -
रस्ते आपले आपल्यालाच चालायचे असतात.
कुणीही झालं, 
कितीही झालं,
तरी आपल्या प्राणांवर नभ धरू शकत नसतं कधीच.
अखेर मुक्काम आपले आपल्यालाच ओळखावे लागतात.
सोडावेही.