Tuesday 11 October 2022

बोडक्याची बहुभाषिकता

एक काहीसं स्पष्टीकरण. हे काहीसं टारगट प्रकटन हिंदी, इंग्रजी वा संस्कृतविषयी नाही खरं तर. मराठी सोडून मला तोडक्या-मोडक्या येणार्‍या सगळ्याच भाषांविषयी मला असंच वाटतं. याची कारणं माझ्या भाषाविषयक धारणांमध्ये आहेत. कोणतीही भाषा आपल्याला आली असं म्हणताना माझ्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा खूप आहेत, आणि वैशिष्ट्यपूर्णरीत्या कडक आहेत. हीच धारणा योग्य असं माझं मत नाही. लोकांनी कुठल्याही प्रकारे भाषांना वागवावं नि कम्फर्टेबल व्हावं हे योग्यच आहे. पण मी मात्र माझ्यासाठी माझे निकष वापरते. हे या लेखनाचं मूळ आहे.

~

जगातल्या कुठल्याही अर्जावरचा अवगत भाषाहा रकाना भरताना दणकवून मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तीनही भाषांना टिकमार्क करण्याची मराठीजनांची जाज्ज्वल्य परंपरा असली, तरी हिंदीसमोर टिकमार्क करताना माझा हात अंमळ बिचकतो. माझं हिंदी लोकांशी बोलून-ऐकून कमावलेलं तर नाहीच, ते पाठ्यपुस्तकांतूनही शिकलेलं नाही. हिंदी सिनेमे बघून-बघून आपल्याला जे आपोआप येऊ लागतं असं मराठी लोकांना वाटतं, ते हिंदी मला येतं.

म्हणजे खरं तर मला हिंदी येत नाही.

मला येते ती हिंदीची बॉलिवुडी बोली. तीही बोलता येते असं म्हणणं म्हणजे... एखाद्दा जरी ट्रेनमध्ये हिंदीतून भांडायची वेळ आली, की त्या येण्याची लक्तरं निघतात. कारण माझ्या हिंदीत एकतर मोहतरमा’, ‘कनीज’, ‘इश्क’, ‘जुनून’, ‘मुल्जिम’, ‘बाइज्जतअसे शब्द तरी असतात, नाहीतर मग थेट मेरेकू उतरने दो ना मॅडम, बीचमें कायको खडे हो तुम?’ तरी असतं. बरं, हेही बोली भेटले तर ओळखीचे भासतात, लेखी भेटले तर भ आणि फ अशा दोन्ही अक्षरांची मोट बांधून केलेल्या अक्षरासारखे स्पीडब्रेकर्स लागतात, नुक्ता नामक टिंबं नक्की कशी उच्चारायची त्याचा पत्ता नसल्यामुळे आत्मविश्वास खचतो, तरी रेटून तस्सं निगरगट्टपणे वाचत राहिलं, तर मराठीत ऑकार आणि अनुस्वार यांचा साधासोपा एकत्रित उच्चार असणारी चाँदबिंदी हासारख्या अक्षरावर येऊन आता काय गायीसारखं हंबरून वाचू का, आँ?’ असा संताप करवून आणते; नि त्यातूनही वाट काढून पुढे जाण्याचं धैर्य राहिलंच, तर बैंक’, ‘डाक्टरबाबूयांसारखे शब्द वाचताना काय येडी का खुळी म्हणायची ही लोकं? ‘बइंकअसं कोण उच्चारतं सुखासुखी जिभेला गाठी मारून? नि डाक्टर’? इतके गावठाण आहोत का आपण? द्या की एक अर्धचंद्र... एरवी जगभर चाँदबिंद्यांतून त्याचे दागिने गाठवता ते?’ अशा फणफणाटात वाचनाचा शेवट होतो. नव्वद टक्के ओळखीची चिन्हं दिसताहेत, लावून-लावून वाचताही येताहेत, पण सगळं मिळून अर्थबोध होईस्तो पहाट उजाडत्ये, अशातली अवस्था.

या असल्या हिंदीच्या जोरावर रेतसमाधीसारखं पुस्तक हाती घेतलं, तर आपल्यालाच समाधी मिळायची. कारण आमच्या हिंदीची झाकली मूठ उत्तरेकडच्या लोकांशी खरोखरच हिंदीतून गप्पा मारायची वेळ येईपर्यंतच वज्रचुडेमंडित. तिला जेमतेम पूर्णविरामाच्या जागी दंड द्यायचा ठाऊक, ‘रेतसमाधीतलं काव्यात्म, संस्कृतप्रचुर हिंदी कुठलं उमगायला? बरं, संस्कृतप्रचुर असल्यामुळे कानाला टोचतं म्हणावं; फारसी-अरबीच्या वळणानं जाणारं हिंदी तरी धड कळतंय ? ‘वख्तमधला ख घसोंड्यातून निघेस्तो ऊर्ध्व लागायची पाळी येते नि पेशानीम्हणजे कपाळ हे निव्वळ मधुबालाच्या सखीनं केलेल्या अभिनयामुळे कळलेलं असतं. त्या एरियात फार बागडायला गेलं, तर स्तन नि नितंब यांपैकी कुठला स्पेअरपार्ट कुठला?’ ही नवइरॉटिकाकाराला सतावणारी गोची आपल्याही वाट्याला येईल याची पोटातून खातरीच असते.

एकुणात हिंदी येतं म्हणायचं, ते फक्त अर्जावर.

आज अनेक वर्षांनी ऋषीकेश मुखर्जींचा बावर्चीदिसला. त्यात हिंदी हमारी अपनी भाषा है।‘ – ‘उर्दू भी तो हमारी अपनी जुबाँ है!लागलं आणि जुनेच न्यूनगंड नव्यानं उफाळून आले. असो.

~

लोकांना ज्या तडफदारपणे आपल्याला इंग्रजी येत असल्याची ग्वाही देता येते, ते बघून मला कायम कुठेतरी लपून बसावंसं वाटतं. कारण मला इंग्रजी येत असल्यासारखं लोकांना काही काळ वाटू शकेल, इतपत इंग्रजी मला येते, पण त्याचा अर्थ मला इंग्रजी येते असा घ्यायचा नसतो, हे अनेक कसनुशा प्रसंगांनी माझ्या मनावर खोल बिंबवलं आहे.

उदा. मराठी नि हिंदी दोन्ही न येणार्या लोकांना एखादी पाककृती समजावून सांगण्याचा प्रसंग. काही नाही... रवा भाजायचा खमंग...एवढं एक भरतवाक्य घ्या. (काही नाही, असं म्हणणं मॅंडेटरी असतं. ते न म्हटल्यास तुम्ही पाकृही येत असण्याचं इंग्रजीसारखंच नाटक करताय असं धरतात.) ते सांगा बरं सफाईदार इंग्रजीमधून. बों ब. रवा म्हणजे सेमोलिना? पण जाडा की बारीक? नि दलिया म्हणजे? नि खमंग भाजायचा म्हणजे कसा? नि मुळात काही नाहीकसं भाषांतरायचं? असे प्रश्न दर टप्प्यावर लागतात. अनेकदा मी या प्रश्नांचा नकाशा आधीच बघून ‘no, I haven't cooked it, so I won’t be able to explain the recipe’ अशी हार पत्करते.

प्रसंग दुसरा. भांडण. मी इंग्रजीतून भांडायला सुरुवात केली की साधारण अडीचाव्या वाक्याला मी भांडणाच्या मुद्द्यांऐवजी आपल्या वाक्याचं क्रियापद येऊन गेलंय की यायचंय, ते सकर्मक होतं की अकर्मक, पण हा वाक्प्रचार असा इंग्रजीत थोडाच असणार आपण तर मराठीतल्या वाक्प्रचाराला साडी नेसवली, नि कुठलं शब्दयोगी अव्यय बरोबर, ऑफ की फॉर की अपॉन... असल्या एक्झिस्टेंशियल भाषाशास्त्रीय प्रश्नांमध्ये पाय अडकून पडायला सुरुवात होते. साहजिकच पलीकडच्या पार्टीचा टेम्पो जातो. ऊर्जा कोंडून राहते, नि एकंदर उभयपक्षी यथेच्छ वैताग वैताग होतो.

प्रसंग तिसरा. तुम्हांला खूप काही म्हणायचंय. पण तुमच्याकडची विशेषणांची शब्दसंपदा तीन विशेषणांत पक्षी : अमेझिंग, फॅंटस्टिक, पथेटिक, आणि तीन क्रियाविशेषणांत पक्षी : रिअली, सिरियसली, टेरिब्ली, संपते. अशा वेळी आपण मगाचंच वाक्य परत बोललोय की काय असं वाटून भयानक न्यूनगंड यायला लागतो.

हे बोलतानाचं झालं. लिहितानाचे प्रश्न अजून निराळे. मी इंग्रजी वापरते ते बहुतकरून आयटी सेटपमधल्या इमेल्समध्ये. त्यामुळे इंग्रजीतून काहीही लिहायला घेतलं, की मला धिस इज रिगार्डिंग...किंवा धिस इज टू इन्फॉर्म...हेच पहिलं वाक्य सुचतं नि भारतातल्या लोकांना चांगलं इंग्रजी येतं असं मानणार्या युरोपियनांची दया-दया येऊ लागते. पुढे काही लिहिलं जातंही बरं, नाही असं नाही, पण त्याला मला येते इंग्रजी, बघा, बघा!असं दाखवत बोलणार्या इसमाची कृत्रिम, केविलवाणी कळा असते. मग त्याला काही केल्या डौल, आत्मविश्वास, ओघ येणं शक्य नसतं.

स्पेलिंग आणि उच्चार याबाबत आपण बोलायला नको. त्या प्रांतात अनेक लोकोत्तर स्त्रीपुरुषांनी महनीय कार्य करून ठेवलेलं आहेच.

माझी खरी गोची होते ती वाचताना. शब्दाचा अर्थ न कळणं इथवर ठीक आहे. नाही आपली शब्दसंपदा चांगली. ठीके ना. लाजायचं काय. नाही आता. पण शब्द दिसून साधारण ओळखता येतो. शब्दाचा अर्थ कळतो. अनेकदा वापरताही येतो अनमानधपक्यानं बरोबर. पण उच्चार काय? फाफलते. जरी आपल्याला त्या शब्दाचा उच्चार कधीच मोठ्यांदा करायचा नसला, तरीही तो आपण मनातल्या मनात अंदाजपंचे करतो आहोत, या जाणिवेनं तुम्ही आपोआप पोक काढून जगायला लागता.

(मला कुणीही कोश बघणे, गूगलणे, यूट्यूब बघणे हे सल्ले देऊ नयेत. त्याकरता ही पोस्ट लिहिलेली नाही. मला ते सगळं ठाऊक आहे. मी भाषा येणे आणि न येणे यांतल्या बाSSरीक फरकाविषयी काही म्हणायचा प्रयत्न करते आहे. धन्यवाद. (बघितलंत, मायमराठीत माझ्या बोलीत कशी बाणेदार तडफ संचारली ती? खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे, उडविन चिंधड्या राइराइएवढ्या... Don’t even start about र्हस्वदीर्घाच्या चुका. आपण मराठी पद्याविषयी बोलतोय, एरिया माझा आहे, शटाप, माझं चूक जरी निघालं तरी शटापच.))

असो. कल्पना येण्याकरता इतकं पुरे आहे.

~

वनम् वने वनानि प्रथमा, वनम् वने वनानि द्वितीया... असं करत करत आठ विभक्त्या ढकलत जायच्या. हे फक्त अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाकरता. निरनिराळ्या अंत्याक्षरानुसार आणि लिंगांनुसार हे असं गुणिले चोवीस रूपं पाठ करत जायची. नि हे फक्त नामांचं झालं. धातूंचे गण नि पदं, त्यानुसार त्यांची रूपं नि प्रत्यय, त्यांची कभूधावि, कविधावि - प्लीज आत्ता फुलफॉर्म विचारू नका - इत्यादी झेंगटं. त्यांना कोणत्या विभक्तीतल्या नामांची अपेक्षा असते, संधीचे नियम... नि हा सगळा अक्कलनिरपेक्ष पाठांतराचा चिखल तुडवून ऊर्जा उरलीच तर मSग त्या भाषेतलं गद्य आणि पद्य.

मला संस्कृतबद्दल अतीव नफरत वाटू लागली याचं मला अजिबात नवल वाटत नाही.

तीन वर्षं या वरच्या परिच्छेदातल्या भयप्रद गोष्टींच्या गोवऱ्या वेचल्यानंतर आणि 'संस्कृत स्कोरिंग असतं' या तद्दन ममव आचरट समजाला आणि बिनडोक लालसेला खतपाणी घालतील इतके मार्कं मिळवल्यानंतरही माझा नि संस्कृतचा संबंध 'हां, हा शब्द संस्कृत वाटतोय' अशा, अक्षरशः अंदाजपंचे दाहोदरसे, अदमासांपुरताच राहिला. तोही राहिला कारण मराठी प्रमाणलेखनाच्या नियमांमध्ये अडकलेला पाय. शब्द मूळ संस्कृत आहे की नाही हे माहीत नसेल, तर मराठी प्रमाणलेखन शिकता येत नाही, ही मजबुरी. (होय, या वाक्यात काहीही चूक नाहीय. पण तो निराळ्या लेखाचा, चळवळीचा, मोहिमेचा, सत्याग्रहाचा इत्यादी विषय आहे.) त्या जुलमाच्या रामरामामुळे संस्कृतचा अजूनच राग-राग. ही शिक्षणानं नि व्यवस्थेनं लादलेली नफरत कमी पडली, म्हणून त्या भाषेची मुकी (तरी मारकुटी) गाय भगव्यांनी आपल्या बैलबाजारात नेऊन बांधली. त्यामुळे एरवी संस्कृत नाटकांच्या आणि काव्याच्या आकर्षणाचं जे गाजर असू शकलं असतं, तेही त्या तुपकट-ओशट-आक्रमक भगवेपणात कुजून गेलं.

आता 'संस्कृत ही संगणकाकरता उपयुक्त भाषा आहे', 'संस्कृत ही देवांची भाषा आहे', 'तुला जर्मन शिकताना संस्कृतचा उपयोग झाला असेल ना?', आणि 'संस्कृतमधून मराठी जन्माला आली' या वाक्यांपैकी कुठलं अधिक संतापजनक आणि घनघोर मूर्ख आणि ठार चूक आहे याचा निर्णय करण्यापुरतीच भाषिक ऊर्जा माझ्या पदरात त्या मृत भाषेकरता शिल्लक आहे. बाकी जिवंत भाषांकरता आवश्यक.

~

जर्मन वापरून मी माझी मीठभाकर कमावते. त्यामुळे तूर्तास काही बोलण्याचा विचार रहित करत आहे. ;-)

No comments:

Post a Comment