Tuesday 15 November 2022

मासोळ्या

लहानश्या ओढ्यावर पाण्यात पाय सोडून बसलाहात तुम्ही कधी?
खूप वेळ स्वस्थ बसलात,
तर हळूहळू...
एकेकच मासोळी जवळ येते आधी.
जराश्याही हालचालीनं धुम् पळून जाते..
हालचाल न करता,
हसू आलं तरी गालातच जिरवत,
बसून राहिलात देवासारखे,
पण देवासारखे नव्हे हां -
जिवंत, शहाण्या, मन काठोकाठ भरलेल्या, भल्या, अस्सल नि स्व-स्थ माणसासारखे -
तर एकीच्या दोन, दोनाच्या चार, नि चाराच्या आठ होतात.
इवल्या दाताओठांनी पावलांना लुचतात.
तरीही स्वस्थच राहायचं बरं का!
त्यांच्या शेपट्या झिळमिळतात.
कोवळ्या उन्हाची वेळ असेल, तर सोन्याच्या तिरिपी अचूक झेलत चमकतात-विझतात,
नजरबंदी करतात.
गुदगुल्या होऊन पोटातून हसू आलं, तर हसायचं मनमुराद.
पण चक्रमपणी भिऊन जाऊन पाय खस्सदिशी ओढायचे मात्र नाहीत.
असं सगळं बयाजवार नि खूपच्या खूप वेळ जमलं,
की मग,
कधीकधी,
कधीकधीच -
हलके-हलके कुशीत शिरावं कुणाच्या,
तसे आपले पाय नि मासोळ्या नि आपण नि पाणी नि ऊन नि आणखीन सांगताच न येणारं काहीतरी...
असं सगळं फेर धरायला लागतं.
अर्थात -
इतकं जमायला जिवंत, स्वस्थ आणि किंचित आवंढा गिळणारं...
माणूसपणच लागतं,
साक्षात देवाचाही काही उपयोग नाही,
कबूलाय.
पण ते तर म्हटलंच ना आपण आधी.
लहानश्या ओढ्यावर पाण्यात पाय सोडून बसलाहात तुम्ही कधी?

No comments:

Post a Comment