Friday, 2 December 2022

बुजरी गाणी ०१

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.


हे गाणं त्यांपैकी एक.


वरकरणी तसं वाटलं, तरी एकतर्फी प्रेमाची कडसर गोडी त्यात आहे असं म्हणता म्हणवत नाही. प्रेमभावनेला सामोरं जाण्याचं धाडस करता न आल्यानं, त्याहून मोठी रेष ओढल्यासारखं करून मूळ मुद्द्याला बगल दिल्याचं किंचित सूचन मला त्यात जाणवत राहतं.


नायिका आणि नायक एकमेकांपासून दूर. ती त्याच्या प्रेमात चूर, उदास, आर्त, पण ठाम. तो जगाच्या दुःखांची ओझी वाहणारा, ध्येयवादी-स्वप्नाळू तरुण, पण ‘तुझ्याहून मोठं काहीतरी मला कळलं आहे’ अशी किंचित तुच्छता कळत-नकळत वागवणारा. काळ्यापांढर्‍या गाण्यांच्या काळातल्या सगळ्या नायिकांना असतो, तो शरणागत स्त्रीत्वाचा न्यूनगंड तिला आहे, यानं किंचित चिडचिडायला होतं आपल्याला, ‘मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है, उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है’ हा तिचा उदास प्रश्न ऐकून. एका प्रकाशशलाकेतले सातही रंग एकसमयावच्छेदेकरून अचूक टिपून चितारणार्‍या लोलकाची अनन्यसाधारण क्षमता आहे बये तुझ्यात, त्याला ‘उलझे-उलझे से खयालात’ काय म्हणतेस, असं हताशपणी वाटतं. पण तिच्या ‘तुम जो ये भी न बताओ तो ये हक है तुमको’मधल्या शांत-ठाम-स्वीकारानं चकितही व्हायला होतं. आपली बाजू पटवून देण्यासाठी भांडावंही वाटू नये कुणाला? असं होण्याकरता किती विश्वास असायला हवा स्वतःवर, असं वाटून थबकायला होतं.


नायकाचं मात्र थेट फैजच्या त्या ‘और भी दुख है जमाने में मोहब्बत के सिवा’सारखं काहीतरी भलतंच चाललेलं. एका व्यक्तीचं प्रेम म्हणजे ‘जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत’ वाटते होय तुला फक्त, किती कमनशिबी असशील तू, असं वाटून मी दर वेळी हळहळते त्या नायकासाठी. पण ‘मैंने तुमसे ही नही सबसे मोहब्बत की है’ ऐकलं की हळहळ संपून मी खांदे उडवून टाकते. एका व्यक्तीवर प्रेम नाही, हे चोख सांगायच्या ऐवजी ‘माझं सगळ्यांवरच प्रेम आहे’ अशी सारवासारव करायला लागावी? ‘हात् लेका! दम नाही तुझ्यात,’ असं म्हणून पुढे होते.


मग या गाण्यामधलं सर्वांत लखलखीत कडवं लागतं.


नायिकेला जणू अंतःस्फूर्तीनं व्हावी, तशी नायकाच्या रस्ता बदलण्याची जाणीव असावी बहुधा. नायकानं जरी ‘मैंने तुमसे ही नही सबसे मोहब्बत की है’ असं म्हटलं असलं, तरी त्याच्या ‘सर्वांभूती प्रेमा’करता मित्रामित्रांमधल्या स्नेहासाठी वापरला जाणारा ‘उल्फत’ असा शब्दच ती वापरते! त्याला डोळेझाक करायची असेल, तर त्यानं ती जरूर करावी. तिला असल्या खेळात रस नाही. आणि तिचं त्याच्यावर प्रेम असलं, तरी तिच्या प्रेमाचं सार्थक मीलनामध्येही नाही. प्रेम हे साधन नव्हे, ते जणू साध्यच आहे तिच्याकरता. ‘मैं तुम्हारी हूं ये मेरे लिये क्या कम है?’ हा तिचा प्रश्न आणि पाठोपाठ ‘मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है’ हे उद्गार. प्रेमाच्या स्पर्शानं अलौकिकत्व लाभावं एखाद्याला आणि त्याला त्याचं अंतर्बाह्य उजळून टाकणारं भानही असावं, तसे ते उद्गार. त्यात बाकीचं सगळं हीण जणू वितळून जातं.


गाणं साहिरचं आहे, यात सगळं कौतुक आलंच. पण तरी हे त्याच्या नेहमीच्या गाजत्या गाण्यांमध्ये कुठेच नसलेलं. लता-आशा यांच्यापैकी कुणाचा आवाज न घेता सुधा मल्होत्राच्या पातळ-उदास स्वरातलं, त्यामुळेही निराळं उठून दिसणारं. शुभा खोटे-सुनील दत्त अशा अनवट जोडीचं असल्यामुळेही वेगळं.


काय शुभा खोटेंनी जिवंत केलीय त्या प्रेमिकेची कणखर आर्तता... ते बघताना नजर खिळवून ठेवणार्‍या पण जीवघेण्या विजेची रेष आठवत राहते.


#बुजरी_गाणी

~



तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है

उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है

मैंने क्यों प्यार किया तुमने न क्यों प्यार किया

इन परेशान सवालों की कीमत क्या है

तुम जो ये भी न बताओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है

जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नही कुछ और भी है

भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में

इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है

तुम अगर ऑंख चुराओ तो ये हक है तुमको

मैंने तुम से ही नही सब से मोहब्बत की है

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही

सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही

मैं तुम्हारी हूं यही मेरे लिये क्या कम है

तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत न सही

और भी दिल को जलाओ तो ये हक है तुमको

मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

~

नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे. 


No comments:

Post a Comment