काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.
हे गाणं त्यांपैकी एक.
चहूबाजूंनी खिडक्या आणि व्हरांडे असलेलं, वाहत्या रस्त्यावरचं, मुंबईमधलं चौकातलं घर. जुन्या पद्धतीची तावदानं, दोन पाखे असलेली दारं नि खिडक्या, गज, फरश्या, बटणं... सगळं सुस्थित, मध्यमवर्गीय, शहरी, सुसंस्कृत आयुष्याची ग्वाही देणारं. माधुरीचा नेहमीचा हेअरकट बाजूला ठेवून उंच पोनीटेल. मिनिमलिस्टिक लुक असलेला मेकप. नायक आणि नायिकेचे कपडेही किती मृदू रंगांचे, घराच्या भिंतींच्या पिवळसर पांढरा रंगात मिसळून जाणारे, एकमेकांच्या कपड्यांशी नातं सांगणारे असावेत! नायकाचा प्लेन पिवळा टीशर्ट आणि नायिकेच्या पांढर्याशुभ्र खमीसवर पिवळ्या रंगाची ओढणी.
या सगळ्या रंगसंगतीचं गाण्याच्या मूडशी अतिशय जवळचं नातं आहे खरं. पण त्या सगळ्या मूडचा टेकऑफ आहे, ती अनिल कपूरची माधुरीकडे बघणारी नजर. त्या नजरेत वासनेचा लवलेशही नाही. एरवी 'पायली छुनमुन'सारख्या नितांत प्रेमभरल्या गाण्यात तब्बूची साडी भिजवल्यावर तिच्यामागे झेप घेणारा अनिल कपूर सावजामागून झेप घेणार्या वाघासारखा भासतो. पण इथे मात्र त्याच्या नजरेत निखळ मृदुता आहे. तहानेनं व्याकूळ होऊन खूप वणवणलेल्या माणसाला नितळ-निवळशंख पाण्याचा झरा दिसावा आणि तो पाहिल्यावर त्याकडे झेपावण्याऐवजी 'वणवण संपली' या भावनेनं, श्रांत समाधानानं त्यानं जागीच किंचित थबकावं तसे भाव त्याच्या माधुरीकडे बघणार्या नजरेत आहेत. ती त्याच्याकडे काही क्षणच अविश्वासानं, अप्रूपानं बघते आणि त्याच्या मिठीत धाव घेते. इथून त्या गाण्याचा सूर जो काही लागतो, तो लागतो!
मग एकमेकांभोवती रुंजी घालण्यात जग विसरलेल्या दोन लव्हबर्ड्ससारखा सगळा नूर. घराभोवतीचं अविश्रांत वाहतं जग आणि त्या जगाच्या मधोमध एखाद्या बेटासारखं असलेलं ते घर. सगळ्या जोखमी आणि दुःखं आणि संकटं यांच्या समुद्रात दोन माणसांनी एकमेकांसाठी सावरून धरलेल्या आडोश्यासारखं. त्या नेपथ्यानं हा भाव अधोरेखित होतो आणि मग अनिल कपूर-माधुरीच्या फक्त एकमेकांसाठी एकमेकांवरच जडलेल्या नजरा तो कुठल्या कुठे घेऊन जातात.
तिचं त्याच्यासाठी रांधणं, त्यानं तिच्या - अहं, त्यांच्या! - घराची डागडुजी करणं, त्यात खेळकरपणे तिनं मदत देऊ करणं आणि त्याच्याकडे टक लावून बघताना काहीतरी धसमुसळेपणा करणं, त्याचं लुटूपुटूचं चिडणं, शिक्षा दिल्याच्या आविर्भावात तिची नजर चुकवून तिच्या बोटात अंगठी घालणं... आणि त्यानं विभोर होऊन तिनं अक्षरशः घेतलेली गिरकी!
लहानपणीच्या आठवणदृश्यांनी अधिकच गहिरी केलेली त्यांची एकरूपता, दिवे गेल्यावरच्या अंधारात आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच भारला गेलेला अवकाश, त्यातलं त्यांचं चोरटं पण अश्लील न भासता अधिकच सुंदर भासणारं सेमी-चुंबन.
दर ला-ला-ला वर आणि 'ऐसा लगा'मधल्या 'गा'वर आशा भोसल्यांनी घेतलेल्या अशक्य मोहक गिरक्या; विधूविनोद चोप्राचा ट्रेडमार्क असा, 'इन्स्पायर्ड-बाय-मधुबाला' असा ठळक शिक्का असलेला, माधुरीचा एकंदर लुक; आणि आशा भोसल्यांच्या सुराला कोंदण केल्यासारखा नि अनिल कपूरच्या हळव्या मुडाला साजून दिसणारा सुरेश वाडकरांचा आवाज.
या गाण्यात न्यून शोधणं अशक्य आहे. म्हणून की काय, गाण्याच्या अखेरीस माधुरीनं अनिल कपूरच्या बोटात घालू पाहिलेल्या अंगठीचं माप चुकल्याचं कळतं नि अपशकुन खरा ठरल्यासारखी दारावरची बेल वाजते. सुखस्वप्नात अडथळा आणून दिग्दर्शकानंच गालबोट लावण्याचं काम केलं आहे असा भास होतो आणि तंद्री भंगते...
~
तुम से मिल के,
ऐसा लगा तुम से मिल के
अरमां हुये पुरे दिल के
ऐ मेरी जान-ए-वफ़ा
तेरी मेरी मेरी तेरी, एक जान है
साथ तेरे रहेंगे सदा,
तुम से ना होंगे जुदा
तुम से मिल के, ऐसा लगा तुम से मिल के
अरमां हुये पुरे दिल के…
मेरे सनम,
तेरी कसम,
छोड़ेंगे अब ना ये हाथ
ये जिन्दगी गुजरेगी अब
हमदम तुम्हारे ही साथ
अपना ये वादा रहा,
तुम से ना होंगे जुदा
तुम से मिल के,
ऐसा लगा तुम से मिल के
अरमां हुये पुरे दिल के…
मैंने किया
है रातदिन
बस तेरा ही इंतज़ार
तेरे बिना आता नहीं
एक पल मुझे अब करार
हमदम मेरा मिल गया
हम तुम ना होंगे जुदा
तुम से मिल के
ऐसा लगा तुम से मिल के...
~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.
No comments:
Post a Comment