Sunday 11 December 2022

राहत्या शहराचे लागेबांधे ०७

ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण हळूहळू माघार घेऊ लागतो. बागेत दुडदुडताना पुढे धाव घेऊन आजोबाची फरफट करणाऱ्या वांड पोरासारखं सुटवंग होऊन आपलं डोकं कधी आपल्यापुढे चार पावलं धावत सुटतं, तर कधी आपल्यामागे रेंगाळू लागतं. एक मात्र करायचं. कुठे जायचं त्याचं अजिबात नियोजन करायचं नाही. अक्षरशः वाट फुटेल तिकडे घरंगळत सुटलो, की आपल्या मूडला खेळकर वळणं देणारे रस्ते आपसुख पायाखाली येऊ लागतात. 


पायाखालचं शहर असलं की काही रस्ते निरनिराळ्या काळातल्या रूटीनची साक्ष देतीलसे चाकोरीबद्ध झालेले असतात. पण अशा वेळी त्यांना किंचित चकवावं. ज्या गल्ल्यांची तोंडं कधीच पाहिली नाहीत, अशांना हॅलो करावं. कधी डेड एण्ड लागून फसगत होते, तर कधी चक्क एखादा बहरलेला कैलासपती भेटून चकित करतो. कुठे जुन्याजाणत्या डेरेदार झाडाच्या पोपटी पानांतून सांडणारं जरतारी ऊन. अशा वेळी लागलेल्या डेड एण्डांनाही घरगुती स्वभाव असतो. रेंगाळत रेंगाळत थबकलेल्या गल्लीच्या टोकापाशी निव्वळ धूळ खात पडलेल्या अजस्त्र चारचाकी धुडांची गर्दी न मिळता एखादं अजूनही सिमेंटचा बट्टा न लागलेलं मातीचं अंगण आणि व्हरांडा लागतो. येणार्‍या-जाणार्‍यावर चष्मिष्ट लक्ष्य ठेवून असणारा एखादा खडूस म्हातारा दिसतो कुठे. कुठे चक्क कांदाभज्यांचा खमंग वास आणि निवांतपणे नाश्ता करणारे चुकार कष्टकरी. तिथे थांबण्याचा मोह होणं साहजिक. पण असे थांबे घेऊ नयेत. चांगली लागलेली तार त्यानं विस्कटू शकते. अशा शांत गल्लीतून आपण एकाएकी रहदारीनं गजबजलेल्या आणि अगदी सरावाच्या हमरस्त्यावर येऊन ओतले जातो, तेव्हा त्या रस्त्याची निराळीच बाजू दिसून दचकायला होतं. नि 'अरेच्चा! बबनचा वडापाव इथे मिळायला लागला होय हल्ली! तरीच तिकडची टपरी बंद दिसते!'प्रकारचे सुखद धक्के मिळतात. काही निखळ नॉस्टाल्जियाच्या गल्ल्या घ्याव्यात. मात्र त्यात किंचित जोखीम असते. आपण अक्षरशः वीसेक वर्षं मागच्या पाण्यात पाय बुडवून शांत होऊन बाहेर येऊ शकतो, वा 'छे! किती इमारती उगवल्या इतक्यात इकडे! आता दोन्ही बाजूंनी अंगावर आल्यासारखं होतंय. नि इथले दोन एकमेकांवर ओठंगलेले गुलमोहोर काय झाले? साले हरामी बिल्डर्स!' अशी तणतणही होऊ शकते. त्यामुळे जरा जपून. कधी मात्र आपला जुना भडभुंजा जसा आठवणीत होता तसाच्या तसाच दिसून चपापायला होतं आणि मग एकदम 'ओह! हा त्याचा मुलगा असणार!' हे ध्यानात येऊन सातत्यसाखळीनं आश्वस्त नि अचंबित असं दोन्ही वाटतं. काही रस्ते आपला तुळशीवृंदावनी स्वभाव सोडून एकदम मुरकी मारत, पान चघळत चहाटळ झालेले असतात. त्यानं विषण्ण व्हायला होतं. कधीकधी मात्र त्या तसल्या रस्त्यांवरही एखादंच जुनं रुपडं आणि ठणठणीत तब्बेत राखून असलेलं एखादं कौलारू घर खास आपल्याला दिलासा द्यायला थांबल्यासारखं थबकून राहिलेलं भेटतं. त्यानं एकदम खुशालल्यासारखं होतं. असे कोपरे भेटले, की आपण पुढे निघालो तरी मन मागेच रेंगाळतं. त्याचा पाय निघत नाही. पण आपण त्याचे लाड न करता साळसूदपणे पुढे निघायचं. कधी काही इमारती निव्वळ नसलेपणामुळे खिन्न करतात. 'या इथल्या कोपर्‍यावरून जाताना 'नववी अ'च्या वर्गाच्या खिडकीचा कोपरा दिसायचा...' असं आठवतं नि तिथे आता अवतरलेला 'अमुकतमुक नगरसेविकेच्या कृपेनं सेल्फी पॉइंट' बघून जग चंगळवादानं विटाळल्यासारखं अस्वच्छ-अशुद्ध वाटायला लागतं. पण हेही औटघटकेचंच. चार पावलं पुढे गेल्यावर सळसळत्या पिंपळातून नाचणारे उन्हाचे कवडसे टिपायला आपणही म्यानातून मोबाईल उपसतोच. चंगळवाद किंवा रसिकता, जो जे वांछील तो ते लाहो! 


मूड्सची अशी अनपेक्षित-खेळकर वळणं घेत हळूहळू पावलं आपसुख आपल्या हक्काच्या टपरीवाल्याकडे वळतात. अशा वेळी लाभलेल्या कटिंगशी स्पर्धा करणारं पेय अजून जन्मायचं आहे. ते घशाखाली उतरताना ग्लोबल कंटाळ्याचे ढग उडून गेलेले असतात. लख्ख मऊ ऊन पडलेलं असतं.


No comments:

Post a Comment