काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.
हे गाणं त्यांपैकी एक.
सुभाष घई आणि आनंद बक्षी ही दोन्ही नावं अशी नव्हेत, ज्यांच्याकडून अगदी मुख्यधारेतल्या सिनेमाच्या बाबतीतही फार अपेक्षा ठेवाव्यात. पण लोकसंगीतांच्या रूपानं लोकमानसातली शहाणीव कशी अलगद झिरपत धंदेवाईक उत्पादनातूनही डोकावताना दिसते, त्याचं उदाहरण म्हणून हे गाणं मला चकित करतं.
फतेहपूर सिक्रीच्या दर्ग्याबाहेरच्या प्रांगणात कलेची सेवा रुजू करायला बसलेल्या बहुधा राजस्थानी कलाकारांचा जथ्था. त्या लाल-विटकरी देखण्या प्रांगणात बेदरकारपणे रंग उधळणारे आणि ते कमी पडलं म्हणून त्यावरच्या आरसेकामानं उठून दिसणारे ठसठशीत पोशाख. तसेच उंच दाणेदार खडे सूर.
नायक आणि नायिका दोघेही प्रांगणात आहेत पण प्रेमाचा उच्चार झालेला नाही. फार काय, स्वतःपाशी स्वीकारही झालेला नाही. पार्श्वभूमीला मोहब्बत आणि इबादत – प्रेम आणि भक्ती यांच्यातलं साम्य रेखणारे शब्द. ईश्वराच्या वाटेवरच्या भक्तानं स्वतःला प्रेमिका नि ईश्वराला प्रियकर कल्पून आपल्या ओढीचं वर्णन करणं आशियाई उपखंडाला नवं नाही. लौकिकाची बंधनं तोडून परमेश्वराच्या भेटीच्या ओढीनं पहिलं पाऊल टाकणं परीक्षा पाहणारं. तसंच घरातल्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पना आणि मायेचे बंध तोडून प्रियकराच्या दिशेनं निघालेल्या प्रेमिकेचं पहिलं पाऊलही. या जगातून त्या जगात नेणारं. मागचं सारं खाक होऊन जाणार आहे, पुढे काय आहे ठाऊक नाही – पण जिवाला लागलेली ओढ अशी की सोसता सोसवत नाही. नायरा नूरनं गायलेल्या नसीम अख्तरच्या ‘उन का इशारा’मधले शब्द आठवतात, तशीच अरुणा ढेर्यांची ‘रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून निघालेल्या उत्कट मुलीची गोष्ट’ही.
या पार्श्वभूमीवरचे ते शब्द – हो, नको होतं प्रेमात पडायला. चुकलं माझं. घडलं हातून. आता काय पर्याय उरला आहे?
‘वापस कर आई मैं बाबुल को मैं शादी का जोडा, मैंने प्यार को पहन लिया रे प्यार को सर पे ओढा...’या ओळींपाशी ही अणिबाणी चरम सीमेवर पोचलेली. 'आता तुम्ही थांबवू शकाल, परतवू शकाल, दुखवू शकाल, त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणाऱ्या कुंवार मुलीला?'
जडावाचे आरसे असलेला शुभ्र पांढरा खमीस, अस्ताव्यस्त झालेले केस, पाय अनवाणी, डोळ्यांत संभ्रमाचं पाणी, आणि वराकडे निघालेल्या वधूसारखी लालबुंद ओढणी... ही वेशभूषा निवडणार्या इसमाला हे गाणं खरं कळलं आहे असं मनात आल्यावाचून राहत नाही.
गाणं चढतच जातं आपल्याला. ‘ये संगम हो जाये सागर से मिल जाए गंगा’ या ओळींचं आवर्तन होतं आणि नायिका नायकाच्या मिठीत शिरते. आता जग इकडचं तिकडं होऊ दे – समोर लढायला उभं ठाकू दे – का-ही-ही होऊ दे. आता विलग होणे नाही...
सिनेमात पुढे बरीच हाणामारी-डोळ्यातपाणी-तमाशे होतात. पण आपल्या डोक्यात ‘कट’ त्या ओळींवरच झालेला असतो. ‘ये संगम हो जाए सागर से मिल जाए गंगा’.
#बुजरी_गाणी ०४
~
ये मोहब्बत भी एक इबादत है
और ये इबादत भी एक मोहब्बत है
ये भी दीवानगी है, वो भी दीवानगी है
ये भी दिल की लगी है, वो भी दिल की लगी है
मुझको क्या हो गया है, सबको हैरानगी है
हो गया है मुझे प्यार
नहीं होना था, अरे नहीं होना था, लेकिन हो गया
हो गया है मुझे प्यार
इस प्यार के ये किस मोड पर वो चल दिये मुझको छोडकर
आगे जा ना सकूँ पीछे जा ना सकूँ
गम दिखा ना सकूँ गम छुपा ना सकूँ
सामने मेरे आग का दरिया डूब के जाना पार
हो गया है मुझे प्यार
जमाना दिलों को नहीं जानता है
जमाने को ये दिल नही मानता है
नहीं और कोई फकत इश्क है वो
जो आशिक की नजरों को पहचानता है
अब वक्त फैसले का नजदीक आ गया है
क्या फैसला करूँ मैं दिल ने तो ये कहा है
जीने का गर शौक तो मरने को हो जा तैयार
हो गया है मुझे प्यार
वापस कर आई बाबुल को मैं शादी का जोडा
मैंने प्यार को पहन लिया रे प्यार को सर पे ओढा
फेंक दी मैंनी गली में झूठी रस्मों की अंगूठी
तोड दिए सब लाज के पहरे मैं हर कैद से छूटी
ठोकर खाऊँ चलती जाऊँ अपनी अखियाँ मींचे
आगे मेरे साजन का घर दुनिया रह गई पीछे
एक ही दुआ मागूँ मैं बिछडा यार मुझे मिल जाए
मेरे पीर-ओ-मुर्शिद मेरा प्यार मुझे मिल जाए
अपना लाल दुपट्टा मैंने दिल के खून से रंगा
ये संगम हो जाए सागर से मिल जाए गंगा
~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.
No comments:
Post a Comment