Wednesday, 12 April 2023

थॅंक्स टू हिंदी सिनेमे २

कोकणातले दशावताराचे खेळ आता पूर्वीसारखे का रंगत नाहीत, याचं एक विलक्षण कारण इंद्रजीत खांबेंकडून ऐकायला मिळालं होतं. पूर्वी कंदील-पेट्रोमॅक्स आणि दिवट्या यांच्या प्रकाशात हे खेळ चालत. त्या दिव्यांचा सोनेरी पिवळसर अर्धधूसर प्रकाश जिथवर पोचेल तितकं त्याचं व्यासपीठ. हलत्या सावल्यांनी जिवंत केलेलं, श्वासोच्छ्वास करणारं, वर्तुळाकार. ते रिंगण विरत जाईल तिथून प्रेक्षक. रिंगणाच्या प्रकाशाच्या काठावर बसलेले. समोर संकासुर आला की दचकून मागे सरणारे, पुन्हा उत्सुकतेने पुढे सरसावणारे.
आता विजेचे झगझगीत दिवे आले, कुठे-कुठे तर कमानी रंगमंच. वर्तुळ गेलं, प्रेक्षक-नट विभागणी करणारी एकच एक दगडी रेषा आली. आता खेळांमधली गंमत कुठून राहणार?
हे ऐकल्यावर प्रकाशाच्या – नेपथ्याच्या सामर्थ्याचं अजब वाटलं होतं. मग हे थबकून टिपून घेणं सुरू झालंच, पण मागे पाहिलं तर अशा कितीतरी नेपथ्यांचे स्क्रीनशॉट्स माझ्या डोक्यात होतेच. त्याविषयी हे टिपण.
हृषीकेश मुखर्जींच्या ‘खूबसूरत’मधलं ते घर तत्काळ आठवलं. मंडळींच्या चोरट्या भेटीगाठी, गुलाबांची देवाणघेवाण, तबला वादन, कथ्थक, आणि नाटकं... इत्यादी सुखेनैव सामावून घेणारी स्वच्छ, प्रशस्त गच्ची त्याला होतीच. पण त्या गच्चीवरच्या पाण्याच्या टाक्या आणि त्या टाकीखाली चटई पसरून घरी पत्र लिहायला खासगी अवकाश शोधणारी रेखा. इतकं मोठ्ठं, देखणं, श्रीमंती घर – अगदी वळणदार भारदस्त जिना असलेलं – पण त्यात नसलेला मोकळाढाकळा दिलखुलास कोपरा त्या पाहुण्या मुलीला गच्चीनं देऊ केला होता. त्या गच्चीनं ते घर खरं घर केलं. अगदी तस्संच ‘गोलमाल’मधलं त्या बहीण-भावंडांचं अटकर घर. ते आधुनिक तर आहेच, पण जणू त्या दोन भावंडांभोवती, त्यांच्यापुरतं, त्यांच्यासाठी रचल्यासारखं लहानसं आहे. त्या घरात बाहेरून आलेल्या माणसासमोर ज्या थापेबाज्या कराव्या लागतात, त्या करताना त्यांची तारांबळ उडते यात काय नवल! नाही म्हणायला दीनाबाई पाठक आपल्या रुंद बुडासकट शिरू शकतील अशी लांबरुंद खिडकी मात्र त्याला आहे. ते एक नशीबच! त्या मानानं ‘बावर्ची’तल्या घराचा कळकट-जुनाटपणा आणि थोडा एकमेकांशी लावून न घेण्याचा भाव उघडच कळतो. त्या घराला चौक आहे खरा. पण राजेश खन्नानं येऊन एकेकाला त्या चौकात गाण्याबजावण्यासाठी पाचारण करेपर्यंत तो उदासवाणाच आहे. मुखर्जींच्या सगळ्या सिनेमांमधल्या घरांच्या खिडक्या होता होईतो बिनगजाच्या, मोठाल्या, मोकळ्या असतात. उजेडही नैसर्गिक आणि लख्ख. ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’मधल्यासारखी कातरवेळ क्वचितच कधीतरी.



हेच गुलजारांच्या सिनेमांतून पाहा! इतका लख्ख, मोकळा प्रकाश चटकन सापडणं कठीण. ‘खाली हाथ शाम आयी है’ वा ‘बिती ना बिताई रैना’मधला प्रकाश तर बोलून-चालून संध्याकाळचा, उदास करणाराच. पण एरवीही छाया-प्रकाशाचे तुकडे एकमेकांशी लपंडाव खेळत असावेत, असा प्रकाश गुलजारच्या सिनेमांमधून भेटतो. ‘छै छप्पा छै’सारख्या गाण्यात घटकेत पावसाळी मोतेरी उजेड, तर पुढच्याच कडव्यात झोपाळ्यात झुलणारी रात्र. गुलजारच्या बाबतीत रात्रच खरी! कधी ती ‘इतना लंबा कश लो यारों, दम निकल जायें...’ म्हणताना दिसते, कधी ‘मेरा कुछ सामान...’ म्हणत हळवी होताना. कधी ‘इस बार अमावस लंबी चली’ म्हणते, तर कधी ‘पानी पानी रे...’ म्हणताना विषण्ण होते. ‘माचिस’मधले तर लख्ख उजेडातले प्रसंगही ‘एक छोटासा लम्हा है, जो खत्म नही होता, मैं लाख जलाता हूं, वो भस्म नहीं होता....’ अशा उदास सुरांनी कळंजून जाताना दिसतात. मग अंधारातले प्रसंग तर...
प्रकाशावर अशीच एखाद्या जादूगारासारखी हुकूमत असलेली जाणवते ती प्रियदर्शन आणि अर्थात मणिरत्नम या दोघांच्याही सिनेमांत.
‘विरासत’मधला तो चौसोपी वाडा, झुलता झोपाळा, वापरून सुळसुळीत झालेल्या वजनदार आरामखुर्च्या नि जिन्या-माड्यांचे कठडे नि दारांच्या चौकटी, बुद्धिबळाच्या पटाची आठवण करून देणार्या देखण्या काळ्या-पांढर्या फरश्या – नि अर्थात त्यावर ‘सही? गलत!’चा खेळ खेळून बिचार्या अनिल कपूरला कासावीस करणार्या त्याच्या पुतण्या. त्या वाड्यात शिरताना तब्बूच्या पात्राला – गेहनाला - किती दडपल्यागत वाटलं असेल, ते मनावर अचूक ठसवतो तो वाडा. तिथल्या ओसरीत ठणठणत गेलेलं पितळी फुलपात्र नि माडीच्या पायरीवरून खाली वाकून बघत नवर्यानं दबक्या आवाजात मारलेली पण दमदार, आवाहक हाक गेहनाचा श्वास फुलवते, यात नवल नाही. तोच त्या नायकाच्या चुलतघराचा वाडा पाहा – चौसोपी नि भव्य तोही आहे. पण तो दाखवताना वापरलेल्या कोनांतून त्याचं हिंपुटेपण प्रियदर्शननं अचूक टिपलं आहे.
मणिरत्नमच्या सिनेमातला प्रकाश म्हणजे... ‘बॉम्बे’मधलं त्या दोघांचं ते पहिलंवहिलं भाड्याचं घर आठवतं? काय प्रकाशाचे विभ्रम आहेत त्यात, माय गॉड! कधीही पूर्ण अंधार न होऊ देणारी, कुठल्या ना कुठल्या प्रकाशाची तिरीप खेळवत ठेवणारी, सततची सोबत देऊ करणारी चाळकरी मुंबई त्यात आहे. त्यात गर्दी आहे, पण घुसमट नाही, सोबत आहे.

संजय लीला भन्साळीच्या सिनेमात एक लटकं, देखावेदार, नाटकी भव्यपण असतं. मग त्या वेश्यांच्या वस्त्या असोत, बंगाली जमीनदाराचा वाडा असो, ख्रिश्चन घर असो, वा मारवाडी पद्धतीचं गच्च्या-पोटगच्च्या असलेलं घर. ‘हे वास्तव नाही, पण मला त्याची फिकीर नाही. हेच माझ्या गोष्टीचं वास्तव आहे, हवं तर घ्या नाहीतर फुटा.’ अशी अदृश्य पाटी लावल्याचा भास त्या नेपथ्यात होतो. ‘हम दिल दे चुके सनम’मधली ती लायब्ररी हे याचं उत्तम उदाहरण. किती त्या लायब्ररीनं उपरं, चिकटवलेलं असावं! त्या लायब्ररीचा काही वापर होत असता, तर एका निसटत्या चुंबनानंतर “कुछ हो गया तो?” असा धास्तावला प्रश्न विचारणारी नायिका त्यात कशाला असती! दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक प्रकाशाचं भन्साळींना असलेलं वावडं. सगळीकडे नाट्यगृहीय प्रकाशाच्या आवृत्त्या. भव्यदिव्य, पण अनेकदा बेगडी.
कृत्रिम प्रकाश आणि इनडोअर जागांमध्ये प्राण फुंकणं बघायचं असेल तर ते दिवाकर बॅनर्जीच्या ‘खोसला का घोसला’त वा शरद कटारियाच्या ‘दम लगा के हैशा’मध्ये बघावं. काय त्या घरांचा जिवंतपणा! प्रॉपर्टीचे बारकावे, प्रकाशाचा अस्सलपणा, घरात साचत गेलेल्या बारीक-बारीक संसारी वस्तूंचे तपशील नि नवेजुनेपणा... अहाहा! तेच ‘
बधाई
हो’मध्येचं. त्या घरातलं नीना गुप्ताचं लहानसं स्वैपाकघर, रेल्वे क्वार्टर्समधल्या घरांची लहानशी बाल्कनी, बसायच्या खोलीत मांडलेली म्हातार्या आईची खाट, त्यातच धाकट्या भावासाठी 'काढलेला' कोपरा… जुना, साचून संपृक्त झालेला, जिवंत, पण म्हातारा संसार. तिथल्या हवेलाही अमृतांजनचा वास येईल, पण पहिला पाऊस पडताक्षणी न मागता आयती भजी आणि चहा हातात मिळेल, असं वाटतं.

‘अंधाधुन’मधलं तब्बूचं श्रीमंती घर तिच्या पात्रासारखंच देखणं, उन्मादक नि सूक्ष्म माजोरडं आहे.
‘गुलाबो सिताबो’मधला वाडा मूर्तिमंत अमिताभच्या पात्रासारखाच. पडझड झालेला, पण निर्लज्जपणे जगत राहण्याची ट्रिक कळलेला.
तेच ‘पिकू’तलं कोलकात्यातलं घर नि दिल्लीतला बंगला – दोन्हींला एक श्रीमंती, क्लासी अकड आहेच, पण घरगुतीपणाही आहे.
या सगळ्याच्या मानानं यश चोप्रांच्या नि करण जोहरच्या सिनेमांमधली घरं - नि प्रकाशही - अगदीच भाड्याचा, उपरा, तकलादू श्रीमंत वाटतो. त्याला खरेपणा कसा तो नसतो. मग ती घरं कितीही निगुतीनं का सजवलेली असेनात. ‘कट्’ म्हणताक्षणी कुणीतरी येऊन भिंती गुंडाळून नेईल असं वाटायला लावणारा बेगडीपणा.
असंच सिनेमात दिसणार्या शहरांचंही कधीतरी करून बघायला पाहिजे. मजेमजेशीर निष्कर्ष हाती येतील.
‘तलाश’मधली रात्रीची, बेगडी, चमकती, बकाल मुंबई आणि ‘इज लव्ह इनफ सर’मधली मुंबई...
‘कहानी’तलं कोलकाता आणि ‘पिकू’तलं कोलकाता…
पिवळ्या दिव्यांनी आणि धुक्यानं माखलेले सेमीशहरांमधले अपरात्रीचे शांत सुनसान रस्ते - 'दम लगा के'मधले निराळे आणि 'अलीगढ'मधले निराळे...
नेपथ्य-प्रकाशाचा खरेपणा, देखणेपणा, जिवंतपणा, भव्यपणा आणि या सगळ्यांची निरनिराळी पर्म्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स निरखताना गोष्टीचा स्वभावही उजळत जाईल.

No comments:

Post a Comment