Monday, 6 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - १

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.
~
ब्लॅक फ्रायडे


अलेक पद्मसींनी दूरदर्शनच्या काळात एक जाहिरात तयार केली होती. उसाच्या रसयंत्रांच्या अस्वच्छ हाताळणीमुळे काविळीसारखे रोग होऊ शकतात, हे दाखवून देणारी. ती इतकी परिणामकारक होती की ती मागे घेण्याची विनंती पद्मसींना करण्यात आली. 
तसंच काहीसं मला कश्यपचा हा सिनेमा बघताना वाटत होतं. 
इतकं रॉ, एखाद्या माहितीपटाच्या शैलीचा वापर करून अस्सलतेचा परिणाम साधणारं, अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी प्रगल्भ, ठाम, आणि नेमकं विधान करणारं, प्रतिमांचा इतका प्रभावी वापर करणारं, अनेक प्रॉमिसिंग चेहरे समोर आणणारं - इतक्या ज्वालाग्राही नाजूक विषयावरचं - आणि तेही अनेक राजकीय नेत्यांविषयी आणि व्यवस्थांविषयी नावानिशी बोलायला न कचरणारं काही... असा सिनेमा होता होईतो दाबून टाकला जाणं ही सिनेमाच्या अभूतपूर्व थोरवीचीच खूण होती असणार.
बॉम्बस्फोटांनंतर ११ वर्षांनी तयार झालेला सिनेमा त्यानंतर ३ वर्षं रखडला. आज त्यालाही १५ वर्षं झाली. आज सिनेमा बघताना त्याला आजच्या राजकीय परिस्थितीचे संदर्भ जसेच्या तसे लागू पडतात, आणि तो अधिकच अंगावर येतो. 
या विषयावर अनेक परिणामकारक सिनेमे आले आहेत. त्यांपैकी 'वेन्स्डे' आणि 'बॉम्बे' हे माझ्या कायमस्वरूपी बघण्यातले सिनेमे. परिणामकारक, पण काहीसे सोपे. अतिशय प्रभावी आणि सोप्या - काही कळायच्या आत डोक्यात अर्थ पेरून जाणाऱ्या - चित्रचौकटी हे 'बॉम्बे'चं बलस्थान. तर अत्यंत चपखल, बिनतोड, अस्सल युक्तिवाद हे 'वेन्स्डे'चं. पण 'ब्लॅक फ्रायडे' या सगळ्याच्या पार पलीकडे कुठेतरी घेऊन जातो. गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलीस लॉकपमध्ये होणारी मारझोड बघताना ओकणारा पोलीस अधिकारी. आपल्याच शरीराचा तुटलेला तुकडा न कळता, आजूबाजूच्या उद्ध्वस्ततेचाच धक्का सहन न होऊन, भेदरलेले मानवी शरीरावरचे डोळे. चेहऱ्यावरचे रक्ताचे डाग आणि अश्रू न पुसता सांडलेल्या साखरेचे कण वेचून खाणारं मूल. स्फोटांनंतर कानांत भरून राहिलेला भण्ण आवाज. आपण च्युत्या बनलो आहोत या निष्कर्षावर येऊन अखेर शांतता गवसलेला सर्वसाधारण भारतीय मुस्लीम तरुणाचा चेहरा. जगाला आग लावायला निघालेल्या - आणि लावून सहीसलामत फरार राहू शकलेल्या - मेमनचे विकृत संतप्त डोळे... यांतलं काहीच विसरता येत नाही. 
तसाच अत्यंत साटल्यानं आणि सातत्यानं अथपासून इतिपर्यंत सुचवला गेलेला हिंसा-सूड-हिंसा हा कार्यकारणभावही.
या चक्रांची अनेक आवर्तनं आपण पाहिली आहेत. आज आकाराला आलेल्या भारतीय राजकारणातल्या दडपणुकीची कोणती फळं उद्या दिसू लागतील, त्याचं भेसूर चित्र मनाशी उभं राहत जातं. ते पुसू म्हणता पुसता येत नाही.
असं, कधीही जुनं न होणारं काही, जन्माला घालणाऱ्या लोकांना त्या कलाकृतींच्या अमरत्वाचं समाधान वाटत असेल की न सोसणारं दुःख? समजत नाही...

1 comment:

  1. कलाकृतीच्या अमरत्वाचं समाधान तर नक्कीच वाटत असेल पण ते तात्कालिक

    ReplyDelete