Monday, 4 May 2020

आपणही आपल्या टेम्प्लेटात


प्रियकराच्या टेम्प्लेटात बसवलेला माणूस
सवयीने साखसुरत नांदतो टेम्प्लेटात.
अनवट गाणी अधूनमधून.
काळजीकाट्याचा शब्द एखाद्दुसरा.
शिळोप्याच्या गप्पा मूठपसा.
आधाराचा चिमटीभर भास.
डार्लिंग, आय लव्ह यू... अनावर.
तरी
एखाद्या भगभगीत सकाळी,
भलताच कुणी भासतो
तेव्हा धस्स होतं काळजात.
उसवल्या बाहीच्या जुन्या टीशर्टासारखं
सवयीनं घरचं झालेलं एकटेपण.
कुठेतरी, कधीतरी, क्वचित थोडी
जुनी दुखरी ठसठस... त्यावर
आपली आपणच घातलेली फुंकर.
पण
पुढे होऊन खांद्यावर हात ठेवायची
हिंमत होता होत नाही,
आवंढा अडकतो घशात,
कुणाकरता कळत नाही,
मन घट्ट करून मिटून घ्यायची पापणी.
फडफडणार्‍या सैरभैर साक्षात्कारांवर
ठेवायचा एक बरासा दगड.
मुकाट्यानं माघार घ्यायची,
हात ठेवायचे कटाक्षाने आपले आपल्यापाशीच.
हळूहळू पुन्हा सुखरूप परततो
आपणही आपल्या टेम्प्लेटात.

2 comments:

  1. Excellent...������

    एक प्रियकर म्हणून वाचताना स्वतःच्या चुकांची उपरती होत राहते... आणि प्रेयसी च्या मनाचा अचूक ठाव....

    ReplyDelete