॥धॄ॥
आपल्यात शेवटच्या काही दिवसांत चाललेल्या प्राणी-पातळीवरच्या आरोप-प्रत्यारोपांपैकीच एक कुठलातरी दिवस. तुझ्या शेजारचा आवाज सकाळच्या अनन्वित गर्दीच्या निर्दय प्रहरात कुणाशी तरी तारस्वरात भांडत असलेला. बहुधा आपल्या ताकदीच्या मर्यादेपलीकडे जाऊन. माझ्याशी निर्वाणीचं भांडतानाही तू मला चक्क स्विच ऑफ केलंस आणि तुझा ताबा घेणारा, संरक्षक आवाज लावून त्या आवाजाला म्हणालीस, "गप्प. एकदम गप्प. आपण त्या पातळीवर जाऊन नाही भांडू शकत." तो आवाज काहीतरी तणतणत, पण तत्काळ शांत झाला. आणि आवाजात सहनशील अलिप्तपणा आणत माझ्याशी बोलती झालीस तू.
मी अवाक.
तुझ्या या आवाजाशी फार कष्टानं लढले आहे मी कायम, त्यामुळे मला समजू शकतो त्याचा परिणाम. फरक इतकाच की मी रीसिंविंग एन्डला नव्हते. यू वेअर डन विथ मी. तो फोन मी तिथेच संपवला.
तिथून पुढे बोलण्यासारखं काही उरलं नाही.
॥१॥
तुझ्या घरातल्या लोकांचा कायम संताप येई मला. खरं तर तो तुझाच यायला हवा हे कळत नसे असं नाही. पण असा थेट राग करता येत नाही हे स्वत:शी न उच्चारताच स्वीकारून मी त्यांच्यावर बंदुकीचं टोक रोखून मोकळी होत असे.
जिच्या मऊ पोटाला हात लावून, तोंडावरून तिच्या सुती पदराचा काठ फिरवत दुपारी लोळत पडायला तुला आवडे, ती तुझी आई. संसार सांभाळून पोस्टाचं काम करणारी, संस्कार भारतीच्या शिबिरात माफक - भगवं समाजकार्य करणारी, वडलांच्या समोर ब्रही उच्चारू न शकणारी. मला अनाकलनीय असलेला एक कंडिशन्ड, चाकोरीबद्ध, काहीसा दयनीय पण, कावेबाज बाईपणा होता तिच्यात.
मला ठाऊक आहे, कावेबाज या शब्दावर आजही तुझ्या डोळ्यात थंड परका राग उमटेल. पण मला कायम वाटत आलं आहे, क्रूरपणे कोपर्यात चेपली गेलेली माणसं परिस्थितीशी जुळवून घेताना अधिकाधिक दबक्या - मवाळ चेहर्याची होत जातात. पण त्यांना कधीच न गाजवता आलेली सत्ता वाटा शोधत राहतेच. ती बाहेर पडताना अनेकदा संभावित क्रौर्याचा चेहरा घेऊन येते आणि 'बायकाच बायकांना छळतात...'छाप सुलभीकृत प्रतिक्रियांना जन्म देऊन जाते. तशा घासून गुळगुळीत झालेल्या तिच्या प्रतिक्रिया मला असत. आपण एका रविवारी एकत्र पहुडून वाचलेलं 'रणांगण' आठवतं तुला? त्यातल्या हॅर्टाच्या आईची आठवण येई मला अनेकदा तुझ्या आईकडे पाहून. शरीरा-मनानं विशविशीत झालेली, आपल्याच पोराच्या उत्कटतेचं उधाण पेलण्याची ताकद न उरलेली, म्हातारं कातडं डोळ्यांवर ओढून शुष्क-अलिप्त होत गेलेली ती असहाय्य बाई आणि तिच्या मांडीत पुन्हा पुन्हा आवेगानं शिरत थोडी ऊब शोधू पाहणारी हताश हॅर्टा. आपल्याला पुस्तकातली पात्रंही आपापल्या जागेवरून निरनिराळी दिसतात. इथं तर हाडामांसाच्या नात्यागोत्याच्या माणसांचा प्रश्न. कितीही स्पष्टपणे बोललं वा कितीही आडवाटांनी आपलं आपल्यापाशी राखून ठेवलं, तरीही एका रेषेवर कसे येऊ शकणार होतो आपण? पण आपण निर्लज्जपणे होता होईतो भाबडे राहू पाहत असतो.
॥२॥
तू पहिली व्यक्ती नव्हतीस माझ्यातली ठिणगी पाहणारी. अखेरचीही नव्हतीस. तरी काय बांधून पडलं आहे आपल्यात, ज्याची ओढ मला अजूनही जाणवते?
मला आठवते तुझी नजर. बाईला विस्फारून न्याहाळणारी.
बाई म्हणजे काय? मला माहीत नाही. कधी नव्हे ती त्या दिवसांत मी या प्रश्नावर अडखळले आहे.
बाई असणं म्हणजे काय? स्तन? पाळी येणं? गर्भाशय असणं? मूल जन्माला घालण्याची क्षमता असणं? योनी असणं? हे तर फक्त शरीराचे तपशील झाले. मग ज्या पुरुषांना आपण बाई असण्याचा साक्षात्कार होतो त्यांचं काय? तेही तर बाई असतातच. त्यांना बाई असल्यासारखं वाटतं, हेच मुळी पुरेसं आहे. अंगभूत सहनशीलता, वात्सल्य, पोषणाची आस असणं? छे! हे माझ्यात असलंच कधी, तर ते सिलेक्टिवलीच असतं हे मला पक्कं ठाऊक आहे. तरी मी बाई आहेच.
मी बाई आहे, कारण मला बाई असल्यासारखं वाटतं. म्हणजे काय वाटतं? मला अजुनी या प्रश्नाचं धड उत्तर देता आलेलं नाही.
मी तोवर घरीही कधी फारसा स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता. येत असे सगळं करायला. आई आजारी पडली खूप, तेव्हा बाबांचीही धावपळ. मग आपोआप शिकणं झालंच. पण त्याआधीही तिचा ’शिकून घ्या बाई’छाप पारंपरिक आग्रह नसे. नंतरही 'इथे आहात तोवर लाड करून घ्या!’ असलं पंखाखाली घेणंही नसे. यायला हवं सगळं. वेळ पडेल तेव्हा समजून करायलाही हवं. बस. त्या मानानं बाबाच वेडे म्हणावेत असे लाड करत. करतात अजुनी.
पण आपण भरकटलो.
तर तोवर मी घरीही कधी फारसा स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता. तिथलं घर हे मी पहिलंच मांडलेलं घर. इतकं मनापासून मांडलं मी ते घर, की एकदा आईबाबा आलेले असताना त्यांनी हौसेनं स्वैपाक करून थोडी मांडामांड बदलून दिली, तेव्हासुद्धा मला पोटात कुठेतरी थोडं ’माझं स्वयंपाकघर का बदलताय?’ असं तद्दन बायकी मालकी वाटून मग अपराधी वाटलं होतं. सगळ्या गोष्टींवर आपली पुरती पकड असल्याचा, संसारी स्त्रियांच्या नजरेत आपसुख उमटतो तो, आत्मविश्वास मी तिथे कमावला. अळशीच्या बिया, खडीसाखर, अस्सल मध अशा काढ्याच्या सामानापासून ते बिर्याणी मसाला, आलंलसणीची पेस्ट, मेतकुटाची पुरचुंडी असलं काहीही तिथे सापडू शके. तिथल्या डब्यांच्या जागा आणि त्यांची जीवितकार्यंही मी नेमून दिलेली होती. तिथली मोलकरीण मला जबाबदेही करी. रात्री कधी चुकून विरजण लावलंच तर ते पहाटे आठवणीनं उठून फ्रीजमध्ये टाकणं किंवा केराची बादली बाहेर ठेवली आहे ना ते रात्री झोपण्यापूर्वी - वेळी अंथरुणातून उठूनही - तपासणं, ही कामं मी हौसेनं अंगावर ओढवून, माझीच असावीत अशा सहजपणे आणि हक्कानं, करत असे. ते घर मी राखतही असे फार प्रेमानं. गाद्यांच्या बैठका करून त्यांना साजेशा रंगांचे अभ्रे घातलेल्या उशा रचणं. कित्तीतरी महिने कुढल्यासारख्या खुरटलेल्या कढीपत्त्याला ताक, कंपोस्ट, हलक्या हातानं केलेली छाटणी आणि मग थेट निर्गुणी भजनं ऐकवून हलके हलके मुडात यायला लावणं. बाहेरची कड नसल्यामुळे धुता न येणार्या ओट्याला स्पंजानं निरपून तकतकीत राखणं. हौसेनं घेतलेले मातीचे दिवे पाजळून - वेळी जुन्या सलवारीच्या नाड्यांच्या वाती करून - संध्याकाळी साजर्या करणं. एखादी नवपरिणीता काय करेल, असा इतमाम. दारात रांगोळी नि व्हरांड्यात तुळस नव्हती, इतकंच काय ते. त्यात ते मांजराचं पिल्लू. काय जीव पाखडला मी त्याच्यावर. त्याला हगायला मऊ मुरमाची माती काय, झोपायला जुन्या सुताची खोळ काय. त्याच्याकरता साय काढून ठेवणं काय. त्याच्याशी तासनतास लोकरीचा गुंडा घेऊन खेळणं काय... भातुकली खेळल्यासारखी खेळले मी... एक दिवस ते पोर परतलंच नाही, त्या आठवड्यात शक्यतांनी सैरभैर होऊन अखेर माझा जीव त्यातून सोडवून घेईस्तोवर.
या सगळ्यातलं काय खुणावत होतं तुला?
परंपरा ज्याला बाईपण म्हणते ते कंडिशन्ड बाईपण? ब्रेकपचे वण जपणारी माझ्यातली दुखरी, फिल्मी प्रेमिका? माझ्या तरुण शरीराचे सहज निरोगी आकारउकार? माणसांच्या पसार्यातून हट्टानं उठून आलेल्या माझं नवं, हुळहुळं एकटेपण? की या सगळ्यावर सायीसारखी धरून राहिलेली माझ्या उत्कटतेची मखमाली लव?
मला ठरवता येत नाही.
आठवतं ते फक्त नव्यानं फुटलेलं स्पर्शाच्या तहानेचं पान.
अतिशय अतिशय मजा आली मला माझं शरीर या प्रकारे अनुभवताना. ना त्याबद्दल मला कधी नैतिक पेच पडले ना कधी अपराधीपणा वाटला. दोन सज्ञान माणसांच्यात परस्परसंमतीनं होणारा व्यवहार करताना अपराधी वाटून घेण्याची काय गरज, इतका स्वच्छ विचार कायमच होता माझ्या डोक्यात.
पण तुला त्या सगळ्याबद्दल काय वाटत होतं? अर्थाचे तिढे पुन्हा पुन्हा पुढे ओढून पाहत बसायची खोड जात नाही.
स्त्रीच्या शरीराशी मांडलेला हा खेळ तू पहिल्यांदा खेळत नव्हतीस. याआधीही कुणाकुणासह प्रयोग केले होतेस तू. तू कधी ते लपवलं नव्हतंस. तुझ्या डोक्यात नव्हता काही स्पष्ट विचारच नसावा बहुधा त्याबद्दल. आपल्याच डोक्याच्या, तनामनाच्या आणि बुद्धीच्या निरनिराळ्या बहुरंगी गरजांचे अर्थ लावण्याची जबाबदारी अशाच कोणत्यातरी बायकी गॉसिपीय सो-कॉल्ड बोल्ड चर्चील सेशनमधून थेट समोर ठाकल्यावर थरकलेली पाहिली आहे मी तुला. तुला नीती अनीती चूक बरोबर प्राकृत विकृत इत्यादी प्रश्न पडले असणार. नवल नाही. तुला पुरुष आणि स्त्री यांच्यातल्या पारंपरिक भूमिका माहीत. आणि पराकोटीची संवेदनशीलता. त्यातून वाट काढताना कधीतरी शरीराच्या वाटा शोधल्या असशील तू स्वतःला दिलासा मिळवून देण्याकरता. किंवा स्वतःच्या भुका भागवण्याकरता. किंवा निखळ बंड म्हणून. आपण काय करतो आहोत हे अजिबात न कळता. किंवा अजूनही काही. किंवा हे सगळंच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रमाणात.
मला समजू शकतं.
या गरजा कुठून उगम पावतात, त्यांची अनुमान बांधता आली मला कायमच. त्या गरजांबद्दल जे वाटलं, त्याला सहानुभूती असं नाव देणं फारच कोरडं होईल. खोटंही. एकेकदा तुला लपवून ठेवावं माझ्याआत असं वाटण्याइतकं आपलेपण, इतकी समजूत दाटून आली तुझ्याबद्दल. मी 'मी' आहे, म्हणून आपल्यात काहीतरी सांधलं गेलं आहे हे स्वीकारलं मग मी.
नि म्हणूनच - एका निर्वाणीच्या क्षणी तुला माझं असणं न सोसून तू कापून टाकलेले दोर मला समजून घेता आले नाहीत. तुला इतक्या सहजी दोर कापता कसे आले? की आले आहेत कायमच? की आय वॉज द ग्रॅन्ड एक्सेप्शन?
होय किंवा नाही, यांतलं कोणतं उत्तर मिळालं तर मला कमी त्रास होणार आहे?
॥३॥
त्या दिवशी मऊ सुताची, काळीशार, ठसठशीत लालबुंद कलमकारी रेखलेली साडी नेसून कुणाच्याशा लग्नात मिरवताना आपण अनपेक्षितपणे समोरासमोर आलो आणि तुझी नजर माझ्यावरून फिरली. मला एकदम अंगभर डोळे चिकटल्यासारखं, कसंसंच झालं.
साडी नेसल्यावर मला कायम निराळं वाटतं काहीतरी. काय ते सांगता येत नाही. त्या सलग, प्रवाही वस्त्राच्या पात्रात आपले वेडेवाकडे बेढब आकार वितळून आपण देखणे नागमोडी होतो, इतकं कळतं.
ते देखणेपण एकाएकी मावळलं.
पण मला बाई किंवा बुवा किंवा तत्सम काहीच असण्यात रस नाही हे पक्कं कळलं होतं मला तोवर. मी सराईत बायांसारखा शांत निस्संकोचपणे पदर वक्षाभोवती नीट रेखून घेतला. अंगाभोवतीचे डोळे झटकून टाकले. डोळ्यांपर्यंत न पोचणारं हसू हसून 'काय, कसं काय?' म्हटलं आणि कंडक्टरसारखी पाय फाकून उभी राहत 'जाम उकडतं बा तुमच्या गावात.' असा एक निरर्थक न-उद्गार हवेत सोडून दिला.
मग बोलण्यासारखं काही उरलं नाही.
No comments:
Post a Comment