मॉर्निंग वॉकला येणार्या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.
हवेत हलका गारवा,
महापालिकेनं मुद्दाम पाळलेली हिरवीगार झाडं,
सिमेंटचे आज्ञाधारकपणे वळणदार रस्ते,
नजरेत रंग घुसवणारी व्यायामाची अणकुचीदार यंत्रं,
आणि एक टुमदार मल्टिपर्पज देऊळ कोपर्यात -
सगळं काही बयाजवार.
सुस्नात, अनवाणी, आणि / किंवा नुसत्याच भल्या पहाटे येऊन
गरगर चकरा मारू लागणार्या अनेकांच्या पावलांनी,
भरू लागतो खळ्यात एक मिरमिरणारा, फसफसणारा उत्साह.
बाहू फुरफुरू लागतात,
पायांना वेग येतो,
हरीच्या नावे फुटतात आरोळ्या,
डोळ्यांत चढतो आरोग्याचा खून.
माशांना कणीक, कुत्र्यांना पाव.
पक्ष्यांना धान्य, मुंग्यांना साखर.
आरोग्याच्या उपासकांना भाज्यांचे निरुपद्रवी रस कडूजहार.
दारिद्र्यरेषेच्या वर राहणारे यच्चयावत सुखवस्तू सजीव
देतात तृप्तीची ढेकर.
बांधून ठेवलेल्या गाड्यांचे लगाम सुटतात.
सवार्या निघतात.
होतात चढत्या उन्हानिशी वाढत्या रहदारीत बघता बघता फरार.
मॉर्निंग वॉकला येणार्या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.
No comments:
Post a Comment