Wednesday, 3 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस ३

लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्‍या लोकांशी वाद घालण्याच्या अजिबात फंदात न पडता – अर्थात. असल्या लोकांना बहुतकरून ‘मी आजवर १७३ पुस्तकं वाचलीत’ वगैरे हिशेब ठेवायची सवय असते आणि जनरली ते ‘दिल चाहता है’मधल्या सुबोध-कॅटेगरीत मोडतात. असल्यांच्या तोंडी कुठला शहाणा मनुष्य लागेल? असो. डायवर्जन लांबलं. तर, त्यांच्या फंदात न पडता – मी सरकारी लायब्री हा माझ्या वाचनाचा मुख्य स्रोत ठरवून सुखी झाले खरी.
उदाहरणार्थ, त्यांच्याकडची पुस्तक निवडण्याची व्यवस्था. पुस्तकांना थेट हात लावून, पान पलटून, मलपृष्ठावरचा मजकूर वाचूनबिचून पुस्तकं निवडण्याची जगन्मान्य पद्धत मग्रसंला मान्य असत नाही. साधारण चपला-बूट ज्या खोकांतून मिळतात, त्या खोक्यांच्या आकाराचे लाकडी खोके आणि त्यात पुस्तक, लेखक, किंमत, पृष्ठसंख्या इ. नोंदलेली पोस्टकार्डाच्या आकाराची आडवी कार्डं. पुस्तकांचं वर्गीकरण – उदा. कादंबरी, संकीर्ण, कविता, नाटक, निबंध, चरित्र... – दर्शवणारा एक मोठा पुठ्ठा खोक्याच्या पाठीशी उभा खोचलेला. असे वीस-पंचवीस खोके टेबलावर हारीनं लावलेले. लोकांनी या खोक्यांमधली कार्डं पेटीच्या भात्यासारखी ओढून वाचत आपल्याला हवी ती दोन – दोनच हं, लाडात यायचं नाही – कार्ड निवडून काउंटरवर नेऊन द्यायची. मग देवघेव विभागातला कर्मचारी ती कार्ड घेऊन मागच्या कपाटांच्या रांगांत गडप होणार. जर पुस्तक तुलनेनं नवं असेल, तर त्याला फार खोल सुळकांडी मारावी लागत नाही. पण जर ते पुस्तक बाबा आदमच्या जमान्यातलं असेल, तर बुडी मारण्यापूर्वी मारक्या म्हशीसारखा एक ‍कटाक्ष भेटीदाखल दिला जातो. आपण अपराधी लोचटपणानं तस्सं उभं राहायचं. ती पुस्तकं गहाळ नसतील, तर ती तुमच्या पुढ्यात यथावकाश दाखल होतील. मग त्यांतलं एक निवडून घ्यायचं. तुम्ही पुस्तक नेलंत की निवडलेलं कार्ड आत जमा होतं, जेणेकरून ते लायब्रीत परत जमा होईस्तो इतरांना लोकांना निवडता येऊ नये. व्यवस्था चोख. पण एकदा घरी नेलेल्या पुस्तकात खुपसलेली दुसर्‍याच कुठल्यातरी पुस्तकांची दोन कार्डं हाती आल्यावर या व्यवस्थेतला घपला माझ्या लक्ष्यात आला. आपल्याला आवडतीलशी तीन कार्डं एकदम मिळाली, तर चक्क ती लांबवायची, म्हणजे मग पुढचे तीन दिवस कार्ड हुडकायचे कष्ट नकोत! हे भलतंच आवडूनही मला ही ट्रिक वापरायचा धीर काही कधी झाला नाही! आमची मजल आपली सगळ्या खोक्यांमधली कार्डं पलटून ‘शास्त्र चुंबनाचे’, ‘लक्ष्मी, लक्ष्मी, कुठे चाललीस?’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ आणि तत्सम नावं माफक मोठ्यांदा वाचून दाखवून खुसफुसण्यापर्यंतच.
दर साली दिवाळी आटपून महिना-दोन महिने उलटले की दिवाळी अंक विकून टाकण्यासाठी लागणारा मग्रसंचा बंपर सेल ही त्यांच्या खाती जमा असलेली एक रोमहर्षक बाब. दहा आणि पंधरा रुपयांत मिळणारे दिवाळी अंक ही माझ्या विद्यार्थी खिश्याकरता चैनीची परमावधी होती. कित्तीतरी वर्षं मी या संधीत अक्षरशः हात धुऊन घेतले. महिनाभराचं वाणसामान आणण्याच्या दोन दणकट खाकी पिशव्या घेऊन मी लुटीला जाई आणि गोड ओझं वागवत हवेवर तरंगतच घरी पोहोचे.
पारंपरिक आणि जुन्या घरांना पडव्या-पोटपडव्या पाडून वाढवल्यामुळे त्यांना जसे विशिष्ट भोंगळ-प्रेमळ-अमिबाई आकार आलेले असतात, तशा आकारांच्या अघळपघळ इमारतींतून गावातल्या मग्रसंच्या दोन्ही शाखा नांदत. त्यांची उंच कौलारू छतं, वर्षानुवर्षांच्या वापरानंच होऊ शकतात तसे गुळगुळीत झालेले लोणकट लाकडी जिने, जुन्या शहाबादी फरश्या, लोकमान्य टिळकांची आठवण करून देणार्‍या संस्थापककालीन देणगीदारांच्या काळ्यापांढर्‍या तसबिरी, उंच पाठींची लाकडी बाकडी, तिथे बसणारी रिकामटवळी पेन्शनर मंडळी, तिथल्या सभागृहांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिथे हमखास भेटणारे गावातले उत्साही लोक, रुक्षपणाचा साक्षात अर्क म्हणावा असा कर्मचारिवर्ग, अपरिहार्यपणे त्यांच्याशी भांडणं केल्यावर ‘फूंक फूंक के रखने पडनेवाले कदम’ नि ओळख झाल्यावर होणारे लाड... आणि सरतेशेवती तिथली कितीकांनी शेरेबाजी केलेली, चिताडून ठेवलेली, पुन्हा पुन्हा बांधणी केल्यामुळे ओळीतल्या शेवटच्या शब्दापर्यंत पोचण्याकरता हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार्‍या नृसिंहाचा अवतार घ्यायला लावणारी, जुनी, नवी, पिवळी, पांढरी, फाटकी, गुलाबी बायंडिंगातली,… अक्षरशः अंतहीन पुस्तकं... हे सगळं मी पुरेपूर उपभोगलं.
लायब्री जुन्या इमारतीत नांदत असताना, इमारतीच्या बाहेरून काढलेला एक डुगडुगता माडीवजा जिना संदर्भविभागात नेत असे. तो साक्षात स्वर्ग होता. तिथलं बुटकं छत, जुन्या कपाटांच्या अंतहीन रांगा, तिथे भरून राहिलेला अस्सल जुन्या पुस्तकांचा धुळकट वास, पाणी प्यायला भीती वाटावी असा एक प्राचीन माठ, शंभरेक वर्षांच्या कालखंडात जमा होत गेलेली निरनिराळ्या आकारांची नि शैलीतली लाकडी नि धातूची खुर्च्या-टेबलं, नुसतं नावं नोंदून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट्टेल ती पुस्तकं वाचत बसण्याची मुभा...
अलीकडे काही कामानिमित्त नव्या इमारतीच्या संदर्भ विभागात गेले असता तिथे बॅंकेच्या कॅशियर काउंटरला लाज आणेल असा एक जाळीदार-कुलूपबंद-अद्ययावत काउंटर, अनेक कॉम्प्युटरांचे जुनाट डबे ठेवल्यामुळे सगळ्या संदर्भविभागाला आलेली स्वस्त सायबर कॅफेची कळा, आणि ‘बाहेर बसण्यासाठीच्या जागा संपल्या आहेत, पुढच्या वर्षी प्रयत्न करावा’ ही पाटी पाहिली.
मी अक्षरशः हाय खाऊन परतले.

०१ । ०२ । ०३ । ०४ । ०५

Monday, 1 June 2020

लायब्र्यांचे‌‌ दिवस २




आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या कल्पनेनीच माझी नांगी इतकी मोडली होती, की गावढ्या गावातून तालुक्याच्या जागी चालत येण्यापूर्वी आठवून आठवून पिशवी भरणार्‍या एखाद्या कष्टकरी महिलेप्रमाणे वेळेआधी फोन करून, आज नक्की लायब्री उघडी असेल ना हे तीनतीनदा विचारून मी तिकडे मोर्चा वळवला. 
त्यांच्याकडे नाव नोंदवताना मात्र क्याटलॉगात नजर फिरवून घेतली आणि 'अरेच्चा! 'बाइंडर' आहे यांच्याकडे शाबूत!', ''नातिचरामि'ही घेतलंय अं? वाईट नाही. तसे अद्ययावत दिसतात.', ''मी भैरप्पा''! हे कधीचं राहिलंय वाचायचं...' अशा जिभल्या चाटत आणि मनोमन शेरेबाजी करतच विचार पक्का केला. तशी पुस्तकं बदलायला मुख्य शाखेत क्वचितच गेले असेन. कारण घराजवळ पंचवीस रुपये रिक्षाच्या अंतरात एक काकू ट्रंक भरून पुस्तकं आणून पोटशाखा चालवतात अशी माहिती मिळाली आणि मग एकशेपंचवीस रुपये रिक्षाला देणं अर्थातच मागे पडलं. पण सुमारे दोन-अडीच वर्षं वापरली ती लायब्ररी. आपल्या शहरात नसताना वीकान्ताचे रकाने भरून काढणं खरं दमवणारं असतं हा साक्षात्कार होता-होताच मला लायब्रीचा शोध लागलेला. त्यातही माझं मराठी नाक मनातल्या मनात सदैव वर असे. 'महाराष्ट्राबाहेर गोठवलेली मराठी जपणारे डबकीय लोक हे, नाईलाज आहे म्हणून वाचायचं झालं!' असा एक उगाचच्या उगाच आढ्यताखोर फणकारा असायचा. पण नाही म्हणता म्हणता मी चिकार नवं कायकाय वाचलं त्यांच्याकडे. 
सुरुवातीला त्यांच्या 'गेटेड कम्युनिटी'तल्या चकचकीत ड्युप्लेक्स फ्लॅटमधून ट्रंकभरून पुस्तकांची शाखा चालवणार्‍या काकूंची जिम्मा मीही पुलंच्याच असंवेदनशीलतेनं 'अतिविशाल' क्याटेगरीत करून टाकली होती. अर्थात - त्यांच्याही बाजूनं अढी कमी नसणार. कधीच एका शब्दाहून अधिक बोलायच्या नाहीत. शोधक नजरेनं बघायच्या मात्र मी काय वाचतेय ते. हळूहळू 'अमकं वाचलंय का?' इथवर प्रगती झाली होती, इतकंच. विशीच्या अल्याडपल्याडच्या पोरी खिदळत पुस्तकं न्यायला येतात, त्या काय डोंबल वाचणारेत, ओसरेल खूळ... अशी दबा धरून बसलेली, पन्नाशीच्या अल्याडपल्याडची, कमावलेली खातरी त्यांनाही असणारच. मी आपली हे सगळं नोंदूनच्या नोंदून वर खांदे उडवून खुशाल असे. दर चारेक महिन्यांनी तेवीस किलोंमधले पंधराएक किलोतरी मी पुस्तकांकरताच वापरत असे, ती काय उगाच होय! परिणामी वर्तुळात सावध अंतरावरून एकमेकींसमोर गोल फिरत एकमेकींचा अंदाज घेणार्‍या आणि क्वचित दात विचकून मग पवित्रा बदलणार्‍या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे आमची एकंदर पुस्तक देवघेव चाले. 
यात फरक पडला, तो विभावरी शिरूरकरांचं 'खरे मास्तर' हे पुस्तक मी उचललं तेव्हा. हे पुस्तक मला तोवर भेटलं नव्हतं. विभावरी शिरूरकरांचं 'कळ्यांचे निःश्वास' हे एकच पुस्तक ठाऊक. अत्यंत विपरित परिस्थितीत जिद्दीनं आपल्या लेकींना शिकवणार्‍या आणि मग त्यांचे पुरोगामी निर्णय पचवणार्‍या गरीब मास्तराची स्तिमित करणारी आधुनिक ओळख वाचून मी अतिशय अतिशय हरखून गेले. 


त्या आनंदात देवघेवीच्या पुढच्या शनिवारी माझ्याकडून अधिकचं वाक्य सुटलं, "काय सुरेख आहे पुस्तक!" यावर काकूंनी हातातला मटा खाली करून चश्मिष्ट नजर माझ्याकडे वळवली. हसू नाही. नुसती सावधपणे जोखणारी नजर. एक क्षण माझ्या काळजाचा ठोका चुकला असणार बहुतेक. पण मग हसल्या हलकंसं. नकळत हुश्श झालं मला! तेव्हापासून त्या आवर्जून एखाद्दुसरं वाक्य उच्चारायला लागल्या दर शनिवारी. सुचवायला लागल्या क्वचित एखादं पुस्तक. 
तितकीच ती मैत्री. कोणत्याही आबदार ग्रंथपालाशी हवी तितकीच आणि तशीच. काकू क्वचित हॉलमध्ये गवार मोडत असल्या, क्वचित यजमानांना सूचना देत असल्या - तरी त्या होत्या अंतर्बाह्य ग्रंथपालच, हे मी स्वीकारून टाकलं. तिथला मुक्काम संपतानाही त्या मैत्रीत विशेष भावनात्मक देवाणघेवाण झाली नाही. 'चाललात का? अच्छा.' इतपतच संवाद. 
पुढे पुष्कळ वर्षांनी एका दिवाळी अंकातला लेख वाचून काकूंनी आवर्जून वाचल्याचं कळवलं. 'वाचला. कुठे असता?' उत्तर. पूर्णविराम. इतकाच संवाद. पुढचा फापटपसारा नाही! मग मी त्यांचं ग्रंथपालपद अजूनच पक्कं करून टाकलं. 

०१ । ०२ । ०३ । ०४ । ०५

कर्तव्य

संतुलित, सुरक्षित आणि साळसूदपणे क्रूर असलेल्यांची घरटी पसरत चाललीत दिवसेंदिवस वेगाने सर्वदूर.
अंडी उबताहेत.
योग्य वेळी अंड्यांतून बाहेर यावीत गोमटी, गोजिरवाणी, एकसारखी, स्वस्थ आणि संवेदनशील अणकुचीदार पिल्लं
आणि
सर्वत्र साधला जावा बहुमतांचा नैसर्गिक समतोल
म्हणून यथायोग्य तापमान राखणारे उष्ण पिवळे दिवे लावलेत थोडथोड्या अंतरावर.
शासन आहे सावध सर्वांसाठीच
डोळ्यांत तेल घालून.
सुज्ञ आणि सुजाण पक्षी असाल,
तर अधिकाधिक अंडी घालणं हेच तुमचं आणि माझंही विहित कर्तव्य आहे.
पुढे श्रीसरकार समर्थ आहेच.


Sunday, 31 May 2020

नांदेल शांतता

जागा मिळेल तिथे 
खुपसून, खचाटून
दिवाळी अंक, मासिकं, पुस्तकं
जुनी, नवी, फाटकी, पिवळी पडलेली, चकचकीत
शुभ्र कोवळी
धूळ खात.
सिरियली. सिनेमे
अमेरिकन. ब्रिटीश. युरोपीय. आशियाई
काळे न्वार
रंगीत सदाबहार.
टॉरेन्टांवर, लॅपटॉपवर, फोनवर, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मांवर
शेअर इट मॅन.
गाण्यांची लयलूट
ऑनलाईन ऐका, उतरवा, यूट्यूबवरचा खच उपसा.
मुलाखती. वेबिनारं. भाषणं. वाद. परिसंवाद.
जागा मिळेल तिथे सगळीभर.
एकदा नीट आवरून ठेवायला हवंय सगळं.
नीट सापडेलसं कुठेतरी.
मग काही बघावाचाऐकायचं नाही.
विनागिल्ट नांदेल शांतता.

Friday, 29 May 2020

लायब्र्यांचे दिवस १

लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी इतरत्र मोर्चा वळवण्याच्या वयात असतानाच कधीतरी ‘माणिक वाचनालया’नं आपला गाशा गुंडाळून तिथे रंगांचे डबे विकणार्‍या कुणालातरी जागा करून दिली. पण ती जागा माझ्या स्मरणात इतकी पक्की आहे, की अजुनी कधी स्वप्नात लायब्री आलीच, तर तिला त्या गाळ्याचंच नेपथ्य असतं. सोबत पुस्तकांबद्दलचं एक हव्यासयुक्त, असुरक्षित, आतुर आकर्षण. लायब्र्यांच्या बरेवाईटपणाचे निकष मनात आकाराला येण्यापूर्वी मिळालेली ही लायब्ररी जेमतेम एका गाळ्यात वसलेली होती. लांबुळका गाळा. तिच्या तिन्ही भिंतींना काचदरवाजे असलेली, पुस्तकांची पातळ कपाटं. मधे लांबुळका काउंटर. गाळ्याच्या दर्शनी भागात, काउंटरला लंबरेषेत मासिकं मांडलेली. लहान मुलांची पुस्तकं भिंतीवरच्या कपाटांच्या पायथ्याशी. तिथल्या ग्रंथपालांच्या – हा शब्द मला पुष्कळ पुढे कळला. तेव्हा ‘खडूस’, ‘राखुंड्या’, ‘ढापण्या’ इत्यादी विशेषणं विशेषनामासारखी वापरलेली ऐकू येत – खडूसपणाबद्दल वाडीतल्या अनेकांची ठाम मतं होती. पण त्यांना माझ्याबद्दल ममत्व असावं. माझ्यातला भावी वाचक वेळीच हेरून आपल्या व्यवसायबंधूंसाठी एक गिर्‍हाईक पोसण्याचाही त्यांचा मनोदय असू शकेलच. पण ते काहीही असलं, तरी माझ्या अंगावर तिथे कुणी कधी खेकसत नसे. मी म्हणीन ती पुस्तकं म्हणीन तितका वेळ बघायला मुक्तद्वार असे. सगळ्याच लायब्रर्‍यांमध्ये हाती लागलेल्या विशेष पुस्तकांच्या आठवणी कायम आपल्या हाती पडलेल्या तिथल्या प्रतींची छबी घेऊनच येतात. तशा तिथून आणून वाचलेल्या ‘हॅन्स अ‍ॅंडरसनच्या परीकथा’ मला अजूनही तशाच्या तशा आठवतात. त्यांतल्या एका कथेचं मधलं पान गहाळ होतं, तर अलीकडे कधीतरी नवीकोरी प्रत विकत मिळाल्यावर मी अचूक त्या पानापाशी जाऊन अधाश्यासारखा तो मजकूर वाचून घेतला.

तिथल्याच कपाटातून आणलेलं शरलॉक होम्सच्या कथांपैकी एक वाचून मला भीतीनं अक्षरशः ताप भरलेला आठवतो. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत सोडलेल्या घंटेच्या दोरीवरून साप सोडून पुतणीचा खून करवणार्‍या काकाची ती कथा होती. भाषांतरात तिचं नाव ‘कृष्णकारस्थान’ होतं नक्की, पण भाषांतरकार काही केल्या आठवत नाही. ‘शिवणाच्या दोर्‍यानं हत्ती जखडण्याइतकं महाकर्मकठीण काम’ किंवा ‘’ग’ची बाथा होणे’ इत्यादी वाक्प्रचार शिकून मग जमेल तिथे त्यांचा यथाशक्ती वापर करणे आणि घरातल्या लोकांना चिमखडे बोल ऐकण्याचा आनंद पुरवणे हेही गुन्हे माझ्या खाती जमा आहेत. मातापितर सुज्ञ असल्यामुळे म्हणा किंवा तत्कालीन आईबापांना चिमखडे बोल नामक चाळे ऐकवण्यातली मज्जा ठाऊक नसल्यामुळे म्हणा – माझी तितकी बदनामी झाली नाही, इतकंच. आता नवल वाटतं, पण लायब्री तशी शुद्ध धंदेवाईकच असूनही तिथे ‘जादूची अंगठी’, ‘उडता खजिना’ आणि तत्सम पुस्तकं कधीही दिसली नाहीत. साधं चंपक आणि ठकठकही नसे. परीकथा, साहसकथा, नीतिकथा, बोधकथा, पंचतंत्र, बिरबल-तेनालीरामा वगैरे चातुर्यकथा, ताम्हनकरांची पुस्तकं, किशोर-आनंद-कुमार यांसारखी मासिकं, थोरांची चरित्रं इत्यादी प्रकरणं असत. याचा अर्थ ग्रंथपालांना – तेच लायब्रीचे मालक होते – काहीएक भूमिका होती असणार. त्याचं आता अप्रूप वाटतं. आता ते भेटण्याची शक्यता कमीच, पण मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडलं असतं. ‘मीच ती आगाऊ बारकी पोरगी’ असं सांगून थोडे नॉस्टाल्जिक लाड वसूल करण्यापलीकडचं मूल्य त्या गप्पांना येऊ शकलं असतं. बाकी काही जरी नाही, तरी तत्कालीन लोकांच्या वाचनाबद्दलचे आणि वाचनाच्या सवयींबद्दलचे त्यांचे शेरे-ताशेरे ‘किमान शब्दांत कमाल जहाल वर्णन’ या चाचणीला उतरणारे असले असतेच. ते आता होणे नाही. आता असे ग्रंथपाल-चालक-मालक अस्तंगत होण्याचा जमाना आहे…
०१ । ०२ । ०३ । ०४ । ०५

Monday, 25 May 2020

घालमेल

काळोख आहे अस्फुट.
हातून काहीतरी जिवंत, उष्ण, सोनेरी निसटून चालल्याची हुरहुर.
अर्धा पाय मागच्याच पायरीवर अजून.
डोळे भिरभिरताहेत.
जागा शोधताहेत टेकायला.
थोड्या वेळापुरता हक्क.
कान टिपू पाहताहेत जमेल तितकं.
एखादा उद्गार...
गोष्टीचा निसटता तुकडा..
सोबतीचे सगळे जण हरवले कुठे?
धडधड काळजात.
इंद्रियांची घालमेल.
काळोख.
लखलखाट.
सन्नाटा.
कडकडाट.
उसासे.
काळोख.
कधी पडेल पडदा?

Sunday, 17 May 2020

शहर तिरकं केलंय कुणीतरी

शहर तिरकं केलंय कुणीतरी
ताटाखाली वटकन लावल्यावर आपसूक वाहत जावं कालवण उताराच्या दिशेनं,
तसं सगळं दैन्य धावत निघालं आहे घरागावाच्या दिशेनं. 
कायद्याचे अडसर न जुमानता.
सांडून जाईल आता आयुष्याबाहेर.
ताट होईल लख्ख,
चाटूनपुसून जेवल्यासारखं.
जेवणारा संतुष्टावला आहे का?
की भूक शिल्लक आहे अजून पोटात?
कुणी विचारीना.

Monday, 4 May 2020

आपणही आपल्या टेम्प्लेटात


प्रियकराच्या टेम्प्लेटात बसवलेला माणूस
सवयीने साखसुरत नांदतो टेम्प्लेटात.
अनवट गाणी अधूनमधून.
काळजीकाट्याचा शब्द एखाद्दुसरा.
शिळोप्याच्या गप्पा मूठपसा.
आधाराचा चिमटीभर भास.
डार्लिंग, आय लव्ह यू... अनावर.
तरी
एखाद्या भगभगीत सकाळी,
भलताच कुणी भासतो
तेव्हा धस्स होतं काळजात.
उसवल्या बाहीच्या जुन्या टीशर्टासारखं
सवयीनं घरचं झालेलं एकटेपण.
कुठेतरी, कधीतरी, क्वचित थोडी
जुनी दुखरी ठसठस... त्यावर
आपली आपणच घातलेली फुंकर.
पण
पुढे होऊन खांद्यावर हात ठेवायची
हिंमत होता होत नाही,
आवंढा अडकतो घशात,
कुणाकरता कळत नाही,
मन घट्ट करून मिटून घ्यायची पापणी.
फडफडणार्‍या सैरभैर साक्षात्कारांवर
ठेवायचा एक बरासा दगड.
मुकाट्यानं माघार घ्यायची,
हात ठेवायचे कटाक्षाने आपले आपल्यापाशीच.
हळूहळू पुन्हा सुखरूप परततो
आपणही आपल्या टेम्प्लेटात.

Thursday, 16 April 2020

नाही उदासी, ना आर्तता...

॥धॄ॥
आपल्यात शेवटच्या काही दिवसांत चाललेल्या प्राणी-पातळीवरच्या आरोप-प्रत्यारोपांपैकीच एक कुठलातरी दिवस. तुझ्या शेजारचा आवाज सकाळच्या अनन्वित गर्दीच्या निर्दय प्रहरात कुणाशी तरी तारस्वरात भांडत असलेला. बहुधा आपल्या ताकदीच्या मर्यादेपलीकडे जाऊन. माझ्याशी निर्वाणीचं भांडतानाही तू मला चक्क स्विच ऑफ केलंस आणि तुझा ताबा घेणारा, संरक्षक आवाज लावून त्या आवाजाला म्हणालीस, "गप्प. एकदम गप्प. आपण त्या पातळीवर जाऊन नाही भांडू शकत." तो आवाज काहीतरी तणतणत, पण तत्काळ शांत झाला. आणि आवाजात सहनशील अलिप्तपणा आणत माझ्याशी बोलती झालीस तू.
मी अवाक.
तुझ्या या आवाजाशी फार कष्टानं लढले आहे मी कायम, त्यामुळे मला समजू शकतो त्याचा परिणाम. फरक इतकाच की मी रीसिंविंग एन्डला नव्हते. यू वेअर डन विथ मी. तो फोन मी तिथेच संपवला.
तिथून पुढे बोलण्यासारखं काही उरलं नाही. 


॥१॥
तुझ्या घरातल्या लोकांचा कायम संताप येई मला. खरं तर तो तुझाच यायला हवा हे कळत नसे असं नाही. पण असा थेट राग करता येत नाही हे स्वत:शी न उच्चारताच स्वीकारून मी त्यांच्यावर बंदुकीचं टोक रोखून मोकळी होत असे.  
जिच्या मऊ पोटाला हात लावून, तोंडावरून तिच्या सुती पदराचा काठ फिरवत दुपारी लोळत पडायला तुला आवडे, ती तुझी आई. संसार सांभाळून पोस्टाचं काम करणारी, संस्कार भारतीच्या शिबिरात माफक - भगवं समाजकार्य करणारी, वडलांच्या समोर ब्रही उच्चारू न शकणारी. मला अनाकलनीय असलेला एक कंडिशन्ड, चाकोरीबद्ध, काहीसा दयनीय पण, कावेबाज बाईपणा होता तिच्यात. 
मला ठाऊक आहे, कावेबाज या शब्दावर आजही तुझ्या डोळ्यात थंड परका राग उमटेल. पण मला कायम वाटत आलं आहे, क्रूरपणे कोपर्‍यात चेपली गेलेली माणसं परिस्थितीशी जुळवून घेताना अधिकाधिक दबक्या - मवाळ चेहर्‍याची होत जातात. पण त्यांना कधीच न गाजवता आलेली सत्ता वाटा शोधत राहतेच. ती बाहेर पडताना अनेकदा संभावित क्रौर्याचा चेहरा घेऊन येते आणि 'बायकाच बायकांना छळतात...'छाप सुलभीकृत प्रतिक्रियांना जन्म देऊन जाते. तशा घासून गुळगुळीत झालेल्या तिच्या प्रतिक्रिया मला असत. आपण एका रविवारी एकत्र पहुडून वाचलेलं 'रणांगण' आठवतं तुला? त्यातल्या हॅर्टाच्या आईची आठवण येई मला अनेकदा तुझ्या आईकडे पाहून. शरीरा-मनानं विशविशीत झालेली, आपल्याच पोराच्या उत्कटतेचं उधाण पेलण्याची ताकद न उरलेली, म्हातारं कातडं डोळ्यांवर ओढून शुष्क-अलिप्त होत गेलेली ती असहाय्य बाई आणि तिच्या मांडीत पुन्हा पुन्हा आवेगानं शिरत थोडी ऊब शोधू पाहणारी हताश हॅर्टा. आपल्याला पुस्तकातली पात्रंही आपापल्या जागेवरून निरनिराळी दिसतात. इथं तर हाडामांसाच्या नात्यागोत्याच्या माणसांचा प्रश्न. कितीही स्पष्टपणे बोललं वा कितीही आडवाटांनी आपलं आपल्यापाशी राखून ठेवलं, तरीही एका रेषेवर कसे येऊ शकणार होतो आपण? पण आपण निर्लज्जपणे होता होईतो भाबडे राहू पाहत असतो. 


॥२॥
तू पहिली व्यक्ती नव्हतीस माझ्यातली ठिणगी पाहणारी. अखेरचीही नव्हतीस. तरी काय बांधून पडलं आहे आपल्यात, ज्याची ओढ मला अजूनही जाणवते?
मला आठवते तुझी नजर. बाईला विस्फारून न्याहाळणारी.
बाई म्हणजे काय? मला माहीत नाही. कधी नव्हे ती त्या दिवसांत मी या प्रश्नावर अडखळले आहे. 
बाई असणं म्हणजे काय? स्तन? पाळी येणं? गर्भाशय असणं? मूल जन्माला घालण्याची क्षमता असणं? योनी असणं? हे तर फक्त शरीराचे तपशील झाले. मग ज्या पुरुषांना आपण बाई असण्याचा साक्षात्कार होतो त्यांचं काय? तेही तर बाई असतातच. त्यांना बाई असल्यासारखं वाटतं, हेच मुळी पुरेसं आहे. अंगभूत सहनशीलता, वात्सल्य, पोषणाची आस असणं? छे! हे माझ्यात असलंच कधी, तर ते सिलेक्टिवलीच असतं हे मला पक्कं ठाऊक आहे. तरी मी बाई आहेच. 
मी बाई आहे, कारण मला बाई असल्यासारखं वाटतं. म्हणजे काय वाटतं? मला अजुनी या प्रश्नाचं धड उत्तर देता आलेलं नाही. 
मी तोवर घरीही कधी फारसा स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता. येत असे सगळं करायला. आई आजारी पडली खूप, तेव्हा बाबांचीही धावपळ. मग आपोआप शिकणं झालंच. पण त्याआधीही तिचा ’शिकून घ्या बाई’छाप पारंपरिक आग्रह नसे. नंतरही 'इथे आहात तोवर लाड करून घ्या!’ असलं पंखाखाली घेणंही नसे. यायला हवं सगळं. वेळ पडेल तेव्हा समजून करायलाही हवं. बस. त्या मानानं बाबाच वेडे म्हणावेत असे लाड करत. करतात अजुनी. 
पण आपण भरकटलो.
तर तोवर मी घरीही कधी फारसा स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता. तिथलं घर हे मी पहिलंच मांडलेलं घर. इतकं मनापासून मांडलं मी ते घर, की एकदा आईबाबा आलेले असताना त्यांनी हौसेनं स्वैपाक करून थोडी मांडामांड बदलून दिली, तेव्हासुद्धा मला पोटात कुठेतरी थोडं ’माझं स्वयंपाकघर का बदलताय?’ असं तद्दन बायकी मालकी वाटून मग अपराधी वाटलं होतं. सगळ्या गोष्टींवर आपली पुरती पकड असल्याचा, संसारी स्त्रियांच्या नजरेत आपसुख उमटतो तो, आत्मविश्वास मी तिथे कमावला. अळशीच्या बिया, खडीसाखर, अस्सल मध अशा काढ्याच्या सामानापासून ते बिर्याणी मसाला, आलंलसणीची पेस्ट, मेतकुटाची पुरचुंडी असलं काहीही तिथे सापडू शके. तिथल्या डब्यांच्या जागा आणि त्यांची जीवितकार्यंही मी नेमून दिलेली होती. तिथली मोलकरीण मला जबाबदेही करी. रात्री कधी चुकून विरजण लावलंच तर ते पहाटे आठवणीनं उठून फ्रीजमध्ये टाकणं किंवा केराची बादली बाहेर ठेवली आहे ना ते रात्री झोपण्यापूर्वी - वेळी अंथरुणातून उठूनही - तपासणं, ही कामं मी हौसेनं अंगावर ओढवून, माझीच असावीत अशा सहजपणे आणि हक्कानं, करत असे. ते घर मी राखतही असे फार प्रेमानं. गाद्यांच्या बैठका करून त्यांना साजेशा रंगांचे अभ्रे घातलेल्या उशा रचणं. कित्तीतरी महिने कुढल्यासारख्या खुरटलेल्या कढीपत्त्याला ताक, कंपोस्ट, हलक्या हातानं केलेली छाटणी आणि मग थेट निर्गुणी भजनं ऐकवून हलके हलके मुडात यायला लावणं. बाहेरची कड नसल्यामुळे धुता न येणार्‍या ओट्याला स्पंजानं निरपून तकतकीत राखणं. हौसेनं घेतलेले मातीचे दिवे पाजळून - वेळी जुन्या सलवारीच्या नाड्यांच्या वाती करून - संध्याकाळी साजर्‍या करणं. एखादी नवपरिणीता काय करेल, असा इतमाम. दारात रांगोळी नि व्हरांड्यात तुळस नव्हती, इतकंच काय ते. त्यात ते मांजराचं पिल्लू. काय जीव पाखडला मी त्याच्यावर. त्याला हगायला मऊ मुरमाची माती काय, झोपायला जुन्या सुताची खोळ काय. त्याच्याकरता साय काढून ठेवणं काय. त्याच्याशी तासनतास लोकरीचा गुंडा घेऊन खेळणं काय... भातुकली खेळल्यासारखी खेळले मी... एक दिवस ते पोर परतलंच नाही, त्या आठवड्यात शक्यतांनी सैरभैर होऊन अखेर माझा जीव त्यातून सोडवून घेईस्तोवर.  
या सगळ्यातलं काय खुणावत होतं तुला? 
परंपरा ज्याला बाईपण म्हणते ते कंडिशन्ड बाईपण? ब्रेकपचे वण जपणारी माझ्यातली दुखरी, फिल्मी प्रेमिका? माझ्या तरुण शरीराचे सहज निरोगी आकारउकार? माणसांच्या पसार्‍यातून हट्टानं उठून आलेल्या माझं नवं, हुळहुळं एकटेपण? की या सगळ्यावर सायीसारखी धरून राहिलेली माझ्या उत्कटतेची मखमाली लव? 
मला ठरवता येत नाही. 
आठवतं ते फक्त नव्यानं फुटलेलं स्पर्शाच्या तहानेचं पान.
अतिशय अतिशय मजा आली मला माझं शरीर या प्रकारे अनुभवताना. ना त्याबद्दल मला कधी नैतिक पेच पडले ना कधी अपराधीपणा वाटला. दोन सज्ञान माणसांच्यात परस्परसंमतीनं होणारा व्यवहार करताना अपराधी वाटून घेण्याची काय गरज, इतका स्वच्छ विचार कायमच होता माझ्या डोक्यात. 
पण तुला त्या सगळ्याबद्दल काय वाटत होतं? अर्थाचे तिढे पुन्हा पुन्हा पुढे ओढून पाहत बसायची खोड जात नाही.
स्त्रीच्या शरीराशी मांडलेला हा खेळ तू पहिल्यांदा खेळत नव्हतीस. याआधीही कुणाकुणासह प्रयोग केले होतेस तू. तू कधी ते लपवलं नव्हतंस. तुझ्या डोक्यात नव्हता काही स्पष्ट विचारच नसावा बहुधा त्याबद्दल. आपल्याच डोक्याच्या, तनामनाच्या आणि बुद्धीच्या निरनिराळ्या बहुरंगी गरजांचे अर्थ लावण्याची जबाबदारी अशाच कोणत्यातरी बायकी गॉसिपीय सो-कॉल्ड बोल्ड चर्चील सेशनमधून थेट समोर ठाकल्यावर थरकलेली पाहिली आहे मी तुला. तुला नीती अनीती चूक बरोबर प्राकृत विकृत इत्यादी प्रश्न पडले असणार. नवल नाही. तुला पुरुष आणि स्त्री यांच्यातल्या पारंपरिक भूमिका माहीत. आणि पराकोटीची संवेदनशीलता. त्यातून वाट काढताना कधीतरी शरीराच्या वाटा शोधल्या असशील तू स्वतःला दिलासा मिळवून देण्याकरता. किंवा स्वतःच्या भुका भागवण्याकरता. किंवा निखळ बंड म्हणून. आपण काय करतो आहोत हे अजिबात न कळता. किंवा अजूनही काही. किंवा हे सगळंच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रमाणात.
मला समजू शकतं.
या गरजा कुठून उगम पावतात, त्यांची अनुमान बांधता आली मला कायमच. त्या गरजांबद्दल जे वाटलं, त्याला सहानुभूती असं नाव देणं फारच कोरडं होईल. खोटंही. एकेकदा तुला लपवून ठेवावं माझ्याआत असं वाटण्याइतकं आपलेपण, इतकी समजूत दाटून आली तुझ्याबद्दल. मी 'मी' आहे, म्हणून आपल्यात काहीतरी सांधलं गेलं आहे हे स्वीकारलं मग मी. 
नि म्हणूनच - एका निर्वाणीच्या क्षणी तुला माझं असणं न सोसून तू कापून टाकलेले दोर मला समजून घेता आले नाहीत. तुला इतक्या सहजी दोर कापता कसे आले? की आले आहेत कायमच? की आय वॉज द ग्रॅन्ड एक्सेप्शन? 
होय किंवा नाही, यांतलं कोणतं उत्तर मिळालं तर मला कमी त्रास होणार आहे?


॥३॥
त्या दिवशी मऊ सुताची, काळीशार, ठसठशीत लालबुंद कलमकारी रेखलेली साडी नेसून कुणाच्याशा लग्नात मिरवताना आपण अनपेक्षितपणे समोरासमोर आलो आणि तुझी नजर माझ्यावरून फिरली. मला एकदम अंगभर डोळे चिकटल्यासारखं, कसंसंच झालं. 
साडी नेसल्यावर मला कायम निराळं वाटतं काहीतरी. काय ते सांगता येत नाही. त्या सलग, प्रवाही वस्त्राच्या पात्रात आपले वेडेवाकडे बेढब आकार वितळून आपण देखणे नागमोडी होतो, इतकं कळतं. 
ते देखणेपण एकाएकी मावळलं. 
पण मला बाई किंवा बुवा किंवा तत्सम काहीच असण्यात रस नाही हे पक्कं कळलं होतं मला तोवर. मी सराईत बायांसारखा शांत निस्संकोचपणे पदर वक्षाभोवती नीट रेखून घेतला. अंगाभोवतीचे डोळे झटकून टाकले. डोळ्यांपर्यंत न पोचणारं हसू हसून 'काय, कसं काय?' म्हटलं आणि कंडक्टरसारखी पाय फाकून उभी राहत 'जाम उकडतं बा तुमच्या गावात.' असा एक निरर्थक न-उद्गार हवेत सोडून दिला. 
मग बोलण्यासारखं काही उरलं नाही. 

Sunday, 12 April 2020

बाकी

कुठेकुठे वळवळणारी, निसटत्या शेपट्यांची टोकं दिसतात.
बाकी
चिमण्या. कावळे. पोपट. दयाळ.
वेडे राघू. शिंपी. कोतवाल.
नाचण. साळुंक्या. लालगांड्या बुलबुल.
मधमाश्या. कुंभारमाश्या. फुलपाखरं. 
एखादा चमकता निळाभोर खंड्या.
खारींचा कलकलाट.
होळीच्या रात्री अंगावर रंग माखून घेतल्यावर दिसतात तशी भांबावलेली कुत्री मोकाट.
सोनेरी उन्हं.
गाडीच्या चाकाएवढाल्ले लालकेशरी चंद्र.
निळंशार चकचकीत आभाळ.
चैत्रानं जडावून मातलेल्या सृष्टीचा उताट.
बाकी 
कुठेकुठे 
भेदरलेल्या निसटत्या, जिवंत शेपट्यांची टोकंच तेवढी दिसतात.