Tuesday, 21 January 2020

व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं

शाळेत असताना माझ्याकडे लाकडी चौकटीची दगडी पाटी होती. डब्बल. जाम जड व्हायचं दप्तर तिच्यामुळे. पण डब्बल दगडी पाटी ही अप्रूपाची गोष्ट असल्यामुळे मी ती प्रेमानं तश्शी वागवत असे. तिच्यावर रुळानी लिहिताना टकटक-टकाक-टक असा मस्त आवाज यायचा. बर्‍यापैकी लांबीची पेन्सिल एका विशिष्ट कोनात धरून खाली ओढली की ती ठरावीक अंतरानं उड्या मारत यायची आणि ठिपक्याठिपक्यांची रेष मिळायची. तसल्या रेषांनी चितारलेला नारळ बाबांनाच काढता येई. फार मस्का न लावायला लावता ते काढूनही देत. तशीच त्यांची चित्रातल्यासारखी सरस्वती. माझ्या पाटीवर कधीच एकाच्या आकड्यांनी रेखलेलं सरस्वतीयंत्र नसायचं. बाबा वीणेसकट चिकनाट सरस्वती चितारून द्यायचे. त्या पाटीवर लिहायला यायची तशी मजा प्लॅस्टिकच्या पाटीवर आली नाही, हा माझ्यातला लहानपणापासूनच सुप्तावस्थेत असलेला नॉस्टाल्जियाचाच फणा असणार. हळूहळू पाट्यांची सद्दी संपलीच. मग कितीतरी काळ वह्या आणि पेन्सिली असायच्या. फ्लोराच्या पांढर्‍यावर गुलाबी फुलं नि हिरवी पानं असलेल्या पेन्सिली, गडद मोरपिशी रंगाच्या – षटकोनी आकारामुळे घरंगळताना डौलदार शांतपणे आणि एक विशिष्ट आवाज करत जाणार्‍या कॅम्लिनच्या पेन्सिली, लाल-काळ्या उभ्या रेषांच्या साध्यासुध्या नटराजच्या पेन्सिली… सगळ्यांकडे याच पेन्सिली कशा काय असायच्या कुणाला ठाऊक. टोकयंत्राला तेव्हा आम्ही कटर म्हणायचो. कुणी ‘शार्पनर्’ असं म्हटलं, की ‘काय बाई फ्याशनेबल असतात लोक...’छापाचा, मराठी शाळेचा खास शिक्का असलेला कुचकट कटाक्ष टाकायचो. तसली कटरंपण लोकांकडे एकदम यंग्राट असायची. विशेषतः ज्यांचे नातेवाईक परदेशी असत, अशांकडे तर भलभलत्या आकाराचे खोडरबर, ट्रकापासून मिकीमाऊसपर्यंत वाट्टेल त्या आकाराची कटरं, कधीकधी हे दोन्ही एकत्र, आणि कधीकधी तर या दोघांसकट एक दाढी करायला असतो तशातला ब्रश असं एकत्रही असे. तो ब्रश कशाला, तर म्हणे खोडल्यावर वा टोक काढल्यावर होणारा कचरा झाडायला. हे मला तेव्हाही अत्यंत बावळट वाटायचं, हाही माझ्यातला लहानपणापासून सुप्तावस्थेत असलेला मध्यमवर्गीय नैतिक उच्चभ्रूपणा असणार! तर – कटरं. मला या कटरांनी पेन्सिलीला टोक काढायला अजिबात आवडत नसे. काही कलात्मक मुलं त्या टोक काढण्याच्या प्रक्रियेतून निघणार्‍या झालरी मोडू न देता हळुवार हातांनी मिळवून त्यांची फुलं चिकटवून ग्रीटिंगंही करत. माझ्यात तो टाकाऊतून टिकाऊपणा नव्हता. मला कटरपेक्षाही आवडायचं, ते बोटभर लांबीचं, पत्र्याचं, मिटून ठेवता येणारं पातं. दाढीची ब्लेडं सगळ्यांकडे असायची. पण या पात्यात जो गुंडपणाचा मिनिएचर आभास होता, तो काहीच्याकाहीच होता. त्या पात्यानं किंवा मग चक्क आईच्या सुरीनी पेन्सिलीला टोक काढून घ्यायला मला आवडे. एकतर खचाखच पेन्सिलीची टवके उडवण्यात आकर्षक हिंस्रपणा होता. शिवाय पात्यानं टोक केल्यावर प्रत्यक्ष शिसाचं टोक लहानसं ठेवून पेन्सिल ‘मोडप्रूफ’ करता येत असे. मग काही काळ ‘पॉइंट फायचं लीड’ (हे सगळं एकत्र आणि असंच म्हणायचं असे) असलेल्या नाजूकनार पेन्सिली असत. त्यांच्या शिसांची पातळशी डबी असे. ती शिसं न मोडता पेन्सिलीत घालणं हा एक इंजेक्शन देण्याइतका कौशल्याचा कार्यक्रम असायचा. मग का कुणाला ठाऊक, त्या पेन्सिली मागे पडल्या आणि पुन्हा साध्यासरळ पेन्सिली असायला लागल्या. शाळेत बॉलपेनांचे आणि शाईपेनांचे दिवस सुरू होऊन वर्षानुवर्षं लोटल्यावरही मी खासगीत खरडायला कितीतरी काळ पेन्सिल वापरली. बिनओळीच्या कागदांच्या पिवळसर पातळ कागदांच्या नि लाल बांधणीतल्या चोपड्या आणि पेन्सिली. पेन्सिलीनं लिहिण्यात एक अजब सहजता आणि अनाग्रहीपणा असे. आता लिहिली ती काळ्या दगडावरची रेघ, खबरदार जर मागे फिराल तर, असा, गळ्यापाशी सुरी ठेवणारा धाक त्या लिहिण्यात नसे. बॉलपेनं तर चक्क सोयच. अजूनही रेनॉल्डची पेनं बघून क्षणभर त्यांच्या पारदर्शक अंतरंगाचा, पांढर्‍याशुभ्र अंगाचा नि परीटघडीच्या कपड्यांवर टाय लावून भांग पाडून एखाद्या गुडबॉय मुलानं बाहेर पडावं तसं दिसणार्‍या त्यांच्या तरतरीत टोपणांचा मोह होतो. पण त्यात शाईपेनांचा रोमान्स नाही. शाईपेनांची कथाच वेगळी. लिहून लिहून चांगल्या लागलेल्या शाईपेनानं लिहिताना, मान कलती करून त्या अक्षरांकडे पाहत राहिलं की उमटत जाणार्‍या अक्षरांच्या ओल्या शाईची चमक क्षणभर दिसून बघता बघता डोळ्यासमोर दिसेनाशी होते. पुढची ताजी अक्षरं चमकू लागतात. मावळतात. आपल्याच हातून उमटलेल्या अक्षरांतून जणू एखादी चमकती लहर दौडत जावी, तसा काहीसा भास होतो आणि थरारायला होतं. ही मजा मी फार काळ फार लुटली. अजूनही काळ्या-करड्या अंगांची नि सोनेरी टोपणांची चायनापेनं आणि काळ्या-निळ्या शाईच्या बाटल्या जमवून ठेवलेल्या असतात, त्या या कधीकाळी अनुभवलेल्या जादूच्या आठवणींपोटीच. एकसारखी दिसणारी, टपोरी, चमकदार, रामदासांनी वर्णन केलेल्या काळ्या तेजाळ मोत्यांसारखी अक्षरं लिहायची आणि चूष म्हणून त्यांना शीर्षरेषेची टोपी न घालता तस्सं बोडकंच ठेवायचं ही माझी लाडकी खोड. काही औपचारिक लिहिताना, किंवा उत्तरपत्रिका लिहिताना शब्दांना शीर्षरेषा देण्याला पर्याय नसे. पण त्यामुळे त्या लिहिण्याला दामटून ओळीत उभं केल्याचा आणि कवायत करायला लावल्याचा भास होई. त्याविरुद्धचं माफक बंड म्हणून माझ्या पत्रा-डायर्‍यांतून कायम शीर्षरेषेशिवायचं लिहिणं असे. आता लिहायला कागदपेनं नि पेन्सिली-खोडरबर वापरायची सवय सुटली. शीर्षरेषेशिवायचं लिहिणंही सुटलंच. कुणीतरी शीर्षरेषेशिवायचा एखादा टंक घडवला, तर ते टंकायला मजा येते का हे पडताळून पाहायला मजा येईल. पण तीही नॉस्टाल्जिकच. आता काहीतरी लिहायचं असतं, तेव्हा बोटं शिवशिवायला लागतात. कळपाट हवा होतो. कागद असलाच जवळ, तरी समाधान होत नाही. वरून पाणी प्यायल्यासारखं, तहानलेलंच राहायला होतं. ही कळपाट आपलासा केल्याची खूणच म्हणायची. अजून तरी फोनवर इतकालं टंकायच्या कल्पनेनी दडपायला होतं, समोर मोठा कळपाट हवा वाटतो. म्हणजे अजून पुढचं माध्यमांतर घडायचंय. इथे थोडं स्थिरावल्याचा भास असताना आधीच्या माध्यमाकडे नॉस्टाल्जिक होऊन बघण्यातली गंमत अजून पुसटशी शिल्लक आहे. या टप्प्यावर मला एक मजेशीर अनुभव आठवतो.

आमच्या भाषावर्गात हस्ताक्षराचा हौशी अभ्यास करणारी एक मुलगी होती. तिला सराव म्हणून आम्ही तिला आळीपाळीनी मजकूर खरडून देत असू. ती अमराठी असल्यामुळे आपोआप रोमन मजकूरच दिला जाई. एकदा तिनं मला मराठीतून खरडताना पाहिलं, नि माझ्या मागे लागून 'मी दोन्ही शिकते' असं म्हणत मराठी मजकूर घेतला. दुसऱ्या दिवशी मला बघितल्यावर भूत पाहिल्यासारखं म्हणे - तू टोटली वेगळीच मुलगी आहेस मराठीत! आधी मी हसण्यावारी नेलं. पण तिनं मागूनमागून दोन्ही मजकूर परत-परत नेले. मग एकदा आपलं आश्चर्य उलगडून सांगितलं. एका लिपीत मी रोखठोक होते, एकात अबोल. एकात बिनधास्त, एकात सावध, इत्यादी. हस्तसामुद्रिकशास्त्राइतपत मिठाची चिमटी याही अभ्यासात गृहीत धरली, तरी मला तो फरक झटकून टाकता आला नाही पार. आपल्या अवघ्या विचारविश्वावर लिपीसकट भाषेचा किती प्रचंड प्रभाव असतो, हे जाणवून थबकायला झालं.

दगडी पाटी ते कळपाट व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं. अजूनही लिपी मात्र तीच आहे. भाषाही. इतका दिलासा पुरेसा नाही?

Wednesday, 15 January 2020

भांडणांची चैन परवडणारी नाही

मी कधीही उजव्या विचारसरणीची समर्थक नव्हते. पण होता होईतो राजकीय घटनांवर थेट मतप्रदर्शन टाळत असे. ज्या विषयाचा आपला अद्ययावत अभ्यास नाही, त्या विषयात न पडण्याचं बंधन पाळत असे. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली घटना, त्यानंतरचं सत्ताधार्‍यांचं वर्तन आणि त्या सगळ्याला सर्वसामान्य माणसांनी दिलेला प्रतिसाद या गोष्टी माझ्याकरता टर्निंग पॉइंट ठरल्या. माणसांमधल्या क्रूरपणानं स्तिमित व्हायला झालं. तथाकथित तर्कशुद्ध, तथाकथित विवेकी, मध्यममार्गी, तटस्थ, वा थेट उजव्या विचारसरणीने पछाडलेले, आपल्या घराची राखरांगोळी करूनही परधर्मीयांना वा परदेशी लोकांना धडा शिकवू इच्छिणारे माथेफिरू... वा यांपैकी कोणत्याही घटकांचं मिश्रण वाहणारे – कुणीही घडलेल्या घटनांचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करत असेल वा त्या घटनांकरता विद्यापीठाला जबाबदार धरत असेल वा तसं दर्शवत असेल; तर मला अशा माणसाशी संभाषण करण्यात रस नाही – मग तो नातेवाईक, परिचित, आप्त, मित्र, सहकारी, शिक्षक... कुणीही असो. माणूसकीला आवाहन करून, प्रेमानं जिंकून, पटवून देऊन माणसांचं मतपरिवर्तन करू शकण्याचं मोल मला ठाऊक आहे. पण माझ्यात ती ताकद आज तरी नाही. एका प्रकारे ही मी – आणि कदाचित माझ्यासारखं कुणीही – एकाकी पडत जाण्याची प्रक्रिया आहे, हे मला कळतंय. म्हणूनच आजवर ज्या मित्रांशी वैयक्तिक कारणांमुळे कटोविकटीची भांडणं मांडली, पण जे लोक आज उजव्या विचारसरणीला विरोध करताहेत, अशांशी असलेली माझी भांडणं मी म्यान करते आहे. आज भांडणांची चैन परवडणारी नाही.

Friday, 3 January 2020

इतक्यात वाचलेली पुस्तकं

श्री. बा. जोशींच्या 'उत्तम मध्यम'ला विषय असा नाही. कधी कुणा गुजराती संताचा परिचय करून देतील, कधी बिहारात आपलं मराठीपण खडीसाखरेसारखं विरघळवून टाकणाऱ्या कुणा उपेक्षित विद्वानाबद्दल सांगतील. कधी टागोरांनी गौरवलेल्या मराठी शिल्पकाराच्या शिल्पाचं कौतुक रचतील; कधी लंडन लायब्ररीसारख्या आगळ्यावेगळ्या संस्थेची महती सांगतील. वरकरणी अस्ताव्यस्त भासणाऱ्या या सगळ्या पसाऱ्यामागचं सूत्र हळूहळू जाणवत जातं. ते आहे शब्दांवर, भाषांवर, शब्दकोशांवर, ग्रंथांवर आणि या साऱ्यावर मनोमन जीव जडवणाऱ्या रसिक विद्वानांवर असलेल्या प्रेमाचं.
तळवलकरांच्या काळातल्या 'मटा'मधून प्रसिद्ध होणाऱ्या श्रीबांच्या सदराचं संकलन म्हणजे हे पुस्तक.
त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची शब्दकळा. जेठा, पालाण, नेमानेम, वावदूक, खर्ची, वेसणबंद, गळाठा, ताजवा, कीर्दखतावणी, वानोळा, घेलाशेटी... अशा, जुन्या मराठीतल्या शेलक्या शब्दांची जागोजाग नि नेमकी पखरण त्यांच्या लिखाणात आढळते. तसेच अतिशय लक्ष्यवेधी पद्धतीनं वापरलेले आणि थबकून दाद द्यायला लावणारे कंटकशल्य, व्यतिक्रम, तिष्ठन्ती, अश्रुतपूर्व, अवसरविनोदन, वाणिग्वृत्ती.. असे गीर्वाणभाषेतले भरजरी साज. हे कमी म्हणून की काय, जागोजागी येणाऱ्या उद्धृतांची अस्सल मराठी वळणाची आणि अचूक भाषांतरं तर पुरवलेली; शिवाय मेट्रोग्राफी (नगरसंशोधन), ॲकेडमिक  (विद्यायतनिक), टॉटेम्स (कुलचिन्ह)... अशी बहुधा स्वरचित आणि चपखल पारिभाषिक भाषांतरं. कुठे कुणा लेखकानं गच्ची या शब्दाकरता योजलेल्या 'चंद्रशाळा' या शब्दाला दाद देणं, कुठे थोरामोठ्यांच्या घसरणीसाठी, 'इंद्रपतन' अशी सांस्कृतिक संभार लेऊन आलेली दिमाखदार शब्दयोजना. कोशांची आणो कोशकारांची नाना वैशिष्ट्यं दाखवत, कौतुकानं त्यांचे किस्से सांगत करून दिलेली ओळख. उपेक्षित विद्वानांना कृतज्ञभावानं दिलेली दाद. नाना भाषांमधल्या सांस्कृतिक वैभवाबद्दलची जाण, त्याबद्दलचा आणि त्याकरता आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींबद्दलचा अपरंपार आदर, आणि या साऱ्याची निदान ओळख तरी मराठी जनांना व्हावी, अशी आस. सगळंच या लिखाणात शिगोशीग भरलेलं आहे. संदर्भग्रंथांची अप्रूपानं केलेली शिफारस, निव्वळ शैलीचा साज, तोंडात ठेवून चघळावेतसे शेलके शब्द... कशाहीकरता वाचावं असं पुस्तक. मजा आली.

~
उत्तम मध्यम
श्री. बा. जोशी
पद्मगंधा प्रकाशन
२०१०

Monday, 9 December 2019

नाटक - ३

अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसं, कुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं की काही चांगलं घडतं का, काही वाईट घडतं का... हाही एक नॉस्ट्राडेमसीय विचार अधूनमधून कुरतडत राहतो मनाला. पण बरेच दिवसांत स्वप्न पडलं नाही, की तोही विचार मागे पडतो. कधीतरी पुन्हा तसं स्वप्न पडतं आणि मी सकाळी जाग आल्यावरही इतकी भारलेली, खूश असते… की हे सगळे फायद्यातोट्याचे विचार मागे पडतात आणि फक्त हातातून सुटून जाणार्‍या स्वप्नाचे सुटेसुटे धागे होता होईतो हातात धरून ठेवायची आनंददायी धडपड तेवढी उरते. अर्थातच तपशील दर वेळी निराळे असतात. स्थळं निराळी. वेळाही निराळ्या. पण काही तपशील मात्र आश्चर्यकारकरीत्या समान. थिएटर असतं कुठलं ना कुठलं. नाट्यगृह हा शब्द मुद्दाम नाही वापरलेला. कारण कधीतरी नाटक दिसतं नुकतंच सुरू झालेलं, कधी नाही. मग मला कळत नाही, हे सिनेमाचं थिएटर आहे की नाटकाचं. ओळखीची नसतात ही थिएटर्स. हे गडकरी रंगायतन किंवा हे वडाळ्याचं आयमॅक्स किंवा हे शिवाजी मंदिर... किंवा हे क्रायटेरियन थिएटर – असं छातीठोकपणे सांगता यावं अशी नसतात ती. त्यांच्यातले कितीतरी घटक एकमेकांत मिसळून गेलेले असतात, त्यांच्या कडा पुसट झालेल्या असतात. कधीकधी नाटक चालू असतं रंगमंचावर. पण बरेचदा मी घाईनं माझी खुर्ची शोधत असते. मनात कमालीची उत्कंठा, आता पडद्यावर काहीतरी सुरू होईल आणि तत्पूर्वी मला माझी जागा हुडकून तिकडे बसलं पाहिजे, असा अदृश्य, हवाहवासा धाक. एकटीच असते मी कायम. कधीच सोबत कुणी असल्याचं आठवत नाही. थिएटर कायम गर्दीनं फुलून गेलेलं. पण सगळी अपरिचितांची गर्दी. सगळीभर पसरलेला सोनसळी प्रकाश. वावरणार्‍याला आश्वस्त वाटावं इतकाच उजेड घेऊन तो उरलेल्या अंधारात मिसळून दिला, की तयार होईल अशा पोताचा. त्यात कध्धीच कुणालाच भीती वाटू नये कसलीही, अशा मऊ स्पर्शाचा. पायर्‍या असतात चिकार. आणि मी त्या घाईनं उतरत वा चढत असते. भिरभिरत्या नजरेनं माझी जागा शोधत. मी जागेवर पोचते, आसनस्थ होते आणि स्वप्न झोपेत विरघळून जातं. सिनेमातल्या एखाद्या स्वप्नदृश्याच्या कडा बाजूच्या धुक्यात विरघळलेल्या असाव्यात, तसं. माझ्या मनातल्या अनिवार उत्सुकतेबद्दल मनात अनिवार उत्सुकता असूनही मी स्वप्नात कधी माझी जागा शोधल्यावर खुर्चीत बसून पुढचं नाटक वा सिनेमा पाहिलेला नाही. दुसर्‍या कुणाचीतरी गोष्ट ऐकण्याबघण्यातला, आपलं आयुष्य पुस्तकासारखं आणि पुस्तकाइतकंच काही काळ मिटून ठेवू शकण्यातला, चौथ्या भिंतीच्या जागची मोक्याची जागा मिळवण्यातला थरार असेल त्यात? काय की...

***
नाटक १
नाटक २

Thursday, 12 September 2019

विंगेतली घरं

एखादं घर आपलं वाटायसाठी त्या घरात प्रत्यक्ष राहावं लागतं थोडंच? पुस्तकातली घरं तर बोलूनचालून कल्पनेत रंगवलेली आणि त्यामुळे काहीशी स्वप्नील, अतिरंजित असणारच. पण सिनेमातली घरं? ती तर नजरेला स्वच्छ दिसतात. नि तरी त्यांतरेंगाळणारा वास कळतो. तिथे उकडत असेल, की गार वाटत असेल तेही कळतं. आपल्याच घरात एका विशिष्ट वेळी पडणाऱ्या उन्हाच्या मऊ तुकड्यासारखेच तुकडे ती घरंही देऊ करतात.
असल्या घरांच्या आठवणी काढायला बसलं, की मला सगळ्यांत आधी आठवतं, ते ‘गोलमाल’मधलं त्या बहीणभावंडांचं घर. कसं अगदी बहीणभावंडांनाच पुरेलसं, अटकर मापाचं नि तरी दोघांना स्वतंत्र अवकाश देणारं घर आहे ते. त्यात राहणार्‍या माणसांच्या मापानंच बेतलेले असावेतसे पलंग नि खुर्च्या. नि शिवाय आणीबाणीच्या वेळी त्यांच्या तोतया आईचं हे थोरलं बूड घरात शिरवून देणारी स्वैपाकघराची चपखल खिडकी. आईबाप नसलेल्या त्या भावंडांना त्या घरात अजिबात एकटं-पोरकं वाटलं नसणार, अशी खातरजमा ते घर नक्की करून देत असणार.
प्रतिमा कुलकर्णींच्या ‘प्रपंच’मधलं घर तसंही त्याच्या खास लोकेशनमुळे ग्लॅमरस आहे. पण त्या घराचं खासपण माझ्या दृष्टीनं त्याच्या लोकेशनमध्ये नाही. तिथे कमालीच्या प्रामाणिकपणानं घर रचून देणारी त्या मालिकेतली जिवंत-चिरंजीव पात्रं त्या घराला खासपण बहाल करून गेली आहेत. अण्णांचा झोपाळा, अगदी साधासा दिवाण नि लोड-तक्क्ये असलेली माजघरवजा खोली, पेटीचे सूर मिरवणार्‍या मागीलदारच्या किंचित खासगी ओसर्‍या, नाटकाच्या तालमी नि नाना रंगांच्या गप्पा रंगवू देणारे अनेक साधेसुधे-खासगी-काळोखे कोपरे नि आवार. पुढे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’मध्ये तेच घर वापरल्यामुळे त्या घराची गोडी माझ्याकरता जरा विटलीच. त्याही कारणानं ती मालिका मला पुरेशी आवडली नाही कधी. ‘प्रपंच’मधल्या घराच्या ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या मानानं ‘४०५ आनंदवन’मधली सोसायटी आणि तिथले ब्लॉक अगदीच सरधोपट होते.
यश चोप्रांच्या सिनेमांमधली बटबटीत परीकथीय घरं कधीच आवडली नाहीत. पण ‘दिलवाले दुल्हनिया…’मधला तो पंजाबातला वाडा मात्र त्याला अपवाद म्हणायचा. कायम लपून प्रेम करायला गुप्त गच्च्या, आपल्या माणसांना भेटायची संधी देणार्‍या ओसर्‍या नि पडव्या नि जिने नि व्हरांडे, त्यांतही कुणी वडीलधारं समोर टपकलंच तर सुमडीत आडोसा घेऊ देणारे कोनाडे नि कोपरे... असं सगळं बयाजवार त्या वाड्यात असणारच. वर संध्याकाळी हुरहुरून कुणाकरता उदासबिदास व्हायचं असल्यास मोठ्ठाले कट्टे असलेल्या नि सूर्यास्त नि सूर्यफुलं नि शेतं दाखवणार्‍या हवेशीर खिडक्याही असणार. कोकणातल्या पारंपरिक नेपथ्याला सरावलेल्या मला हे पंजाबी घर नव्हाळीचं होतं नि शिवाय योग्य त्या वयात भेटलं. पुढे ‘दिलवाले...’ची जादू ओसरून गेल्यावरही तो वाडा लक्ष्यात राहिला तो राहिलाच. ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या अतिरिक्त ‘चांदोबा’शैलीतल्या त्या गच्च्या-संपृक्त बेगडी घराची भूल मला पडली नाही, यात पुस्तकांच्या अक्षरशः चळतींमध्ये उभं राहून ‘किस केल्यावर बाळ होईल?’ असा अडाणी प्रश्न विचारणार्‍या नंदिनीचा जितका वाटा होता, तितकाच ‘दिलवाले...’मधून आधीच आपल्याश्या वाटलेल्या त्या वाड्याचाही होताच.
तितका सुखकारक नि रोम्यांटिक नसूनही खूप आवडलेला बंगला ‘खोसला का घोसला’मधला. खरंतर त्या घरातलं सगळंच किती चिमुकलं आहे! घरातली मुलं मोठी झालीत नि त्यांना आता हे जुनं घर पुरेनासं झालं आहे हे त्या घरातल्या मंडळींच्या वावरातून स्पष्ट दिसतं. असं वाटतं, या ताडमाड कार्ट्यांचे पाय इथल्या बिछान्यांतून नक्की बाहेर येत असणार नि सकाळी घाईच्या वेळी हमखास एकमेकांवर टकरी होऊन चिडचिडाटही होत असणार. शिवाय आंघोळीला नि कधी-कधी संडासलाही आधी कुणी जायचं यावरून हाणामार्‍या होतच असणार. पण तरी त्या घरात त्या वरकरणी विजोड वाटणार्‍या मंडळींना सांधणारं काहीतरी आहे खास. तिथल्या भिंतींना अमृतांजन आणि घर गळल्यामुळे आलेली नि सुकलेली बुरशी आणि जुना झालेला डिस्टेंपर आणि वर्षानुवर्षांच्या फोडण्या असा सगळा संमिश्र वास असेल, पण दिल्लीतल्या थंडीत त्या घरी शिरल्यावर मस्तपैकी ऊबदारही वाटत असेल. ते घर सोडून नव्या टोलेजंग बंगल्यात जाताना सिनेमाच्या अखेरीस मंडळींना नक्की भरून आलं असणार.
अशी कितीतरी घरं. ‘डेल्ही सिक्स’मधलं ते गिचडीबाज गच्च्या असलेलं, कबुतरं नि लोणची नि वाळवणं नि लग्न न करता घरात थांबून राहिलेरी देखणी-अबोल आत्या असणारं घर. ‘हम हैं राही प्यार के’मधला तो साधासरळ मध्यमवर्गीय बंगला नि काचेचं छप्पर असलेली गच्चीतली बरसाती. ‘रंगीला’मधलं खाली भाडेकरू नि वर मालक असणारं कनिष्ठ मध्यमवर्गीय एकांडं घर नि त्याच्या पायर्‍यांवर रात्री-बेरात्री मिली आणि मुन्नानं मारलेल्या गप्पा. ‘बॉम्बे’मधलं मुंबईतल्या जुन्या, उंच छताच्या इमारतींचा छायाप्रकाश अचूक पकडणारं, तावदानं-गच्ची, गॅलरी, चिमुकलं स्वैपाघर नि च-ह-क्क-ह चार खुंट्या नि छत असलेला लाकडी पलंग मिरवणारं मुरत गेलेलं घर...
मी ज्या बारा-पंधरा खर्‍याखुर्‍या घरांमधून बाडबिस्तरा हलवला आहे, त्यांच्याइतकीच जवळची, घरासारखी झालेली ही घरं. सिनेमे नि पुस्तकं नि नाटकं नि सिर्यलीत कसले रमता, असा गद्य प्रश्न विचारणार्‍या लोकांची घरं उन्हात बांधून मी मिळवलेली. नो मेंटेनन्स, चकटफू घरं.. 

Sunday, 8 September 2019

इतक्यात वाचलेली पुस्तकं

One foot on the ground: A life told through the body
Shanta Gokhale
Speaking Tiger Publication


जेव्हा एखादा लेखक शरीराबद्दल बोलतो, तेव्हा तो ओशाळतोय का, त्याला पोटातून गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतोय का, तो उत्तेजित होतोय का, तो मूर्तिभंजन करू इच्छितो आहे का, किती जोरानं आणि कोणती किंमत भरून… हे सगळं त्याच्या सुरामधून उघड-उघड कळत असतं आणि त्यावरून मजकुराचा आवाका नि दिशा ठरत असते. शांताबाईंच्या आत्मचरित्राची चौकटच मुळी शरीर ही आहे. ही चौकट वापरून त्यांचा सूर इतका सहज, मोकळा, अलिप्त, ठाम आणि सूक्ष्मपणे तिरकस आहे; की सांगण्याचं बरंचंसं काम हा सूरच करतो. त्यात अवघडलेपणा अजिबातच नाही. जे सांगितलं जातं आहे, त्यापल्याडचा विचारही करण्याची गरज नाही, मुभा तर नाहीच नाही असा अदृश्य धाक वाचकाला घालणारा चिरेबंदीपणा आहे. 
दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थळवर्णनाचा अट्टाहास न करताही त्यांच्या कथनातून जिवंत झालेली दादर आणि आसपासच्या परिसरातली सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची मुंबई. कसल्याही प्रकारचे भावुक कढ न काढता, शब्दबंबाळ न होता, अपरिहार्यपणे आणि आपसुख उभं राहत गेलेलं असं नेपथ्य फार कमी वेळा बघायला मिळतं. (कथनातून दिसलेल्या मुंबईची आठवण काढायची झाली, तर त्यांच्याच दोन मराठी कादंबऱ्या - त्या वर्षी, रीटा वेलिणकर, आणि त्यांनी अनुवादित केलेली जेरी पिंटोची 'एम ॲन्ड बिग हूम' ही कादंबरी आठवते.)
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सूक्ष्म, धारदार, भेदक विनोद. स्त्रीपुरुषामधल्या सामाजिक असमतोलाची नेमकी जाणीव, त्याबद्दलची अप्रीती आणि तुच्छता, शब्दाच्या अचूक निवडीचं भान, आणि प्रखर आत्मविश्वासातून येणारा निस्संकोचपणा - हे सगळं त्यांच्या विनोदातून भेटतं. एकत्र कुटुंबातल्या नात्यांतली विसंगती वर्णन करणारा  'अग्गंबाई, वन्सं मुतल्या!' हा किस्सा हा त्याचा निव्वळ एक मासला.
हे पुस्तक मराठीतही असायलाच्च हवं नि ते खुद्द शांताबाईंनीच लिहायला हवं असं अगदी मनापासून वाटतं.
***

नाइन्टीन नाइन्टी
सचिन कुंडलकर
रोहन प्रकाशन


नव्वदीत मराठी मध्यमवर्गीय समाजाचा पोत बदलायला सुरुवात झाल्यावर त्यापूर्वीच्या अनेक गृहीतकांमधली विसंगती आणि छद्म हळूहळू ठळक व्हायला लागली. या पुस्तकातून कुंडलकरांचा रोख त्यांकडे आहे हे स्पष्ट जाणवतं. अशा विसंगती प्रकाशात आणायला, यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे आणायला, एक प्रकारचा मूर्तिभंजक बिनधास्तपणा लागतो. पण त्याचबरोबर आपण ज्या दोषांवर टीका करतो आहोत, त्याच दोषांच्या सापळ्यात आपला पाय अडकत तर नाही ना, हे सतत तपासून बघणारा सावध डोळसपणाही लागतो. पहिली बाब कुंडलकरांकडे आहे, हे अभिनंदनीय आहे. पण दुर्दैवाने दुसरी बाब मात्र नाही. परिणामी त्यांची अभूतपूर्व कसरत होत असलेली जाणवते. आपल्यापूर्वीच्या पिढ्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचण्याची जवळजवळ सक्ती म्हणावी अशी अपेक्षा केली जाते म्हणून होणारी रास्त चिडचिड आणि त्याच वाचनाच्या सवयीतून मिळालेल्या गोष्टींबद्दलची कृतज्ञता - हे या गोचीचं एक उदाहरण. नॉस्टाल्जिया, स्वैपाक, मूल्यं.. अशा अनेकानेक बाबतींतल्या अगदी अश्शाच गोचीची अनेक उदाहरणं पुस्तकभर विखुरलेली दिसतात.
पण त्याचबरोबर 'ज्याचे कुणी नसते, त्याचा हिंदी सिनेमा असतो' हे आणि अशी अनेक दाणेदार वाक्यंही ते सहज लिहून जातात. चकित करतात. आज तिसरं सहस्रक सुरू होऊन वीस वर्षं व्हायला आली तरीही मध्यमवर्गीय जाणिवांना 'बोल्ड' वाटणाऱ्या अनेक गोष्टींविषयी सहज मोकळेपणानं लिहितात. गॅजेट्स, इंटरनेट, माध्यमं, एकटेपण, शरीर, नैराश्य यांसारख्या अनेक विषयांवर नवं-ताजं बोलतात. परिणामी प्रचंड परस्परविरोधी अडगळसदृश गोष्टींचा खच, त्यातच नेमड्रॉपिंगचा अकारण पसारा, आणि मधूनच लक्कन चमकून जाणारी हिरकणीसारखी काही वाक्यं हा 'नाइन्टीन नाइन्टी'चा साधारण साचा म्हणून उरतो.
बाकी कुंडलकरांच्या ब्लॉगचं आणि सदरलेखनाचं हे संकलन आहे याची कल्पना आहे. पण त्यातून सदरामधल्या काही वादग्रस्त गोष्टी टाळलेल्या स्पष्ट दिसताहेत. मग एकंदर घाटाचा विचार न करता, ब्लॉगवर लिहिलेली एक कथा तशीच घुसडून का बरं छापली असावी? विचार करकरूनही त्यामागचं कारण कळलं नाही.
***

टाहोरा
अनिल साबळे
लोकवाङ्मय गृह प्रकाशन


या कवितांबद्दल काही समीक्षात्मक म्हणण्याची माझी लायकी नाही, इच्छा नाही. निव्वळ त्यांकडे लक्ष्य वेधून घेण्यासाठी हे टिपण.
अगदी साधे, अनलंकृत शब्द. पाऊस. मधमाश्या. अस्वलं. मोर. वासरं. निळ्या भणभणणाऱ्या माश्या. पाणी. भूक. जंगलाशी अभिन्नजीव असणं. शाळा शिकण्यातल्या तडजोडी आणि कोंडमारे. व्यवस्थांनी जंगलाचा गळा आवळत नेल्यावर, व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचारानं भूक उघडीवाघडी केल्यावर, मायबापाच्या-निसर्गाच्या-जंगलझाडीच्या मायेपासून अपरिहार्यपणे सुटं होत गेल्यावर -  कवितेमधून दुःख उमटू शकणं.
हे सगळं या कवितांमध्ये आहे. एक कविता उद्धृत करते आणि गप्प होते -

समोर कोरा कागद असला तरी
कविता सुचत नाही
पोतंभर पिठाची कणीक मळताना
कविता सुचते... पण तेव्हा
हात पिठात बुडलेले असताना
मला तरी लिहिता येत नाही
अर्धवट भिजलेलं पीठ सोडून कविता.
मऊसूत मळलेल्या कणकेचे
गोल गोळे करताना
शब्द ओठावर दाटून येतात
उतू आलेल्या वरणासारखे
मुलं पोटभर जेवून आश्रमशाळेत बसली म्हणजे
मी धरतो आंब्याच्या सावलीची वाट
पुस्तक छातीवर मांडून
मी घनदाट झोपतो
तीनची बस गोंगाट करीत आली म्हणजे
धडपडत उठतो. तोंडावर पाणी शिंपून
मी चालू लागतो आश्रमशाळेकडे
संध्याकाळी घरी येताना
पायाला चिकटून येतात
भाताची शुभ्रं शितं
नव्या शब्दांसारखी
कविता तर अशीच असते
पोटभर जेवलेल्या मुलांसारखी.

***
The testaments
Margaret Atwood
Penguin Random House UK


मूळ कलाकृती साहित्यातली, तिच्यावर आधारित टीव्हीमालिका, त्या टीव्हीमालिकेतल्या घडामोडी पचवून-वापरून परत लेखकानं आपला शिक्का उमटवत पुढे नेलेलं कथानक - हे आज-आत्ताच घडू शकणारं, माध्यमांमधली अंतरं मिटवून-गिळून टाकणारं अजब वास्तव ॲटवुडच्या या कादंबरीतून भेटलं. आता 'The handmaid's tale'वरच्या मालिकेच्या चौथ्या पर्वाला पुनश्च लेखकाला शरण जाणं भाग आहे, हे लक्ष्यात आल्यावर मनापासून हसायला आलं. ॲटवुड नामक लोभस-लबाड हडळीला मनोमन एक नमस्कार ठोकला.
या कादंबरीची नायिका सर्वसामान्य नाही. पण सर्वंकष सत्तेला रूढार्थाने आव्हान देणारी भव्योदात्त व्यक्तीही नाही. ती माणूस आहे. चिवट आहे. तगून राहायसाठी काय वाट्टेल ते करणारी, त्याचं समर्थन करणारी, आणि आपण समर्थन करतो आहोत हे जाणून असणारी डोळस व्यक्ती आहे. शोषल्या जाणाऱ्या, जीवनासक्त माणसांच्या मनोव्यापारांमधलं प्रचंड क्रौर्य, आपसांतल्या राजकारणांना येणारी धार, मांजरपावलांनी आपल्याआत वस्तीला येत जाणारं हीण हे ॲटवुडचं होम पिच. ते या कथानकाच्या पूर्वार्धात सर्वार्थानं अवतरलं आहे. आपण जगायचं की नैतिकता जगवायची या द्वंद्वात रूढ नीतिमूल्यांचं हास्यास्पद, अर्थहीन, असंगत होत जाणं बघताना हबकून जायला होतं. तो या पुस्तकातला जबरदस्त भाग.
उत्तरार्ध मात्र त्या मानाने काहीसा कमअस्सल. गोष्टीची आपल्यावरची पकड कुठेही ढिली होत नाही, उत्कंठा कमी होत नाही, घटनांचं जाळं अविश्वासार्ह वाटत नाही, वाचताना श्वास रोखला जातोच. ॲटवुडचं ते कौशल्य वादातीत आहे. पण त्या सगळ्या भागाला एखाद्या भाराभागवतीय कुमारवयीन साहसकथेच्या शेवटाचे रंग आहेत. आधीच्या पुस्तकात आणि याही कथानकाच्या पूर्वार्धात मानेवर सुरी ठेवणारी आणि भयानं गोठवून टाकणारी वातावरणातली गुदमर हरपली आहे.
अर्थात - तरीही आज आणि उद्याच्या सीमेवरचे, गृहीतकंच खोलवर तपासणारे अनेक प्रश्न पडतातच. लोकशाही, मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुषसमता यांसारखी, आज आपण गृहीत धरून चालतो ती मूल्यं खरोखरच कालातीत आहेत? की उद्याच्या युगात ती लोपूही शकतील? नि तरीही माणसं जगू पाहतील मिळालेल्या अवकाशात तितक्याच समरसतेनं? उत्तरांसाठी कदाचित फार थांबायला लागणार नाहीसं दिसतं, हा खरा डेंजरस भाग.


Sunday, 18 August 2019

...पंख पसरून उडून जातो.


तेलाचा हात लावून मळलेल्या कणकेचा मऊ लुसलुशीत गोळा हातावर धरून,
तव्यावरची पोळी आणि दिवसाच्या गरगरत्या चाकाला येऊ लागलेली जिवंत लय
अशा दोन्हींकडे काणाडोळा करत,
दिवस रेंगाळू देतो,
आणि
कावळ्याच्या आर्जवी सुरासमोर शरणागती पत्करून प्रेमळ होतो आपण.
कुणावर तरी का होईना-
निरपेक्ष प्रेम करू शकण्याच्या मोहक कल्पनेलाच शरण जातो.
जमेल तितका लांबवतो प्रेमाचा क्षण.
पण कधीतरी कावळ्यावर उगारतोच लाटणं.
कावळा असू शकत नाही क्षमाशील.
त्यालाही असतं पोट.
डूख धरतो,
चकित करतो,
मनात भीतीचा डंख पेरून जातो.
हळूहळू पोळ्या सुरळीतपणे मऊसूत होत जातात,
खिडकी होते निष्प्राण,
दिवस यंत्रासारखा तालासुरात धावू लागतो.
कावळा विसरतो डूखही.
मानेला अनोळखी झटका देतो,
पंख पसरून उडून जातो.


Friday, 19 July 2019

राक्षस, पोपट आणि लिंगभाव

राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो, तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये विखुरलेला असतो, असं एक निरीक्षण आहे. होरक्रक्सच्या रक्षणार्थ तडफडणार्‍या व्होल्डरमटप्रमाणे हे स्त्रीपुरुष सदैव या जादुई पोपटांच्या संरक्षणाच्या तजविजीत असतात. त्यांची ही यादी. ती अपुरी आहे, हे सांगणे न लगे. इच्छुकांनी यथाशक्ती भर घालावी.
पुरुष
  • कमालीचं जहाल, आतड्यांची जाळी होईल इतक्या प्रमाणात, टाळूला घाम फोडेल असं तिखट खाणे. या खाण्याचा आविष्कार सार्वजनिक ठिकाणी झाला आणि सार्वजनिक ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्ती उपस्थित असल्या,तर परिणामकारकता वाढते. पण हा मुद्दा तसा यादीतल्या सगळ्याच गोष्टींना कमीअधिक प्रमाणात लागू आहे.
  • टीव्हीवर कोणत्याही प्रकारच्या खेळांचे सामने तन्मयतेनं पाहणे. वेळी त्यासाठी चिडचिड, धुसफुस, कटकारस्थानं, दादागिरी, आडमुठेपणा, टोमणे, चपळ हल्ले… इत्यादी गोष्टींचा वापर करून रीमोट हस्तगत करणे. या सामन्यांपायी टीव्हीवरच्या डेलीसोप्सची गळचेपी होत असल्यास या पोपटाची परिणामकारकता वाढते. पण टीव्हीवरच्या डेलिसोप्समधल्या कुठल्या बाईचं कुठल्या बाप्याशी मागल्या दारानी लेटेस्ट संधान बांधलेलं आहे आणि कुठली नणंद सध्या कोणत्या विषाच्या गोळ्या कुणाला देते आहे याची यच्चयावत आणि अद्ययावत माहिती बाळगून असतानाही आपण त्या गावचेच नाही असं सतत प्राणपणानं सिद्ध करत राहणे हाही पौरुषाविष्काराचा एक पोटभाग असल्यामुळे,तुम्हांला डेलिसोपबद्दल खरा तिरस्कार वाटतो की नाही याच्याशी गळचेपी-आनंदाचा थेट संबंध नाही. एरवी डेलीसोप्स बघता बघता अधिकाधिक कल्पक आणि सर्जनशील शिव्या देऊन विरुद्ध पार्टीला त्यात असलेला रस ही किती भयानक गोष्ट आहे हे सिद्ध करत राहण्याचा एक मार्ग कायम उपलब्ध असतोच. शिव्यांची अभिव्यक्ती हाही पौरुषाविष्काराचा एक पुरातन पोपट आहे हे सांगण्याकरता अनेक जण आसुसले असतील. पण अलीकडे आधुनिकतेवर क्लेम करण्यासाठी या पोपटावर विरुद्धलिंगी पार्टीनंही आक्रमण केलेलं असल्यामुळे तूर्त त्यात न पडणं इष्ट. 
  • बाहेर जाताना कुठे जातो आहोत, किती वाजता परत येणार आहोत याबद्दल घरात अवाक्षरही न सांगणे. जर सांगून जाण्याची नामुष्की ओढवलीच तर सांगितलेली वेळ न पाळणे. त्याबद्दल फोन वा मेसेज करून न कळवणे.
स्त्रिया
  • घर, स्वैपाकघर, न्हाणीघर, टेबलाचा कप्पा इत्यादींपैकी झेपेल त्या टेरिटेरीत आपल्या निकषांवर आधारित स्वच्छता पाळणे आणि मुख्य म्हणजे त्याच निकषांनुसार इतर लोक कसे भयावह अस्वच्छतेत लोळणार्‍या डुकरासमान आहेत,हे डुक्कर हा शब्द प्रत्यक्ष न वापरता निरनिराळ्या साटल्यपूर्ण प्रकारांनी तपासत, व्यक्त करत, सिद्ध करत राहणे. ‘मला नाही असलं चालत’ हे भरतवाक्य या संदर्भात विशेष परिणामकारक मानलं जातं.
  • रंगांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटांचं ज्ञान आपल्याला असल्याचं निरनिराळ्या अगम्य नावांचा वापर करून सिद्ध करणे,त्याचप्रमाणे हे ज्ञान विरुद्ध पार्टीला नाही हे विविध प्रसंगी आणि प्रकारे सिद्ध करून फिदिफिदि वा करुणार्द्र हसणे.
  • बाहेर जाण्यासाठी तयार होताना ठरलेल्या वेळेपेक्षा किमान अर्धा तास आणि कमाल कितीही उशीर करणे आणि त्याबद्दल विरुद्ध पार्टीकडून ऐकवले जाणारे अत्यंत स्टिरिओटाइप्ड-गुळगुळीत टोमणे धन्यधन्य होऊन ऐकणे. मानेला एक अर्धवट कौतुक अर्धवट तुच्छता दर्शवणारा झटका देता आल्यास परिणामकारकता डबल. 
  • पाल-झुरळ वा तत्सम प्राण्यांना बघून किळस अधिक भीती अशी एक संमिश्र किंकाळी फोडणे – बादवे, किंकाळी फोडणे आणि चक्कर येणे या गोष्टींचा कमांड परफॉर्मन्स हे अतीव महत्त्वाचे आणि परिणामकारक पोपट आहेत, पण ते इतके सनातन आहेत, की तूर्त त्याबद्दल बोलणं हे थोडं औट ऑफ फ्याशन झालेलं आहे. त्यामुळे ते बाजूला सारण्यात येत आहे – आणि / किंवा नारळ फोडता येत नाही हे कौतुकानं सांगणे आणि / किंवा गॅसचा सिलेंडर बदलण्यासाठी विरुद्ध पार्टीला पाचारण करणे. हे तसे एकाच लेव्हलचे पोपट आहेत. याच्याऐवजी तो, त्याच्याऐवजी हा... असं सहज चालण्यासारखं आहे.
  • कुठूनही कुठेही पोचल्यानंतर तत्काळ फोन करून आईला,असल्यास सासूला, असल्यास नवर्‍याला आपण सुखरूप पोचलो आहोत हे कळवणे. विरुद्ध पार्टीकडूनही हीच अपेक्षा बाळगणे आणि त्यांच्या यादीतल्या पोपटांच्या यादीबरहुकूम ती कधीच पूर्ण होणार नसली तरीही दर वेळी नव्याने संताप, भांडण, तमाशा ही साखळी यथासांग वापरणे.
असो. यादी अपुरी असल्याची नम्र जाणीव आहेच. तरी भर घालण्याचे करावे....

Thursday, 4 July 2019

रविवार चढत जातो प्रहराप्रहरानं


शुक्रवारच्या संध्याकाळी फुलून आलेल्या थेटरासारखे चमकतात तुझे डोळे.
माथ्यावरच्या गेंदेदार रत्नखचित झुंबराखाली पडलेल्या चमकत्या, सळसळत्या सोनेरी शलाकेसारखी एकच तिरीप,
बाकी सगळा जिवंत झुळझुळणारा अंधार 
थेटरातल्या गजबजीला मौनात खोलवर खेचून नेणारा.
शुक्रवारच्या संध्याकाळीनं धावत सुटावं उतारावरून कमालीच्या खेळकर मुडात
सुसाट,
खिदळत,
उत्कटपणे,
आणि विरघळत जावं 
शनिवारचा हलकासा वास असलेल्या निवांत काळ्याभोर रात्रीत, 
तशी भिडते तुझ्या नजरेला नजर.
पडते ठिणगी.
वीकान्ताची लाही हाहा म्हणता फुलते
शनिवार सकाळच्या दमदार उन्हाच्या पावलागणिक.
रविवार चढत जातो प्रहराप्रहरानं.

Tuesday, 25 June 2019

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवर

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवरच्या ॲंटेनांच्या कुशीत,
पुन्हापुन्हा
चिवटपणे उगवणाऱ्या पिंपळाच्या लालसर कोवळ्या कोंभासारखीच,
'...बस हाथों में तेरा हाथ हो'ची पुन्हापुन्हा उमलून येणारी आस पुसून टाकता येत नाही काही केल्या,
आणि
ओशटपणे पायात पायात येणारं नि हलकटपणे पायात पाय घालणारं जग लाथेसरशी उडवून नामानिराळं होण्याची उबळही जिरवता येत नाही काही केल्या,
तेव्हा
'सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये मौज आहे..'च्या ओळी,
साधुवाण्याच्या कथेसारख्याच यांत्रिकपणे
आणि
यच्चयावत कर्मठ, चिवट आणि आक्रमक पण तोडू म्हणता तुटणार नाहीत आणि तुटूही नयेतसं वाटायला लावणाऱ्या,
जिवाजवळच्या माणसांवरचा संतापओठ मिटून गिळत,
घोकाव्या लागतात
पुन्हापुन्हा.
तरीही,
कोण जाणे किती युगं
कुठल्या सुपरहीरो कृष्णाचा धावा करत उभे आहोत मूर्खासारखे,
आपली वस्त्रं अखेर आपल्यालाच सावरायची असताना सिनेमाचा क्लायमॅक्स येईस्तोवर थांबून काय होणार त्याला आणखी एक जबरदस्त सुपरडुपरमेगाहिट मिळण्याखेरीज -
पुरे आता -
अशी कडूजहर अश्रद्ध ॲसिडिक लहर दाटून येते गळ्याशी.
नेमकं तेव्हाच वाजतं दिलखेचक बासरीचं बॅक्ग्राउंड म्युझिक.
आणि अवतरतो एखादा श्यामलवर्णी पावेबाज मुरारी.
पण -
तू सुपरहीरो असलास तर तुझ्या घरी,
मीच आहे शेवटी राधा ऑन द डान्स फ्लोअर.
नि
मुख्य म्हणजे नाचणं तर माझं मलाच भाग आहे,
मग फुटेज तुला कशाला,
चल फूट -
म्हणण्याइतकी जान येते जिवात,
तेव्हा
पिंपळाचं बी कुठून येत असेल वाहत हे सनातन नवल वाटेनासं होतं.
तगमग निवते,
ॲंटेना स्थिरावतो,
व्यत्यय संपतो,
प्रक्षेपण सुरू होतं
सुरळीत.