Thursday, 12 September 2019

विंगेतली घरं

एखादं घर आपलं वाटायसाठी त्या घरात प्रत्यक्ष राहावं लागतं थोडंच? पुस्तकातली घरं तर बोलूनचालून कल्पनेत रंगवलेली आणि त्यामुळे काहीशी स्वप्नील, अतिरंजित असणारचपण सिनेमातली घरंती तर नजरेला स्वच्छ दिसतातनि तरी त्यांतरेंगाळणारा वास कळतोतिथे उकडत असेलकी गार वाटत असेल तेही कळतंआपल्याच घरात एका विशिष्ट वेळी पडणाऱ्या उन्हाच्या मऊ तुकड्यासारखेच तुकडे ती घरंही देऊ करतात.
असल्या घरांच्या आठवणी काढायला बसलंकी मला सगळ्यांत आधी आठवतंते गोलमालमधलं त्या बहीणभावंडांचं घर. कसं अगदी बहीणभावंडांनाच पुरेलसंअटकर मापाचं नि तरी दोघांना स्वतंत्र अवकाश देणारं घर आहे ते. त्यात राहणार्‍या माणसांच्या मापानंच बेतलेले असावेतसे पलंग नि खुर्च्या. नि शिवाय आणीबाणीच्या वेळी त्यांच्या तोतया आईचं हे थोरलं बूड घरात शिरवून देणारी स्वैपाकघराची चपखल खिडकी. आईबाप नसलेल्या त्या भावंडांना त्या घरात अजिबात एकटं-पोरकं वाटलं नसणारअशी खातरजमा ते घर नक्की करून देत असणार.
प्रतिमा कुलकर्णींच्या प्रपंचमधलं घर तसंही त्याच्या खास लोकेशनमुळे ग्लॅमरस आहे. पण त्या घराचं खासपण माझ्या दृष्टीनं त्याच्या लोकेशनमध्ये नाही. तिथे कमालीच्या प्रामाणिकपणानं घर रचून देणारी त्या मालिकेतली जिवंत-चिरंजीव पात्रं त्या घराला खासपण बहाल करून गेली आहेत. अण्णांचा झोपाळाअगदी साधासा दिवाण नि लोड-तक्क्ये असलेली माजघरवजा खोलीपेटीचे सूर मिरवणार्‍या मागीलदारच्या किंचित खासगी ओसर्‍यानाटकाच्या तालमी नि नाना रंगांच्या गप्पा रंगवू देणारे अनेक साधेसुधे-खासगी-काळोखे कोपरे नि आवार. पुढे श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये तेच घर वापरल्यामुळे त्या घराची गोडी माझ्याकरता जरा विटलीच. त्याही कारणानं ती मालिका मला पुरेशी आवडली नाही कधी. प्रपंचमधल्या घराच्या ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या मानानं ४०५ आनंदवनमधली सोसायटी आणि तिथले ब्लॉक अगदीच सरधोपट होते.
यश चोप्रांच्या सिनेमांमधली बटबटीत परीकथीय घरं कधीच आवडली नाहीत. पण दिलवाले दुल्हनिया…’मधला तो पंजाबातला वाडा मात्र त्याला अपवाद म्हणायचा. कायम लपून प्रेम करायला गुप्त गच्च्याआपल्या माणसांना भेटायची संधी देणार्‍या ओसर्‍या नि पडव्या नि जिने नि व्हरांडेत्यांतही कुणी वडीलधारं समोर टपकलंच तर सुमडीत आडोसा घेऊ देणारे कोनाडे नि कोपरे... असं सगळं बयाजवार त्या वाड्यात असणारच. वर संध्याकाळी हुरहुरून कुणाकरता उदासबिदास व्हायचं असल्यास मोठ्ठाले कट्टे असलेल्या नि सूर्यास्त नि सूर्यफुलं नि शेतं दाखवणार्‍या हवेशीर खिडक्याही असणार. कोकणातल्या पारंपरिक नेपथ्याला सरावलेल्या मला हे पंजाबी घर नव्हाळीचं होतं नि शिवाय योग्य त्या वयात भेटलंपुढे दिलवाले...ची जादू ओसरून गेल्यावरही तो वाडा लक्ष्यात राहिला तो राहिलाच. हम दिल दे चुके सनममधल्या अतिरिक्त चांदोबाशैलीतल्या त्या गच्च्या-संपृक्त बेगडी घराची भूल मला पडली नाहीयात पुस्तकांच्या अक्षरशः चळतींमध्ये उभं राहून किस केल्यावर बाळ होईल?’ असा अडाणी प्रश्न विचारणार्‍या नंदिनीचा जितका वाटा होता, तितकाच दिलवाले...मधून आधीच आपल्याश्या वाटलेल्या त्या वाड्याचाही होताच.
तितका सुखकारक नि रोम्यांटिक नसूनही खूप आवडलेला बंगला खोसला का घोसलामधला. खरंतर त्या घरातलं सगळंच किती चिमुकलं आहे! घरातली मुलं मोठी झालीत नि त्यांना आता हे जुनं घर पुरेनासं झालं आहे हे त्या घरातल्या मंडळींच्या वावरातून स्पष्ट दिसतं. असं वाटतंया ताडमाड कार्ट्यांचे पाय इथल्या बिछान्यांतून नक्की बाहेर येत असणार नि सकाळी घाईच्या वेळी हमखास एकमेकांवर टकरी होऊन चिडचिडाटही होत असणार. शिवाय आंघोळीला नि कधी-कधी संडासलाही आधी कुणी जायचं यावरून हाणामार्‍या होतच असणार. पण तरी त्या घरात त्या वरकरणी विजोड वाटणार्‍या मंडळींना सांधणारं काहीतरी आहे खास. तिथल्या भिंतींना अमृतांजन आणि घर गळल्यामुळे आलेली नि सुकलेली बुरशी आणि जुना झालेला डिस्टेंपर आणि वर्षानुवर्षांच्या फोडण्या असा सगळा संमिश्र वास असेलपण दिल्लीतल्या थंडीत त्या घरी शिरल्यावर मस्तपैकी ऊबदारही वाटत असेल. ते घर सोडून नव्या टोलेजंग बंगल्यात जाताना सिनेमाच्या अखेरीस मंडळींना नक्की भरून आलं असणार.
अशी कितीतरी घरं. डेल्ही सिक्समधलं ते गिचडीबाज गच्च्या असलेलंकबुतरं नि लोणची नि वाळवणं नि लग्न न करता घरात थांबून राहिलेरी देखणी-अबोल आत्या असणारं घर. हम हैं राही प्यार केमधला तो साधासरळ मध्यमवर्गीय बंगला नि काचेचं छप्पर असलेली गच्चीतली बरसाती. ‘रंगीलामधलं खाली भाडेकरू नि वर मालक असणारं कनिष्ठ मध्यमवर्गीय एकांडं घर नि त्याच्या पायर्‍यांवर रात्री-बेरात्री मिली आणि मुन्नानं मारलेल्या गप्पा. बॉम्बेमधलं मुंबईतल्या जुन्याउंच छताच्या इमारतींचा छायाप्रकाश अचूक पकडणारंतावदानं-गच्चीगॅलरीचिमुकलं स्वैपाघर नि च-ह-क्क-ह चार खुंट्या नि छत असलेला लाकडी पलंग मिरवणारं मुरत गेलेलं घर...
मी ज्या बारा-पंधरा खर्‍याखुर्‍या घरांमधून बाडबिस्तरा हलवला आहेत्यांच्याइतकीच जवळचीघरासारखी झालेली ही घरं. सिनेमे नि पुस्तकं नि नाटकं नि सिर्यलीत कसले रमताअसा गद्य प्रश्न विचारणार्‍या लोकांची घरं उन्हात बांधून मी मिळवलेलीनो मेंटेनन्स, चकटफू घरं.. 

No comments:

Post a Comment