पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली आहेत - कमालीचा नार्सिसिझम, असुरक्षितता, ध्यास. त्याच्या वडिलांसोबतचं त्याचं गुंतागुंतीचं नातं; जसपाल या जिवलग मित्रासोबतचं दुधारी नातं; अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एका पस्तिशीच्या स्त्रीशी केलेला विवाह आणि लगोलग मिळालेलं, न पेलवणारं पितृत्व; ग्रॉटोव्हस्कीच्या कार्यशाळेत झालेला अपेक्षाभंग; रत्नासोबतचं प्रेम; नंतरचं सुखी-समाधानी आयुष्य... याबद्दल नसीरनं विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्याला यशानं दिलेल्या हुलकावण्या, सततचा एकटेपणा आणि जगानं नाकारलेलं असणं - हे कोणत्याही नटाच्या आत्मवृत्तात भेटावं असं. हे सगळंच अतिशय रसाळ भाषेत आणि मोकळेपणानं, प्रामाणिकपणानं नोंदलेलं आहे. त्याची तेजतर्रार विनोदबुद्धी पानापानांतून भेटते आणि आपण मनमुराद हसतो. पण माझं इतक्यावर भागेना. मला मराठीतल्या नटांच्या चोख लेखनाची सवय. लागूंचं ’लमाण’ काय, विजयाबाईंचं ’झिम्मा’ काय, प्रभावळकरांचं ’एका खेळियाने’ काय... फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलीन, अशी शपथ वाहिल्यासारखी ही सगळी आत्मवृत्तं. अभिनय, दिग्दर्शन आणि आपलं कार्यक्षेत्रं - यावर काहीएक भाष्य गांभीर्यानं करणारी. त्या जातीचं फारसं काही मला या पुस्तकात मिळालं नाही. मुळात एखादी भूमिका सही-सही वठवणं आणि ती वठवण्याच्या प्रक्रियेबद्दल नेमकेपणानं सांगणं, या दोन निराळ्या गोष्टी आहेत, हे मी अखेर मान्य केलं. जवळजवळ तीनेकशे पानं वाचूनही, मला सतत आठवण येत होती, ती ’साप्ताहिक सकाळ’च्या सदा डुम्बरे-कालीन दिवाळी अंकात माधव वझेंनी घेतलेल्या नसीरच्या मुलाखतीची. ती कितीतरी स्पष्ट, ओघवती आणि तरीही नेमकी होती. मामुली संपादन केलेलं असूनही.
संपादनाचा विषय निघालाच आहे, तर होऊन जाऊ द्या. हे ’पॉप्युलर’ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ’पॉप्युलर’ हे काहीएक परंपरा असलेलं प्रकाशन आहे, असं म्हणायला हरकत नसावी. पण अनुवाद कसा होतो यावर आपला अंकुश नसेल एक वेळ (नसीरनं सई परांजपेंच्याच नावाचा आग्रह धरला असल्याचा उल्लेख प्रस्तावनेत आहे.), त्यावर संपादनाचा हात फिरवला जायला नको? एखादा शब्द घाईघाईनं खोडावा आणि मग त्यावर काहीही लिहिलं तरी मूळ शब्द अचूक वाचता येऊन रसभंग होत राहावा, तसं अनेक अनुवादित वाक्यं वाचताना होत राहतं. नको तिथे मूळचे परभाषिक शब्द तस्सेच ठेवणं (इन्स्टिट्यूट) आणि नको तिथे संकल्पनांना मराठी अवतार देणं (एकलगीत? ओह, यू मीन सोलो!) सतत दाताखाली येत राहतं. हेही एक वेळ ठीक. पण पुस्तकात चक्क प्रमाणलेखनाच्या चुका सापडाव्यात? र्हस्व-दीर्घाच्या अगणित चुका, एकजात सगळी शब्दयोगी अव्ययं शब्दांपासून फटकून, बोली भाषेचा हास्यास्पद आग्रह धरताना भलतीकडे पडलेले शिरोबिंदू, ’संयुक्तिक’सारख्या अनेक शब्दांचं चुकीचं लेखन, आणि चक्क काही ठिकाणी राहून गेलेले जादाचे काने? ही हलगर्जीपणाची हद्द आहे. हरून ऍन्ड द सी ऑफ स्टोरीज्
सलमान रश्दींच्या बाकीच्या वादग्रस्ततेशी माझं फार देणंघेणं नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीशी अर्थातच सहमती आहे. पण आतडं असं नाही. हे पुस्तक वाचून सलमान रश्दी माझ्यासाठी एकाएकी त्रिमित झाले. बाकी पुस्तकाच्या चमत्कृतीपूर्ण आणि प्रचंड मजेशीर नि अतिकल्पक गोष्टीबद्दल हवं तितकं लिहिता येईल. पण इथे काही चमकदार गोष्टी तेवढ्या नोंदून ठेवते.
- ’गप’ (हिंदीतलं गप, मराठीतलं नव्हे!) आणि ’चुप’ (हे मात्र दोन्हीपैकी कुठलंही चालेल!) ही दोन राज्यांची नावं. एकीकडे गप्पा, एकीकडे चुप्पी. एकीकडे उजेड, एकीकडे अंधार. एकीकडे ऊब, एकीकडे थंडी. एकीकडे रंग, एकीकडे काळाकुट्ट रंग. एकीकडे... असो!
- गोपी आणि बाघा ही रेंच्या सिनेमातल्या बडबड्या ठगांची नावं बडबड्या माशांना वापरणं.
- बातचीत-बातमतकरो-बोलो-बेजुबान-माली... असल्या हिंदी अर्थपूर्ण नावांची तितकीच अर्थपूर्ण मोडतोड करून वापरणं.
- ’कथासरित्सागर’ - सी ऑफ स्टोरीज! हा संदर्भ लक्ष्यात आला तेव्हा मला एकदम ’युरेका!’ झालं.
- गोष्टी - गोष्टी, ऍज इन, कथा - त्यांच्याबद्दल काय एकेक थोर मुक्ताफळं.... "जुन्या गोष्टींमधूनच तर नव्या गोष्टी जन्माला येतात!", "गोष्टीमधल्या जगावर कुणाचंही राज्य चालत नाही.", "त्याला काय झालं, गोष्टीत गोष्टी मिसळल्या तर? अशाच तर नव्या गोष्टी तयार होतात!", "चांगली ठणठणीत गोष्ट असली, म्हणजे मग तिच्यात थोडे फेरफार नि इकडम् तिकडम् केलं तरी तिला ढिम्म फरक पडत नाही! अगदी सहज पचवते ती, करून बघा..." हे वाचून माझा फॅनफिक्शनी मेंदू किती सुखावला-सैलावला-कौतुकावला असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
- चांगलं सैन्यासारखं सैन्य (पुस्तकातल्या पानांचं!) आणि समोर ठाकलेलं युद्धासारखं युद्ध! पण सैन्य सेनाप्रमुखाचं निमूट ऐकून हल्ला करील म्हणता? छे! ते सैनिक वाद घालतात, चर्चा करतात, एकमेकांचं म्हणणं खोडून काढतात, सेनाप्रमुखाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात - सऽऽगळ्यांचं समाधान झाल्यावर मगच काय तो हल्लाबिल्ला करतात! नि सेनाप्रमुख? तो चिडेल? तो बेटा, कधी इकडून तर कधी तिकडून पिना मारत सगळ्या वादंगाची मौज लुटत असतो! आणि अशा प्रकारे बोलभांड राज्य आपल्या गप्पिष्ट सवयींसकट मुक्या राज्याला हरवतं!
- "राजपुत्र मूर्ख आहे खरा आमचा थोडा. पण जाऊ द्या ओ! इथे नाहीतरी मुकुटवाल्या मंडळींच्या हातात ठेवलंय काय आम्ही मोठंसं? द्या टाळी!"
असलं बरंच काय काय, बारीक-बारीक आणि महामार्मिक. भाषेच्या ह्याऽऽऽ एवढाल्ल्या गमती. नादमय संवाद. तिरपागडे वेढे दिलेले हरेक तिसर्या शब्दाला. समकालीनत्वाची अत्यंत मजेदार सरमिसळ. मस्ट रीड. रिफ्रेशिंग रीड.
स्टॉप व्हॉट यू आर डूइंग ऍन्ड रीड धिस!
(जालावरून साभार)
नाव जरा हिटलरी आहे, कबूल. पण त्यावर जाऊ नका. अनेक मान्यवर लेखकांनी आपापल्या वाचनानुभवावर लिहिलेले निबंध यात आहेत. त्यात संशोधक-चिकित्सक दृष्टीचे लेख आहेत, तसे निखळ स्मरणरंजनात्मक लेखही आहेत. एकूणच वाचणे या गोष्टीची आपण अनुभवलेली जादू हे लोक मन:पूत सांगताहेत.
माझ्या सध्याच्या विचारचक्राला गती देणारं हे पुस्तक होतं. वाचण्याशी असलेले संबंध तपासून पाहणं पार्श्वभूमीला चालू आहे. अशा वेळी अनेक संदर्भपुस्तकांची नावं मिळणं, काही गोष्टी इतरांच्या अनुभवांशी ताडून पाहता येणं, गोष्ट आणि न-गोष्ट या वाचनातला फरक नोंदताना त्याच्याशी संबंधित विदा मिळणं, काही थेटच पुस्तकं वाचायजोगी-शोधायजोगी हाती लागणं… अशा अनेक प्रकारे. पण त्यातला खरा महत्त्वाचा भाग कोणता असेल, तर माझी तळ्यात्मळ्यातावस्था संपवणारा. वाचन महत्त्वाचं आहे, ते हातचं निसटून जाता कामा नये, ही माझी भावना होती. पण तिला कोणता आधार आहे, असं कुणी विचारलं, तर मी निरुत्तर असे. तंत्रज्ञानातले बदल माध्यमबदलात परिणित होणारच, कालचक्राला थांबवणारे तुम्ही कोण, असा आक्रमक प्रश्न आल्यावर मला काही सुचत नसे. आपण निव्वळ स्मरणरंजन म्हणून तर पुस्तकं हातची जाऊ देत नसू, असा प्रश्न डोक्यात वळवळत राही. त्याला एक ठोस उत्तर मिळालं. मागे एकदा एका मित्राशी बोलताना तो एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून गेला होता. ’आपल्यासारख्या हावरट लोकांना भावनिक भूकही तीव्र असते. ती भागवणारी माणसं कायम सोबत असणं अशक्यच असतं. काही अंशी भूक माणसं भागवतात. पण उत्तम सिनेमे आणि उत्तम पुस्तकं - म्हणजे फिक्शन हो, नाहीतर काढाल कुरुंदकर बाहेर - ही भूक विस्तारतात, सखोल करतात आणि बहुतांशी भागवतात. उगाच का आपल्याला इतकं सगळं हपापून बघा-वाचावं लागतं?’ त्या वाक्याचा एक लहानसा ढग डोक्यात कुठेतरी ब्याकग्राउंडला तरंगत होता. हे पुस्तक वाचताना कधीतरी तो बरोब्बर डोक्याच्या वर येऊन थांबला. आणि एका नियत क्षणी पाऊस पडून मी भिजले. एरवी ज्या शिस्तीला ’सो व्हॉट?’ म्हणून खांदे उडवून दाखवण्यात धन्यता मानली जाते, ती कामापुरती कबूल करून मी अनेक फिक्शनी पुस्तकं नेटानं पुरी केली. मग कुठल्यातरी टप्प्यावर त्यातला ’नेट’ संपला. मी अल्लाद पुस्तकात शिरले.
हे पुस्तक म्हणतं त्यानुसार - अक्षरं म्हणजे अलीबाबाच्या गुहेचं दार असतं. ज्याला ती डीकोड करता येतात; तो दार ओलांडून पल्याड जातो. नवीन जगात दाखल होतो. ते जग जगतो. अशी अनेक जगं, अनेक आयुष्य जगतो. मी मधला बराच काळ पासवर्ड विसरले होते. तो मला आठवला. आठवला म्हणण्यापेक्षा - बरेचदा आपली बोटंच पासवर्ड लक्ष्यात ठेवून असतात. तो जाणिवेत न ठेवता नेणिवेत कुठेतरी नेऊन टाकतात. तो परत वर आणायचा, तर गुहेच्या बाहेर चिकाटीनं रेंगाळावं लागतं. - तसं रेंगाळायला या पुस्तकानं ढकललं. आणि बात बन गई.
काही गोष्टी जाहीर बोलू नयेत असं आपल्या मनावर लहानपणापासून पद्धतशीरपणे बिंबवण्यात आलेलं असतं. त्यात काहीएक समंजसपणा, जाण असते आयुष्याबद्दलची. काही प्रमाणात प्रस्थापितांचे हितसंबंध असतात. काही थोडी सगळ्यांचीच दीर्घकालीन सोय. एकूण परिणाम असा होतो, की ज्या गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ बोलल्या गेल्या पाहिजेत - वेळी जाहीरपणे - बोलल्या गेल्या पाहिजेत - त्याही बोलताना आपण कचरतो. वयसुलभ बंडखोरीतून, अंगभूत उद्धटपणातून, कुतूहलातून, अभिव्यक्तीच्या गरजेतून मी वेळोवेळी या मर्यादेवर मात करत आले आहे. त्याचे परिणाम स्वीकारले आहेत. आज त्याला अपवाद नाही.
एका अंकाचं काम करताना माझे ’ऐसी अक्षरे’ या संस्थळाच्या व्यवस्थापकांशी मतभेद झाले. मतभेदांना ना नाही. पण रास्त अधिकार डावलून मनमानी करण्याला मात्र ना होती, आहे. म्हणून काम पूर्ण करून बाजूला झाले.
आता अनेक प्रकल्पांची पूर्वी हातात घेतलेली कामं समोर तशीच पडलेली पाहून प्रश्न पडताहेत.
संस्था महत्त्वाची की माणसं? फक्त आपला अहं दुखावला गेला, म्हणून तर आपण हे करत नाही आहोत ना? आपल्याला जे काम करायला मनापासून आवडतं, जमतं, सुचतं; ते आपण का थांबवलं आहे? ते निराळ्या ठिकाणी करणं शक्य आहे म्हणून? तसं करण्यात संसाधनांची आणि मानसिक ताकदीची नक्की किती उधळपट्टी होते आहे, होणार आहे, आणि त्यातली किती रास्त समजायची? तुटण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आपल्या हातून अदब सुटून माणसांशी दुष्टावा होऊ नये, म्हणून किती जपायचं? अशा वेळी राहतो का आपले आपण तटस्थ मूल्यमापक? राहू शकतो? आपण एका विशिष्ट वर्तुळातून बाजूला झालो, म्हणून वर्तुळं मिटून जात नाहीत, हा जगाचा दस्तूर मानून चाललो आहोत खरे आपण. पण आपली आपल्यालाही लख्ख दिसत असते आपण बजावत असलेली भूमिका. ती सोडून देताना आपला अहं सुखावत असतो हेही खरंच. पण वर्तुळातही काहीएक मूलभूत आणि नकोसे बदल होत असतात. त्याकडे किती काळ नि कशी डोळेझाक करतात? त्या बदलांची किंमत मोजण्याइतका मोठा आहे का आपला अहं? पण क्षमाशीलतेचे आकाशवेधी टप्पे पार करणं आपल्याला अजूनही जमलेलं नाही, आपले रागलोभ - माणूसपण अद्याप रसरशीत जिवंत आहे, या गोष्टीचाही अभिमानच तर बाळगतो ना आपण? ते माणूसपण जपण्याची नाही का मोजावी लागत काही किंमत? कसं ठरवतात त्यात लहानमोठं?
नि अखेरशेवट, काय करतात अशा वेळी?
माझ्याकडे एकच एक उत्तर नाही. अशा प्रश्नांना एकच एक उत्तर असतही नाही. मग मी हे सगळं इथे का मांडते आहे?
वेळोवेळी संगतवार विचार मांडून पाहायचा खेळ खेळून मला दीर्घकालीन उत्तरं मिळाली आहेत. काही गोष्टी दाराआड न ठेवता चव्हाट्यावर आणून ठेवल्या पाहिजेत, होता होईतो शक्य तितकी अदब बाळगून, पण ठेवल्या गेल्याच पाहिजेत, हे मी मानलं आहे. या जाहीर मांडणीमुळे संस्थळाच्या संपादकांनाही काहीएक प्रश्न पडतील, उत्तरं द्यावी लागतील - लोकांना नाही, तर आपली आपल्याला द्यावी लागतील. दुटप्पीपणा टळेल, निवळेल. दीर्घकालीन महत्त्वाचं काही भलं साधण्याची - सांधण्याची शक्यता निर्माण होईल, असा भाबडा आशावाद आहे. म्हणून.
यातून संस्थळाला मी नको इतकं महत्त्व तर देत नाही ना?
नाही. संस्थळ तितकं महत्त्वाचं आहेच. त्याचसाठी हा खटाटोप.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य, दडपशाहीचा निषेध, लोकशाही मूल्यं यांचा गौरव करणार्या पुरोगामी संस्थळाबद्दल मला मनापासून प्रेम, आपलेपणा वाटतो. ज्या लोकांना इतर अनेक मराठी संस्थळांवर बोलण्याइतका मोकळा अवकाश मिळत नाही, अशा अनेक चाकोरीबाहेरच्या लोकांना इथे निवांत-आश्वस्त वाटतं, आपली भूमिका तपासून घेण्याइतकी खुला, मतभेदासहितचा निकोप अवकाश मिळतो, हे मी वेळोवेळी निरनिराळ्या कोनांतून अनुभवलेलं आहे. अशी एक तरी जागा आपल्या वैशिष्ट्यांसह टिकावी असं मला मनापासून वाटतं. संस्थळांमधून अनेक नवनवीन पोटसंस्थळं जन्मावीत. पण त्यांच्या जन्मामागे दडपशाही भांडणांचाच इतिहास असण्याची आणि तो चवीनं चघळला जाण्याची परंपरा मात्र मोडीत निघावी, असंही वाटतं.
म्हणूनच - अशा व्यासपीठाच्या व्यवस्थापकांनी केलेल्या मनमानीचा, संपादकीय अधिकारांच्या पायमल्लीचा आणि स्वतःच्याच भूमिकांशी केलेल्या बेईमानीचा मी निषेध करते आहे. आपापले व्यक्तिगत अजेंडे दौडवण्याच्या नादात आपण संस्थळाच्या बहुआयामी प्रकृतीला एकारलेलं तर तर करत नाही ना, हे तपासून पाहण्याचं त्यांना आवाहन करते आहे. पुरेसा वेळ जाऊ दिल्यानंतर, अहंकार बाजूला ठेवत, हितचिंतकाच्या नात्यानं धोक्याची घंटा वाजवते आहे.
नेहमीप्रमाणेच, या कृतीचे परिणामही स्वयंभू आणि अनेकपदरी असणार आहेत याचं पूर्ण भान मला आहे.
मस्त वाटतं, शाईपेनानं लिहायला. लिहिताना कागदावर झुकून एका विशिष्ट कोनातून मजकुराकडे पाहताना, ओल्या शाईमुळे अक्षरांना आलेली देखणी लकाकी दिसत राहते. ती अशक्य सुंदर असते. हळूहळू ओसरत जाते ती. पण ती ओसरत जाताना आपण कुठे थांबून पाहत राहिलेले असतो? आपण पुढच्या अक्षरांना जन्म देत, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये, डावीकडच्या एकांड्या-लांबड्या सीटवर, पाय पसरून खिडकीत बसून, फिलॉसॉफिकली वारा पीत, पळता रस्ता आणि झाडं आणि शेतं न-न्याहाळत, डोक्यातले विचार घोळवत-मागे टाकत जाण्याइतकंच थरारक आणि सुंदर आणि शांतवणारं.
कुणाचा विश्वास बसेल का यावर?
कदाचित.
वाळून गेलेल्या अक्षरांवर नजर फिरवताना, जर ती लकाकी पुन्हा जिवंत होऊ शकली, तर. बसेलही कदाचित. One can only hope.
’ऐसी अक्षरे’साठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं’पॉर्न ओके प्लीज’.नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे,त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.