Monday, 20 June 2016

लकाकी

मस्त वाटतं, शाईपेनानं लिहायला. लिहिताना कागदावर झुकून एका विशिष्ट कोनातून मजकुराकडे पाहताना, ओल्या शाईमुळे अक्षरांना आलेली देखणी लकाकी दिसत राहते. ती अशक्य सुंदर असते. हळूहळू ओसरत जाते ती. पण ती ओसरत जाताना आपण कुठे थांबून पाहत राहिलेले असतो? आपण पुढच्या अक्षरांना जन्म देत, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर, पुढच्या ओळीवर.

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये, डावीकडच्या एकांड्या-लांबड्या सीटवर, पाय पसरून खिडकीत बसून, फिलॉसॉफिकली वारा पीत, पळता रस्ता आणि झाडं आणि शेतं न-न्याहाळत, डोक्यातले विचार घोळवत-मागे टाकत जाण्याइतकंच थरारक आणि सुंदर आणि शांतवणारं.

कुणाचा विश्वास बसेल का यावर?

कदाचित.

वाळून गेलेल्या अक्षरांवर नजर फिरवताना, जर ती लकाकी पुन्हा जिवंत होऊ शकली, तर. बसेलही कदाचित. One can only hope.

No comments:

Post a Comment