Tuesday, 18 October 2022

उशिरा सापडलेले नट

आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला नाही कळत लगेचच्या लगेच. शेफाली छायाचीही मला नव्हती कळली. हो, मला माहितीय तिचं नाव आता ती शेफाली शाह असं लावते. पण माझ्या डोक्यात तिचं आधीचंच नाव रुतून बसलंय आता. काय करायचं. नटाला सगळं स्वतःच नाही ठरवता येत. अनेक जणांचे शब्द, अनेक जणांच्या नजरा, अनेक जणांच्या कल्पना... अशा सगळ्यांतून घडत गेलीय शेफाली छायाही. तिचं रूपही तसंच. बघणार्‍याच्या नजरेत दडलेलं. ऐश्वर्या राय-छाप रूपाला देखणेपणा म्हणणार्‍या लोकांना शेफाली छाया देखणी नाहीच वाटायची. सावळी, ठेंगणी, जाडजूड भारतीय बांध्याची. तिचं देखणेपण तिच्या डोळ्यांत आहे पण. मोठ्ठाले डोळे. मनातलं सगळं बोलत राहणारे.


तिला पहिल्यांदा ‘सत्या’त बघितल्याचं आठवतं. ‘मुम्बै का किंग’ असलेल्या भिख्खू म्हात्रेला झापडवणारी त्याची राणी. ‘सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पिछे पिछे चलता है...’ असं त्याला सुनावत बेभान नाचणारी. तिची ती भूमिका विसरणं शक्यच नव्हतं. पण तरी तिची कदर नाहीच केली मी. पुढे खूप वर्षांनी राहून गेलेला ‘मान्सून वेडिंग’ बघताना त्यातली ती एकत्र कुटुंबातली, बापाचं छत्र हरवलेली, लैंगिक शोषण सोसणारी, स्वतःचा स्वतंत्र आवाज शोधायला धडपडणारी तरुण मुलगी बघताना मात्र तुटलं पोटात. अन्यायामुळे डोळे भरून येत असताना मुक्यानं सगळं निभावत जाणारी ती मुलगी दुसर्‍या कुणा लहान मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होताना बघून वाघिणीसारखी झेपावते त्या हरामखोर पुरुषासमोर. बापासारखं प्रेम करणार्‍या काकाच्या विनवणीखातर मुक्यानं वावरते लग्नात अपमान गिळून. किती काय-काय बोलले आहेत तिचे डोळे त्या सिनेमात. ‘मान्सून वेडिंग’मध्ये खूपच काय-काय नि कोण-कोण आहे बघायला. कितीही वेळा बघितलं तरी काही ना काही नवं सापडतंच त्यात. उदास संध्याकाळच्या एकटेपणापासून ते अस्फुट उमलत्या शृंगारापर्यंत... विजय-राजच्या फाटक्या करुण मीलनोत्सुक देहापासून आख्ख्या नसीरपर्यंत. 

पण दर वेळी - दर वेळी न चुकता, irrespective of anything and everything else, शेफाली छाया मला तिचं देणं द्यायला लावत आली आहे. 

मग कधीतरी ‘दिल धडकने दो’ बघितला. त्यातली असहाय्यपणे, दोन्ही हात बरबटवून चॉकलेट केक खात खात स्वतःचा अपमान गिळू बघणारी शेफाली छाया. त्यातही तिचा संधीसाधूपणा, सोयीस्कररीत्या मुलांचंही हवं तेच ऐकणं, कधी भान विसरून नवर्‍यावर करवादणं... 

मग मी तिला जमेल तिकडे शोधायला सुरुवात केली. ‘रंगीला’त कचकड्याची हिरॉईन. ‘ज्यूस’मधली अक्षरशः डोळे नि देहबोली वापरून तगमग-संताप दाखवणारी नायिका. ‘वक्त द रेस अगेन्स्ट टाईम’मधली पोरावर डोळस प्रेम करणारी आई – चक्क अमिताभची बायको नि अक्षय कुमारची आई! या बाईला काही करायला भीती वाटतच नसेल का? बरं, सहसा अशा नटांना असते ती रंगभूमीची तगडी-दमदार पार्श्वभूमी तिला नाहीच. मग कुठून, कुठून येतं हे? 

‘डार्लिंग्स’मधली तरुण भंगारवाल्याला जवळ करणारी नि जावयाला मारायचे बेत थंड डोक्यानं रचणारी तिनं केलेली आई मला अलिया भटच्या फुटेजखाऊ नायिकेहून ठळक वाटली होती. ‘जलसा’मधली मदतनीस शेफाली – ते बोलण्याजोगं प्रकरण नाही. बघण्याचं आहे. ‘डॉक्टर जी’मधली गायनॅक डिपार्टमेंटची करारी हेड तर बोलूनचालून ‘ये बाई, खा भाव’ कॅटेगरीतली होती. 

अजुनी मी शेफाली छायाची सगळी कामं बघितली नाही आहेत. मला काही घाईही नाही. हा तिच्या कारकिर्दीचा सगग्र आढावाफिढावा नव्हे. तिची कारकीर्द इतक्यात संपू नये, तसं तिची काही कामं अजून माझ्याकडून बघणंही संपू नये. असावं सतत तिनं केलेलं काहीतरी बघायचं शिल्लक. कमी वेळा लाभतात असले नट. रसिकासारखे काही तर चकवून मरूनही जातात मध्येच. मग त्यांच्यावर धड भडकताही येत नाही. त्याहून हे बरंय. 

No comments:

Post a Comment