Tuesday, 7 September 2021

to friends...

'शाळेतली मैत्रीण ही माझी' असं म्हणून माझ्या ऑलमोस्ट चाळिशीच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, की लोक एकदम आदरानं बघतात, हेच मला कमालीचं अचंबित करणारं वाटे. आमची मैत्री इतकी 'जुनी' असल्यामुळे वयोवृद्धांना भारतात दिला जातो तशापैकी अकारण आदर आपल्याला दिला जातोय असं वाटून चिडचिडही होई. आम्ही शाळेत भेटलो नि एकत्र चित्रकलेच्या वर्गात कुचकुचलो तेव्हाची मैत्री निराळी; नंतर वाढताना, बदलताना, निरनिराळे मित्रगट वागवताना कशा कुणास ठाऊक एकमेकींबरोबर असतच राहिलो तेव्हाची मैत्री निराळी; एकमेकींना अजिबात ठाऊक नसलेली वयाला साजेशी प्रेमप्रकरणं करून, एकमेकींची मुक्यानं काळजी करत राहून, सरतेशेवटी एकमेकींपाशीच येऊन बोललो, नि आपल्याला कुठे दुखलं आहे समोरच्या व्यक्तीला अचूक कळतं आहे हे जाणवून चकित झालो नि सुखावलो तेव्हाची मैत्री अजूनच निराळी. या सगळ्या जणू निरनिराळ्या माणसांनी केलेल्या मैत्र्या होत्या नि कर्मधर्मसंयोगानं ही सगळी माणसं आम्हीच वागवत आलो होतो, म्हणून आमची मैत्री शाळेतली, असं म्हणता येत होतं. तरी 'शाळेतली मैत्रीण! किती भारी!' अशातलंच कौतुक? अगदीच झंपट वाटायचं.

पण मग वयाच्या निरनिराळ्या टप्प्यावर, तथाकथित जाणतेपणी, पारखून-निरखून, सावडून-निवडून, मनापासून, झोकून देऊन केलेल्या अनेक मैत्र्यांमध्येही विश्वासघात होतच राहिले नि आम्ही पुन्हापुन्हा एकमेकींशी बोलत राहू शकलो, तेव्हा हळूहळू या जुनेपणाची किंमत थोडीथोडी कळू लागली. त्यात निव्वळ जुनेपणाला दिलेला आदर नव्हता, नसावा. इतक्या वर्षांचा सहवास घडावा, त्यात दोन माणसं साधारण एकाच वेगानं समांतर चालत राहावीत, आणि त्यांच्या नात्यात इतक्या वर्षांच्या कालखंडानं कसलाही मोठा कडवटपणा आणू नये, रक्ताच्या नात्याविना-शृंगाराच्या बांधलेपणाविनाही जवळीक टिकावी... या विलक्षण योगायोगाच्या गोष्टीला नकळत दिलेली दाद होती असावी.

हे कळू लागलं, तेव्हा कुठे, तोवर मैत्रीभंगानं प्रेमभंगाइतकीच उद्ध्वस्त होणारी मी किंचित प्रौढ झाले असणार. मग मला दर पंधरा माणसांनंतर एकदाच मिळू शकण्याच्या शक्यतेची शक्यता बाळगणारी एक लखलखीत मैत्री गृहीत न धरण्याची सवय स्वतःला जाणीवपूर्वक लावून घ्यायला पाहिजे हे मान्य करता आलं. सगळ्याच मैत्र्या सगळीकडून आपल्याला अशा अंगासरशी होणाऱ्या, जुन्या, मऊ, विटक्या कुर्त्यासारख्या 'होणार' नाहीयेत आणि तरी त्यांचं ठेवणीतलं असणं ही आपल्या भाग्याचीच बाब आहे, हे थोडथोडं समजू लागलं. आपण उधळून मैत्री करण्यात घेत असलेल्या जोखमीची बूज न राखता कुणी वेड्यासारखं वागलं, तरी तितकं खोलवर दुखेनासं झालं. आपण निबर झालो की काय अशा भीतीनं धस्सही झालंच! पण हेही ज्यांना सांगून कोरडं, समंजस, पण खोल हसू शेअर करता येईल, अशा समवयस्क, विषमवयस्क, नात्यातल्या, नात्याबाहेरच्या, अंतरं अर्थहीन करणाऱ्या, सामाजिक वर्तुळं किंचित का होईना ओलांडणाऱ्या, नव्या, उत्कट मैत्र्या मिळत राहिल्या.

हे श्रेय माझं अर्थातच नव्हे. माझ्या क्षमाशील आणि प्रयोगशील आणि वायझेड मित्रांच्या जिवावर मी टिकवून धरलेल्या, माझ्यातल्या वेडसरपणाचं आहे. सगळ्यांना असेच वायझेड मित्र मिळावेत, टिकावेत, आणि नव्यानं मिळत राहावेत, यापल्याड काय म्हणायचं असतं?

No comments:

Post a Comment