Tuesday, 19 January 2021

कुठूनही कुठेही

जाता येतं

कुठूनही कुठेही

खिशात शंभरेक रुपये असले की.

अर्धी चड्डी घालून फिरा वा भरजरी साडी नेसून

फोनवर तासंतास बोलत राहा प्रियकराशी लाडाकोडाचं

वा निकरावर येऊन शिव्याशाप देत भांडा कडकडून.

पाठीला नाक आणि हा हात माझा की पलीकडचीचा-हां, घड्याळ माझंच कीअसलेल्या गर्दीत

न आवरणारं पाणी बिनदिक्कत वाहू द्या गालांवर.

बघितलंच कुणी कधी रोखून तर सरळ अंगाची अळी सरकवत दारात जाऊन लटका

आणि समोरून येणारा भणाणवारा पीत

खोचून ठेवा नजर मोटरमनच्या केबिनीच्या दिशेनं.

जात राहा

कुठूनही कुठेही.

गरम वडा कुशीत घेणारे वडापाव घ्या दोन.

समुद्रावर बसा ऊन तोंडी लावून वडापावाची लालसर चव घेत.

रस्त्यांवर पहुडलेली पुस्तकं न्याहाळा.

तासंतास उकिडवं बसून

हाताची बोटं धुळकटून,

चवड्याला रग लागेस्तोवर.

विसरून जा

की घर आहे आपल्याला.

त्यातल्या-त्यात नितळ भासणार्‍या गटाराच्या काठी मनसोक्त न्हाणार्‍या भिकारणीच्या नजरेला द्या नजर

आणि खिशात घाला एक बेदरकार नितळ हसू.

हातानं चाचपडत राहा पुन्हापुन्हा

वितळून जाईस्तो

जात राहा

कुठूनही कुठेही.

No comments:

Post a Comment