अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
आनंद विंगकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन
या गोष्टीची कोरड्या सुरात समीक्षकी चीरफाड करायला मला लगेच जमणार नाही. घुटक्याघुटक्यात, कोरडेपणी, एका हातानं व्हॉट्सअॅप वा फेसबुक चाळत करण्याच्या, चैनीच्या वाचनाला विटून तिला हात घातला होता. तिनं पुरेपूर दान पदरात घातलं. कादंबरी पुरी होईस्तोवर ती मला बाजूला ठेवता आली नाही. रडं आवरता आलं नाही. हसू फुटायचं राहिलं नाही. रात्रभर रडून, पहाट होताना शिणून, शांत होऊन आभाळ बघावं, तसा - एकाच वेळी जड आणि हलकं, पारोसं आणि तरी डोक्यावरून आंघोळ केल्यासारखं लख्ख वाटायला लावणारा - भाव गोष्ट संपताना मला व्यापून राहिला. अशा प्रकारच्या उत्स्फूर्त भावनिक प्रतिसादाला शरमण्याची एक सर्वमान्य प्रथा आहे. पण ती बाजूला सारून मला हे बोलायचं आहे. या गोष्टीतल्या जिवंत माणसांनी, प्राण्यापक्ष्यांनी, झाडांनी आणि मातीनं मला त्यांच्याशी बांधून घेतलं, जिवाजवळचं काही उलगडून दाखवलं. माझा परकेपणा, उपरेपणा, खडूसपणा, कडवटपणा…. थोडा का होईना, विझवून टाकला. ही एक फार तालेवार आणि जिवंत गोष्ट आहे, इतकं तरी मी तत्काळ म्हणणं लागतेच.
**
यापूर्वीच्या पुस्तकाबद्दलच्या चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं, की मला ग्रामीण साहित्य वाचायचा कंटाळा येतो. खरंच येतो. त्याचा एक ठरून गेलेला साचा आहे. मान्सूनवर अवलंबून असलेली शेती. सरकारी यंत्रणांची मदत संपूर्णतः गायब. जातिव्यवस्थेसारखे, पुरुषप्रधान समाजाला पुजलेले शतकानुशतकांपासूनचे प्रश्न. त्याला जागतिकीकरणानं दिलेला एक अधिकचा वेढा. भ्रष्टाचार आणि मानवी हलकटपणाच्या नाना परी. या सगळ्यातून पिचत गेलेली एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब, एखादं गाव. याच गोष्टीच्या नाना आवृत्त्या वाचनात आल्या आणि वैतागायला झालं. अफगाणी बायकांची दुःखंही खरीच असतात. पण अफगाणी बायका, इराणी निरागस मुलं, हलाखीतलं बालपण सांगणारी शोषितांची आत्मवृत्तं यांच्या साचेबद्धपणाचा वीट येतोच. तशातलंच माझं वैतागणं. पण या पुस्तकानं साचा मोडला.
फक्त कर्जबाजारी शेतकरी जोडप्यानं केलेली आत्महत्या आणि एक काळाकुट्ट दुष्ट सावकार, इतकंच नाही गोष्टीत. सरंजामी व्यवस्था अंगात भिनलेली आणि तरी माणूसपणा शाबूत असलेली माणसं आहेत. स्थलांतरित, परभाषक माणसं आहेत. आता बौद्ध झालेली महार माणसं आहेत. अपंग माणसं आहेत आणि धडकी माणसं आहेत. शहरी माणसं आहेत. सगळीच स्खलनशील आहेत. माणसात-प्राण्यात-मातीत जीव गुंतवण्याइतकी जिवंत आहेत. काही भाग काळा-करडा असेल त्यांच्यातला. तरी काही हिरवाही आहे. प्राणी आणि पक्षी आहेत. शरीर आणि शरीराच्या मागण्या असलेले. त्यापल्याडची अनाम, मुकी जाण असलेले. आणि त्यापलीकडचा निसर्ग आहे. आपसांत बांधलं जातं त्यांच्यात काही. काही तुटतं. जगण्याच्या प्रवाहात सामावून जात पुन्हा ईर्ष्येनं वाहतं होऊ पाहतं. होतंही.
निवेदक एकाच एका सुरात, एकाच एका भाषेत बोलत नाही. कधी वर्तमानपत्रातली बातमी देतो. कधी पुस्तकी प्रमाण भाषेत बोलत त्रयस्थ निरीक्षणं नोंदतो. कधी पात्रांच्या मनात शिरून क्लोजप्स टिपत राहतो. निवेदनाच्या ओघात अप्रमाण, स्थानिक शब्द वापरतो आणि चित्रदर्शी संदर्भ पुरवून त्यांचे अर्थही डोक्यात रुजवून टाकतो. कधी तो कसलाही आव न आणता गोष्ट सांगतो सरळ. कधी गोष्टीतून बाहेर येतो आणि चौथ्या भिंतीवर उभा ठाकून आपल्याशी गोष्टीच्या शेवटाबद्दल चर्चा करतो. चार भिंतींच्या स्टुडिओत चालणारं क्लोजपीय शूटिंग थांबवून कॅमेर्यानं आपलं कॅमेरापण ओळखून बाहेर झेपावावं आणि लाँग शॉट्स टिपावेत, तसे लाँगशॉट्स टिपतो कधी. गावकीचे. भावकीचे. त्यांना आतूनबाहेरून वेढून घेत घोळसणार्या निसर्ग नामक व्यवस्थेचे. कधी सदसद्विवेकी आवाज होऊन, काय होऊन हवं आहे त्याला गोष्टीत, ते सांगतो. ते न होण्याची अपरिहार्यता कळल्यावर हताश होतो. तरीही आपल्या पात्रांमधला चिवट जिवटपणा हेरतो, वापरतो, कामाला लावतो, गोष्ट घडवतो आणि तरीही गोष्टीला ताशीव-घडीवपण येऊ न देता वाहतेपण राखतो.
गोष्टीत पारंपरिक संकेत आहेत अनेक. अनिष्टाची चाहूल लागते काही घटनांतून . पिंडाला कावळे शिवतात वा शिवत नाहीत. कुत्री भेसूर रडतात गळे काढून. अवकाळी पाऊस येतो. पुरुषाचं आणि स्त्रीचं मीलन होतं वा अभद्रपणे अर्ध्यावर विझून जातं. एखाद्या काळरात्री अगम्य-अनाकलनीय शहाणपण ल्यालेले अद्भुताच्या सीमीवरचे अतिवृद्ध येऊन डोक्यावर हात फिरवून जातात. बदल घडवू पाहणारे काही उत्प्रेरक घटक असतात. प्रियकर आणि प्रेयसीची कहाणी सुफळ-संपूर्ण होणार की अधुरी राहणार अशी हुरहुर दाटते. या सगळ्या बाबी कमालीच्या प्रेडिक्टेबल असूनही – एक फार उत्कंठावर्धक, जिवंत आणि शहाणी गोष्ट घडवतात.
हे फार विलक्षण आहे.
**
शेत किंवा पीक या गोष्टींशी वृत्तपत्राखेरीज कधीही काहीही संबंध न आलेली मी एक सुखवस्तू शहरी व्यक्ती. ‘मला ग्रामीण साहित्य नाही बॉ आवडत’ असं नाक मुरडून म्हणण्याची सवलत मला आयुष्यानं दिली आहे. आजच्या भयावह विस्तारलेल्या आणि धावपळीला बांधलेल्या माझ्या जगात, माझ्या ताटात येणार्या अन्नाचे स्रोत असलेल्या या माणसांशी मला जोडून घेणारं दुसरं काय शिल्लक आहे?
कदाचित फक्त गोष्टच आहे.
गोष्टीची ही ताकद अभंग राहो. आपल्याला अशा गोष्टी सांगणारे अनेक आवाज चिरंतन राहोत.
मिळालं गं मला हे पुस्तक काल वाचनालयात ! आत्ता वाचून संपवलंय आणि थेट इथंच आलेय थ्यान्क्यू घालायला. चिक्कार सोबत होणार या गोष्टीची.
ReplyDeleteपुन्हा वाचायचा धीर होईल तुझा?
Delete