क्लिशेड् कविता
किर्र काळोखात ओढलेल्या सिगारेटचा सुलगता, सोबत करणारा निखारा
तटतटलेल्या स्नायूंमधली दुखरी कळ तश्शी जिरवत जीव खाऊन धावलेली शेवटची पंधरा पावलं
हाडं फोडणाऱ्या थंडीत धुमसत्या हट्टानिशी डोक्यावर ओतलेला बर्फगार तांब्या
कडाक्याचे वाद हसत आत परतवून लावत चेहऱ्यावर राखलेलं मऊ स्माइल्
गरगरता पंखा बघत, कापरी हटवादी भीती कोपऱ्यात रोखून धरत, अपरात्रीची भूक पाण्यानं विझवत बेमुर्वतपणे झोपी गेलेल्या अगणित उन्हाळी रात्री
ओठावर दात घट्ट रोवत आतल्याआत कोंडून धरलेल्या सगळ्या क्लिशेड् कविता
कशाकशाची किंमत चुकती करता येईल तुला?
कर तर मग.
हिशेब चोख मांडून ठेवलाय.
झिणझिण्या आणणारे लिहिलेयस
ReplyDeleteइतकं सगळं अनुभवल्यावर कविता क्लिशेड् कशा असतील? आणि असल्या तरी जगण्याशी जोडलेल्या असतील तर असू देत त्या क्लिशेड्. आपल्याच कवितांना उपरोधाने क्लिशेड् म्हणलेलं असेल तर त्याची गरज वाटत नाही असल्या अनुभवांच्यानंतर.
ReplyDeleteअसूच देत. उपरोध नाही तो. उलट क्लिशे मानल्या गेलेल्या बहुतांश गोष्टी टाळता येणार नाहीत इतक्या खर्या असतात या गोष्टीच्या दिशेनं फेकलेला सलाम आहे. दुसरी मजा म्हणजे, ही कविता लिहून झाल्यावर पुन्हा वाचताना मला गुलजारचं मेरा कुछ सामान अपरिहार्यपणे आठवलं आणि माझी चिडचिड झाली. ट्यूरिंगनं अनेक जुनेच शोध लहानपणी पुन्हा नव्यानं लावल्यावर आणि जुन्या शोधांबद्दल त्याला कळल्यावर त्याची झाली असेल तशी. मग 'गुलजार असेल, तर त्याच्या घरी. तो आधी झाला हा त्याचा प्रॉब्लेम ए, माझा नाही.' असं फणकारून मी घट्ट राहिले. त्याचीही ती अॅक्नॉलेज्मेंट.
Delete