***
माझा एक म्यानेजर मित्र आहे. पहिल्या नोकरीच्या काळात सगळीकडूनच झिलई चढायची असतानाच्या आणि अंगच्या रानवट उद्धटपणाची कोवळीकही ओसरलेली नसतानाच्या दिवसांपासूनचा.
आमच्यात चकमकी झडत बर्याच. पण गप्पाही होत कसल्याही आडव्यातिडव्या, तुरळक आणि घनदाट. गरुडपुराण ते झेन तत्त्वज्ञान आणि फिल्म फेस्टिवल ते जर्मन व्याकरण - अशा रानोमाळ. तेव्हा मित्र म्हणजे एकमेकांना 'भ'कारी हाका घालणारे आणि रात्रीबेरात्री जागवताना साथ देणारे समवयस्क प्राणी इतकीच संकुचित व्याख्या असत असे. म्यानेजरला माझा मित्रबित्र म्हटलं असतं कुणी, तर मी फिदिफिदि हसले असते म्हणणार्याच्या तोंडावर; इतकं अंतर आमच्यात. वयाचं, समजुतीचं, हुद्द्याचं, पगाराचं, शिक्षणाचं... पण एक दिवस तो काहीच जाहीर न करता दांडी मारून माहेरी म्हणून गेला आणि उगवलाच नाही. मग नव्या प्रोजेक्टाच्या कामी बदली करून गेला, तो गेलाच. पहिले एखाद-दोन दिवस 'बाई नाही आल्यात' म्हटल्यावर जसा दंगा वर्गात होतो, तसल्या हुल्लडबाजीत सरले. पण नंतर मला एकदम करमेचना, का करमेना हेही कळेना. त्यातल्याच एका दुपारी कितव्यातरी चहाच्या कपावर कुणीच टोकलं नाही, तेव्हा मला एकदम साक्षात्कार झाला आमच्यातल्या मैत्रीचा. एका सहकार्याची उधार सिगारेट मुद्दामहून डिवचल्यासारखी शिलगावत मी म्यानेजर मित्राच्या रिकाम्या खुर्चीला नव्यानं हॅल्लो केलं.
अगदी तस्संच हॅल्लो मला त्या गावानंही करायला लावलं.
सुरुवातीला मी धुसफुस केली बरीच. इथे रहदारीच फार. रस्तेच चिंचोळे. लोकच गावठी. उकाडा किती. भाडी किती फुकटच्या फाकट. घामच कसा येत नाही इथे. एक ना दोन. त्यात भाषा परकी. आपल्या भाषेतून उसवून अशा भलत्याच भाषेत येऊन पडायची माझी पहिलीच खेप होती ती. नुसतीच चिडचिड चिडचिड होई. तिथल्या डांबरी सडकांवर पडणारे फुलांचे राजस सडे बघून आणि तिथल्या चिमुकल्या बागा मनःपूत भोगूनही माझी नजर मृदावत कशी ती नसे. "या गावठाण गावाला करायचंय काय इतकं सौंदर्य... आमच्याकडे..."छाप शेर्यांच्या अनेकानेक आवृत्त्या मनात फणकारत राहत. त्यातच नवीन घर लावायचा लबेदा. घरं पाहा. घासाघिशी करा. तारखांचे हिशेब घाला. पागड्या जमवा. रूममेट या नवीनच नातेवाइकाशी जमवून घ्यायला शिका. तुटपुंज्या लायब्र्यांतून मिळणार्या पुस्तकांवर भागवून घ्या. घरच्या आणि घरच्या रस्त्यांवरच्या जेवणाच्या आठवणीचे आवंढे गिळा...
आपल्याला स्वैपाक नामक प्रकार मनापासून आवडतो हा शोध लागायलाही बराच वेळ गेला त्या सगळ्या धामधुमीत. सांडलवंड, उताऊत, जाळपोळ, करपवाकरपवी, नासाडी - अर्थात चिकार. पण तिथल्या भांड्याकुंड्यांच्या दुकानातून हिंडून, परक्या भाषेत लंगडी घालत, मनासारख्या झाकण्या आणि पातेल्या आणि सांडश्या आणि सुर्या मिळवायला बेहद्द मजा आली. मधापासून खडीसाखरेपर्यंत आणि पापडामिरगुंडापासून लिंबाच्या लोणच्यापर्यंत साग्रसंगीत भातुकली मांडल्याचं मी खरं नोंदलं, ते घरच्या मंडळींनी केलेल्या भोचक हलवाहलवीनंतर माझ्या कपाळी आठी उमटली तेव्हा.
मग एकदा गॅसचं बटण बंद करायला विसरून गेल्यावरही घरानं जाळलंबिळलं नाही.
एकदा फिरायला जाण्याच्या धांदलीत घराचं दार सताड उघडं टाकून गेल्यावरही कुणी काही चोरलंबिरलं नाही.
एकदा गल्लीच्या तोंडाशी हापिसातला एक सहकारी भेटला आणि मग तिथेच उभं राहून आम्ही पंधरावीस मिनिटं इंग्रजीतून गप्पाष्टक रंगवलं, तेव्हा मला ‘इकडे ओळखीचे लोकपण भेटायला लागले वाटेत गप्पा करणारे, अं?’ असं वाटून चपापायला झालं.
एकदा गावाच्या पार पलीकडच्या टोकाला जाऊन एका नाटकाचा प्रयोग पाहिला आणि दस्तुरखुद्द नसीरला स्वागताला उभं पाहून अपरात्री कधीतरी तरंगत घरी आले, तेव्हा गल्लीच्या तोंडाशी असलेल्या रातराणीकडे लक्ष्य गेलं...
एरवी दारासमोर जुईचा वेल, फाटकातून बाहेर पडताना टपोरलेला सोनचाफा, चार पावलं चालून गेल्यावर नागचाफ्याच्या पाकळ्या अंथरलेल्या, मग सोनटक्क्याचं रान, आणि गल्लीच्या तोंडाशी चक्क प्राजक्त आणि रातराणी – असल्या श्रीमंतीनं माझ्या मत्सरी मनाचा जळफळाटच व्हायचा वास्तविक. तो झाला नाही, तेव्हाच माझ्या लक्ष्यात यायला हवं होतं. पण तिथल्या चुरचुरीत हवेत गच्चीवरून उन्हाळलेल्या वासाचे कपडे गोळा करून आणताना; भाज्याफुलांची दक्षिणपथी नावं आत्मसात करताना; शेजारचा खडूस चश्मेवालां आठेक दिवस गायब होऊन मग एकदम नववधूसकट माणसाळून परतला तेव्हा त्यांना चहाला बोलावताना; रस्त्यावरचे हे एवढाले दैत्याकार मारुतीचे पुतळे बघूनही न दचकता सवयीनं पुढे जाताना; ‘अगदी ‘पृथ्वी’ची आठवण येते किनाई?’ हे म्हणायला विसरून जात रिक्षावाल्यांनी बांधलेल्या थेटरात कितवंतरी नाटक पाहताना… आणि ‘आता घरी जायचं!’ या तहानेनिशी आनंदून मायभाषेत परततानाही -
नाही लक्ष्यात आलं खरं.
एका मैत्रिणीला भेटायला म्हणून त्या गावी पुन्हा फिरकले आणि सहज म्हणून त्या गल्लीत शिरले. एकदम भॉ करून हक्कानं दचकवावं कुणी आणि मग मिठी घालावी, तसं त्या गल्लीनं दचकवलं मला. ‘ते माझं जुनं घर’ असं मैत्रिणीला खालून दाखवताना आवंढाच आला एकदम घशाशी. आवरताना पुरेवाट.
मग माझा पहिलावहिला संसार मांडून देणार्या त्या गावातलं म्यानेजर मित्राचं बिर्हाड हुडकून काढलं आणि जाऊन त्यालाही भॉ केलं. चकित झाला, पण आनंदला. काय करावं त्या लबाड माणसानं? मिश्कील हसत मला सिगारेट ऑफर केलीन् की!
मनापासून खुशालत त्याला ‘नको’ म्हटलं आणि मधल्या काळात राहून गेलेल्या गप्पा मारायला घेतल्या त्याच्याशी...
***
भाग ०५
भाग ०५
हे वाचताना मला माझी पहिली नोकरी आठवली.मला भयंकर जीवावर आलेलं मुंबई सोडून जायला. हैदराबादमध्ये मी उतरले तेव्हा उन्हाने अक्षरशः आग लागलेली सगळीकडे.दर पाचव्या मिनिटाला मला कुठे आणि का आलेय मी असं उगाचच रडू येत होतं.मग घर घेतलं तिथे रेंट्वर.स्वयंपाकाला येणाऱ्या मावशी,खालचे वाच्मान काका,दूधवाला,अशी सपोर्ट सिस्टम झाली तयार.रूटीन बसलं.आणि मग बाल्कनी मध्ये मोगरा लावला.I think that was the point when I accepted that city as my own. त्या नंतर त्या शहरात किती काय काय अनुभव घेतले,किती फिरले,किती नाती बनवली. झक्कत जाऊन एकटीने पहिली स्कूटर घेतली. माझं स्वतःच असं ते पाहिलं घर,पहिलं शहर. मला चालायचं तिथलं तोड मोड हिंदी,आणि चांगला नसलेला बस प्रवास,आणि ना शिस्त असलेंल ट्रॅफिक.आणि मोठ्ठी मोठ्ठी साड्यांची दुकानं,प्रत्येक गल्लीबोळात ढिगाने दिसणारे डॉक्टर,चहा ऐवजी कॉ फीच्या टपऱ्या.मला आठवतंय मला "माझं" ते घर सोडून सुट्टीत मुंबईला येतानाही कुठेतरी वाईट वाटायचं मग नंतर.
ReplyDeleteआता परत हैदराबादला जायचं होतं कामासाठी.आणि मला जवावेना अक्षरशः. ब्रेक अप झाल्यावर कसं होतं,की विश्वास नसतो स्वतःवर की जे परत आपल्याला कधीच मिळणार नाही ते समोर आलं तर कदाचित सहन होणार नाही. तसंच वाटलं मला.मग लक्षात आलं,अरे मी तर चक्क प्रेमातच पडले होते या शहराच्या.
थॅंक्यू! फारच चपखल नि भारी दाद. :)
Delete