वास्तव्याच्या ठिकाणांशी, शहरांशी, रस्त्यांशी आणि सार्वजनिक
जागांशी.. आपले लागेबांधे जोडले जातात. आपल्या वरकरणी विनाकारण बदलत्या मूड्सवर
त्यांची छाया असते. ते छायाप्रकाश पकडण्याचा हा प्रयत्न.
***
एरवी लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर खूश व्हायला व्हावं अशा
अनेकच गोष्टी असतात. पण जर ठाण्यात पहिल्या नंबरच्या फलाटाला दिवसाउजेडी ठाणा-गाडी
आली, तर मला विशेष खूश व्हायला होतं.
एकतर एक नंबरला गाडी येण्याची चाहूल तशी पुष्कळच आधी लागते. एरवी जोशात असणारी
गाडी थोडी रेंगाळते आधीच. मग गर्दीत कुणाचं लक्ष्य जाणार नाही, पण एखाद्याशी कानगोष्टी करता येतीलशा बेतानं एखादीनं हळूहळू
एखाद्याच्या जवळ सरकावं, तशी ती हळूहळू पश्चिमेच्या दिशेनं
सरकायला लागते. त्या बाजूच्या रुळांना लागूनच असाव्यातशा इमारतींमध्ये डोकावून
पाहता येईल, वेळी कुणाला हात हलवून दाखवता येईल
इतकी कडेला होते. तिचा वेगही पुष्कळ मंदावतो. कधीकधी तर ‘आता आलंच खरं, पण जाववेना बाई’ असं म्हणत असल्यासारखी थांबतेदेखील
मिनिटभर. मग सावकाश एक नंबरच्या फलाटाच्या दिशेनं निघते. पलीकडच्या दारात उभ्या
असलेल्या बायका पराभव पत्करून या दिशेच्या दाराकडे घरंगळतात. डाव्या बाजूची गटारं,त्यावर
कायम पोसलेलं गचपण, रेल्वे क्वार्टर्सच्या उखीरवाखीर
इमारती, तिथेच काहीतरी संशयास्पद करत
बसलेलं एखादं बारकं पोरगं, सार्वजनिक मुतणं म्हणजे पौरुषाचा
परमाविष्कार मानणारे काही पुरुष... असं काय-काय दिसतं, पण एकुणात त्या दिशेला शांतता असते.
मला त्या फलाटावर गाडी शिरताना कायम शनिवार सकाळ
असल्यासारखी खुशी होत असते. काहीही कारण नसताना असा उगाच आनंद होण्याचं कारण बहुधा
लहानपणी महिन्याअखेरच्या शनिवारी आईसोबत तिच्या शाळेत जाण्यामध्ये असावं. असे
शनिवार अगदीच चुकार असणार खरंतर. पण का कुणास ठाऊक, मला ते अगदी लख्ख आठवतात. बाहेर पडता पडता बाबा आईला न
चुकता बजावायचे, तिला घेऊन दारात उभी राहू नकोस...
छे, छे.... असं काहीतरी मिश्कील
उत्तरून आम्ही निघत असू. शाळेत ‘बाईंची मुलगी’ म्हणून फुकटचा भाव खाणं, आईच्या मैत्रिणींकडून लाड करवून घेणंआणि कंटाळा यायच्या आत
परतणं. येताना गाडी एक नंबरच्या दिशेनं आली तर आईला स्टोरी विचारायची, तू इकडे उडी मारून उतरायचीस ना? ती ‘हो’ म्हणे आणि मागल्या बाजूनं बीकेबिनच्या गल्लीत शिरलं की अगदी
घरापाशी कसं बाहेर पडता येतं तेही सांगे.
गाडी एक नंबरला आली, की खरी मी खट्टूच होत असणार. कारण दोन नंबरवर गाडी आली की
तिथल्या नीरावाल्याकडे दोन ग्लास नीरा प्यायची हा अलिखित संकेत. दुपारी बाराच्या
आत स्टेशनावर पोचून ‘आता घरीच
जायचंय’ अशा निवांतपणे, आंबट न होऊ लागलेली नीरा पिण्यात काहीच्या काही जादू
असायची. ती हट्ट करून मिळवलेल्या उसाच्या रसातही नसे आणि घरच्या लिंबा-कोकमाच्या
सरबतातही.
एक नंबरच्या फलाटाकडे गाडी वळली, की मला हे सगळं हमखास आठवतं. स्पष्ट आठवलं – न आठवलं, तरीही मूड जागा करण्याइतकं पृष्ठभागापाशी येतं. आणि मग एकूण मजाच वाटते. कशाची ते धड सांगता न आलं तरीही. मग रिक्षाबिक्षाचा नेहमीचा आळस विसरून मी रेल्वे क्वार्टर्सच्या सुनसान गल्लीतून चालतच बीकेबिनमध्ये शिरते.
पूर्वी गावातला हा भाग म्हणजे गुंडांचं माहेरघर असलेलं. तिकडून एकट्यादुकट्या बाईनं येणं म्हणजे धोक्याचंच. पण माझ्यासाठी त्या ऐकीव कथाच. गाव बेसुमार वाढत गेलं, तशा जागांच्या वाढत्या किमतींनी बीकेबिनचा थरारही गिळंकृत केला आणि आता, कसा कुणास ठाऊक, पण स्टेशनाजवळच्या परिसराला येणारा बकालपणा टाळून कनिष्ठ मध्यमवर्गीय घरगुतीपणा धारण करत आणि कुठेकुठे चुकार ठिकाणी आपलं मवालीपण मिरवत हा तुकडा निराळ्या स्वभावाचा उरला आहे. जाणीवपूर्वक विचार न करताच हे मनात वागवत मी श्रीराम बुक डेपोपाशी बाहेर पडते. आता खरंतर तेही गळपटलंच आहे. पण पूर्वी श्रीराम बुक डेपो म्हणजे माझ्या बैठ्या पुस्तकप्रेमी विश्वातली अलीबाबाची जादुई गुहा होती. तिथे आल्यावर माझ्या अनामिक खुशीला आणखी एक नवा वळसा मिळतो आणि मग मी सावकाश रहदारीच्या दिशेनं वळते...

जागा ही आपल्या असण्याचा भाग नकळत बनून जाते खरी. लहानपणच्या जागेतच पुढचं आयुष्यही (निदान काही काळ तरी) घालवता आलं असतं मला, तर काय मजा आली असती याचा थोडासा अंदाज या लेखनातून येतो आहे....
ReplyDeleteअगदी अगदी. काही ठिकाणी गेल्यावर उगीच मनावर झाकोळ येतो, काही ठिकाणी नुसता अनाकलनीय उत्सव. काही ठिकाणं मी उद्मेखून अशा लाग्याबांध्यांतून सोडवून घेतली आहेत.. कोरी करून पुन्हा नव्यानं रंगवली आहेत. मजाच वाटते, आपण किती तीव्रपणे आणि नकळत कशी कुंकवं लावून ठेवत असतो भावहीन निर्जीव जागांना!
Deleteअसं मला फक्त मुंबईतच ४ जागांना करता येईल. :)
Deleteमला बहुतेक मी राहिल्ये त्या सगळ्याच गावांना. लहानमोठे कसेही मुक्काम.
Deleteसुंदर लिहिलंय...
ReplyDelete:) धन्स.
Deleteमनात बऱ्याच जागा जाग्या झाल्या तुझ्या लिहिण्या मुळं। मस्त लिहिलं आहेस। ललित वगैरे सोस असलेली कहर वर्णनं नसतात तुझी,व्वा!
ReplyDeleteआभार. :)
Delete