Monday, 1 February 2016

यंदा

यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय.

सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री निर्जीव संबंध... सगळं एका मिश्कील हसण्यासोबत एखाद्या तळ्यात सोडून द्यायचंय. हळूहळू तळ्याच्या पोटात ते सगळं गडप होईल नि ’पाथेर पांचाली’मध्ये धरते तशी विश्वासू शेवाळाची अलगद साय त्याच्यावर धरेल. त्याच्याकडे बघताना मीही आतून निवांत, आश्वस्त होत जाईन आणि सैलावून, पाण्यात पाय सोडून बसेन तिथेच. उतरती उन्हं असतील. निवांतपणा असेल, पण शांतता मात्र जिवंत असेल. एखादा चुकार बगळा. हात लांबवला तर सहज बोटाला लागेल अशी एखादी हवेवरची सुरेल हाळी. थोड्या तुरतुरमुंग्या.

’आता थोड्या वेळात परतूच...’ असं म्हणता म्हणता किती वेळ जाईल कुणास ठाऊक. पण अंधार पडेल तोही आपण जागरणं करता करता स्वैपाकघरात जातो नि दिवा न लावता सवयीनं पाणी पिऊन परत येतो, तेव्हा भोवती असतो तसा - मायाळू. मग कुठेही परतावं - ते घरच असेल!

यंदा. नक्की.

8 comments:

  1. मस्त ! मेघना... तुला काय म्हणायचेय ते लख्ख समजले....
    गेट्टुगेद्री...म्हणजे पहिल्यांदा समजलेच नाही. मला वाटले काही बंगलोरचा कन्नड शब्द आहे!
    असो असो :-)
    अजून जरा विस्तारीत चालला असता लेख! यंदा.........फार संकल्प करु नयेत मुळात!

    ReplyDelete
  2. त्या स्फुटाचा जीव त्याहून जास्त नव्हता. पण मायक्रो तर मायक्रो, त्याची जागा ब्लॉगवरच आहे, असं म्हणून नेटानं वर्षारंभ केला! आभार. :)

    ReplyDelete
  3. आमेन मेरे दोस्त! सापासारखी कात टाकता यायला हवी, गोवन म्हणतात तसं सुशेगाद व्हावं. कुठलं तरी रिस्टार्टचं बटन दाबता यायला हवं!!

    ReplyDelete
  4. गेट्टुगेद्री निर्जीव संबंध!!! brilliant

    ReplyDelete
  5. आभार, संवेद आणि अनिरुद्ध.

    ReplyDelete
  6. आंबट-गोड आणि गुरुप्रसाद, आभार.

    ReplyDelete
  7. आत्ता वाचलं मी.
    मला पण यायचंय☺

    ReplyDelete