Saturday, 27 December 2014

हॅपी न्यू इयर


ब्लॉग या माध्यमप्रकाराकडे छद्मी हसून पाहण्याची सध्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. व्यक्तिगत अनुभवांचे अर्धकच्चे तपशील, डायरी, प्रेमभंगाचे अभंग, खवासदृश पाडलेल्या कविता, एकांतमैथुनं, लोकसन्मुखतेचं वावडं वगैरे वगैरे लागेबांधे ब्लॉग या गोष्टीला लागूनच येतात, असं एक आहे. तर ते तसं आहेच, हे एक सुरुवातीला मान्य करून ठेवू या. या म्हणण्याचा पुढच्या म्हणण्याशी थेट संबंध शोधायला जाण्यात तसा अर्थ नाही. पण नेपथ्यात वापरलेली प्रॉपर्टी नाटकात प्रत्यक्ष वापरली नाही, तरीही तिचं महत्त्वाचं काम असण्यातून नि दिसण्यातून पार पडत असतं हे माहीत असणार्‍याला त्या म्हणण्याचे अर्थ सापडतील असं धरून चालू.

***

तर - बरेच लोक, बरेच कार्यक्रम, बरीच कामं आणि त्या सगळ्याशी एकसमयावच्छेदेकरून (हा शब्द वापरला की धन्य होण्याची एक नवी परंपरा मराठीत रूढ झालेली आहे. तिला छेद देण्याचा प्रयत्न करतानाच मी तिच्या दिशेनं एक सलाम फेकला आहे. याचाच अर्थ परंपरा म्हणून ती यशस्वीपणे घडली आहे, हे मान्य केलं पाहिजे.) वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे असं सध्याचं चित्र आहे.

मी त्यावर नाखूश आहे का?

नाही.

पण माणसांपासून शक्यतोवर फटकून राहून, माणसांइतकी अस्थिर-जिवंत-शक्यताबहुल नसलेली माध्यमं वापरून, जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याची आतापर्यंतची माझी शैली मला मधूनमधून आठवत राहते आहे. त्यात एक धीमेपणा, अखंडपणा, शांतता होती. माझ्या वेगानं गोष्टी स्वीकारण्याची वा नाकारण्याची मुभा होती. मला हवं असेल तेव्हा अंतर्मुख होऊन मौनात जाण्याची सोय होती. आता ते नाही. पुस्तकं आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टी वापरणार्‍या माणसाला मी करते आहे ती तुलना अधिक जवळून कळेल कदाचित. त्या अर्थानं माणसं इंटरनेटवरच्या संवादी माध्यमांसारखीच असतात असं दिसतं आहे. ती तुम्हांला स्वस्थ बसू देत नाहीत. तुमच्याकडून सतत वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं - अहं, प्रत्युत्तरं? चक. प्रतिक्रिया - प्रतिक्रिया मागतात. तुमच्याकडून बळंच काढूनही घेतात. तुम्हांला थांबू देत नाहीत. त्यांना वाचणार्‍या तुमच्यात होणार्‍या बदलांसह, बदलांमुळे आणि बदलांना न जुमानताही तीही निरंतर बदलत असतात. मागचं पाऊल उचलून पुढे टाकेस्तोवर त्यांच्या असण्याचे आयाम कदाचित बदललेलेही असू शकतात आणि ते तुमच्या मागच्या पावलाशी नक्की कुठल्या प्रकारचं नातं ठेवून असतील ते तुम्हांला सतत जोखत राहावं लागतं; किंवा ते न जोखण्याचे परिणाम स्वीकारायला तयार राहावं लागतं. त्याचेही तुमच्यावर आणि त्यांच्यावर होणारे परिणाम असतातच...

हुह.

हे थकवणारं आहे, प्रश्नच नाही. पण हे विलक्षण दिलचस्प आहे, हेपण आहेच. त्यांतून हाती काय लागतं आहे त्याचे हिशेब होत राहतील. वेळ मिळेल तसतसे. तोवर - पुस्तकं न वाचणारे आणि आधुनिक माध्यमांच्या आणि माणसांच्या तथाकथित झगमगाटात रमणारे लोक उथळ असतात असं विधान सर्वमान्य असण्याच्या दिवसांत त्या विधानाचं पोकळपण तेवढं मी नोंदून ठेवते आहे.

अंतर्मुख होण्याइतकी सवड देणार्‍या, पण तितक्याश्या लोकप्रिय न उरलेल्या, ब्लॉग या माध्यमातून.

हॅपी न्यू इयर.

4 comments:

  1. बर्‍याच दिवसांनी हा ब्लॉग उघडला. बर्‍याच दिवसांनी या ब्लॉगवर पोस्टींग झालं असावं.

    "ब्लॉगिंग आणि जगणं" याची तुलना आवडली. लिहिणं आणि जगणं यातलं द्वैत, लेखकाचं जीवन , बायोग्राफीज् हा प्रांत समृद्ध आहे. कवीने लिहिलेल्या "तो एक माझ्यातला घनतमीं तेजाळतो" यांसारख्या ओळी मनात येऊन गेल्या. (वाचताना एक गमतीदार विचार आला. "मच्छीमारी आणि जगणं" अशा स्वरूपाचं लिखाण तो हेमिंग्वेचा म्हातारा कसं करेल ? :-) )

    तर मुद्दा असा की, ज्या गोष्टीबरोबर आपलं घनिष्ठ नातं जुळतं "ती गोष्ट आणि जीवन" अशी तुलना, त्या तुलनेतून केलेलं लिखाण होणं अपरिहार्य आहे. अशोक केळकरांनी "भाषा आणि जीवन" हे नियतकालिकच वर्षानुवर्षं चालवलं हे या संदर्भातलं एक महान उदाहरण म्हणायला हवं. याउलट "माझ्या जीवनाची सरगम" असं छान नाव घेऊन सी रामचंद्रांनी बरंच गॉसिपिंग आणि स्कोअर सेटलिंग केलं हेही त्रासदायक उदाहरण आठवतं.

    मेघना या माझ्या प्रिय मैत्रिणीचा घनिष्ठ संबंध ब्लॉगिंगशी आहे आणि ती ब्लॉग छानच लिहिते त्यामुळे हे लिखाण इतकं पारदर्शी, "सत्य असत्याशी मन केले ग्वाही" प्रकारचे झाले. या ब्लॉगएंट्रीतली, माणसांशी असणार्‍या नात्याबद्दलची निरीक्षणं छान आहेत. "नातेसंबंधांची मायक्रोबायोलॉजिस्ट" असं मेघनाचं वर्णन करता येईल. (आम्ही इतके coarse की मायक्रोस्कोप सोडा साधं भिंगही वापरणं जमत नाही. बटबटीत चर्मचक्षूंना जे दिसेल ते खरं :-) )

    असो. लिखाण आवडले हेवेसांनल.

    ReplyDelete
  2. मेघना, हे तू काही तरी मोठं सांगु पाहाते आहेस. निव्वळ प्रतिक्रियेवर थांबण्याची ईच्छा नाही. तुझा या मागे विचार असेलं असं दिसतय. तसं असेल तर काही तरी धमाकेदार करायचं का?

    ReplyDelete
  3. And yes, Happy New year my fellow Blogger. I use this title with a proud feeling like "Poet" Borkar used to do

    ReplyDelete
  4. @ मुक्त सुनीत

    आभार. बाकी ’ब्लॉग छानच लिहिते’ म्हणजे काय हे जरा कळलं नाही. ब्लॉग हे प्रकाशनाचं एक माध्यम तेवढं आहे. बाकी लिखाणाचा प्रकार सर्वत्र असतो तोच. कविता, कथा, स्फुट, कांदा, लसूण इत्यादी इत्यादी. हे असं निबंधाच्या वहीला धापैकी धा मार्क दिल्यासारखं ’ब्लॉग छान’ असं का म्हणताय? तुम्ही जुने ब्लॉगर... असो! बाकीची कुरकुर मरूदेत. तर - जगणं आणि ब्लॉगिंग. इतकं मोठं काही म्हणू बघतेय का मी? माहीत नाही. माहीत नाही.

    @संवेद
    पुन्हा एकदा - मोठं आहे का यात काही? ठाऊक नाही. या माध्यमालाच शाळकरी-हौशी म्हणून हिणवणार्‍या कमेंटांचा मात्र तिटकारा आला एकाएकी इतकं खरं. काय धमाकेदार करायचं म्हणतोस, फेलो ब्लॉगरा?

    ReplyDelete